Home > मॅक्स ब्लॉग्ज > Religious Politics : "सेहर शेखने तिच्या बोलण्यात धार्मिक अस्मितेऐवजी लोकशाही, संविधान, आपला वैचारिक-सामाजिक विकास यावर बोलायला हवं होतं"

Religious Politics : "सेहर शेखने तिच्या बोलण्यात धार्मिक अस्मितेऐवजी लोकशाही, संविधान, आपला वैचारिक-सामाजिक विकास यावर बोलायला हवं होतं"

संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरवा करून टाकायचा आहे. आपण फक्त अल्लाचे मोहताज आहोत; कुणाच्या बापाचे मोहताज नाही असं विधान करणाऱ्या सेहर शेख... यांच्या विधानासंदर्भात लेखक उत्पल व. बा यांचं विश्लेषणात्मक लेख

Religious Politics : सेहर शेखने तिच्या बोलण्यात धार्मिक अस्मितेऐवजी लोकशाही, संविधान, आपला वैचारिक-सामाजिक विकास यावर बोलायला हवं होतं
X

Thane Municipal Corporation Elections ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्याहून AIMIM एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. यात Seher Sheikh सेहर शेख ही तरूण मुलगी आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचे मुंब्र्यातील बरेच जुने मित्र युनूस शेख यांची ही मुलगी. तिला तिकीट न दिल्याने नाराज होऊन युनूस शेख एमआयएममध्ये गेले. त्यांनी त्या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीकाही केली. महापालिका निवडणुकीतल्या विजयानंतरची तिची सभा बघताना काही गोष्टी जाणवल्या त्या नोंदवाव्याशा वाटतात.

तिच्या व्यक्तिमत्वात एक उमदेपणा आहे. तिचा लोकांशी कनेक्टही चांगला आहे. बोलणं प्रभावी आहे. पण एमआयएमचं राजकारण धर्माधिष्ठित असल्याचं प्रतिबिंब तिच्याही बोलण्यात पडलं याने मात्र निराशा झाली. संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरवा करून टाकायचा आहे, इथून पुढे इथला प्रत्येक लोकप्रतिनिधी एमआयएमचाच असला पाहिजे असं ती म्हणाली. आपण फक्त अल्लाचे मोहताज आहोत; कुणाच्या बापाचे मोहताज नाही असंही विधान तिने केलं. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा बोलताना मात्र आपल्या एमआयएम पक्षाच्या नावाला धक्का पोहोचेल असं आपण काही करता कामा नये असंही ती म्हणाली. 'अलहम दुरिल्ला' हे अरेबिक वचनही ती बरेचदा वापरत होती. त्याचा अर्थ 'ईश्वराचे आभार, ईश्वराची प्रशंसा' असा होतो. पुढची पाच वर्षं आपण मुंब्र्यासाठी काम करू वगैरेही ती बोलली. तिच्यानंतर बोलताना तिचा सहकारी सलाउद्दीन याने युनूस शेख यांची तुलना इराणच्या खोमेनींशी केली. खोमेनींनी जसे इस्रायलच्या नाकी नऊ आणले तसेच हे इथल्या इस्रायलच्या नाकी नऊ आणणारे खोमेनी आहेत असं तो म्हणाला. दुसरे सहकारी, मुंब्रा एमआयएमचे अध्यक्ष सैफ पठान यांनी मात्र त्यांच्या भाषणात स्थानिक मुद्दे, आरोग्य-शिक्षणाच्या सुविधा याच्यावर भर दिला.

