Home > Election 2020 > नक्षलवाद : …तर राजकारणी आणि संरक्षण तज्ञांचे बुरखे फाटतील

नक्षलवाद : …तर राजकारणी आणि संरक्षण तज्ञांचे बुरखे फाटतील

नक्षलवाद : …तर राजकारणी आणि संरक्षण तज्ञांचे बुरखे फाटतील
X

नक्षलवाद हा बहुआयामी लोलक आहे. कधीकाळी अत्याचारित लोक नक्षली बनत होते, पण आजकाल खाण माफिया आदिवासींना धाकात ठेवण्यासाठी नक्षली बनवतो. देशाच्या मध्यभागी असणाऱ्या भूभागात वावरणाऱ्या या नक्षलींना अत्याधुनिक बंदुका आणि स्फोटके कुठून मिळतात? हे कळलं तर कित्येक राजकारणी आणि संरक्षण तज्ञांचे बुरखे फाटतील. म्हणून ह्या शस्त्रांचा, पैशाचा उगम कुणी विचारण्याच्या भानगडीत पडत नाही.

भारतातल्या जवळपास 120 जिल्ह्यात नक्षलींचा वावर आहे. हे नक्षली आदिवासींवर अत्याचार करतात, त्यांना बंदुकीच्या जोरावर भरती करून घेतात आणि विरोध करणाऱ्या आदिवासींना संपवून टाकतात. गडचिरोलीत खाणींना विरोध करणाऱ्या आदिवासींना या नक्षलींनी संपवलेले आहे. या नक्षलींचा माग काढण्यासाठी सशस्त्र दलेही आदिवासी समाजालाच वेठीला धरतात. आणि या नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात, स्फोटांत जे जवान मारले जातात तीसुद्धा गरीब, शेतकरी, कष्टकरी घरातली मुलेच असतात.

नक्षलवाद हा विविध व्यवस्थांकडून पद्धतशीरपणे पोसला गेलेला आहे, ज्यांना त्याचे आर्थिक फायदे मिळतात. म्हणूनच हा नक्षलवाद संपवण्यासाठी कुणीही जाणीवपूर्वक कसलेही प्रयत्न करत नाही. तसही नक्षलवादाचे बळी हे एकतर गरीब आदिवासी असतात किंवा शेतकऱ्यांची सशस्त्र दलात भरती झालेली पोरं. त्यामुळे यांच्यातलं कुणी मृत्यू पावलं तरी इथल्या पांढरपेशा समाजाला, व्यवस्थेला आणि मीडियाला काहीही फरक पडत नाही.

डिसेंबर 2018 मध्ये गडचिरोली, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या भागात 4-5 दिवस राहिलो आणि तिथल्या लोकांना भेटून, बोलून आलो. नक्षलवादाला असंख्य पदर आहेत जे बाहेरच्या लोकांना क्वचितच दिसू शकतील. तिथली पोलीस स्टेशन पाहिली तर भीतीची जाणीव होते. गेटसमोरच्या रस्त्यावर टाकलेल्या काटेरी तारा, बाहेर किंवा वर वाळूच्या पोत्यांची बनवलेली पोस्ट आणि त्यात बंदूक घेऊन नजर रोखून बसलेला जवान. प्रश्न पडतो की हे पोलीस जर स्वतः इतके असुरक्षित असतील तर सामान्य आदिवासी काय अवस्थेत असेल?

गडचिरोली, दांतेवाडा इथे शहीद होणाऱ्या जवानांबाबत वाचलं की मन हेलावून जातं. त्याचबरोबर गेली 50 वर्षे इथले आदिवासी ज्या परिस्थितीत राहतायत ते पाहिलं की डोळ्यांच्या कडा ओलावतात. भांडवलशाही हव्यासाला पोसण्यासाठी साम्यवादी सशस्त्र चळवळ कशी काम करते आणि त्याचा बळी फक्त "नाही रे" वर्ग असतो हे पाहून डोकं सुन्न होऊन जातं!

Updated : 2 May 2019 7:30 AM GMT
Next Story
Share it
Top