New Year Resolutions : वर्ष संपतंय, वेळ सरतोय, आपण कुठे येऊन पोहोचलो, आपण काय झालो!
पृथ्वीप्रमाणे गतिमानता, सूर्याप्रमाणे तेज, चंद्राप्रमाणे शांती आणि ऋतूंसारखी बदल स्विकारण्याची वृत्ती तुमच्या प्रत्येक दिवसात दुग्गोचार होत राहो. तुमच्या मनातील संकल्प केवळ शब्द राहू नयेत, तर कृती बनावेत; कृती सवयींत रुपांतरीत व्हाव्यात आणि त्या सवयीनी तुमचे जीवन अधिक सुंदर व्हावे. नवीन वर्षाची सुरुवात नेमकी कशी करावी सांगताहेत विज्ञान प्रसारक जगदीश काबरे
X
New Year Reflections दर वर्षाप्रमाणे हे वर्ष संपत आले आहे आणि नवीन वर्षाचे द्वार किलकिले होत आहे, ही जाणीव ज्या क्षणी होते त्या क्षणी मनात एक अनामिक हेलकावे खाणारी भावना निर्माण होते. मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी जाग्या होतात, गेल्या बारा महिन्यांत आपण काय मिळवले, काय गमावले, कोणत्या गोष्टी साध्य झाल्या, कोणत्या राहिल्या, कोणावर रागावलो, कोणावर प्रेम केले, कोणते नातेसंबंध घट्ट झाले आणि कोणत्या नात्यांना तडे गेले, या सगळ्यांचे एक अदृश्य लेखांकन सुरू होते. मन एक विचित्र लेखापाल आहे.
ते फक्त आर्थिक व्यवहारांचेच नाही तर भावनिक, नैतिक आणि आत्मिक व्यवहारांचेही हिशेब ठेवते. वर्ष संपतानाच ते ही सारी खाती उघडते आणि आपल्यासमोर ठेवते. मनाने मांडलेला हा लेखाजोखा पाहून धडाक्यात आपण कधी लाजतो, कधी हसतो, कधी खंतावतो, कधी पस्तावतो आणि कधी अभिमानाने छाती फुगावतोही. आत्मपरीक्षण हा एकमेव असा आरसा आहे जो कधी खोटं बोलत नाही; तो कितीही कठोर वाटला तरी त्यात आपली खरी प्रतिमा दिसते आणि हे आत्मपरीक्षणच नवीन वर्षाच्या स्वागताची खरी सुरुवात ठरते. नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणे नाही; तर ते मनाला नवा अनुभव घेण्यासाठी, नव्या वाटांचे आमंत्रण स्वीकारण्यासाठी तयार करणारी घटना आहे. बदलाचा स्वीकार करत पुन्हा एकदा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा क्षण आहे.
दर वर्षाच्या अखेरीस जेव्हा कॅलेंडरची शेवटची पानं वाऱ्याने हलू लागतात, तेव्हा मनात एक अतिशय विचित्र पण गोडसं अस्वस्थपणं जन्माला येतं. वर्ष संपतंय, वेळ सरतोय, आपण कुठे येऊन पोहोचलो, आपण काय झालो, आपण कसे बदललो या सगळ्या प्रश्नांची एक शांत, पण अत्यंत खोल लाट मनावर आदळते. संपूर्ण वर्षभर आपण जगतो, धावतो, पडतो, उठतो, स्वप्नं पाहतो, जपत राहतो, चुकत राहतो, शिकत राहतो. पण या अखेरीच्या काही दिवसांत वेळ जणू मंदावतो आणि आपल्याला थांबवून म्हणतो, "स्वतःकडे एकदा नीट पाहिलंस का?" वर्षभराच्या धांदलीत आपण स्वतःला देखील भेटत नाही; पण वर्षाच्या या टप्प्यावर मात्र आपल्या अंतरंगाची दारं स्वतःच उघडू लागतात. आत्मपरीक्षण हा शब्द फक्त पुस्तकी नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाचे गाठोडे आहे. या क्षणी आपण नुसते विचार करत नाही; आपण स्वतःला पुन्हा एकदा नव्याने अनुभवत असतो. आपण काय होतो, आपल्याला काय व्हायचं होतं आणि काय झालो, काय व्हायचं आहे, या तीनही काळांचा संगम जणू एखाद्या पवित्र क्षणासारखा सामोरा येतो. हा क्षण हलका नसतो; तो आपल्या अस्तित्वाला खडसावणारा, पण त्याचबरोबर हळुवार स्पर्श करणारा असतो. हा क्षण सांगतो, "तू जगलास, पण आता जगण्याचा अर्थही समजून घे."
