Home > मॅक्स ब्लॉग्ज > गर्दीतला आवाज.....शंकरआप्पाची हाजामत

गर्दीतला आवाज.....शंकरआप्पाची हाजामत

काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या...काही कालबाह्य झाल्या....अशीच एक गोष्ट म्हणजे हजामत....पूर्वी उघड्यावर एका गोणपाटावर बसवून हजामत केली जायची....वडिलधाऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच मुलांची हजामत केली जायची....अनेक वर्षांपूर्वी अनेकांनी घेतलेल्या या अनुभवाची उजळणी केली आहे विनायक कदम यांनी आणि ते देखील अस्सल गावराण भाषेत....

गर्दीतला आवाज.....शंकरआप्पाची हाजामत
X

हाजामत मजी आताच्या नव्या खोंडासनी लय वंगाळ कायतर वाटतंय. कटिंगला, शेविंगला निगालुय आस शुद्ध भाषेत बोलत्यात. क्यास कापाय आता आधुनिक साधन आली पण आमच्या गावातल्या शंकर आप्पाची हाजामत मजी लय जबऱ्या काम. मी शाळला आसलं तवा आप्पा साठीत हुता. दुकान फिकान कुटल. तवा आप्पा पिंडीच पोत भुईला हातरुन खाली बसवायचा. वायरच्या पिशवितन कात्री, मोट्या दाताचा कंगवा, हातमिशन, तुरटी,साबण, वस्तारा,आणि घासायचा दगुड आसल मोजकच सामान.

हाजामतीला कोण पोरगा बसला की पोरांचं बा बी सांगायचं न्हायत आणि सांगिटलं तर आप्पा बी आयकायचा नाय. मिशन लावून डोसक्याची पार वाट लावून टाकायचा. जवानीत याय लागल्याल्या पोरासनी क्यास जरा ठिऊ वाटायचं. पोर कळकळायची. पण आप्पा खाटकागत धरल्याल मुंडक सोडायचा न्हाय. क्यास कापाय लागल्याव आप्पाचा योक हात बसल्याल्याच्या डोसक्याव आसायचा. त्यो नुसता हात नसायचा ढाई किलोचा हात आसायचा. कोण कितीबी खाली वळवळलं तर हालाय याच नाय. आप्पा वरन दाबायचा. हालाय याचं नाय. मान खाली घालुन कड याचा. पण बाब सोडायच न्हाय. लय आवकाळ कोण आसला की गुडग्यात मुंडक दाबून धरायचा.

लेवल काडाय लागलं की लय आब्दा. आप्पाच काम चोक आणि लय नकसगिरीच. भार भार आवरायचं नाय. मान खाली करून करून मुडून पडायची येळ याची. तवर खाली छड्डीत कायतर गेल्याल आसायचं. वळवलायच पण हालत की आप्पा शिव्या दयायचा. बाजूला नंबर लावून सताट गडी बसलं आसायच. तेंच ध्यान हाजामतीव. ये गाबड्या हालतयस कशाला कापलं बीपल की आस म्हणायची. मग लैच आवगडल्यागत व्हायचं. तासबर चांगलं जायाचं. हाजामत झाली की पिंजऱ्यातन सोडल्याल्या पोपटागत तितन कवा पळीन व्हायचं.

थंडीच्या दिसात हाजामतीला गारठ्यात जायाचं मजी मुताय याचं. आप्पा तांब्यात हात बुडवून पाणी लावायचा. पाणी लावतुय का आंगुळ घालतुय वाटायचं. पाणी आंगाव, मानव पडून वगाळ याचं. कवा कवा ऊन बगून आप्पा पोत हातरायचा. बरं वाटायचं आणि आप्पाची हाजामत सुरू झाली की झॉप यायची. दगडावर वस्तारा लावून तवा वडत हुती. परत बिलेट आलं. येका बिलेटाव आप्पा दिवसभर दाड्या वडायचा. निबार दाडी आसल्याला येकादया गड्याला भडभडायच. आप्पा भडभडतय लगा म्हणायचा. "भडभडतय" सकाळी नव बिलेट आणलंय आणि तुला भडभडतय वी म्हणायचा.

आप्पाच काम येवड चोक आसायचं परत दोन म्हयन डोसक्याला क्यास याच न्हायत. डोसक मोकळ आणि हालकं व्हायचं. आख्या गावाची हाजामत आप्पा बयत्याव करायचा. कुणाचं जावाळ आसल की धोतार शर्ट, पायात बूट घालून, वायरची पिशवी पाटीव टाकून आप्पा याचा. जावळाच तेवड पैस आप्पाला रोक मिळायचं. पण पिकाच्या काढणीच्या हंगामात आप्पाला निरोप याचा मशिला वैरण आणि मळणी झाली की खळ्यावन उचलणीच वज आप्पा घिऊन जायाचा. रानातल्या वैरणी पासन घरात खायाच कायपण केल्याल माणसं न मागता आप्पाला दयायची. रानातल्या कोरड्या वल्याशाच तर पायजी तेवढं न्हयायची मुभा आप्पाला असायची. साऱ्या गावात आप्पाला इज्जत आसायची.

आप्पाला रान न्हवत पण एकाद्या जमीनदाराच्या दारात धान्याची थाप नसलं ईवडी आप्पाच्या दारात असायची. शेरड ,म्हसर दारात आसायची.आप्पाच्यातन येक मस आमच्या बा न आनलीवती. मस यिली की तिला रेड्याच व्हायच्या. रेड कवा व्हायचं नाय. दूध बी लय दयायच्या. बा मानसासनी सांगायचा ही शंकर आप्पाची आवलाद हाय. आता भुयला बसून क्यास कापायच सार बंद झालंय. दुकानात गादीसारख्या खुर्चीव एसीत क्यास कापाय बसलं तर शंकर आप्पाच्या त्या पोत्यावरल्या हाजामतीची मजा आता येत न्हाय.


विनायक कदम

Updated : 30 Jan 2022 2:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top