Home > मॅक्स ब्लॉग्ज > Jawaharlal Nehru यांच्या जडणघडणीत वडील मोतीलाल नेहरुंचा मोलाचा वाटा

Jawaharlal Nehru यांच्या जडणघडणीत वडील मोतीलाल नेहरुंचा मोलाचा वाटा

Jawaharlal Nehru यांच्या जडणघडणीत वडील मोतीलाल नेहरुंचा मोलाचा वाटा
X

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु घडले त्यामागे त्यांचे पिताश्री मोतीलाल नेहरु यांचा खूप मोठा वाटा होता.

मोतीलाल नेहरु यांनी आपले वकीलीचे शिक्षण इंग्लंड मध्ये जावून घेतले होते. त्यांच्या या निर्णयास १८८० मध्ये काश्मिरी पंडित जातीबांधवांनी विरोध केला होता. पण मोतीलाल बधले नाहीत. 'कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक प्रगतीसाठी आणि देशाच्या हितासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, मग त्यासाठी सामाजिक नियमांचा भंग करावा लागला तरी चालेल.' हे मोतीलाल नेहरुंचे ठाम मत होते.

त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना आयुष्यभर सनातनी काश्मिरी पंडितांच्या कुजबुज समूहाच्या सामाजिक टिकेला सामोरे जावे लागले. या चमूला भीक न घालता त्यांनी आपल्या वकीलीची घराणेशाही पुत्र मोतीलाल नेहरु यांना सूपूर्द केली. जवाहरलाल देखील १९१२ मध्ये इंग्लंड मधून बॅरिस्टर झाले. पिताश्री प्रमाणेच जवाहरलाल देखील आयुष्यभर सनातन्यांचे लक्ष्य राहिले, मरणोत्तर देखील टिका सहन करत जिवंत आहेत.

मोतीलाल नेहरुंनी अनेक क्रांतिकारकांचे खटले अल्प मानधनात किंवा काही वेळा मोफत लढवले. १९२५-२७ दरम्यानचा काकोरी खटला, रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकउल्ला खान, १९२९ चा शहिद ए आजम भगतसिंह यांच्या बाजूने लाहोर कट खटला, चंद्रशेखर आझाद यांच्या मरणोत्तर खटल्यात मार्गदर्शनाची महत्त्वाची भूमिका वगैरे उल्लेखनीय खटले. याशिवाय अनेक क्रांतिकारकांचे खटले अल्प मानधनात लढवले.

जवाहरलाल नेहरु यांनी देखील स्वातंत्र्य लढ्यातील जहाल गट आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये स्वतः वकिलीचा कोट घालून अनेक खटले लढले. आझाद हिंद सेनेचे कर्नल प्रेम सहगल, कर्नल गुरबख्श सिंग धिल्लन, मेजर जनरल शाहनवाज खान, यांच्यावर दिल्लीच्या लाल किल्ल्यात देशद्रोहाचा खटला होता. जवाहरलाल नेहरुंनी या खटल्यांच्या माध्यमातून सुभाष बाबूंची भूमिका देशभरात पोहोचवली. चंद्रशेखर आझाद यांना जवाहरलाल नेहरु आर्थिक मदत करत असत याचेही अनेक दाखले आहेत.

मोतीलाल नेहरुंनी आपल्या संपत्तीचा खूप मोठा वाटा काँग्रेस आणि स्वातंत्र्यलढ्याला दान केला. जवाहरलाल नेहरुंनी देखील तोच कित्ता गिरवत आपली संपत्ती, कमाई काँग्रेस पक्षाला व देशासाठी दान केली.

मोतीलाल नेहरुंना भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी २ वेळा तुरुंगवास भोगावा लागला, ज्याचा एकूण कालावधी सुमारे एक वर्षाच्या आसपास होता. तर जवाहरलाल नेहरुंना स्वातंत्र्य लढ्यात एकूण ९ वेळा तुरुंगवास झाला, ज्याचा एकूण कार्यकाळ सुमारे १० वर्षे आणि ३ महिन्यांहून अधिक होता.

मोतीलाल नेहरु यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी २ वेळा संधी मिळाली. तर जवाहरलाल नेहरु यांना एकूण ७ वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष पदी विराजमान होता आले. १९४० च्या सुमारास मोतीलाल नेहरु यांच्या संकल्पनेतून जवाहरलाल नेहरु यांचा वाढदिवस जवाहर दिन म्हणून साजरा केला जात असे. जवाहरलाल यांच्या निधनानंतर हा दिवस राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा होवू लागला.

एकूणात काय? तर जवाहरलाल नेहरुंच्या जडणघडणीत मोतीलाल नेहरुंचा मोलाचा वाटा होता जो नेहमी दुर्लक्षित होतो. त्यामुळे नेहरुंच्या विरोधकांनी आजच्या दिवशी हे मुद्दे घेवून जवाहरलाल नेहरु हे घराणेशाहीतून आलेले असल्याचे ठासून सांगावे.

नवभारताचे शिल्पकार, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे क्रांतिकारक, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

तुषार गायकवाड

मो.९०१११२१३१२

[email protected]

(शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता)

Updated : 14 Nov 2025 10:19 AM IST
Next Story
Share it
Top