Home > मॅक्स ब्लॉग्ज > २६/११: डॉक्टरने मृत व्यक्त केलेली व्यक्ती हेमंत करकरे होते...

२६/११: डॉक्टरने मृत व्यक्त केलेली व्यक्ती हेमंत करकरे होते...

“बाहेर फायरिंग सुरु होती. तेवढ्यात रुग्णालयात एक मोठा पोलिसांचा ताफा आला. सोबत स्ट्रेचरवर एक धिप्पाड शरीर यष्टीचा माणूस. त्यांना लगेच बेडवर शिफ्ट केलं, चेक करणाऱ्या डॉक्टर्सनी डेड म्हणून घोषित केलं. एकच शांतता पसरली. कांही वेळाने समजले बेड वर पडलेली व्यक्ती हेमंत करकरे होते” वाचा २६ / ११ हल्ल्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेले डॉक्टर रेवत कानिंदे यांनी मांडलेला थरारक अनुभव.....

२६/११:  डॉक्टरने मृत व्यक्त केलेली व्यक्ती हेमंत करकरे होते...
X

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मेडिकल कॅम्पला लागणाऱ्या साधनसामुग्रीची व्यवस्था करण्यासाठी मी आणि माझा मित्र कामा हॉस्पिटलला गेलो होतो. कामा हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या जवळ आहे. कामं आटोपून संध्याकाळी ७च्या सुमारास परत येऊन जेजे हॉस्पिटलला मीटिंग घेतली. जेवण करून रूमवर गेलो. इथपर्यंत रोजच्या सारखाच तो एक दिवस होता. पण रात्री १०च्या सुमारास हॉस्टेलच्या समोरच्या रूम मधल्या माझ्या सिनिअरनी सांगितलं. " मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि कामा हॉस्पिटल परिसरात जोरदार फायरिंग झाली आहे..

हे ऐकून मला धक्काच बसला. गोळीबार आणि तोही सी. एस. टी. परिसरात? आम्ही तातडीने हॉस्टेलच्या टी व्ही रूममध्ये न्युज पाहायला गेलो. तोपर्यंत न्युज दोन गटातल्या हाणामारी वरून दहशतवादी हल्ल्या पर्यंत गेलेली होती. तेवढ्यात न्यूज चॅनेल च्या खालील पट्टीवर लिहून आलं की जखमींना जेजे हॉस्पिटल मध्ये नेण्यात येत आहे.

त्या वेळेस मी एम. बी. बी. एस. च्या थर्ड इयर ला होतो. वय होतं फक्त २० वर्षे. इंटर्न असलेले चार – पाच सिनिअर्स हॉस्पिटलच्या अपघात विभागा कडे निघाले, मी ही लगेच अॅप्रण घालून त्यांच्यामागून गेलो.

वॉर्ड ४ च्या बाहेर डॉ. आकाश खोब्रागडे सर टी शर्ट व नाईट पँटवर उभे होते, त्यावेळेस सर MARD चे सचिव होते. माझ्या कडे पाहून बोलले "रेवत जलदी जा अंदर, बोहोत काम है". सर सर्वांना सूचना देत होते. डायरेक्ट करत होते.

वॉर्ड ४च्या आतील दृश्य पाहून मेडिकलचा विद्यार्थी असून सुद्धा माझे पाय थबकले. आतमध्ये मोठा फोकस लाइट लावलेला होता. सगळ्या बेड वर विव्हळत पडलेले रुग्ण आणि त्यांना तत्परतेने अटेंड करणारे डॉक्टर्स.कुणाच्या हातातून रक्त तर कुणाच्या पायातून, कुणाला डोक्याला जखम तर कुणाला पाठीला बंदुकीची गोळी आणि स्फोटकांमुळे होणाऱ्या जखमा. ते दृश्य मी आयुष्यात पाहिल्यांदाच पाहत होतो.

प्लास्टिकचा गाऊन अप्रनच्या वरून घातला, हातात ग्लोव्हज घातले आणि दिसेल ते काम करणं सुरू केलं. विद्यार्थी असल्या कारणाने मला procedure करणं allowed नसलं तरी BP घेणे, injection, jelco (intracath) prepare करणे,saline bottle - iv line prepration, उपचार करणाऱ्या डॉक्टरला हवं ते हातात आणून देने हे काम मी करू शकत होतो. इथे DAMA च्या मेडिकल कॅम्पचा अनुभव ही कामी आला. गर्दी वाढतच होती. मी आणि माझे दोन वर्गमित्र आम्ही पेशंट्सला wheelchair/स्ट्रेचर वरून उचलणे आणि बेडवर शिफ्ट करणे पासून ते जखमा साफ करणे, डॉक्टर्स टाके मारत असतांना वेदनेने विव्हळनाऱ्या पेशंट्सला पकडणे असे हातात येईल ते काम करत होतो.

