Home > मॅक्स ब्लॉग्ज > तेल्या तांबोळ्याला संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे का ?

तेल्या तांबोळ्याला संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे का ?

तेल्या तांबोळ्याला संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे का ? असे विचार बाळगणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांना १ लाख रुपये किमतीचा पुरस्कार दिला जातो हा टिळकांच्या विचारांचा विजय आहे की भारतीय संविधानाचा ? याचा ज्याचा त्याने विचार करावा.. परखड विश्लेषण केला आहे अभ्यासक पैगंबर शेख यांनी...

तेल्या तांबोळ्याला संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे का ?
X

मोदी पुण्यात आले. पुणे बंद झाले. शाळांना सुट्टी यासाठी दिली गेली की शिक्षक देखील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील. विद्यार्थ्यांना शाळेत हा कार्यक्रम जबरदस्तीने दाखवला नाही हेच कौतुक म्हणावे लागेल. मोदींच्या स्वागतासाठी शनिवार वाड्याच्या बाजूची गर्दी दाखवण्यात आली. २०२४ ला मोदीच येणार असे काही लोकांना वाटत असल्याने आणि ते त्या कारणास्तव भाजपला पाठिंबा देत असल्याने लोकांची गर्दी अजून वाढली. आता लाचारी पत्करण्या शिवाय पर्याय नाही हे जनतेला देखील समजले.

असो, याही परिस्थितीत पुणे बंद असताना वेगवेगळ्या ठिकाणी मोदींच्या विरोधात निषेध आंदोलन केले जाते. आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यासाठीचे रस्ते देखील बंद केले जातात तरीही हजारोंची गर्दी आंदोलनाला होते. अगदी मणिपूरचे लोक देखील पुण्यात मोदींचा निषेध करण्यासाठी आंदोलनात सामील होतात. जसे देशाबाहेर मोदी गेल्यावर त्यांचा तिथले भारतीय आंदोलन करून निषेध करतात आणि हे भारतातील मीडिया दाखवत नाही अगदी तशीच परिस्थिती काल पुण्यात होती. आणि संपूर्ण देशभर हीच परिस्थिती आहे पण ते देशातील जनतेला हे दाखवले जात नाही. अहो, महिलांची नग्न धिंड काढली गेली हे समजायला तुम्हाला अडीच महिने लागले. याहून थोडा विचार करा देशात काय चाललय ते. पुणे जिल्ह्यात किती जणांना नोटिसा आल्या, किती जणांना स्थानबद्ध केले, किती जणांना काहीही कारण नसताना पहिल्या रात्रीपासूनच पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवले याची तर मोजनीच केली गेली नाही.

मोदी दगडु शेठ हलवाई गणपतीला भेट देतात. पण त्या समोरच भिडे वाड्यात वयाच्या २१ व्या वर्षी मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या भिडे वाड्यात मात्र मोदीजी जात नाहीत. चक्क भिडे वाडा झाकला जातो. स्त्री स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ ज्या वास्तूमध्ये रोवली गेली ती वास्तू प्रधानमंत्री पुण्यात आले असता झाकली गेली ही साधी गोष्ट न्हवे. टिळकांवर ज्यावेळी पहिला खटला दाखल झाला होता त्यावेळी त्यांना जामीन होण्याची तैयारी दाखवणारे हेच ते महात्मा फुले ज्यांनी शाळा सुरू केल्यावर बोटे मोडणाऱ्यांच्या नावे काल पुरस्कार दिला गेला.





विचार करण्याची गोष्ट आहे. देशात मणिपूर सारख्या ठिकाणी महिलांची नग्न धिंड काढली जाते. शेकडो लोक महिलांवर सामूहिक बलात्कार करतात, त्यांना जाळून टाकतात आणि ही गोष्ट तब्बल अडीच महिन्या नंतर देशाला समजते. अशा हजारो मणिपूर मध्ये घडलेल्या घटना ताज्या असताना, या दुःखाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून खपली देखील निघाली नसताना देशाचे प्रधानमंत्री कुठल्या तोंडाने पुण्यात येऊन पुरस्कार घेत होते बरे ? आणि कुठल्या पुणेरी तोंडाने पुरस्कार देणारे पुरस्कार देतही होते ? हा प्रश्न आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना पडतो. हा प्रश्न आम्हाला पडतो कारण तो तिथे उपस्थित असणाऱ्या नेत्यांना पडत नाहीये.




