Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > सामाजिक काम करणाऱ्या मंदिरांना विरोध का?

सामाजिक काम करणाऱ्या मंदिरांना विरोध का?

अनेक धार्मिक स्थळांच्या माध्यमातून समाजकार्य केली जातात. पण या समाजसेवेचा खरा अर्थ काय आहे आणि या समाजसेवेच्या नावाखाली जनतेची कशी लूट केली जाते याचे परखड विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ विज्ञान लेखक जगदीश काबरे यांनी....

सामाजिक काम करणाऱ्या मंदिरांना विरोध का?
X

'काही मंदीरे सामाजिक उपक्रम राबवितात, इस्पितळे चालवितात, तरीही मंदिरांना विरोध का करता?' धार्मिकांचा हा प्रश्न वरवर पाहता संयुक्तिक आणि सडेतोड वाटतो. पण अशा सकृतदर्शनी योग्य वाटणाऱ्या विचार करण्याच्या सवयीमुळेच आपल्या समाजाचे मोठेच नुकसान झाले आहे. जरा खोलवर विचार केल्यास वरील प्रश्नाचा फोलपणा दिसून येईल.

मुळात मंदिरे (मग ती कुठल्याही धर्माची असोत) ही अंधश्रद्धा, पराभूत वृत्ती आणि शोषण व्यवस्था वाढवण्याची ठिकाणे आहेत. सर्वसामान्य माणसांना मरण (म्हणून आपल्या देशात सृष्टीचा लय करणाऱ्या शंकराची देवळे जास्त आहेत तर उत्पत्तीचा देव ब्रम्हाची देवळे मात्र अपवादात्मकच आहेत.) आणि भविष्याची अनाकलनियता यांची भीती असल्यामुळे ते कशाचा तरी आधार शोधत असतात... मग त्यांना तो बुडत्या श्रध्देचाही चालतो... तो आधार त्यांना परमेश्वर नावाच्या संकल्पनेत सापडतो. कारण एकदा का त्याच्यावर आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांची जबाबदारी टाकली की आपण काहीही... अक्षरश: काहीही करायला मोकळे होतो. म्हणजे असे की, एखादे दुष्कृत्य (पाप) करा आणि नंतर सोन्या चांदीच्या वस्तूंचे दान देऊन देवाला प्रसन्न करून प्रायश्चित्त घ्या; की मग पुन्हा दुसरे दुष्कृत्य करायला मोकळे ! अशाप्रकारे माणूस दुष्कृत्य करायला निर्ढावतो आणि दांभिकही बनत जातो. 'गंगेत डुबकी मारून पाप धुणे'ही संकल्पना अशाच मानसिकतेतून आली आहे. ही झाली अंधश्रद्धा!

तरीही प्रश्न उरतोच की, मंदिरात जरी मोठ्याप्रमाणात (बरेचदा काळ्या पैशाची) धन निर्माण होत असेल आणि त्यातून समाजकार्य उभे राहत असेल, तर त्यात वाईट काय? एका उदाहरणाने यातील फोलपणा स्पष्ट करता येईल.

समजा एका दरोडेखोराची टोळी आहे. त्याने एकदा एका धनधान्याने समृद्ध असलेल्या गावात दरोडा टाकला. अनेकांच्या कत्तली करून त्यांची धनसंपत्ती लुटली, आणि पसार झाला. गावात अवकळा पसरली. सगळे म्हणाले, 'आमचं नशीबच फूटकं त्याला कोण काय करणार? मागच्या जन्मी आम्ही काहीतरी पाप केले असणार म्हणून देवानेच आम्हाला शिक्षा केली.' ही विचारसरणी पूर्ण पराभूत वृत्ती दर्शवते. खरंतर, त्या गावात जर संरक्षणाची सुव्यवस्था असती तर दरोडेखोराच्या टोळीशी दोन हात करता आले असते, आणि लुटीपासून बचाव करता आला असता. पण नशिबावर आणि देवावर हवाला ठेवून जगण्याची आळशी वृत्ती वाढीला लागल्यामुळे येथे प्रयत्नवाद संपुष्टात आला होता.

