लोक आंधळे, बहिरे आणि मुके झाले आहेत – रविश कुमार

5312
Ravish Kumar, blog, maxmaharashtra, news, marathi
 “ स्वतंत्र आवाजांचा अवकाश आकसत आहे. तुम्ही मुक्त पत्रकार आहात असं सांगणे धोक्याचं झालं आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजवटीत असे पत्रकार नाहीसे झाले आहेत. सरकारने अनेक पत्रकारांवर अन्याय करून त्यांना तुरुंगात डांबलय. वृत्तसंस्थांनी गांभीर्याने केले जाणारे वृत्तांकन बंद केलंय. चीनमध्ये शी जिनपिंग यांच्यामुळे  समर्थ नेतृत्वाचे वादळी वारे मजबूत होऊ लागले आहेत. त्यामुळे चीनमध्ये रोखठोक टीका करणारी बातमीदारी बंद झाली आहे. अनिर्बंध सेसाँरशिप चे युग अवतले आहे. आमच्यासारखे पत्रकार जवळजवळ अदृश्यच झाले आहेत.”
त्रेचाळीस वर्षांच्या जांग वेनमिन हिचे हे म्हणणे न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिध्द झाले आहे. चीनमधली धाडसी शोधपत्रकार अशी जांग हिची ओळख होती. देशभर हिंडून पर्यावरणाचा ऱ्हास, पोलिसी अत्याचार आणि न्यायालयांनी पुराव्याशिवाय केलेल्या शिक्षेच्या बातम्या ती गोळा करीत असे. सध्या जांगचे पंख छाटले गेले आहेत. चीन मधलं कुठलेही वृत्तपत्र, कुठलीही वेबसाईट तिच्या बातम्या प्रसिद्ध करेनाश्या झाल्या आहेत. सरकारने सोशल मिडीयावरचे तिचे सर्व अकाउंट बंद केले आहेत. जांग ने लिहावे तरी कुठे? सांगावे तरी कोणाला? सध्या ती बेरोजगार आहे. तिचा निर्वाह आपल्या साठवलेल्या पुंजीवर चाललाय. तिने भ्रष्टाचारी नेत्यांच्या बातम्या केल्याबद्दल एक वर्षाचा तुरुंगवासही भोगला आहे.
सत्य सांगणारं,खरं बोलणारं कुणी उरलं नाही. सरकारने नागरिकांना अडाणी बनवून टाकलं आहे. त्यांना काही माहित नाही. लोक आंधळे आणि बहिरे झाले आहेत आहेत,त्यांच्या जीभा छाटल्या गेल्या आहेत. टीकेचा अधिकार फक्त सत्तारूढ पक्षाला आहे. शोधपत्रकारितेला व्यवस्थेतल्या चुका सुधारण्याची संधी मानणे तर सोडाच उलट यामुळे सामाजिक स्थैर्याला धोका आहे असं शी जिनपिंग याचा पक्ष आणि सरकार  मानते. अनेकवेळा सेन्सॉर कोण करतंय हेही समजत नाही.
खेड्यांतून शहरात आलेल्या निर्वासितांच्या कहाण्यांचे फिचर करणारी वेबसाईट Q Daily अनेकदा बंद करण्यात आली आहे. वास्तववादी पत्रकारिता करून जनमत बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ज्या बाबींवर लिखाण केलं जात असे अशा बाबी मर्यादित करण्यात आल्या आहेत. Q Dailyच्या मुख्य संपादीका यांग यींग म्हणतात, “सरकारी हस्तक्षेपामुळे व्यवसाय बंद पडला आहे. आमच्या वेबसाईटने राजकारण आणि लष्कर यांच्या बातम्यांवर सरकारी बंधने मान्य करण्याचा प्रयत्नही करून पाहिला, पण सरकार केंव्हा आणि कशामुळे नाराज होईल हे सांगता येत नाही. इथे चीनमध्ये वृत्तमाध्यम चालवण्यात आता शान राहिली नाही ” बाहेरच्या जगात चुकीची बातमी छापली तर पत्रकाराला नारळ दिला जातो तर चीनमध्ये खरी बातमी लिहिल्याने पत्रकाराची गच्छंती होते.
