Home > मॅक्स ब्लॉग्ज > New Education Policy : शिक्षणव्यवस्थेत नवा गोंधळ

New Education Policy : शिक्षणव्यवस्थेत नवा गोंधळ

केंद्र सरकारने नवी शिक्षण पध्दती लागू करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र या नव्या शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांमुळे आणखी गोंधळ निर्माण होणार आहे. नेमका तो कसा? आणि ही शिक्षण पध्दती खेड्या पाड्यातील विद्यार्थ्यांना कशी उध्वस्त करणारी आहे? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. बाळासाहेब पवार यांचे विश्लेषण

New Education Policy : शिक्षणव्यवस्थेत नवा गोंधळ
X

भारतात सर्व काही नवे करण्याचा काळ आहे. याला अमृतकाळ म्हणून काही लोक सबोधतात . भारत 2014 ला स्वतंत्र झाला म्हणणाऱ्यासाठी भारताला स्वतंत्र होऊन फक्त आठ वर्ष झाले आहेत. त्यामुळे सर्व नव्याने उभारणे सुरु आहे. दि.27 एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू विजय पांढरीपांडे यांचा नवीन शैक्षणिक धोरणा बद्दल दै लोकमत मधील लेख वाचला. अर्थात त्यांनी फक्त उच्चं शिक्षणाबद्दल मत व्यक्त केले आहे . कोणतेही सरकारी धोरण आले की, काहीही विचार न करता पालखीचे भोई होणाऱ्या तथाकथित शिक्षण तज्ञ् झालेल्या प्राध्यापकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा लेख आहे . यापूर्वी नॅक चे प्रमुख व विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी ही नॅक मूल्यांकनावर प्रश्न उपस्थित करून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .

पदावर असताना सरकारी धोरणाची घोकंमपट्टी केल्यासारखी भाषण करणे आपण समजू शकतो. परंतु कोणत्याही समाजाचा ,राष्ट्राचा पाया असणारी शिक्षण व्यवस्था एका गोधळाच्या स्थितीत आणून उभी करायची व दोन पाच पिढ्या बरबाद करायच्या या धोरणाला ठाम पणे विरोध करण्याचे हे फार भयंकर आहे. अश्या चुकीच्या धोरणाला विरोध करायचे धाडस महाविद्यालयात असणारे शिक्षण तज्ञ करत नाहीत तर फक्त येणाऱ्या सूचनाची अमलबजावणी करतात.

काही दिवसांपूर्वी नॅक मानांकन करण्याचा दबाव सुरु झाला. हळूहळू हे नॅक होत असताना नॅकच्या अपेक्षा व आपल्या परिसरातील वास्तव याचा ताळमेळ कोणाला नसताना ही प्रक्रिया जोरात सुरु आहे. परंतु त्या महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकाला वास्तव नक्की माहित असते. नॅक करताना त्याची काय ओढाताण झाली हे तोच सांगू शकतो व हे नॅक मनांकन किती खरे किती खोटे हे पण तोच जाणतो.परंतु भरपूर पगार मिळतो त्याला ते करणे भाग आहे. काही लोक नॅकचे तज्ञ म्हणून पुढे आले ती एक स्वतंत्र व्यवस्था उभी राहिली आहे. स्वतंत्र कार्यालय स्वतंत्र व्यवस्था. प्रचार्यांना समकक्ष असेच ह कार्यालय तयार झाले आहे. या पैकी काही लोक राज्यातील इतर महाविद्यालयांना मार्गदर्शन करू लागले. अर्थात हा शिक्षण क्षेत्रातील पाकिट संस्कृतीचा व हित संबंध जपणाऱ्या टोळ्याचा उद्योग झाला आहे. त्यात नॅक करून घेण्याचा दबाव सतत असतो. नॅक करण्यातील अडचणी कोरोना काळानंतर खूपच वाढल्या सर्वात मोठी अडचण होती. महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थिती, त्यातून मार्ग काढावा लागला. शासनाने कसला ही विचार न करता कायम विनाअनुदानित महाविद्यालयाची इतकी खिरापत वाटली. एक तालुक्याच्या ठिकाणी तीन तीन महाविद्यालय सुरु आहेत . त्यातून विद्यार्थी मिळवणे हाच कामाचा मोठा भाग बनला आहे. त्यात प्राध्यापकांना नसलेले पगार आज अनुदानित महाविद्यालयात 50% जागा रिक्त आहेत. तिथे तासिका तत्वावर काम करणारे प्राध्यापक आहेत. ही नवी शोषन् व्यवस्था आहे. यातून कसे तरी नॅक पार पडत आहे.

