Home > मॅक्स ब्लॉग्ज > राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि फॅशिस्टांच्या लबाड्या!

राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि फॅशिस्टांच्या लबाड्या!

केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त हर घर तिरंगा अभियान सुरू केलं आहे. राष्ट्रगीतासाठी कोणत्या देशात का नियम आहेत? यासह राष्ट्रगीताला विरोध करणारे कशा पध्दतीने राष्ट्रगीताचा आग्रह धरतात याचं विश्लेषण केलं आहे ज्येष्ठ लेखिका मुग्धा कर्णिक यांनी...

राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि फॅशिस्टांच्या लबाड्या!
X

राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याची सक्ती नाही, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. अर्थात यामुळे परिस्थितीत काहीही बदल होणार नाही. राष्ट्रगीत वाजले की त्याच्या सन्मानार्थ उभे राहणे ही बाब अनेक देशांमध्ये तशी गृहीत असते. कुठे ऐच्छिक, कुठे सक्तीची असते.

अमेरिकेत राष्ट्रगीत वाजले की झेंड्याकडे तोंड करून उभे राहायचे असते. पण तसे न करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. मेक्सिकोत प्रत्येकाने राष्ट्रगीत स्वतः म्हणणे सक्तीचे असते - शब्द चुकले, तर आठशे-नऊशे डॉलरपर्यंत दंड आहे, जपानमध्ये सक्ती आहे. त्यांचे राष्ट्रगीत राजेशाहीचा सन्मान करणारे असल्यामुळे काहींना ते गीत पटत नाही. पण नोकरीत असलेल्या सर्वांना, विशेषतः शिक्षकांना ते म्हणणे सक्तीचे आहे. न म्हटल्यास त्यांच्यावर कारवाई झाल्याची उदाहरणे आहेत. इटलीमध्ये फक्त राष्ट्राध्यक्ष ज्या कार्यक्रमांना हजर असतात, तेव्हा आणि क्रीडा महोत्सवांच्या वेळी राष्ट्रगीत वाजवले जाते. तेव्हा उभे राहणे अपेक्षित असते. पण अमुक एका प्रकारे उभे राहा, चालू नका, वगैरे अपेक्षा नसतात. शिवाय क्रीडा महोत्सवांच्या वेळी सर्व देशांच्या राष्ट्रगीतांना उभे राहून मान देणे अपेक्षित असते आणि लोक तसे करतात. थायलंडचे लोक राष्ट्रगीताचं सोवळं फारच पाळतात. रोज सकाळ-संध्याकाळ टीव्हीवरून राष्ट्रगीत वाजते, विद्यार्थी एकत्र येऊन रोज ते म्हणतात, सरकारी कार्यालयात ते म्हटले जाते. मात्र, युरोपीय देशांतील लोक राष्ट्रगीताचे स्तोम अजिबातच माजवत नाहीत, त्यांच्या क्रीडा महोत्सवांतही अमेरिकेसारखे महत्त्व राष्ट्रगीताला दिले जात नसते.

