Home > News Update > स्वराज्य यात्रा नांदेडमध्ये पोहोचली, रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उभारला जातोय जगातील सर्वांत उंच ध्वज

स्वराज्य यात्रा नांदेडमध्ये पोहोचली, रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उभारला जातोय जगातील सर्वांत उंच ध्वज

स्वराज्य यात्रा नांदेडमध्ये पोहोचली, रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उभारला जातोय जगातील सर्वांत उंच ध्वज
X

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुरु केलेल्या स्वराज्यध्वज यात्रेचा आज 11 वा दिवस (18 सप्टेंबर) आहे. स्वराज्य ध्वज मोहिमेच्या दहाव्या दिवशी ही यात्रा नांदेडमध्ये पोहोचली होती. हा यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

शुक्रवारी सकाळी माहूरच्या श्री रेणुकामाता मंदिराला भेट दिल्यानंतर स्वराज्य ध्वजाची प्रतिमा नांदेडमधील तख्त सचखंड श्री हुझूर अबचलनगर साहिब या मुख्य गुरुद्वारात नेण्यात आली. शीख धर्मीयांचे पवित्र स्थान असणा-या या गुरूद्वारात श्री गुरु गोबिंदसिंहजींनी आपला शेवटचा श्वास घेतला होता. १८९१ साली बांधलेल्या या गुरूद्वाराला नांदेडवासीयांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे.




हा ध्वज शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचं प्रतीक असल्याचं योजकांनी म्हटलं आहे. स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच स्थरांमधून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सतरा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीचा अनुभव घेतला असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जात आहे. प्रवासातील खराब हवामान, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

37 दिवस चालणार 'स्वराज्य ध्वज यात्रा': रोहित पवार सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने ही स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.




भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वजाची संकल्पना साकारल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया(बिहार), केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे.



या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे. ही या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.

Updated : 2021-09-18T13:53:29+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top