Home > मॅक्स ब्लॉग्ज > नव्या भारताची नवी भाषा

नव्या भारताची नवी भाषा

नरेंद्र मोदी हे भारताच्या राजकारणातीस पॉन्जी स्कीम आहेत. त्यांचं काम MLM सारखं चालतं. त्यांनी स्वतःला प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये उतरवलंय. राजकारणाच्या मार्केटची नवी भाषा लिहिलीय. विरोधी पक्ष मात्र या नव्या भारताच्या नव्या भाषेपासून कोसो दूर लांब आहे.

नव्या भारताची नवी भाषा
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या लाल किल्यावरून केलेल्या भाषणावर प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे, चावड्या यावर बरीच चर्चा झालीय. देशाचा जीडीपी, बेरोजगारी, Unemployment महागाई हे प्रश्न गंभीर वळणावर पोचलेले असतानाही एखादा आत्ममग्न व्यक्तीच त्याची योग्य समिक्षा न करता अशा प्रकारचं भाषण देऊ शकतो, असा सर्वसामान्य सूर विरोधी पक्षातून उमटत असतो. मला वाटतं विरोधी पक्षाची भावना प्रामाणिक असली तरी आकलन मात्र अपुरं आहे. नव्या भारताची नवीन व्याख्या आणि त्याची भाषा समजून घेऊन त्या भाषेत विरोधी पक्षांनी बोलले पाहिजे. विरोधी पक्षांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही, हे सांगायला हा लेख नाही, मात्र नवीन भारताची भाषा, मागणी काय आहे याचं विवेचन या सगळ्या वादाच्या मध्यभागी येऊन करण्याची आज गरज आहे. हा बॅलन्सिंग ॲक्ट चा प्रकार आहे, असं ही काही जण म्हणतील, पण आपापले चश्मे बाजूला ठेवून कधीतरी या नवीन भारताबद्दल बोललं पाहिजे.

जगातील सर्वांत तरूण देश नरेंद्र मोदींच्या हाताला लागला. ७० च्या दशकात जसे कोळसा खाणीतील मजूर, देशभक्ती वगैरे सिनेमे बनत असताना यशराज फिल्मस् नी अचानक या देशातील तरूणांना स्वित्झर्लँड, लंडन, अमेरिकेची सैर करवून आणली ते काम नरेंद्र मोदींनी केले. तुम्ही ज्या परिस्थितीत राहत आहात, जगत आहात त्या परिस्थितीतील जे सर्वांत सुंदर चित्र आहे ते तुम्हाला बघायला आवडतं. तुम्ही झोपडपट्टीत राहत असाल तर तुम्हाला SRA ची खोलीही बंगल्यापेक्षा कमी वाटणार नाही. काँग्रेसने या देशातील गरीबाला मध्यमवर्गाकडे ढकललं. असं म्हणतात मध्यमवर्ग कुणाचाच नसतो. तर हा नव्याने तयार झालेला मध्यमवर्ग ही काँग्रेसचा कधी झाला नाही. त्याच्या आशा आकांक्षांना नवं क्षितिज दाखवत नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.

मिनिमम गवर्नन्स, ट्रान्सपरन्सी, दलाली विरहीत व्यवस्था, काळा पैसा आणि देशातील बेरोजगारी, अन्नधान्य यापासून सर्व समस्यांवर चुटकीसरशी उपाय काढता येतील, फक्त राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे हे परवलीचे शब्द नरेंद्र मोदींनी वारंवार हॅमर केले. मोदींच्या भाषणाला केस स्टडी म्हणून गुजरात मॉडेल ( Gujrat Model ) होतं. माझ्या ओळखीचे एक माजी कुलगुरू आहेत, ते नेहमी सांगतात की या देशात जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं मार्केटींग स्कील चांगलं लागतंच पण हा देश हिरोईजम च्या मागे लागलेला देश आहे. तुम्हाला कोण endorse करतंय हे पण पाहिलं जातं. म्हणून देशातील मोठ्या सेलिब्रिटींना घेऊन जाहिरात बनवली की प्रॉडक्ट पटकन विकलं जातं.

नरेंद्र मोदी हे २०१२ पासून भारताच्या राजकारणातलं ते यशस्वी प्रॉडक्ट आहे. दंतमंजन पेस्ट ला कोलगेट, पाण्याच्या बॉटल ला बिसलेरी, ठंडा मतलब कोकाकोला म्हणणाऱ्या या देशात तुम्ही एखाद्याला जे नाम ठेवून ब्रँड कराल तो त्या वस्तूचा पर्यायी शब्द बनून जातो. म्हणूनच मोदींनी स्वतःला भारताचा तो ब्रँड म्हणून प्रेजेंट केलं जो भारतीय राजकारणाचा, देशभक्तीचा पर्यायी शब्द म्हणून पाहिला जात आहे. याच काळात त्यांनी आपल्या विरोधी प्रॉडक्टचं ब्रँडींग कसं खराब होईल हे ही पाहिलं. त्याचमुळे राहुल गांधींच पप्पू करण करण्यात आलं. इतर नेत्यांना भ्रष्ट म्हणून दाखवलं गेलं. मात्र असं करत असताना याच विरोधी ब्रँड मधून लोकं आणून त्यांच्यामार्फत विस्तार ही केला.