पुण्यात १८९७ मध्ये प्लेगची साथ सुरू असताना टिळकांची कर्तुत्व सर्वश्रुत आहे. त्याचवेळी ज्योतिबांची साऊ लोकांची सेवा करून त्याच वर्षी मृत्यूमुखी पावल्या. मणिपूरमध्ये मानवी द्वेषाची साथ अतिउच्च शिखर गाठताना मोदींची भूमिका यापेक्षा काही वेगळी नाही त्यामुळे त्यांना योग्यच पुरस्कार मिळाला आहे असे म्हणण्यास पूर्ण वाव आहे.

सर्वात हास्यास्पद गोष्ट म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असलेले रोहित दिपक टिळक हे या कार्यक्रमाचे आयोजन करतात. ते मोदींचे गोडवे प्रास्ताविक मध्ये गातात. पुरस्कार देताना केंद्र सरकारच्या विरोधात मोट बांधत असलेले शरद पवार साहेब मंचावर उपस्थित राहतात, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदेजी देखील तिथेच असतात, अगदी मोदींचा ऑटोग्राफ अमेरिकेत घेतला जातो असे अज्ञानी वकव्य महाराष्ट्राच्या मुख्यंत्र्याकडून केले जाते. त्याला अजित दादा आधीच दुजोरा देऊन बसलेले असतात. याहून अधिक फडणवीसांना बोलण्याची गरजच काय राहिली आता ?

इतिहासात पहिल्यांदा हे पाहण्यात आले असेल की मंचावर आणि रस्त्यावर एकाच पक्षाचे लोक समर्थन देखील करतात आणि विरोध देखील. या सगळ्यात जनतेचा मोठा गेम झालायं. जनतेच्या प्रश्नांना कोणीही वाली राहिलेला नाही. चळवळीचा कोणीही वाली राहिलेला नाही. शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणारी आणि आपले मत ठामपणे मांडणारी चळवळ शेवटच्या घटका मोजत आहे. ज्यांनी त्याची जबाबदारी घेतली तेच 'मनुवादाचा पुरस्कार ' उघडपणे करत आहेत.




ज्या मोदींनी मनोहर कुलकर्णींचे पुण्यात कौतुक केले होते त्याच मोदींना पुणेरी पगडी फुलेंच्या पगडीचा आग्रह धरणारे पुण्यात घालतात याहून मोठी शोकांतिका काय असेल ? तो राजकीय कार्यक्रम न्हवता असे म्हंटले जात आहे. बर, मग कालची कृती नक्की कुठल्या संस्कृतीत बसते ? निदान हे तरी आम्हाला सांगा. नाहीतर संस्कृतीचे गोडवे तरी निदान गाऊ नका.




आम्ही मोदींचा द्वेष करतो अशी आरोळी आता ठोकली जाईल. मोदींचा द्वेष करण्या एवढे मोदी मोठे झालेत असे मला तरी निदान वाटत नाही. त्यांचा द्वेष करण्या सारखे आमच्याकडे काहीच कारण नाहीये. जरी त्यांनी नोटबंदी करून करोडो तरुणांचे रोजगार बुडवले असले तरी, अचानक लॉकडाऊन लाऊन करोडो भारतीयांना रस्त्यावर आणले असेल तरीही, कुठलेही नियंत्रण नसलेली महागाई केली असली तरीही आम्ही त्यांचा द्वेष करत नाही. ते प्रधानमंत्री आहेत आणि आम्ही सुजाण नागरिक आहोत. म्हणून आम्ही त्यांना फक्त प्रश्न विचारत आहोत.




ते आमच्या सारख्यां पासून पळून का जातात ? ते पुण्यात आले असता लोकांना नोटिसा का दिल्या जातात ? लोकांना स्थानबद्ध का केले जाते ? त्यांना पोलीस स्टेशन मध्ये का बसवून ठेवले जाते ? आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, लोकांचा विरोध दिसू नये म्हणून रस्ते का बंद केले जातात ? मोदीजी एकाही विरोधकाला का भेटत नाही बरे ?

मोदी विरोधकांना भेटायला घाबरतात का ? हा प्रश्न त्यांच्या समर्थकांनी त्यांना भेटल्यावर विचाराला हवेत. आहे का तेवढी धमक तुमच्यात ? मोदी फक्त मार्केटिंग कंटेट आहेत. सत्तेसाठी आणि मनुवादी व्यवस्था आणण्यासाठी चालवलेले कंटेंट... #समजलंतरठीक

- पैगंबर शेख

पुणे, महाराष्ट्र

९९७००७०७०५



Updated : 5 Aug 2023 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top