तनुश्री दत्ताच्या निमित्ताने !
X
हा प्रसंग मी स्वतः बॉलिवूड शी संबंधित एका 'भीष्म' पितामहाकडून ऐकला होता, आज तनुश्री दत्ताच्या निमित्तानं तो पहिल्यांदा शेयर करतोय.
खरं तर या घटनेतली सगळं पात्रं नावासाहित टाकायची इच्छा होती, पण यातली 3 प्रमुख पात्र आज हयात नाहीत.आणि, जिथे समोरची व्यक्ती आपली बाजू मांडण्यासाठी हयात नाही, ती सांगू नये असा प्रघात आहे म्हणून नावं टाळतोय ! पण याहून महत्वाचे म्हणजे यातल्या पिडीत अभिनेत्रीने याबाबत कधी कुठेही याची सार्वजनिक वाच्यता केली नाही, म्हणूनही नावं टाळतोय! पण ही घटना सांगणारी व्यक्ती महान तर होती आणि या अभिनेत्रीची गॉडफादर होती म्हणून हा प्रसंग तिने त्यांच्या सोबत शेयर केला होता आणि मला खात्री आहे. अनेकांनी याबाबत ऐकलंही असेल! ऐकीव गॉसिप म्हणून नाही तर, तर तनुश्री दत्ताच्या निमित्ताने अश्या कितीक अभिनेत्री या सारख्या दबावाला बळी पडल्या असतील या साठी हा पोस्ट प्रपंच !
तर, नव्वदच्या दशकातील एक गाजलेल्या सिनेमाच्या सेटवर हा प्रसंग घडला होता. दक्षिणेतल्या एका सुपरहिट सिनेमाचा रिमेक एक अभिनेता-कम-दिग्दर्शकाने हिंदीत बनवला होता. हिंदीतला एका अनुभवी आणि देखणा अभिनेता हिरो होता आणि बॉलीवूडमध्ये स्थिर होऊ पाहणारी एक नवोदित आणि गुणी अभिनेत्री यात होती. या सिनेमाचं गाणं चित्रित होत होतं. या गाण्यात अनेक बोल्ड सीन्स होते, मात्र या थोराड अभिनेत्याने यात एक लांबसडक चुंबन दृश्य घुसवले !! इतकेच नाही, तर या सीन्स चे अनेक रिटेक्स करवले... अभिनेत्री मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातली होती, तिला होत असलेला प्रकार कळत होता , पण बॅनर आणि समोरचा अभिनेता इतका 'मोठा' होता कि विरोध करण्याची तिची हिंमत झाली नाही. सेट वर मात्र भरमसाठ रिटेक्स ची गरमागरम चर्चा होती ! एकदा मध्येच तीने, 'अब बस, सर !! मुझे लगता है अब ओके है टेक' म्हणत थांबवण्याचा प्रयत्नही केला... पण व्यर्थ! ती मेकअप रूम मध्ये जाऊन ढसाढसा रडली... पण दुसरीकडे तिच्या समोर, त्या हिरोला लोक, हिरोच्या थाटाने 'तू साले नही सुधारेगा' म्हणत त्याच्या पौरुषत्वाचा सत्कार करत होते...
सिनेमा हीट झाला, हे गाणं आणि त्यातला हा सिन खूप गाजला ! पुढे ही हिरोईन मोठी स्टार झाली! आणि कदाचित ये सब चलता है असं सांगून ज्यांनी तिला त्यावेळी समजावलं होतं त्यावर तिचा विश्वास ही बसला असेल ! मोठ्ठ यश तुम्हाला कटू आठवणींचा विसर पाडायला भाग पाडतं!
तेव्हा social media नव्हतं की #metoo campaign ! किंवा आजच्या सारखं vocal bollywood ! तो प्रसंग तिच्या मनावर कोरून राहिला जरूर, पण तिनेही कधी त्याला वाचा फोडली नाही!
नाही म्हणायला काही वर्षांनी त्याच थोराड हिरोच्या मुलाला आपलं करियर धक्क्याला लावण्यासाठी याच अभिनेत्री चा सहारा घ्यावा लागला ! बाप आणि मुलासोबत हिरोईन म्हणून काम करण्याचा आगळा पराक्रम तिने साध्य केला... एरवी बॉलिवूडमध्ये हा अधिकार फक्त पुरुषांनाच!
मला हे पितामह म्हणाले होते, जी तिने या पद्धतीने का होईना एक प्रकारे त्या अभिनेत्यावर सूड उगवला होता!
बॉलिवूडच्या या झगमगाटात मात्र अश्या अनेक आहेत ज्यांना ना तोंड उघडण्याची संधी मिळते, मिळाली तरी त्यांची हिम्मत होत नाही आणि झाली हिम्मत तरी त्यांची दाखल कोणी घेत नाही!
साभार कमलेश सुतार यांच्या फेसबुक पोस्टवरुन