Home > Election 2020 > भाजप-सेनेच्या कलगी तुऱ्यातून एनडीएच्या मित्र पक्षांनी धडा घ्यावा

भाजप-सेनेच्या कलगी तुऱ्यातून एनडीएच्या मित्र पक्षांनी धडा घ्यावा

भाजप-सेनेच्या कलगी तुऱ्यातून एनडीएच्या मित्र पक्षांनी धडा घ्यावा
X

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते, प्रमोद महाजन, यांनी १ जानेवारी १९९० मध्ये जेव्हा पहिल्यांदाच शिवसेनेबरोबर युती घडवून आणली, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कागदाच्या तुकड्यावर एक आकडा खरडला आणि, “आम्ही २०० जागा लढवितो, तुम्ही उरलेल्या लढा,” असं भाजप नेत्यांना स्पष्टपणे सुनावलं. अर्ध्या तासात हा करार झाला. अखेरीस त्या निवडणुकीत २८८ पैकी सेनेने १८३ आणि भाजपने १०५ जागा लढवल्या.

आणि आज २०१९ च्या निवडणुकीमध्ये सत्तेचे पारडे फिरवत भगव्या युतीत करार मदार करताना भाजपने शिवसेनेची मुस्कटदाबी करून त्यांना दुय्यम स्थान स्विकारायला भाग पाडले. केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात सत्तेचा सारीपाट असा फिरवला की, हे नाट्यपूर्ण बदल झाले.

सत्तेचा समतोल भाजपकडे झुकणे सेनेसाठी फारच त्रासदायक आहे. विशेषतः संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मंथनातून जन्माला आलेल्या प्रखर मराठी अस्मिता असलेल्या शिवसेनेला दोन गुजरात्यांचे वर्चस्व सहन करण्याचा कडू घोट गिळावा लागला. आणि ‘मराठी माणसांना’ त्याच्या घरातच अपमानित करून खालच्या पायरीवर बसवण्यात आलं.

या सर्वातून लक्षात येतंय की, सरकार स्थापनेसाठी आतुर झालेल्या भाजपसमोर शिवसेनेने आळीपाळीने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह का धरला आहे? २०१४ मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढा दिला. निकालानंतर सेनेला भाजपाच्या अटी आणि शर्ती स्वीकारण्या शिवाय गत्यंतर नव्हते.

हे ही वाचा

मतदारांनी भाजपला इशारा दिला आहे - राजदीप सरदेसाई

मोदीजी आता शुभेच्छापत्रं पाठवा - राजदीप सरदेसाई

महाराष्ट्रात पण आमदारांचा बाजार भरेल.. - राजदीप सरदेसाई

जेव्हा किनारा मुख्यधारा बनतो - राजदीप सरदेसाई

शिवसेनेला महाराष्ट्रात एकही महत्वाचं खातं मिळालं नाही, दिल्लीतही अगदी किरकोळ खात्याचं मंत्रिपद देऊन शिवसेनेची बोळवण करण्यात आली. हतबल उद्धव ठाकरे यांना ‘कमजोर’ नेता म्हणून तर फडणवीस यांना महाराष्ट्राचा नेता क्रमांक ‘एक’ म्हणून प्रस्थापित करण्यात भाजपला यश आले.

२०१४च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत शिरकाव केला. शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या, तर भाजपाने ३१ वरून ८२ जागांवर मुसंडी मारली.

मुंबईतल्या बहुसंख्य उत्तर भारतीय स्थलांतरित जनतेला आकर्षित करायला शिवसेनेची प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली प्रतिमा आडवी आली. याउलट भाजपाने स्वतःला हिंदू राष्ट्रवादाचं एक मंगल चिन्ह म्हणून मिरवले. बाळासाहेब ठाकरेंच्या जमान्यात एका गर्जनेने मुंबई बंद करणा-या वाघाला भाजपाच्या आक्रमक आणि शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या राजकारण आणि कार्यपद्धतीने कागदी वाघ बनवून टाकले.