खरे तर देशावर प्रेम असणारे सगळे आपोआप नैसर्गिकपणे राष्ट्रगीत म्हणतात. परंतु बहुतेक वेळा राष्ट्रप्रेमाचा ज्वर विशिष्ट हेतूने तापवायचा असतो, तेव्हाच त्याचा वापर होतो. गीतांच्या सुरांची, शब्दांची ताकद असते. तिचा वापर एकत्रभावना जागवण्यासाठी होतो आणि त्या अतिरेकाने ती भावना अधिक टोकदारही केली जाऊ शकते. चित्रपटगृहांत प्रत्येक खेळाआधी राष्ट्रगीत वाजवण्याची कल्पना, आपल्या देशात सुरुवातीच्या काळात आली. आणि मग काही काळानंतर ती बंद झाली. मग देशधर्मादी वातावरण तापवण्यात रस असलेल्या शासनकर्त्यांनी तो प्रकार पुन्हा सुरू केला. आणि मग त्या वेळी उभे राहायचे की नाही, वगैरे वाद सुरू झाले. उभे न राहिलेल्यांना मारहाण करणे, त्यांच्या देशभक्तीवरच संशय घेणे आदी पोरखेळ सुरू झाले. अनेक ठिकाणी अगदी कुणी अपंग व्यक्ती असली, तरीही तिला मारण्याची वेळ यावरून आली. स्वतःची देशभक्ती सिद्ध करण्याबरोबरच दुसऱ्या कुणा 'त्यांचा' देशद्रोह सिद्ध करण्यातला रस एकंदरीत वाढीला लागल्यावर चित्रपटगृहांतील राष्ट्रगीताचा वापर अस्त्र म्हणून होऊ लागला. प्रिटी झिंटासारख्या सेलिब्रिटीने एका न उभे राहिलेल्या माणसाला उभे रहाण्यास भाग पाडले. मग लगेच ट्विटरवरून आपल्या शौर्याची जाहिरातही केली. यानंतर पेवच फुटले. राष्ट्रगीत लोकांना एकत्र आणण्याऐवजी असली भूमिका पार पाडण्यासाठी वापरले जाऊ लागले.

आताही सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्वाळा काहीही वेगळे साध्य करणारा नाही. कारण, ज्यांना आपल्या देशभक्तीची जाहिरातच करायची आहे, ते लोक उभे न राहणाऱ्या लोकांना तरीही लक्ष्य करू शकतात. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याचीच गरज नाही. राष्ट्रीय सण, संस्थांचे अंतर्गत कार्यक्रम, शाळा या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवले जातेच. सिनेमा, नाटके या ठिकाणी लोक मनोरंजनासाठी जात असतात, अशा वेळी उगीच कुणाच्या तरी राजकीय आग्रहापायी राष्ट्रगीत वाजवले जावे यात काहीही संगती नाही.

भारताचे राष्ट्रगीत हे जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीत आहे, असे 'युनो'ने जाहीर केले वगैरे बकवास फॉरवर्ड्स आपल्यापैकी अनेकांनी वाचले असतील आणि ते काहींना खरेही वाटले असतील. तर असे काहीही नाही. 'युनो'ने अशा प्रकारे कोणत्याही देशाचे राष्ट्रगीत श्रेष्ठ वा उत्तम वा बेक्कार वगैरे ठरवलेले नाही. प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत त्या देशाच्या नागरिकांना प्रियच वाटते.

आपल्या देशात राष्ट्रगीतावरून कट्टर हिंदुत्ववादी, मंडळींनी राष्ट्रगीताचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. 'वंदे मातरम' हेच राष्ट्रगीत असावे हा आग्रह धरताना त्यात 'त्यांना' आवडत नसलेली मातृदेवी प्रतिमा आहे. हे महत्त्वाचे कारण होते. अन्यथा संस्कृतप्रचुर बंगालीतील गान या देशातील बहुसंख्य अडाणी लोकांच्या माथ्यावर थोपण्याचे प्रयत्न झाले नसते. हिंदुत्ववादी विचार थोपण्यात 'वंदे मातरम' अगदी फिट्ट बसत होते. आणि देखता डोळा निधर्मी श्वास फुंकणारे 'जन-गण-मन' हे नकोसे वाटत होते.

हिंदुत्ववादी गटांनी जन-गण-मनला आक्षेप घेताना आणखी एक वाईट खेळी खेळून पाहिली होती. रवींद्रनाथांनी हे गीत पाचव्या जॉर्जच्या स्तुतीसाठी लिहिले होते, असा अपप्रचार त्यांनी सुरू केला. अजूनही असत्याचा हा राग त्या विचारधारेचे अनेकजण आळवतात, प्रसारित करतात, हे सत्य आहे. रवींद्रनाथ टागोरांनी स्वतः या आरोपाचे निःसंदिग्ध शब्दांत खंडन केले होते. भारताचे भाग्यविधाते हे येथील लोक आहेत, या अर्थाला पिळवटून जॉर्ज हा भारताचा भाग्यविधाता आहे, असा अर्थ अभिप्रेत होता असे सुचवणारे लोक त्या कवीची मानखंडना करतात आणि त्याचबरोबर येथील लोकांचीही.