निसर्गाच्या काळाचा प्रवासही याच वेळी आपल्या मनाला अधिक जाणवतो. सूर्याच्या भोवती पृथ्वीचे ३६५ दिवसांचे परिभ्रमण हे फक्त खगोलशास्त्राचे गणित नाही; ते आपल्या जीवनाशी घट्ट जोडलेले एक अविचल सत्य आहे. पृथ्वी एका स्थानी थांबत नाही, मग आपण का थांबावे? पृथ्वीचा प्रवास आपल्याला सांगतो की जीवन प्रवाही असलं पाहिजे... स्थिर नाही, धडपडणारं असलं पाहिजे... गोठलेलं नाही. पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते, तशी आपणही दिवसभर आपल्या भावनांभोवती, जबाबदाऱ्यांभोवती, नात्यांभोवती फिरत असतो. पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते, तशी आपल्या आकांक्षा, स्वप्नं, उद्दिष्टं याभोवती आपण परिभ्रमण करत असतो. दिवस-रात्र तयार होणं म्हणजेच आपल्या भावना उचंबळणं आणि पुन्हा शांत होणं. ऋतूंचे फेरबदल हे मनाच्या बदलत्या अवस्थांचेच प्रतिबिंब आहेत. कधी आपल्यात वसंत फुलतो, नवी उमेद उगवते. कधी उन्हाळा तापतो, अडचणी वाढतात. कधी पावसाळा भावनांना भिजवतो, मन ओलाव्यात भिजून शांत होतं आणि कधी हिवाळा जणू मनाला गारठवतो, जिथे आपण स्वतःला झाकून घेतो, शांत राहतो, थंड विचारांतून नवे निर्णय जन्माला घालतो. बदलत्या ऋतूंमध्ये जगणं म्हणजे बदल स्वीकारणं. कालगणना म्हणजे निसर्गाने दिलेली वेळ मोजण्याची पद्धत नव्हे, तर बदलांना समजून घेण्याची कला आहे.
ही कालगणना आदिमानवाने निरीक्षणातून निर्माण केली. सूर्य कुठे उगवतो, कुठे मावळतो, चांदण्यांच्या हालचालींमध्ये काय लय आहे, पावसाचे ढग का येतात, समुद्रात भरती-ओहोटी कोणत्या क्षणी वाढते, या सगळ्या निसर्ग एक नैसर्गिक घटनांचे निरीक्षण करून काळगणनेचा पाया घातला गेला. ही काळाची शिस्त होती आणि माणसाने त्या शिस्तीत स्वतःच्या आयुष्याला वळण लावले. पृथ्वी स्थिर नाही, म्हणून वेळही स्थिर नाही. वेळ वाहते, तसंच जीवनही वाहतं. या वाहण्याच्या प्रवाहात वर्ष संपतं म्हणजे आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या महासागरात पुन्हा एकदा डुंबण्याची संधी मिळते.
या सर्व नैसर्गिक समन्वयाच्या पार्श्वभूमीवर माणसाने संकल्पांची निर्मिती केली. वर्ष संपतं म्हणून काही तरी बदल करायचा, स्वतःला सुधरायचं, काही हवं ते साध्य करायचं ही भावना माणसामध्ये हजारो वर्षांपासून आहे. आजही नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे जणू कोऱ्या पानावर लिहिण्याची संधी. पण हे पान नवीन असलं तरी हातातील अक्षरं तीच असतात. म्हणूनच जास्तीत जास्त संकल्प काही दिवसांत विरतात. संकल्प करण्याचं काम सोपं असतं, पण संकल्प टिकवणं कठीण असतं. कारण संकल्प हे क्षणिक प्रेरणेचे फलित असतात, तर त्यांना टिकवणारी गोष्ट म्हणजे शिस्त. प्रेरणा नाजूक असते; ती येते आणि जाते. शिस्त मात्र कठोर असते; ती येत नाही, ती निर्माण करावी लागते. जणू लहानसा धागा असतो दिसायला बारीक, पण त्याची पकड मजबूत असते. शिस्त म्हणजे स्वतःला सतत म्हणत राहणं. "मी करू शकतो… आणि मला हे करायचंच आहे." याचे स्वतःला सतत स्मरण करून देणं. आजच्या धावपळीत, ताणतणावात, मोबाईलच्या व्यसनात, अनियमित झोपेत, गोंधळलेल्या भावनांमध्ये शिस्त राखणं हेच कठीण होतं. म्हणूनच संकल्प टिकत नाहीत. आपले संकल्प हे मोसमी पावसासारखे सातत्य ठेवत नाहीत. ते सातत्याने पडणाऱ्या हलक्या रिमझिम पावसासारखे असले पाहिजेत. ज्यातून हळूहळू सवयी उगवतात, आणि सवयींमधून बदल फुलतो.
