Home > मॅक्स ब्लॉग्ज > उस्मानाबाद पूरग्रस्त भागातील सद्यस्थिती, KT बंधार्‍यामुळे गावं उद्धवस्त!

उस्मानाबाद पूरग्रस्त भागातील सद्यस्थिती, KT बंधार्‍यामुळे गावं उद्धवस्त!

नदीला प्रवाह बदलण्यास भाग पाडणारे आणि गावकऱ्यांना संकटात टाकणारी व्यवस्था, अद्याप नुकसान भरपाई नाहीच, वाहून गेलेल्या जनावरांचे काय? हा शेतकरी उभा राहण्यास पुन्हा किती वेळ जाईल हे प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच? चिंचपूर ढगे आणि वाळवड या भूम तालुक्यातील दोन्ही गावांत बांधलेले बंधारे हे अलीकडेच बांधलेले. या बंधाऱ्यांचा उपयोग कसा होईल? याचा विचार करून बंधारे का बांधले गेले नाहीत? असा सवाल लेखक सिरत सातपुते यांनी केलाय.

उस्मानाबाद पूरग्रस्त भागातील सद्यस्थिती, KT बंधार्‍यामुळे गावं उद्धवस्त!
X

21 सप्टेंबर 2025 ची रात्र. मुसळधार पावसाची रात्र. गोदावरीची उपनदी असलेली बाणगंगा नदी फुगली. नदीवरील KT बंधार्‍यात फुरसन अडकलं आणि पाणी तुंबलं. बंधाऱ्याने अडवलेलं पाणी गावात शिरलं. हे गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे. 21 आणि 22 सप्टेंबरच्या रात्री मुसळधार पाऊस झाला आणि गावाच्या वरच्या अंगाकडील पाझर तलावांमध्ये पाणी भरले. वास्तविक तलाव पूर्ण भरल्यावर केटी बंधाऱ्याचे दरवाजे उघडायला हवेत पण बंधाऱ्याची दुरुस्ती नसल्याने दरवाजे अडकले. त्यात प्रवाहा बरोबर वाहत आलेले फुरसन अडकले. नदीने आपला प्रवाह बदलला आणि गावात पाणी शिरलं. गावातील मारुतीच्या देवळाच्या कळसापर्यंत पाणी चढलं. गुरं ढोरं वाहून गेली आणि घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडला. गावातील अंगणवाड्यातही पाणी शिरलं.



आज दिड महिन्यानंतर अंगणवाड्या सुरू झाल्या. मुले यायला लागली आहेत पण सरकारी मदत काहीच आलेली नाही. मुलांची बसायची जमिनीवरची सतरंजी अजून अंगणवाडीच्या भिंतीवर वाळतेच आहे आणि लहान लहान मुलं तशीच जमिनीवर बसत आहेत. अंगणवाड्यांच्या छतापर्यंत पाणी आल्याने छत कधीही पडेल अशी परिस्थिती आहे. स्वयंसेवी संस्थांकडून थोडीफार मदत मिळाली आहे पण सरकारी मदतीच्या अभावी अंगणवाड्या चालू ठेवणं कठीणच झालं आहे.

चिंचपूर ढगे गाव हे तसं द्राक्षाच्या बागायतीचे गाव आणि जोडधंदा म्हणून खव्याचे उत्पादन. नदीपात्रात असलेल्या पडीक जमिनीवर गावातील जनावरांसाठी चारा उगवला जायचा. पण अलीकडे या पडीक जमिनीवर झालेल्या अतिक्रमणामुळे हा चाराही मिळणे मुश्किल झालंय. नदीपात्रातीलअतिक्रमणाकडे केलेले दुर्लक्ष आणि अडीच तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्याचे अतिशय सुमार दर्जाचे काम यामुळे चिंचपूर ढगे सारख्या गावाला महापुराचा फटका बसला. आजही या बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता कधीही पडेल अशा अवस्थेत आहे. नीट पंचनामे न झाल्याने अजून गावातल्या अनेकांना अंतरिम मदतही मिळालेली नाही.




चिंचपूरला जाताना भूम तालुक्यातीलच वाळवड गाव लागतं. तिथेही पाझर तलाव फुटल्याने गावात पाणी शिरलं आणि पूर्ण गाव आणि शिवार पाण्याखाली गेलं. शेतात सहा सहा फूट खड्डे पडले. सोयाबीन तर पूर्ण पाण्याखाली गेलंच पण अख्ख्या शेतातील मातीच वाहून गेल्याने पुढची काही वर्ष शेती करणं अवघड बनलय.




दूधना नदी वरील दहा महिन्यापूर्वीच बांधलेला बंधारा पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेला आणि गावकरी गावातच अडकले. आज दीड महिन्यानंतरही शेतातले खड्डे तसेच आहेत. नदीवरचा पूल हा भ्रष्टाचारी बांधकामाची साक्ष देत तसाच तुटलेल्या अवस्थेत आहे. नदीने प्रवाह बदलला तसाच गावकऱ्यांनीही तुटलेल्या पुला शेजारून मार्ग काढला. नदीला प्रवाह बदलण्यास भाग पाडणारे आणि गावकऱ्यांना संकटात टाकणारे हे एकच आहेत. त्यांच्याविरुद्ध, या व्यवस्थेविरुद्ध गावकऱ्यांच्या बोलण्यातून संताप व्यक्त होत होता. नुकसान भरपाई नाहीच, वाहून गेलेल्या आणि जनावरांचे काय? हा शेतकरी उभा राहण्यास पुन्हा किती वेळ जाईल हे प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच आहेत. चिंचपूर ढगे आणि वाळवड या भूम तालुक्यातील दोन्ही गावांत बांधलेले बंधारे हे अलीकडेच बांधलेले. ते बंधारे पाझर तलावातले साठवलेल्या पाण्याच्या नियोजनासाठी आणि चुकून माकून कधी मोठा पाऊस पडला तर या बंधाऱ्यांचा उपयोग कसा होईल याचा विचार करून का बांधले गेले नाहीत हा सवाल शासनाला विचारायलाच हवा.

#मराठवाडाडायरी

#महापूर

सिरत सातपुते

Updated : 13 Nov 2025 7:57 AM IST
Next Story
Share it
Top