महाराष्ट्राला ‘नालायक’ कोण ठरवतंय?

11207
Courtesy: Socil Media

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची प्रतिमा अपयशी ठरवण्यासाठी कोण प्रयत्न करतंय? केंद्र आणि राज्यात समन्वय आहे का? देशाला भाकरीची गरज आहे की, हेलिकॉप्टर मधून पडणाऱ्या फुलांची? वाचा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी उपस्थित केलेले १० मुद्दे…

१. ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर राज्यांना न विचारता परस्पर १७ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ केंद्राने वाढवला. त्या संदर्भात कृती कार्यक्रम निश्चित केला गेला नाही. त्या त्या राज्यांवर हा निर्णय सोपवला नाही.

२. राज्यांशी समन्वय साधून मार्गदर्शक सूचना वगैरे द्यायची केंद्राची तयारी नाही. राज्यांचा गोंधळ अधिकच वाढेल, अशी सगळी ‘व्यवस्था’ केली जातेय.

३.  महिन्यापेक्षा अधिक काळ देशभरातील कष्टकऱ्यांचे हाल झाले. त्यानंतर त्यांना घरी पोचवण्यासाठी मजुरांकडून प्रवासभाडे वसूल करण्यात आले! नंतर सारी पश्चातबुद्धी.

४. कष्टकरी उपाशी मरत असताना लष्कर आणि सर्व सैन्यदले हेलिकॉप्टरमधून फुले उधळताहेत. हे म्हणजे, ‘भाकरी मिळत नसेल, तर केक खा’, असे म्हणण्यासारखे आहे.

५. इथे ‘हेलिकॉप्टर मनी’ ची (ही फ्रेज आहे) गरज आहे. राज्यांच्या तिजोरीत खडखडाट आहे. केंद्र इथे राज्यांचा करांमधला वाटाही द्यायला तयार नाही. वरची मदत तर सोडूनच द्या. मग महसुलासाठी राज्यांनी दारूसारखे काही प्रयत्न करावेत, तर त्यांचे हसे होणार! गप्प बसावे, तर अकार्यक्षम म्हणून जिकडे-तिकडे बोभाटा केला जाणार!

६. ‘पीएम केअर्स’कडे आलेल्या पैशांचे काय होणार आहे? या निधीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्याचे ‘ऑडिट’ होऊ शकत नाही. ‘कॅग’ त्याच्यावर ताशेरे मारू शकत नाही. संसद काही विचारू शकत नाही. हा निधी ‘आरटीआय’च्या कक्षेत येत नाही. मग, ‘सीएम फंड’ सोडून हा निधी नक्की आहे कशासाठी? तिथेही राज्यांच्या हक्काचा निधी केंद्राने पळवला.

७. अशा स्थितीत संसदेच्या फेरबांधणीसाठी केंद्र सरकार २० हजार कोटी खर्च करणार आहे. ते पैसे कोठून येणार आहेत?

८. महाराष्ट्रात मुंबईसारखे महानगर आहे. आपली आणि केरळची तुलना होऊ शकत नाही. केरळने आदर्श काम केले हे खरे, पण आपल्यासमोरची आव्हाने आणखी खडतर आहेत. आपली लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, महानगरीकरण हे आणखी वेगळे आहे.

९. मुळात, कोरोनाच्या संदर्भाने कडक पावले उचलायला हवीत, असे महाराष्ट्र आधीपासूनच सांगत होते, तेव्हा केंद्र सरकार ट्रम्प यांना पायघड्या घालण्यात मग्न होते. आता मात्र, महाराष्ट्राची स्थिती बिघडावी, असा प्रयत्न केंद्राचा दिसतो आहे.

१०. उद्धव ठाकरेंसह राज्यातील सरकारची उदात्त प्रतिमा तयार झालेली असताना, राज्य सरकारची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे सरकार कसे अपयशी ठरले, असे पर्सेप्शन तयार करण्यासाठी ही धावाधाव आहे. हा डाव लक्षात घेतला पाहिजे.

– संजय आवटे