थोडक्यात पॉन्जी स्कीम च्या MLM सारखं काम नरेंद्र मोदींनी केले आहे. MLM म्हणजेच मल्टी लेव्हल मार्केटींग मध्ये कंपनीच्या प्रमोटर ला दैवी शक्ती असलेला, सर्वांचं भाग्य बदलण्याची कुवत असलेला तारणहार म्हणून पेश केलं जातं. त्याच्या उदारतेच्या, धडाडीच्या कहाण्या पेरल्या जातात, त्याची स्टेज वरची एन्ट्री दमदार असेल, त्याच्या आसपास महागड्या गाड्या. हेलिकॉप्टरची रेलचेल असेल, त्याने डोक्यावर हात ठेवल्यावर कसं एखाद्याचं आयुष्य बदललं याच्या स्क्रीप्ट तयार केल्या जातात. त्याचं प्रत्येक काम कसं लोक कल्याणासाठी असतं, याच्या बखरी लिहिल्या जातात. अनेकदा वरचा माणूस बदलला – प्रमोटर बदलला तर खालची सगळी साखळी नवीन प्रमोटर च्या सेवेत रूजू होते. जे कोणी तपास यंत्रणांशी संबंधित आहेत, टॅक्स विभागाशी संबंधित आहेत त्यांना ही प्रक्रिया ठाऊक आहे. जर कुणाला अधिक माहिती हवी असेल तर त्याने सहारा किंवा इतर कंपन्यांच्या जडणघडणीवरील डॉक्युमेंटरी पाहाव्यात.

नरेंद्र मोदींनी २०१२ नंतर भारताच्या राजकारणात मार्केटींग तंत्र आणलं. हे करत असताना त्यांची भाषा सातत्याने नव्या भारताच्या रचनेची राहिली आहे. याचे लाभार्थी थोडेच असतात पण त्यांच्या कहाण्या मार्केट करून करून इतर तरूणांना आपणही असंच करू शकतो हा आत्मविश्वास जागवला जातो. MLM मध्ये काम करणारे सगळेच श्रीमंत बनत नाहीत. जे ठराविक लोकं श्रीमंत बनतात त्यांच्या केस स्टडी बघून प्रत्येकाला आपण ही तसंच होऊ असं वाटत राहतं आणि एक दिवस डोलारा कोसळतो, मात्र तरीही लोक प्रमोटर ला दोष देत नाहीत. ते स्वतःच्या नशिबाला दोष देतात. नीट चाललं असतं तर आपलं ही नशीब उघडलं असतं असंच मानत राहतात. नरेंद्र मोदींनी ही भाषा नव्या भारतात आणली आहे.

या नव्या भारतात सगळं काही आलबेल नाहीय, मात्र तरीही लोकं नरेंद्र मोदींच्या मागेच राहतात यामागचं कारण ही या नव्या भारताच्या बदललेल्या भाषेत आहेत. या भाषेला जशास तसं उत्तर देऊन ब्रँडींगचा खेळ करून किंवा जुगाड करून काही लोकांनी तात्पुरती खीळ घातली आहे, मात्र या MLM साखळीचा उन्माद तुम्ही रोखू शकत नाही, कारण मार्केट त्यांच्या हातात आहे. हीच साखळी कुठल्याही निगेटीव्ह गोष्टींचं पॉझीटीव्ह नॅरेटीव्ह लिहिते. म्हणजे जर देशात पूर आला तर काँग्रेसच्या काळात पूर आला नव्हता का? असा प्रतिप्रश्न तयार असतो. या नव्या नॅरेटीव्ह रायटींगचा मुकाबला विरोधी पक्षांना करता आलेला नाही.

नरेंद्र मोदींच्या भाषणात AI, अंतराळ संशोधन, टेक्नॉलॉजी, पर्यावरण, जैवविविधता, संशोधन, स्टार्ट अप, सर्वांना समान संधी देणारा नवा भारत अशा शब्दांचा वारंवार वापर हा या नव्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तमाम युवकांसाठी परवलीचे शब्द आहेत. मोदींच्या काळात पारदर्शकता आली म्हणून सातत्याने टॅक्स चं कलेक्शन वाढत आहे, परकीय गंगाजळी वाढत आहे, शेअर बाजार वाढतोय, पायाभूत सुविधांचा विकास होतोय वगैरे वगैरे टिपिकल मुद्द्यांवर उत्तरे देऊन देऊन थकायला होतं, मात्र मार्केटींग इतकं जोरात आहे की हे सगळे मुद्देच म्हणजे देश आहे यावर लोकांचा दृढ विश्वास बसला आहे. यात ज्यांच्या हाताला काम नाही अशा लोकांना रोज फॉरवर्ड करण्यासाठी मिळणाऱ्या पोस्ट, त्याचं नॅरेटीव्ह रायटींग चे कारखाने अव्याहत पणे सुरु ठेवून मोदींनी या नव्या भारतात सलग ८-९ वर्षे आपली लोकप्रियता उंचीवर ठेवलेली आहे. नरेंद्र मोदींना होत असलेला विरोध मोजण्याचं एकही परिमाण शिल्लक नसल्याने केवळ त्यांची लोकप्रियताच लोकांसमोर मांडली जाते. ही या देशातील राजकारणात उदयाला आलेल्या नव्या भाषेची कमाल आहे.

नरेंद्र मोदी लाखो-करोडो रूपयांच्या योजनांचे आकडे लोकांसमोर मांडतात. त्याचे लाभार्थी सातत्याने टीव्हीच्या स्क्रीन वर आणतात. त्यांच्याशी बोलतात, आपलं कसं रोजचं मॉनिटीअरींग आहे हे लोकांना सांगतात. याउलट विरोधी पक्ष अजूनही लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता इ. इ व्याख्यांच्या चौकटीत आपला प्रचार करतात. कुठल्याही लोकशाहीचे हे महत्वाचे अध्याय आहेत, मात्र याची भाषा नव्या भारताला अपरिचित वाटते. जसं गीर्वाण भारती म्हणून ओळखली गेलेली संस्कृत भाषा आज आपल्याला अनोळखी वाटते. विरोधी पक्षांच्या भाषेचंही असंच काहीसं झालंय.

Updated : 16 Aug 2021 7:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top