जांग वेनमिनआणि यांग यींग भारतातल्या पत्रकार नाहीत. तरीही हे सर्व भारतातही लागू आहे. इथेही शोधपत्रकारिता किंवा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन, कष्ट उपसून खोदून काढलेल्या माहितीचे वृत्तांकन बंद होत आहे. एखाद्या बातमीसाठी सरळ सरकारशी दोन हात करावे लागू नये यासाठी हे केलं जातंय. माध्यमांमधल्या बहुतेक प्रमुख वृत्तसंस्थांमध्ये हे घडतंय. काही छोट्या माध्यमसंस्था आणि काही  मोजक्या ध्येयवादी पत्रकारांमुळे इकडून तिकडून काही बातम्या झळकतात पण त्याही हळू हळू कमी होत जाणार आहेत.
खरंतर आधीच खूप उशीर झाला आहे. तुम्ही सरकारचे समर्थक असा कि टीकाकार, काही बदलत नाही. रेल्वेच्या कर्मचा-यांनी अनेक ठिकाणी संप केला. २०१९ च्या निवडणुकीत हे लाखो कर्मचारी भाजपबरोबर होते असं सहज मानता येईल. ह्याच कर्मचा-यांनी भाजपच्या मांडीवर खेळणाऱ्या गोदी मीडियातून मारा केलेली भाजप आणि मोदी यांची प्रतिमाही मनोमन  स्वीकारली असेल. जेंव्हा आज त्या कर्मचा-यांचे अस्तित्व पणाला लागले आहे, तेंव्हा ही माध्यमं त्यांच्या सोबत नाहीत. आणि त्यांच्या आंदोलनाला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही.
आज हेच रेल्वे कर्मचारी ‘माध्यमं विकली गेली आहेत, त्यांच्या आंदोलनाच्या बातम्या देत नाहीत’ असे मेसेज  फॉरवर्ड करत आहेत. जोवर या रेल्वे कर्मचा-यांच्या अस्तित्वावर कु-हाड कोसळली नव्हती, तोवर ते ह्याच माध्यमांचे पाठीराखे आणि गिऱ्हाईकही होते, आपला कष्टाने कमावलेला पैसा या माध्यमांवर खर्ची करत होते. आणि आज अचानक त्यांना माध्यमं विकली गेली आहेत असा साक्षात्कार झाला आहे.
इतर वर्गांचीही अशीच अवस्था होणार आहे. सरकार निवडणे आणि आपला पेपर किंवा चॅनेल निवडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; लोक हे विसरत चालले आहेत. माध्यमांना संपवण्यासाठी एक वातावरण तयार करण्यात आले. त्या वातावरणाचं बेछुट समर्थन करणारे रेल्वे कर्मचारी आता कोणत्या पत्रकारांकडून, माध्यमांकडून अपेक्षा करत आहेत? मिडिया विकला गेला आहे अशी त्यांची पक्की खात्री असेल तर ज्या पेपरचा मजकूर त्यांनी चवीचवीने वाचला किंवा जो  चॅनेल डोकं बंद करून पहिला,त्यासाठी दरमहिना ३०० ते ५०० रुपये खर्च केले, ते पेपर किंवा चॅनेल त्यांनी बंद करून टाकले आहेत का?
माध्यमं विकली गेली आहेत असं तुमचं म्हणणं असेल तर तुमच्या आंदोलनात वृत्तपत्र स्वात्रंत्र्याची मागणी असली पाहिजे. अहिसक आणि नैतिक मार्गांनी पत्रकारीतेसमोरचे प्रश्न चव्हाट्यावर आणले पाहिजेत,त्यासाठी राजकीय पाठबळ निर्माण केले पाहिजे, नाहीतर लवकरच तुम्हाला भारतातली पत्रकारिता संपली आहे असं ऐकावं लागेल. पत्रकारितेत आता शान उरली नाही. विकले गेल्यावरच जर सन्मान मिळणार असेल तर जीव पणाला लावून कोण पत्रकारिता करेल? मुळात या खंडप्राय देशात पत्रकारिता धोकादायक का झाली? लिहिण्यावर अंकुश का लागले आहेत? तरीही लिहिलं तर नोक-या का जात आहेत? असे प्रश्न आता आहेत.