११ डिसेंबर १९११ रोजी रवींद्रनाथांनी लिहिलेले 'जनगणमन' हे गीत त्याच महिन्यात २८ डिसेंबर रोजी कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथम गायले गेले. नंतर या गीताचे निधर्मित्व ओळखून पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी हेच गीत राष्ट्रगीत म्हणून निवडले. १९५० मध्ये हे भारताचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून घोषित झाले. मात्र, हिंदू जनजागृती समितीसारख्या वेबसाइट्सवर अजूनही 'वंदे मातरम'ला राष्ट्रगीत बनवणे अशक्य नाही, अशा सूचक हाका दिल्या जात आहेत. किंबहुना, हिंदू राष्ट्र निर्मितीच्या छुप्या न राहिलेल्या कार्यक्रमाचा तो मोठाच भाग आहे.

आता राष्ट्रगीत बदलता येत नाही, हे पुरेसे स्पष्ट झाल्यानंतर त्याच राष्ट्रगीताच्या आधारे वेगळे राजकारण खेळण्याचे मार्ग निघाले आहेत. त्याचाच भाग चित्रपटगृहातील राष्ट्रगीत वाजवणे आणि त्यासाठी उभे न राहिल्यास लोकांना लक्ष्य करण्याचा खेळ आहे.

एक स्वानुभव सांगण्याचा मोह होतो. चार वर्षांपूर्वीची डिसेंबरमधलीच गोष्ट आहे. आम्ही सातआठ सहकारी माझ्या केबिनमध्ये जवळ येऊ घातलेल्या प्रदर्शनाचे काम करत बसलो होतो. गप्पा मारत मारत सारे काम चाललेले. मध्येच मला वाटतं मीच 'ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछुडे चमन' गुणगुणायला सुरुवात केली. त्याला जोडून आणखी एकाने 'ऐ मेरे वतन के लोगों'चा सूर ओढला. आणि मग ते हे गाणं मग ते, ते गाणं अशी हिंदी-मराठी देशभक्तीपर गाण्यांची आठवणगुणगुण मालिका सुरू झाली. जवळजवळ सगळी गाणी एकेक ओळ सूर बेसूर कशीही गात होतो. झेपत नव्हतं तरी आम्ही लताचं 'वंदे मातरम'ही म्हटलं... काही गाणी आम्ही एकेक कडव्यापर्यंतही म्हटली. तेवढ्यात, एक ज्येष्ठ प्राध्यापिका आल्या. गाणं सुरूच होतं. मग त्यांना कोणकोणती गाणी गाऊन झाली हे सांगितलं. हिंदी चित्रपटांतील विविध विषयांवरची गाणी यावर त्यांचा अभ्यास आहे. त्यांनीही आणखी एक दोन गाणी सांगितली. दीडएक तास सिलसिला जारी था...

मग मी म्हणाले, पण सगळ्यात मस्त आहे, जन गण मन... आणि आम्ही सर्वांनी जन गण मन म्हणायला सुरुवात केली, बसल्या बसल्या. तिसऱ्या चौथ्या ओळीला सगळेच एकेक करून उठून उभे राहिलो. मग म्हटलं, राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आता थांबू तिथेच. किती मस्त होता तो दिवस!

अशी सहज उसळून आलेली भावना कधी चित्रपटगृहातल्या वाजणाऱ्या रेकॉर्डमध्ये आणि झेंड्याच्या चित्रातून येते?

तेव्हा या सगळ्या दिखाव्याच्या गोष्टी कशासाठी वापरल्या जातात याचा विचार करू.

Updated : 13 Aug 2022 2:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top