म्हणूनच २०१९ ची निवडणुक शिवसेनेसाठी अटीतटीची होती. अवघ्या २९ वयाच्या आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले. ठाकरे कुटूंब निवडणूक न लढवता, रिमोट कंट्रोलचे राजकारण सोडून आता प्रत्यक्ष लढाईत उतरणार आहेत याची ही नांदी होती. निकालांनंतर भाजप आणि शिवसेनेच्या संख्याबळातली दरी स्पष्ट झाली. भाजपाच्या चिन्हावर लढवलेल्या १६४ जागांपैकी १०५ जागांवर भाजपाला यश मिळाले. त्यांचा ‘स्ट्राइक रेट’ ७० टक्क्यांहून जास्त आहे, तर सेनेने लढवलेल्या १२४ जागांपैकी ५६ जागा जिंकल्या, हा स्ट्राइक रेट ५० टक्क्यांहून कमी आहे. पण निवडणुकांच्या राजकारणात टी -२० क्रिकेटप्रमाणे स्ट्राईक रेट महत्त्वाचे नसतात; खरं म्हणजे, भाजप महाराष्ट्रात बहुमताच्या आकड्याच्या ३९ जागांनी मागे आहे. त्यामुळे सेनेला सरकार स्थापनेत निर्णायक भूमिका बजावण्यास पुरेशी संधी मिळाली आहे. २०१४ मध्ये, एकटे पडण्याच्या भीतीने सेनेला भाजपची मनमानी स्वीकारण्यास भाग पाडले गेले; पण आता २०१९ मध्ये, भाजपची सत्तास्थापना सेनेच्या समर्थनावर अवलंबून असल्याने वाटाघाटीत शिवसेनेची बाजू मजबूत झाली आहे.

कथेतली ही एकमेव निरगाठ नाही. २०१४ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपबरोबर सत्तेत बसण्याचे पर्याय पडताळून पहायची इच्छा होती; २०१९ मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाची नोटीस बजावल्यानंतर (ED) आणि भाजपाच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याच्या खेळीने दुखावलेल्या शरद पवार यांनी भाजपाची झोप उडवण्यासाठी कंबर कसली आहे.

कॉंग्रेसचा विचार केला तर ते थोडेसे बांधले गेलेले आहेतः महाराष्ट्रासारख्या समृद्ध असलेल्या राज्यात दुसर्‍यांदा भाजपाप्रणीत सरकारची स्थापना रोखण्यासाठी ते उत्सुक दिसतात. पण शिवसेनेशी उघडपणे हात मिळवणी करायला ते तयार नाहीत. (विशेष म्हणजे १९७५ मध्ये बाळ ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता आणि नंतर १९७७ आणि १९८०च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसविरूद्ध उमेदवार उभे केले नाहीत)

राजकीय वर्चस्वाच्या या खेळात मोदी-शाह यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपासमोर लवकरच एक मोठा प्रश्न उभा ठाकणार आहे. भाजप किती काळ आपल्या आपल्या मित्रपक्षांना भाजपच सर्वशक्तिमान आहे. या भ्रमात ठेऊ शकेल? कदचित काही महत्त्वाची मंत्रालये मिळाल्यानंतर सेनेचे समाधान होईलही. पण महाराष्ट्रात घडलेल्या या महाभारतापासून एनडीएच्या युतीच्या प्रयोगाचे अखेरचे दिवस सुरु झाले आहेत का? आज इथे शिवसेना आहे, उद्या बिहारमध्ये नितीशकुमार आणि जनता दल युनायटेड असतील का?

ताजा कलम: प्रत्येक निवडणूकीत नवे यशवंत आणि त्यांच्या यशाचे शिल्पकार पुढे येतात. २०१९ची महाराष्ट्राची निवडणूक त्या अर्थाने नाट्यपूर्ण ठरली आहे.या क्षणी उगवता तारा कोण आहे हे स्पष्ट नाही. पत्रकार कधीकधी यशस्वी राजकारणी बनू शकतात याचे उदाहरण पाहायचे असल्यास सेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्याकडे पाहा. बाळासाहेब ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतल्यानंतर राजकारणात उतरलेला माणूस आता शिवसेनेचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा आवाज बनला आहे!

भाषांतर : रविंद्र झेंडे, पत्रकार लेखक आणि अभ्यासक

Updated : 8 Nov 2019 2:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top