आत्मपरीक्षण म्हणजे आपल्यातल्या सत्याचा आपणच सामना करणे. ते आपल्याला सांगतं की, आपण कोठे चुकीचे वागलो, कुठे रागाने उत्तर दिलं, कुठे अहंकाराने नातं दुखावलं, कुठे आळसाने संधी गमावली, कुठे जिद्दीने यश मिळवलं, कुठे प्रेमाने नातं जपलं. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणे केलेला संवाद. हा संवाद कधी कधी वेदनादायक असतो; पण तितकाच मनाला शुद्ध करणाराही असतो. नदीत स्नान केल्यावर जसा ताजेपणा येतो, तसाच आत्मपरीक्षणानंतर विचार शुद्ध होतो. मन जड असलं तरी हलकं वाटू लागतं. आत्मपरीक्षण करताना आपण आपला स्वभाव, आपली चुकांची पद्धत, आपल्यातील कमकुवत बाजू, तसेच आपल्या चांगल्या गुणांचीही जाण ठेवतो. आपण कोणाला दुखावले असेल तर ती खंत आपल्याला जाणवते. कुणाचा उपकार राहिला असेल तर त्याची जाणीव होते. जे स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाही त्याची हुरहूर राहते पण पुन्हा प्रयत्न करण्याची उमेदही निर्माण होते. ज्या क्षणी आपण स्वतःला स्वीकारतो, त्या क्षणीच नवीन वर्षाची पहिली खरी सुरुवात होते.
खरेतर नवीन वर्षच नाही, तर प्रत्येक दिवस हा नवा असतो. पण वर्षाचा पहिला दिवस हा नवेपणाचे प्रतीक आहे. कारण संपूर्ण जग त्या दिवशी स्वतःला नव्याने परिभाषित करत असतं. जगण्याचा अर्थ पुन्हा शोधायची ही संधी आहे. या संधीचा स्वीकार करताना मनात एक स्वच्छ, निर्मळ आशा जन्माला येते. आशा म्हणजे जगण्यासाठी नव्या दमानं चालण्यासाठी प्रोत्साहित करणारं कारण! आशा नसती तर माणूस पडल्यावर उठला नसता. आशा म्हणजे मनाचा सूर्य. अंधाऱ्या दिवसांत हीच आशा आपल्याला उजेड देते. नवीन वर्ष म्हणजे या आशेचा प्रकाश अधिक तेजोमय होण्याचा क्षण!
या वर्षात आपण अनेक गोष्टी अनुभवल्या... काही चांगल्या, काही वाईट, तर काही कठीण, काही अप्रिय आणि काही सुंदरही. या सर्व अनुभवांकडे आपण कसं पाहतो हे महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टींचा आनंद घेणं सोपं असतं; पण अप्रिय गोष्टींनी दिलेल्या भानामुळे त्यांचं आभार मानणं हे आत्मपरीक्षणानं दिलेलं धैर्य असतं. दुखापत करणाऱ्या अनुभवांमध्येही ज्ञान असतं. अपयश आपल्याला शिकवतं, फसवणूक आपल्याला सावध करते, तुटलेली नाती आपल्याला मूल्यांची जाणीव करून देतात. या वर्षात कोणीतरी आपल्याला साथ दिली असेल, त्यांचे आभार मानणंही आत्मपरीक्षणाचाच भाग आहे. कधी कधी "धन्यवाद" आणि "माफ करा" या दोन शब्दांत शहाणपण दडलं असतं.