नॅकच्या काळात खरे कष्ट तर विनाअनुदानित व कायम होण्याच्या रांगेत असणारे प्राध्यपक घेतात. महाविद्यालयात सुद्धा पोट भरलेला व उपाशी असलेला प्राध्यपक असे दोन वर्ग आहेत. उच्च शिक्षित असले तरी आहे रे वर्ग नाही रे वर्गाची पिळवणूक करतोच राबणारा नाही रे वर्गाचा असतो..

यापूर्वी क्रेडिट सिस्टीम अशाच पद्धतीने लादल्या गेली आहे. क्रेडिटच यश अपयश मूल्यमान करताना विद्यार्थ्याला काही समजत नाही. क्रेडिटचे नेमके विषय कोणते, कोणत्या विषयाला किती क्रेडिट हा सगळा गोंधळ त्यातही आहेच. आता तर आपले स्वतः चे गुणपत्रक सुद्धा त्याला समजत नाही इतका भाडीमार क्रेडिट चा झाला आहे . हे क्रेडिटच ओझंबरोबर घेत आता स्वयत्ता महाविद्यालयाचे वारे वाहू लागले . गौरवशाली परंपरा असणाऱ्या विद्यापीठा पासून नाळ तोडत स्वतंत्रपणे संसार थाटायचा असा हा एकूण उद्योग. हा खरोखर एक उद्योग सुरु झाला आहे. डॉ. विजय पांढरीपांडे यांनी आपल्या लेखात अतिशय कठोर शब्दात वास्तव मांडले आहे. नवीन विषय सुरु करण्याची नवी योजना सुरु आहेत. विषयामध्ये थोडे फार फेरफार करून नवी विद्याशाखा सुरु होत आहेत. त्याला फी वाढवण्याचा अधिकार महाविद्यालयांना आहे. आपण नवीन विषय निश्चित सुरु करावेत. परंतु त्याला येणारा विद्यार्थी खरोखर त्यात रुची असणारा आहे का? तो फक्त जाहिरात बाजी, नवीन काही तरी आहे म्हणून या विषयाला प्रवेश घेतो का? त्याला शिकवण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक मिळतात का ? खरोखर आपण त्याला न्याय देतो का? डॉ. पांढरीपांडे यांनी आर्टिफिशल इंटिलिजिन्स पर्यंत व मशीन लर्निंग या विषयाचा उल्लेख केला आहे . ते स्पष्ट लिहितात् हा शिळ्या कढी ला नवी फोडणी देण्याचा प्रकार आहे. या अभ्यासक्रमात जुन्याच अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विद्याशाखांचे विषय एकत्र करून नवा अभ्यासक्रम तयार केला जातो. कधीतर कोर्स असलेला विषय विद्याशाखा होतो. यासाठी भौतिक सुविधा मिळतील. पण प्राध्यपक कसे मिळणार व त्यांना पगार कसा मिळणार? ते काम कसे करणार? पर्यायी काही वर्षानंतर असे विषय बंद होतात व मुलांचे नुकसान होते.

याचा ग्रामीण भागातील पालक किती विचार करतो? हे पहावे लागेल. तो ओढून ताणून फी भरतो. पण त्याच्या पाल्याला चांगली नोकरी व पगार मिळेल का? काही अभ्यासक्रमाबद्दल तर शंभर टक्के नोकरीची चर्चा असते, असे कधी होत नाही . पालक व विद्यार्थी निराश होतात.