आता काही काळानंतर तोच दरोडेखोर लोकांच्या धार्मिक भाबडेपणाचा फायदा घेऊन प्रायश्चित्ताचे नाटक करतो, आणि त्या गावात एक मोठे मंदिर बांधतो. त्याच्या देखभालीसाठी गावातीलच एक त्याला अंकित असणारा ब्राह्मण पुजारी नेमतो.(मंदिराची मालकी मात्र स्वतःकडेच ठेवतो. मंदिराचा ट्रस्ट करत नाही.) लोकही त्याची दुष्कृत्ये विसरून त्याचा उदोउदो करू लागतात. (कुणाला दुष्कृत्ये करणारा being human वाला सलमान खान आठवला तर तो योगायोग समजावा.) नवसाला पावणारा देव म्हणून त्या मंदिराची भरभराट होऊ लागते. (लालबागचा राजा आठवला तर तोही योगायोग समजावा.) मंदिरात भरपूर धन जमा होते. त्यातून त्या मंदिराचा मालक की जो दरोडेखोर ( इतर ठिकाणी तस्करही असू शकतो.) आहे, तो गावात आधी एक शाळा बांधतो आणि मग एक रुग्णालय. पण तुमच्या एका लक्षात येतंय का की, शाळा आणि रुग्णालय बांधण्यासाठी त्याने त्याच्या कष्टाचा एक पै सुद्धा वापरलेला नाही. उलट मूळ संपत्ती त्याने त्या गावातीलच लोकांच्या कत्तली करून लुटून नेलेली होती. म्हणजे शेकडो लोकांच्या रक्ताने माखलेल्या संपत्तीतून देऊळ बांधले आणि मग देवळाला मिळालेल्या दानातून शाळा आणि रुग्णालय... म्हणतात ना 'आयजीच्या जीवावर बायजी उदार'. वाल्या कोळ्याचा जरी वाल्मिकी ऋषी झाला तरी त्याची बायका-मुले त्याच्या पापात वाटेकरी झाले नाहीत. हा दाखला लक्षात घेता रामायणाला धर्मग्रंथ मानणाऱ्या धार्मिकांनो, मग आता मला सांगा.. शेकडो लोकांच्या अत्याचारातून मिळालेल्या पैशातून केलेले हे समाज कार्य उचित आहे का? जर असेल तर तुम्हीही त्याच्या पापाचे वाटेकरी व्हाल. आहे कबूल?

बाबाबुवा, गुंड प्रवृत्तीचे राजकारणी यांचे सामाजिक कार्यही याच प्रकारचे असते. हे सगळे लोक देवाधर्माच्या नावाखाली सामान्य जनात भेद आणि द्वेष निर्माण करतात. 'फोडा आणि झोडा' ही चाल खेळून आपल्या सर्वांचे शोषण करून स्वतः सत्तेच्या मस्तीत आणि धनसंपत्तीत ऐषारामी जीवन जगत असतात. म्हणून मुळावरच घाव घालायला हवा... देव आणि त्याची मंदिरे नष्ट करायला हवीत. देवाधर्माच्या भीतीने सद्वर्तनी होण्यापेक्षा स्वतःच्या विवेकाला स्मरून सद्वर्तनी होणे हे केव्हाही चांगले नाही का? आपल्या करणीची जबाबदारी देवावर टाकण्यापेक्षा आपणच आत्मपरीक्षण करून आपली करणी सुधारणे हे केव्हाही चांगलेच नाही का? म्हणून माणसात अंधश्रद्धा जोपासणाऱ्या, पराभूत वृत्ती वाढवणाऱ्या आणि शोषण करणाऱ्या मूठभर धूर्त लोकांच्या हातचे बाहुले बनवणाऱ्या मंदिर संस्थेला आमचा विरोध आहे.

लेखकांचा परिचय – जगदीश काबरे हे विज्ञान विषयावर लिहिणारे ज्येष्ठ लेखक असून त्यांची विज्ञान विषयावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ, लोक विज्ञान संघटना, मराठी विज्ञान परिषद, ग्रंथाली चळवळ, खगोल मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष अशा विविध पुरोगामी चळवळींमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

जगदीश काबरे


Updated : 2021-02-10T19:39:53+05:30
Next Story
Share it
Top