निसर्गाकडून आपण अजून एक मोठा धडा शिकू शकतो. निसर्ग कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी धरून ठेवत नाही. वसंत फुलतो, पण तोही जातो. पावसाळा येतो, पण थांबतो. थंडी कडक होते, पण हळूहळू हवीहवीशी वाटायला लागते तेवढ्यात तीही जाते. आपल्याला देखील हेच शिकायचं आहे की, राग धरून ठेवायचा नाही, चिडचिड जपून ठेवायची नाही, दु:ख कायम मनात ठेवून कुढायचं नाही. भावना या ऋतूंप्रमाणे येऊ द्यायच्या, पण जड होऊ द्यायच्या नाहीत. नवीन वर्ष म्हणजे जुन्या भावनांचं ओझं हलकं करून पुढे सरकणं! जीवनाकडे पाहण्याची दृष्टीही वर्ष बदलताना बदलते. गताकालच्या अनुभवामुळे आपण थोडे अधिक सहनशील होतो, थोडे अधिक समंजस होतो, थोडे अधिक शांत विचाराचे होतो. आपल्याला समजायला लागतं की, माणसं परिपूर्ण नसतात; आपणही नाही. त्यामुळे चुकाही होतात, पण सुधारण्याची इच्छा असेल तर काहीही शक्य आहे. मनात सकारात्मकतेचा ओलावा आला की, नातीही हिरवीगार होऊ लागतात. राग कमी होतो, शब्द सौम्य होतात, हसू सहज येऊ लागतं, आणि मनात शांततेचा झरा वाहू लागतो. ही शांतता म्हणजे नवीन वर्षाची सर्वात मोठी देणगी. यात निसर्गाची शिस्त आपल्याला दररोज शिकवत असते. सूर्योदय एका निश्चित वेळी होतो, सूर्यास्तही निश्चित वेळेला. चंद्राची कला निश्चित क्रमाने बदलते. वृक्ष ठरावीक ऋतूत पालवी धरतात. ही शिस्त पाळणं हा त्याचा स्वभावच आहे. माणसानेही हीच शिस्त रोजच्या जीवनात आणली तर तो केवळ यशस्वीच नाही तर अधिक संतुलित, समाधानी आणि शांत होईल. आरोग्य, आहार, वेळेचं नियोजन, मनाची स्थिरता, नात्यांची काळजी, कामातील सातत्य, ही सगळी शिस्त आपल्याला अंतर्बाह्य मजबूत करते.
या पार्श्वभूमीवर आपण नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण मनात एक स्वच्छ, निर्मळ आणि प्रेमळ भावना ठेवू शकतो. स्वतःला माफ करणं, इतरांना माफ करणं, भूतकाळाला स्वच्छ मनानं स्वीकारणं, भविष्याला घाबरून न जाता त्याला धीराने आणि धैर्यानेही सामोरं जाणं, यातच नवीन वर्षाचं खरं सौंदर्य दडलं आहे. आपण निसर्गाचा भाग आहोत, त्याच्यासारखं आपल्यालाही वाढता आलं पाहिजे, फुलता आलं पाहिजे. जगण्यासाठी आशा हवी, पण आशेला साथ देण्यासाठी आत्मविश्वास हवा, आत्मविश्वासाला दिशा देण्यासाठी संकल्प हवा आणि संकल्पाला टिकवण्यासाठी शिस्त हवी. या चारही गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करणे होय.
या सर्व भावनांनी नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, शांती, आरोग्य, आनंद, प्रगती आणि समाधान घेऊन येवो. तुमच्या आयुष्यात निरंतर नवे विचार उगवोत, नवी स्वप्नं फुलोत, नवी ध्येयं ठरवून त्यांना पूर्ण करण्याची जिद्दही वाढत राहो. पृथ्वीप्रमाणे गतिमानता, सूर्याप्रमाणे तेज, चंद्राप्रमाणे शांती आणि ऋतूंसारखी बदल स्वीकारण्याची वृत्ती तुमच्या प्रत्येक दिवसात दुग्गोचार होत राहो. तुमच्या मनातील संकल्प केवळ शब्द राहू नयेत, तर कृती बनावेत; कृती सवयींत रुपांतरीत व्हाव्यात आणि त्या सवयीनी तुमचे जीवन अधिक सुंदर व्हावे. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात उजेड, उमेद, उर्जा आणि सौंदर्य घेऊन येवो हीच मनःपूर्वक सदिच्छा.
जगदीश काबरे
(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)