यात आणखी एक धोका जाणवतो तो म्हणजे पैसे कमावणाऱ्या संस्था व पैसे कमावण्यासाठी प्रवेश घेणारा विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमाना तुच्छ लेखू लागतो. तो तो कोर्स केला पदवी मिळाली म्हणजे लगेच अमेरिकेत स्थायिक होणार नाही. त्याला या समाजात राहावे लागेल. ती बाजू सुद्धा महत्वाची आहे . समाजिक पाया ढासळून ए आय व एम एल वर समाज चालणार नाही तर त्याला संस्कार क्षम बाजू संभाळणारा समाज सुद्धा उभा राहावा लागेल, असे ही डॉ पंढरीपांडे स्पष्ट करतात .

अलीकडे आणखी नवी बाब म्हणजे इतर संस्था बरोबर होत असलेले सामंजस्य करार. हा त्या महाविद्यालय व विभागाना नॅक मध्ये गुण मिळून देतो. त्याचे मोठ मोठे करार समारंभ होतात. काही वेळा परदेशी विद्यापीठाबरोबर करार होतात . परदेशी संस्था बरोबर करार होतात. खरोखर या कराराचा काही फायदा होतो का? तो फायदा विद्यार्थ्याला व्हायला हवा की नॅक च्या गुणांना हा भाग वेगळाच . या परस्पर सांमजस्यात परदेशी प्राध्यापकांचे जे मूळचे भारतीय आहेत. पण सध्या परदेशात काम करतात. त्यांचे भारतात दौरे होताना दिसतात. कोणी थेट तिथला मूळचा शास्तज्ञ आपल्याकडे येऊन काही काळ थांबून नवीन काही आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देतो का? काही संधी त्यातून उपलब्ध होतील का? असे काही होत नाही . हे करार कागदात व नॅकच्या एस एस आर मधेच दडून राहतात.

भारतातील काही नामांकित संस्था ही असे करार करतात. परंतु ती बौद्धिक देवाणघेवाण व्हायला पाहिजे, तशी होत नाही. कारण प्राध्यापक हा अभ्यास संशोधन या पेक्षा नॅकची पूर्तता करणारा क्लार्क झाला आहे. तो ना ग्रंथालयात बसतो .ना काही नवीन लिखाण करतो. प्रयोग शाळेत काही नवे शोधतो असे काही होत नाही. त्याला वेळच नाही व जे करतो ते नॅकची पूर्तता व आपल्या पुढच्या प्रमोशन साठी कागदांची जुळवा जुळव. यात विद्यार्थी वर्गात किती उपस्थित आहे व त्याला वर्गात काय मिळते हे खूप दूरची गोष्ट आहे . ग्रामीण भागात तर भयानक चित्र आहे . विद्यार्थ्यांचा वर्गातील शिक्षणावरचा विश्वास उडाला आहे.

शिक्षण क्षेत्रातील मंडळी खरोखर या बाबत विचार करत आहेत का? आपण नवीन महाविद्यालये व नवीन अभ्यासक्रम सुरु करून काय साधतो हे पाहावे लागेल. विद्यार्थ्यांचे व पालकाचे आर्थिक व मानसिक शोषण करणाऱ्या व्यवस्थेचे आपण एजंट तर होत नाहीत ना याचा विचार करावा लागेल. इतर सर्व ठिकाणी परंपरा चा उदो उदो करताना शिक्षणातून मात्र पारंपरिक शिक्षण हद्दपार करून फक्त भांडवलदरा साठी गुलाम तर आम्ही तयार करत नाहीत ना? याचा विचार पालक , शिक्षक व विद्यार्थी यांनी करायला हवा मला काय हवं हे त्याने स्वतः शोधले पाहिजे प्रवाहा बरोबर वाहत जाता कामा नये . नसता आजची शिक्षण व्यवस्था वेगळे प्रयोग करताना आमच्या हाताने उध्वस्त होणार तर नाही ना याचा विचार करावा लागेल . ती इतकी वाईट असती तर तीने आजची प्रगती केली नसती . ही प्रगती करणारी आजची पिढी त्या जुन्याच शिक्षण पद्धतीतून पुढे आली आहे .आम्हाला उसने व उष्टे ज्ञान आणून जमणार नाही . आम्हाला आमच्या परिस्थितीत बसेल प्रगती करेल असेच ज्ञान हवे हे ठाम पणे व्यवस्थेला सांगावे लागेल . पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करावा लागेल .

Updated : 2 May 2023 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top