Home > News Update > कोणाला हवेत झुंडीचे बळी?

कोणाला हवेत झुंडीचे बळी?

कोणाला हवेत झुंडीचे बळी?
X

देशात अलिकडे मॉबलिंचिकचे प्रकार वाढत आहे. यामागे विशिष्ट शक्ती अनेक वर्ष पडद्यामागे काम करत आहेत. या पडद्यामागील शक्तींचा वेध घेणारा डॉ. बापू चंदनशिवे यांचा लेख

खरं तर या देशामध्ये झुंडीने एकत्र येऊन लोकांना मारणे काही नवीन नाही. विशेषतः मागील पाच- सहा वर्षात हे प्रमाण अधिकच वाढले. काहींना ठरवून मारले, तर काहींचे जात, धर्म याचा सहारा घेत खून केले. समूहाने मारले, की कोणी मारले हे कळत नाही.

जात- धर्म- वर्ण- राजकीय दहशत, सामंतशाही वृत्ती, यामुळे अनेकांना आलेला माज, मग्रुरी आणि अतीव घमेंड हे झुण्डशाहीचे प्रेरक घटक आहेत.

या घटकांना प्रोत्साहन देण्याचं काम राजकीय पातळीवरून सुरू आहे किंवा ते तटस्थ आहेत. यामुळे समाजातील काही द्वेषाचे प्रशिक्षण घेतलेले लोक सुसाट सुटलेले आहेत.

केवळ अफवा अशा हिंसेला कारण आहेत असं नाही, तर अफवा जाणीवपूर्वक पेरल्या जातात. एखाद्याची बदनामी करताना इथले लोक समूह जसा ठरवून वागतो. अगदी तसेच अफवाही ठरवून पसरवल्या जात असतात किंवा जावू शकतात. राजकीय सत्ताधाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. किंवा अशा घटनांचा आपल्याला राजकारण करण्यासाठी, प्रसंगी एखाद्याचा काटा काढण्यासाठी झुंड उपयोगी ठरते. असे अनेकांना वाटू लागले. यातूनच कायदा हातात घेणे, कायद्याला न जुमानणे, सर्वकाही आपल्या मुठीत आहे. असे वाटणे समाजासाठी घातक ठरत आहे.

कायदेशीर शिक्षेपेक्षा कायदा हातात घेऊन दिलेली शिक्षा अधिक क्रूर व अमानवी असते. ही पध्दत समाजात दहशत निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरते, हे समाजातील काही उपद्रवी गटांना माहित आहे. त्यांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे. झुंडीला कोणतेही कारण एखाद्याला ठार मारण्यासाठी पुरेसं असतं. मग गोध्रा, खैरलांजी, अखलाक, राईन पाडा पासूनच ते थेट पालघर पर्यंत अशा घटना घडताना आपण पाहिल्या व वाचल्या आहेत. काही मारतात तर काही लोक त्याचे व्हिडीओ काढतात. कारण क्रूरतेचे सार्वत्रिकरण करणं हे मॉबला हवंच असतं. पण ही हाणामारी कोणीही सोडवताना दिसत नाही. कारण मॉब सायकॉलॉजी तिथं सोडविणाऱ्याचाही बळी जाण्याचीच अधिक शक्यता असते.

मरणाऱयांच्या डोळ्यात रक्त उतरलेले असते. मग ते गोध्रात स्त्रियावर बलात्कार करणे, गरोदर महिलांच्या पोटात तलवार खुपसून त्यांच्या पोटातील बाळाला तलवारीच्या टोकावर नाचविणे यात त्यांना काहीच दु:ख वाटत नाही, तर पुरुष अशाच प्रकारे आपलं पौरोषत्व सिध्द करीत असतो. मुस्लीम किंवा इतर अल्पसंख्याक धर्मातील लोक वगळले तर मारणारे व मरणारे शक्यतो एकाच म्हणजे स्वधर्मीयच असतात. उदाहरणार्थ इथले दलित, आदिवासी, स्त्रिया, इत्यादी. आपण स्वतःला कितीही शांतताप्रिय व अहिंसावादी म्हणत असलो, तरी आपला इतिहास तसा मुळीच नाही, याचाही आपण विचार करणे आवश्यक आहे.

