Home > Election 2020 > नथुराम गोडसे देशभक्त होता का... ?

नथुराम गोडसे देशभक्त होता का... ?

नथुराम गोडसे देशभक्त होता का... ?
X

जव्हार तालुक्यातील बाळ कापरा गावातील एक वयस्कर व्यक्ती पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेला असताना पाय घसरून 20 फूट खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. राज्यात पिण्याच्या पाण्याचं संकट अतिशय गहिरं झालं असून ठिकठिकाणी पाणवठ्यांवर पाण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय.

बीडमध्ये भररस्त्यात एका मुलावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात त्या मुलाचा मृत्यू झाला. ही कहाणी इतकीच नाहीय. त्या मुलाचं नाव सुमीत वाघमारे. त्याचं भाग्यश्री नावाच्या मुलीवर प्रेम होतं. दोघांची जात वेगवेगळी म्हणून दोघांनी मंदिरात लग्न केलं आणि इंजिनिअरींगची परिक्षा झाल्यानंतर आपापल्या घरी कळवून संसार थाटायचा निर्णय घेतला. पण त्यांचा संसार थाटण्याआधीच त्यांचं विश्व उद्ध्वस्त झालं. आजही भारतात अशा अनेक ऑनर किलींग होत असतात. या भारतात आजही जात स्वीकारली जात नाही. अभावानेच रोटी बेटी व्यवहार होतात.

चेंबूरच्या अमर महल पुलाखाली राहणाऱ्या लोकांवर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत एका दोन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. राज्याच्या काना-कोपऱ्यातून मुंबईत दररोज हजारो लोक येत असतात. राज्यात पडलेला दुष्काळ, साधनांची कमतरता, जगण्याचे प्रश्न यामुळे हरलेले लोक आपला सगळा संसार सोडून शहराकडे येतात. इथे पदपथांवर, पुलाखाली राहतात. खास करून दुष्काळी भागातून बरेच लोक इथे येतात. या शहरांवर वर आपला तितकाच हक्क आहे, असं त्यांना वाटतं. पण हे शहर त्यांना आपलं मानत नाही. आजही भारत आणि इंडीया अशी थेट विभागणी आपल्याला बघायला मिळते. प्रगतीच्या वाट्यात आजही वंचित-शोषितांना तितका वाटा नाहीय.

पुण्याच्या पिंपरी भागात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. मधल्या काळात इथल्या अनेक कंपन्यांच्या बाहेर कामगारांची आंदोलनं-निदर्शने सुरू असलेली दिसतात. अनेक कंपन्या बंद पडतायत, काही गुजरात मध्ये स्थलांतरीत होतायत. येत्या काळात कामगारांचं कुणीच ऐकणार नाही, शोषकांची मोठी फळी तयार झालीय. त्यात सरकार, कामगार नेते सर्व पार्टनर आहेत, त्यामुळे कामगारांचा प्रामाणिक वाली कोणीच शिल्लक राहिलेला नाही अशी स्थिती निर्माण झालीय. उद्योगधंदे बंद पडल्यामुळे किंवा आधुनिकीकरणामुळे अनेक जण बेरोजगार होतायत. बेरोजगारांच्या फौजा येत्या काळात एकमेकांशी लढतील किंवा सरकारच्या विरोधात लढून सरकारं उलथून टाकतील. देश एका मोठ्या अनोगोंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे.

2014 ची निवडणूक वेगळीच होती, या निवडणुकीने देशातल्या सर्व निवडणुकांचे संदर्भच बदलून टाकलेयत. या निवडणुकांच्या मुळे अदानी हे नाव चर्चेत आलं. अदानी हे एका मोठ्या उद्योगसमूहाचे मालक आहेत. त्यांची संपत्ती मच्छरांच्या पैदाशीच्या गतीने वाढतेय. दररोज ते नवनवीन उद्योग उभे करतायत. निवडणुका आल्या की अंबानी-टाटा यांच्या सारख्या उद्योगपतींची नावे तर चर्चेत असतातच. देशातील 1 टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. या मोठ्या उद्योगसमूहांची संपत्ती काही राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. या उद्योगसमूहांचं विभाजन-त्रिभाजन करण्याचं काम वेळीच झालं नाही तर काही काळानंतर हे उद्योगसमूह देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठे होऊ शकतात.

संतोषी नावाची एक मुलगी उपासमारीने मेली. मरताना ती फक्त ‘भात भात’ बोलत होती. तिचा मृत्यू हा काही अपवाद नाहीय. देशात दररोज अशा हजारों संतोषी मरत असतात. हा आकडा कमी होत नाहीय, हा आकडा कमी करण्यासाठी काम करणाऱ्या एनजीओ मात्र वाढतायत, सरकारचा खर्चही वाढतोय.

या बातम्या किंवा माहिती सांगून तुम्हाला बोर करण्याचं कारण एकच आहे. नथूराम गोडसे! नथुराम गोडसे खूनी होता, दहशतवादी होता यात दुमतच नाही, तरी सुद्धा तो देशभक्त असल्याची चर्चा सतत होत राहते. अशावेळी नथुराम देशभक्त आहे की नाही या मुद्द्यावरची चर्चा डायवर्ट करण्याचा माझा प्रयत्न आहे.

इथले मुसलमान, दलित देशभक्त आहेत की नाहीत यावर रोज चर्चा केली जाते, इथल्या महिलांच्या कपड्यांवर रोज बोललं जातं, हिरवे-भगवे फतवे निघतात. कोणी काय खावं-काय घालावं यावर रोज टीव्ही चॅनेलवर चर्चा सुरू राहते. टाइमच्या पहिल्या पानावर देश भंजक म्हणून पदवी लागल्यावर अचानक राहुल काय बोलला-प्रियांका काय बोलली, ममता काय बोलल्या यावर चर्चा होतात. देशात कुठलीही मुलभूत समस्या निर्माण झाली की देशात जात-धर्म-पंथ किंवा कोणी काय बोललं यावर चर्चा सुरू होतात.

मुख्य मुद्द्यांपासून लोकांना विचलित-डायवर्ट करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. आज मी नथुरामच्या निमित्ताने पुन्हा असंच तथाकथित मुद्द्यापासून तुम्हाला डायवर्ट करण्याचा प्रयत्न करायचं ठरवलंय. जर तुम्ही संवेदनशील असाल आणि जरा जरी विचलित झालात तर मी समजेन की हा देश अजूनही जिवंत आहे.

- रवींद्र आंबेकर

Updated : 16 May 2019 4:46 PM GMT
Next Story
Share it
Top