Home > मॅक्स ब्लॉग्ज > भयगंडाचे बळी !!

भयगंडाचे बळी !!

भयगंडाचे बळी !!
X

माझ्या पत्रकारितेची सुरूवात आपलं महानगरमधून ती ही ९३ मधील मुंबई दंगलीच्या वार्तांकनाने झाली. शिकाऊ वार्ताहर म्हणून १ जानेवारी, १९९३ ला मी पत्रकारितेला सुरुवात केली. आणि ९ जानेवारीला वडाळ्यात किडवाईनगर पोलिस ठाण्यावर शिवसेनेने काढलेल्या मोर्च्याची बातमीदारी करण्यासाठी मला पहिल्यांदा कार्यालयाबाहेर पडावं लागलं.

मला आठवतं, खूप घाबरत घाबरत मी ते काम निभावलं होतं. पण त्या बातमीच्या मांडणीने मला अनेक भागात फिरून दंगलीचं वार्तांकन करण्याची संधी चालून आली. वडाळ्याचं प्रतिक्षानगर, सांताक्रूझचा गोळीबार परिसर, जोगेश्वरी, धारावी, शिवडी, दक्षिण मुंबई अशा विविध भागात मी बिनधास्त फिरलो.‌ कधी पायी, कधी बस, कधी टॅक्सी तर कधी पोलिसांच्याच गाडीतून.

एकदा मी बांद्रा रेल्वे स्थानकातून कलानगरला मुख्य रस्त्यावर येऊन बस पकडण्यासाठी समोरच्याच वस्तीतून लघुमार्ग पकडला आणि आरामशीर चालत बसस्थानकावर आलो. बसची वाट बघत असताना त्याच वस्तीतून एक माणूस घामाघूम होत बाहेर पडून बसस्थानकावर आला. धापा टाकत होता. बोलायच्या मनःस्थितीत नव्हता. त्यांची विचारपूस केल्यावर मला कळलं की माझ्यासारखाच त्यानेही वस्तीतून लघुमार्ग पकडला होता. अर्ध्यावर आल्यावर त्याला कळलं की आपण बेहरामपाड्यातून चाललोय आणि तो घाबराघुबरा झाला. त्याला आत वस्तीत कोणी हटकलंही नव्हतं. थोड्या वेळापूर्वी मीही तिथूनच आलो होतो. मला माहितच नव्हतं, हा बेहरामपाडा आहे.

सांताक्रूझच्या गोळीबार भागात शिरताना बाहेरच्या चौकीतील पोलिसाने मला हटकलं होतं.‌ मी पत्रकार आहे कळल्यावर तो म्हणाला, कशाला जीव धोक्यात घालता? आत जाऊ नका. त्या पोलिसाचं न ऐकताच मी वस्तीत शिरून लोकांशी बोललो. मी ऐकत नाही म्हटल्यावर पोलिस म्हणाला होता, ठीक आहे, पण कोणाच्या घरी काही खाऊपिऊ नका. या लोकांचा काही भरवसा नाही. मी काहीच मनावर न घेता चहा प्यालो. पोहे खाल्ले. तोच प्रकारात धारावीत. अगदी दक्षिण मुंबई पायाखालून घालताना मला सर्वसामान्य माणूस त्याच्या दैनंदिन व्यवहारात व्यस्त दिसला. दोन्हीबाजूच्या लोकांच्या मनात काय साठून होतं, तर ते होतं भय !! पोलिससुध्दा या भयगंडाचे शिकार होते, तर इतरांची काय गत !

सिटीलाईटवरून माहिम रेल्वे स्थानकाकडे जायच्या रस्त्यावर एका पोलिसाला मी रस्ता विचारला तर तो म्हणाला होता, इकडून जवळ पडेल, पण सगळा त्यांचा एरिया आहे. त्यापेक्षा इकडून जा. मी जवळच्या रस्त्यानेच गेलो. सगळं सुरळीत सुरू होतं.

दंगलीच्या काळात अफवांचा तर बाजार उठला होता. कोणतीही घटना दंगलीशीच जोडून लोक रंगवून सांगायचे. न घडलेल्या अनेक घटना दोन्हीकडच्या लोकांकडून ऐकायला मिळायच्या. घराघरात लोक लाठ्याकाठ्या, दगडधोंडे साठवून होते; कधीही हल्ला होऊ शकतो या भीतीने. गटागटांनी लोक पहारा देत होते.

मुंबईची दंगल जवळून पाहताना एका गोष्टीची खात्री पटली की दंगल ठरवून सुरू केली जाते आणि ठरवून आटोक्यात घेतली जाते.

कोणतीही दंगल सुरूवातीला खोडसाळ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक सुरू करतात, पसरवतात आणि मागाहून सर्वसामान्य लोक त्यात फरफटले जातात. अफवा आणि राजकारण आगीत तेल ओतायचं काम करतात.

Updated : 7 Feb 2020 3:00 PM GMT
Next Story
Share it
Top