लक्षात घ्या, टीव्ही चॅनेल लोकशाहीचा गळा घोटत आहेत. वर्तमानपत्रे झोपेच्या गोळ्या चारत आहेत. वाचक आणि प्रेक्षकांचा गळा दाबला जातोय. आज तुम्ही माझ्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष कराल पण एक दिवस तुम्हाला आठवेल! जेंव्हा तुम्ही चित्तरंजन,परतातू आणि कपूरथाळ्याला रेल्वे कारखान्यांच्या बाहेर आंदोलन करत असाल आणि कुणी पत्रकार तिकडे बातमी करण्यासाठी फिरकणार नाही तेंव्हा त्याला तुम्हीही जबाबदार असाल, हे विसरू नका.
तुम्हीच विचार करा. शी  जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांची जेंव्हा भेट होते तेंव्हा हे प्रश्न आपल्या मनात येतात का? हे नक्की काय घडतंय याचा विचार आपण करतो का? आपल्या करता अशा घटना म्हणजे देशासाठी महान आणि गौरवाचे क्षण असतात. तुम्ही अश्या क्षणांच्या शोधात असता. दुसरीकडे अधःपतनाच्या खुणा तुमच्या पावलाखालीच अधिक ठळक होत चालल्या आहेत. आता घसरून पडलात किंवा चिखलात रुतलात तर माध्यमांना दोष देऊ नका. मिडिया विकला गेला आहे हे माहित असूनही कोणतेही प्रश्न न विचारता तुम्ही तुमचा पैसा त्यावर उधळत होतात. सरकारलाही तुम्ही प्रश्न विचारले नाहीत.
सोळा विरोधी पक्षांनी राज्यसभेत माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नांवर चर्चेची मागणी केली आहे. विरोधी पक्षांना या प्रश्नावर उशीरा जाग आली आहे. आता या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी, किती वर्तमानपत्रांनी या चर्चेची बातमी छापली? किती चॅनेलवर ही चर्चा दाखवली गेली याचा अहवाल विरोधी पक्षांनी तयार करावा आणि राज्यसभेच्या सभापतींकडे तो सादर करावा. विरोधी पक्ष जागा झाल्याने काहीही घडणार नाही. जे घडायचे ते ब-याच काळाकरता घडून गेलेले आहे. ज्या कार्यक्रमातून  पत्रकारितेऐवजी प्रचार    केला  जात असे अशा कार्यक्रमात हजेरी लावून विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही त्यांना मान्यता दिली आहे.
माध्यमांचे स्वातंत्र्य चिरडणारे कार्यक्रम दिमाखदार होते. सुंदर सेट्स उभारले गेले. या सेट्सवर विरोधी पक्षांचे नेते आणि मुंबई-दिल्लीच्या जाणकार विद्वानांना पाचारण केले गेले. या जाणकार, वरिष्ठ लेखक आणि पत्रकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांना मान्यता मिळवून दिली. या कार्यक्रमांची नावं लोकशाही मूल्याचे वर्णन करणाऱ्या शब्दांचा वापर करून ठेवण्यात आली. नंतर कधी या कार्यक्रमातून या जाणकार सज्जनांची बोळवण करून उद्धट आणि प्रतिगामी तज्ञ आणि प्रवक्ते घुसडले गेले याचा पत्ताही लागला नाही. आजही भलेभले सज्जन या चॅनेलांवर जातात. संध्याकाळी ते घरी भेटत नाहीत. त्यांच्या हजेरीमुळे सवंग प्रचाराला दर्जा प्राप्त होत आहे. आपण जो टीव्ही बघतोय तो टीव्ही आपल्याशी काय खेळ करतोय हे प्रेक्षकांना कधीही कळणार नाही.माध्यमं संपवायचं काम फक्त सरकारं आणि कॉर्पोरेट कंपन्या करत नाहीयत तर समाजातल्या सगळ्या घटकांच्या हातभाराने हे कार्य सुफळ संपूर्ण होते.

भाषांतर – रविंद्र झेंडे