Home > मॅक्स ब्लॉग्ज > Book Review : मॉन्सून : जन गण मन

Book Review : मॉन्सून : जन गण मन

तरुण पिढीसाठी आपली मुळे नक्की कशात आहेत हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक मदतकारक ठरणार आहे.

Book Review : मॉन्सून : जन गण मन
X

सुनील तांबे यांचे हे पुस्तक मनोविकास प्रकाशनने मागच्या महिन्यात प्रकाशित केले आहे. पुस्तकाची भाषा, बांधणी क्युट आहे. विषय सर्वात पुरातन आणि वैश्विक आहे. प्रत्येकजण त्यात भिजलेला आहे. लेखकाचा अनेक दशकांचा अभ्यास आणि लगन पुस्तकातील पानापानात वाचकांना भिडते. एकाच वेळी अनेक प्रकारचे वाचक रिलेट होऊ शकणे हे या पुस्तकाचे खूप मोठे सामर्थ्य आहे.

दोन दिवसापूर्वी राष्ट्र सेवा दलाने या पुस्तकावर चर्चा आयोजित केली होती. खूप बोलणयासारखे आहे. पण एक महत्वाचा मुद्दा पोचवावासा वाटतो तो म्हणजे मॉन्सून आणि अनुषंगिक विषयाकडे ऐतिहासिक भौतिकवादी दृष्टिकोनातून बघायला हे पुस्तक शिकवते.

१. ऐतिहासिक भौतिकवाद असे मांडतो की की समाजकारण, अर्थकारण, राजकारण यामागील ढकलशक्ती त्या-त्या काळातील व्यक्तींच्या पलीकडे वसत असते. आपल्या देशातील समाजकारण, संस्कृती, चालीरीती इत्यादींना मॉन्सूनने निर्णयक आकार दिला आहे. उदा लेखकाची काही वाक्ये :

“प्रत्येक देशाची ओळख त्या देशाच्या पर्यावर्णाने घडवलेली असते. हे सत्य भारतीय उपखंडाला देखील लागू पडते”, “भारतीय उपखंडातील वैविध्याचा स्त्रोत मॉन्सून आहे”; “मॉन्सून मुळे भारतीय संस्कृतीत हजारो वर्षाचे सातत्य आहे”. अशी ठोस अंतरदृष्टी देऊन तांबे आपल्याला मॉन्सून आणि भारतीय उपखंडातील समाजाचे नाते उलगडून दाखवतात.

२. यांत्रिक बोटींचा शोध लागण्यापूर्वी होड्या, जहाजे शिडात वारा भरून घेऊनच चालत. मॉन्सूनच्या येणाऱ्या जाणाऱ्या कालबद्ध वाऱ्यांमुळे भारतीय उपखंडातील समुद्री व्यापाराला चालना मिळाली. व्यापार हा अर्थव्यवस्थेतील आणि म्हणून समाजातील रक्ताभिसरण सारखा असतो. तो शुद्ध आर्थिक कधीच नसतो. त्यातून विविध भूप्रदेश, धर्म, चालीरीती, अन्न पदार्थ यांचे अभिसरण झालेच पण शुद्ध वंश ही संकल्पना मोडीत निघून डेमोग्राफी देखील बदलली. भारतीय उपखंडातील शेकडो वर्षांच्या सर्व धर्म समभावाची मुळे यामध्ये आहेत हे सत्य पुस्तक आपल्याला पटवून देते.

३. मॉन्सूनचे वेळापत्रक असते हे खरे. पण तो काही बाथरूममधील शॉवर नाही. त्यामुळे त्याच्या येण्या जाण्यात, नक्की किती पाऊस पडणार यामध्ये नेहमीच अनिश्चित असणार हे उघड आहे. भारतीय उपखंडातील कोट्यावधी नागरिकांचे जीवन, सुख आणि दुःख, समृध्दी आणि यातना गेली हजारो वर्षे मोठ्या प्रमाणावर मॉन्सून वर अवलंबून राहिल्या आहेत.

दुसऱ्या शब्दात त्यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन एकप्रकारे जोखीमीचे, अनिश्चितता असलेले राहिले आहे. या अनिश्चिततेमध्ये, जोखीमेमध्ये तगून राहण्यासाठी येथल्या माणसांनी अंधश्रद्धांना पकडून ठेवले असावे असे तांबे सुचवतात.

तरुण पिढीसाठी आपली मुळे नक्की कशात आहेत हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक मदतकारक ठरणार आहे.

सर्वांनी जरूर विकत घेऊन वाचावे. पैसे सार्थकी लागले अशीच भावना असेल हे नक्की.

संजीव चांदोरकर

लेखक, अर्थतज्ज्ञ

(साभार - सदर पोस्ट संजीव चांदोरकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 19 Nov 2025 3:51 PM IST
Next Story
Share it
Top