तेवढ्यात एक मोठा पोलिसांचा ताफा आला. सोबत स्ट्रेचरवर एक धिप्पाड शरीर यष्टीचा माणूस. कोणी तरी महत्वाचा मोठा पोलीस ऑफिसर असणार असा अंदाज बांधला. त्यांना लगेच बेडवर शिफ्ट केलं, एक सोबत ३-४ डॉक्टरस्,इंटरन्स त्यांना चेक करू लागले, मी ही मदतीला होतो. सोबत आलेले ते ५-६ पोलीस भल्यामोठ्या बंदुका हातात उभ्या करून त्या बेडच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बेडला गोलाकार उभे राहिले जणू काही संरक्षण गोलाकार भिंत. चेक करणाऱ्या डॉक्टर्सनी डेड म्हणून सांगितलं. एकच शांतता पसरली. मीही confuse झालो होतो,चकमक सुरू होऊन काही तास ही झाले नव्हते आणि हा इतका महत्वाचा माणूस कसा मारला गेला? नकळत माझा पाय "shit this should not be happening" म्हणून जमिनीवर मारला गेला.

कांही वेळाने समजले बेड वर पडलेली व्यक्ती हेमंत करकरे होते.

त्यांचं न हलणारं पोट, त्यांचा न मोडलेला भांग, शांत चेहरा मला अजूनही जसाच्या तसा आठवतो. जणू काही आता उठून बसतील ते, असं वाटावं. त्याच्या मृत्यूच्या बातमीने त्यांना गोलाकार करून उभे राहिलेल्या पोलिसांच्या अंगात काय अग्नी संचारला कुणास ठाऊक, चेहरा रागाने आणि त्वेषाने लालबुंद. ते विद्युत वेगाने फिरले एक नजर करकरेंवर टाकली आणि वळले. वेगाने बाहेर जाण्यास निघाले. हे सगळं मी पाहत होतो. त्यांच्या घरातला माणूस मारला गेला असावा असा त्यांचा अवतार. मला बाहेर काय झालं आणि काय होणार हे माहीत नसलं तरी त्यांनी शांत होऊन बाहेर युद्धभूमी झालेल्या ठिकाणी जावं असं वाटलं. मी पटकन त्यांच्या पुढे गेलो. त्यांच्या कडे वळून माझा हात वेगाने चालणाऱ्यां त्यांच्या पैकी एकाच्या छातीवर ठेऊन बोललो, "सर,थोडा शांत होके जायीये",

त्याने तितक्याच वेगाने माझा हात झिडकारला आणि म्हणाला, "अब बस मरणा है या मारणा है". त्यांच्या पाठमोऱ्या ढिप्पाड चालणाऱ्या सैनिकी शरीराकडे पाहतांना जो काही राष्ट्रवाद मला समजला तो शब्दात सांगणे अशक्य आहे. विद्युत वेगाने ते बाहेर गेले..

सगळे डॉक्टर्स,नर्सेस,स्टाफ, मामा मावशी लोक वेगाने कामं करत होते. स्ट्रेचरवर रक्ताचे डोह साचलेले होते,त्या डोहात कुणाला पाय नसलेले कुणाला अर्धा हात असलेले रक्तबंबाळ रुग्ण शॉकमध्ये पडलेले होते. एका एका रुग्णाला एका एका वेळेस ३-४ फ्लूइड्सच्या बॉटल सुरू होत्या. पटापट एक्स रे , पटापट सोनोग्राफी करून शरीरात कुठे अजून गोळी आहे का हे शोधायचं काम सुरू होतं.

आणि तसं लगेच त्यांना OT मध्ये शिफ्ट करणं चालू होतं.

रात्रीचे २ वाजले रुग्णांचा ओघ कमी होत नव्हता. एक कल्पना सुचली. रात्री सुरू असलेल्या दुकाना मध्ये जाऊन प्लास्टिकचे ३-४ डझन ग्लास विकत आणले. कार्टूनच्या पुठ्याचा ट्रे करून सगळ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना प्यायला पाणी दिलं. त्यावेळी डॉ.चंदनवाले सर ऑर्थोचे HOD होते,ते करत असलेल्या धावपळीत त्यांच्या समोर पाण्याच्या ग्लास दिला. सरांनी स्मित हास्य करत पाठीवर थाप मारली,पाणी पिलं आणि पुन्हा पेशंट कडे वळले.सगळ्यांची कामं सुरूच राहणार होती..

सकळी ४ च्या नंतर जखमींचा ओघ कमी झाला पण हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचं काम अजून कित्येक दिवस चालनार होतं. शवागृहातील डेड बॉडींचा खच. त्यांना आयडेन्टिफाय करायला लागणारी यंत्रणा आणि जखमी रुग्णांची शुश्रूषा अशे कित्येक कामं बाकी असणार होती.

सकाळी पाच वाजताच्या सुमारास आम्ही विद्यार्थी परत निघालो .. रूमवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला पण रक्ताच्या डोहात पडलेल्या रुग्णांचं दृश्य अजून ४ दिवस तरी डोळ्यांना झोप देणार नव्हतं..

- डॉ.रेवत कानिंदे

Updated : 26 Nov 2022 10:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top