भारतीय मुस्लिमांची गेल्या काही वर्षातली स्थिती, त्यांच्यावर झालेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अत्याचार या पार्श्वभूमीवर मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारा राजकीय पक्ष स्वतःला कसं प्रेझेंट करतो याला एक महत्त्व प्राप्त झालं आहे. एमआयएमची ओळख उजव्या विचारसरणीचा पक्ष अशीच असल्याने त्यांच्याकडून धर्मश्रद्धेला खतपाणी घातल्याशिवाय राजकारण केलं जाणार नाही हे तर दिसतंच. पण असदुद्दीन ओवैसी यांची मांडणी वेगळी आहे, तार्किक आहे असं ऐकलं आहे. मी त्यांची भाषणं वा मुलाखती फार पाहिलेल्या नाहीत; पण आता बघेन. महाराष्ट्रातील एमआयएमच्या विजयासंदर्भात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बीबीसी मराठीला जी मुलाखत दिली आहे त्यात मात्र ते मुस्लिम धार्मिक ओळखीच्या अंगाने काही बोलल्याचं दिसलं नाही. भाजपसारखा पक्ष हिंदुत्वाचा वापर आपलं अपयश झाकण्यासाठी करतो असं ते म्हणाले. आम्हाला भाजपचे नेते, अगदी मुख्यमंत्रीसुद्धा, 'हिरवे साप' म्हणतात असं ते एके ठिकाणी म्हणाल्यावर पुढे ते काय बोलतात हे ऐकायला मी उत्सुक होतो. पण त्यांनी त्यावर कुठलीच तीव्र प्रतिक्रिया दिली नाही.

एमआयएम हा उजव्या विचारांचा पक्ष असला आणि कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना, स्थानिक व इतर नेत्यांना पक्षाच्या लाइनवर चालावं लागतं हे खरं असलं तरी सेहर शेखसारख्या तरूण, इंस्टाग्रामवर लक्षावधी फॉलोअर्स असणाऱ्या, नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलीने तिच्या बोलण्यात धार्मिक अस्मितेऐवजी लोकशाही, संविधान, आपला वैचारिक-सामाजिक विकास यावर बोलायला हवं होतं असं वाटत राहिलं. निवडणूक जिंकणं म्हणजे जणू लढाई जिंकणं असं समीकरण झाल्याने विजयाचा आनंद व्यक्त करणं, थोडं तिखट होणं हे समजून घेता येतं; पण तरी भविष्यवेधी मांडणीची अपेक्षा करण्यात गैर नाही. अर्थात मी तिचं हे एकच भाषण ऐकलं आहे. प्रचारादरम्यानची भाषणं ऐकलेली नाहीत. (कार्यक्रमात मधे एकदा कुठून तरी मिनिटभरासाठी एक घोषणावजा काहीतरी वाजलं. त्यातली एक ओळ फार वाईट होती - ये सियासत हमारे घर की लौंडी है; हम उसके गुलाम नहीं है)

आज आपल्याला आवडो की न आवडो, भारतीय मुस्लिम हा एक बहुआयामी विषय झालेला आहे. तसंच आपल्याला आवडो की न आवडो, पटो की न पटो - अस्मिता आणि धर्माचं राजकारण हा राजकारणाचा स्थायीभाव झालेला आहे. या सगळ्या कोलाहलात मुस्लिमांच्या कृतीकडे, त्यांच्या उक्तीकडे, वैचारिक भूमिकेकडे विशेष लक्ष देऊन पाहिलं जातं आहे. मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व मिळायला हवं ही रास्त अपेक्षा धरत असतानाच मुस्लिम सामाजिक-राजकीय धुरिणांनी धार्मिक राजकारणाच्या घिस्यापिट्या वाटेने जाऊ नये अशी अपेक्षा आहे. (ती पूर्ण होणार नाही बहुधा; पण अपेक्षा आहे). मुस्लिमांची धार्मिक आयडेंटिटीच जिथे सर्वाधिक प्रबळ झाली आहे तिथे हे होऊ शकेल का असा प्रश्न कुणी विचारू शकेल. त्यावर मला असं वाटतं की भारतीय मुस्लीम धुरीणांकडे आज साचेबद्ध धार्मिक राजकारणाला छेद देण्याची संधी आहे. आम्ही मुस्लिम आहोत याहीपेक्षा आम्ही एका लोकशाही व्यवस्थेतले, भविष्याकडे पाहणारे नागरिक आहोत अशी लाइन स्वीकारणं कदाचित एकूणच राजकारणावर प्रभाव टाकू शकेल.

असदुद्दीन ओवैसी हे करतील की नाही माहीत नाही. सेहर शेखसारख्या मुलीने मात्र आज ना उद्या हे करावं.

(एमआयएम हा भाजपनेच पोसलेला पक्ष आहे असंही अनेकांचं एक निरीक्षण/मत आहे. त्यांची एका ठिकाणी युतीही झाली होती. पण याबाबत माझ्याकडे फार माहिती नाही).

Updated : 21 Jan 2026 7:41 AM IST
Next Story
Share it
Top