आपण धर्म, जात, लिंग, वर्ण, प्रदेश यावरून कायम आप्तस्वकीयांना मारलेलं आहे. उदाहरणार्थ, बिहार- उत्तर प्रदेशातील एकच धर्म असलेल्या किंबहुना एकाच धर्मातील आपले पोट भरायला आलेल्या भैय्याना आपण मारत आलेलो आहोतच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे केवळ मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यावरून आपण लोकांना जीवंत जाळले आहे, लोकांची घरे पेटवून दिली आहेत. अत्याचार करताना विरोध केला म्हणून स्त्रियांना जीवंत जाळलेल्या, मारून जनावरांप्रमाणे आडरानात फेकून दिल्याच्या हजारो घटना या देशात घडत आल्या आहेत. घडत आहेत. कोणालाही मारणे ही विकृती आहे. एखाद्या समूहाचा द्वेष करणे हाही पूर्वग्रह किंवा सामाजिक व सांस्कृतिक विकृतीचाच भाग आहे. द्वेष कोणकोणत्या मुद्द्यांवर करायचा हे शिकविणाऱ्या समाजमान्य संघटना या देशात कार्यरत आहेत. 'आपणही त्या जागी असतो तर असेच केले असते...! त्यांना असेच करायला हवंय..! अद्दल घडवायला पाहिजेच...' असं बोलत असतो.

आपण किंवा काही लोकांना बोलताना ऐकतही असतो आपण... ही सामूहिक हिंसेला चालना देणारी वाक्यं आहेत... समाजाला जर सामूहिक हिंसेची सवय लागली, तर समाज स्वास्थ बिघडायला उशीर लागणार नाही. देशात याची सुरुवात होऊन बरीच वर्षे झाली आहेत. सामूहिक हिंसेला जर राजकीय, धार्मिक, जातीय व संघटनात्मक समर्थन मिळायला सुरुवात झाली तर लोक पिसाळल्यासारखं करतील. कोणाचीही सामूहिकपणे जीव घेणे हे अवघड नसते. हे असा संदेश जेव्हा समाज कंटकामध्ये जेव्हा जातो, तेव्हा त्यांच्यासाठी हा केवळ खेळ होऊन बसतो. हे वाईट आहे.

सामूहिक हत्या हे जर हत्यारासारखं वापरलं जाऊ लागलं, तर याचा बळी कोणीही ठरू शकते. अगदी मीपण, तुम्हीपण..! म्हणून सरकारने या मॉब लिन्चिन्गकडे आतातरी गांभीर्याने बघायला हवंय. साध्या, गरीब, निर्दोष लोकांचा बळीच आतापर्यंत झुंडीच्या हिंसेने घेतले आहेत. ही वेळ कोणावरही येऊ शकते. नंतर तपास करून मेलेल्या व्यक्तींचा जीव परत येत नाही. सामाजिक संघटनानी प्रबोधन करणे व सरकारने या संदर्भात कडक कायदे करुन अशा वागणाऱ्या लोकांना शिक्षा करणं आवश्यक आहे.

जर या दोन्ही घटकांनी या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष केलं, तर आपण हे ध्यानात ठेवायला हवे, की ही वेळ कोणावरही येऊ शकते आणि एकदा का झुण्डिच्या स्वाधीन आपण झालो, तर तिथं कोणीही वाचवायला येत नाही, अगदी पोलीसपण हे पालघरच्या घटनेने सिध्द झालंय.

डॉ. बापू चंदनशिवे

Updated : 26 April 2020 1:57 AM GMT
Next Story
Share it
Top