Home > मॅक्स ब्लॉग्ज > मोदी- अदानी नावाची मोनोपॉली

मोदी- अदानी नावाची मोनोपॉली

अदानी प्रकरणावरून मोदींनी पुन्हा एकदा नेहरूंची ढाल वापरण्याचा प्रयत्न केला. पण ही ढाल शेवटी कुठपर्यंत कामाला येणार आहे. मोदी-अदानींची मोनोपॉली देशात तयार झालीय. दोघे ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. एक बाजू खोटी असेल तर दुसरी बाजू खरी कशी मानायची.. वाचा रवींद्र आंबेकर यांचा लेख

मोदी- अदानी नावाची मोनोपॉली
X

हजारों सवालों से अच्छी है मेरी खामोशी. ना जाने कितने जवाबों के आबरू रखी है? पासून सुरु झालेला प्रवास तुम्हारे पैर के नीचे जमीं नहीं है. कमाल ये है कि तुम्हें खबर ही नहीं है पर्यंत आलाय. २०१२ मध्ये युपीए सरकार वर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, संसद बंद पाडली जात होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना बोलू दिले जात नव्हते. त्यावेळी मनमोहन सिंह यांनी हजारों सवालों से अच्छी है मेरी खामोशी असं म्हणत विरोधकांना आपलं उत्तर दिलं. माझ्या कामाचं मूल्यमापन इतिहास करेल असं मनमोहन सिंह बोलले होते. त्यानंतर आज २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अदानी समूहाला फायदा पोहोचवण्याचा थेट आरोप झाला.

२०१२ मध्ये मनमोहन सिंह मौनी राहिले असा त्यांच्यावर आरोप होत होता. आज नरेंद्र मोदी मौनीबाबा च्या भूमिकेत आहेत. मनमोहन सिंह यांच्यावर आरोप होत राहिले, कालांतराने त्यातली अनेक प्रकरणं नंतर विरून ही गेली. त्यातले काही आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, मात्र २०१२ मध्ये जी काही पडझड झाली त्यानंतर भारतीय राजकारणामध्ये मोदींचा उदय झाला. मोदींनी प्रचार-प्रसार यंत्रणेवर पकड मिळवली. प्रत्येक नॅरेटीव्ह आपल्याबाजूने फिरवण्यासाठी नवं नॅरेटीव्ह तयार केले. धर्म आणि देश या पांघरूणाखाली आपली प्रत्येक चूक, त्रुटी, घोटाळा लपवला. त्याचमुळे ज्यावेळेला अदानींचं नाव घेऊन राहुल गांधींनी भाषण केलं आणि मोदी अदानींसाठी काम करतात असा आरोप केला तेव्हा देशातील मेनस्ट्रीम मिडिया राहुल गांधी ना प्रश्न विचारू लागली. हा मोदींच्या आणि भारताच्या बदनामीचा कट असल्याचा आरोप करू लागली.

आज पर्यंत अनेक पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, उद्योगपतींना आश्रय दिल्याचा आरोप ही काही नवीन नाही. मात्र उद्योगपतीसाठीच मोदी काम करत असल्याचा आरोप थोडा वेगळा आहे. मोदी अदानींसाठी काम करतात या मोदींनी मौन धारण केलं. बिलकुल काही बोलले नाहीत. जे काही भाषण झालं त्या भाषणामध्ये अदानी वगळून सगळं काही होतं त्यांनी काँग्रेसला त्यांच्या पायाखाली जमीन नसल्याची आठवण करून दिली.

सध्याचं मोदींचं मौन आणि मनमोहन सिंगांचं मौन यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. मोदींची बहुमतावर पकड असल्याने त्यांनी सभागृहात भाषणं होऊ दिली. त्याच्यावर आपलं उत्तर दिलं. नव्या भारताला ज्या पद्धतीचं उत्तर हवं ते देण्याचा प्रयत्न केला. पण मायनस अदानी ! आता मोदींना अदानीवर का बोलायचं नाहीय? त्यावर थोडसं बोलू आणि मग नंतर मोदींच्या भाषणातले मुद्दे पाहू. मोदींचं भाषण हे नेमकं कोणासाठी होतं? मोदींचा त्याच्यातला राजकीय डाव किंवा राजकीय समीकरणं काय होती ते पण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात.

अदानींची संपत्ती वाढली. अदानी १६०-१६२ नंबर वरून अदानी जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून झाले. त्याच वेळेला हिंडनबर्गचा रिपोर्ट आला. अदानींच्या एफपीओ च्या अवघ्या काही दिवस आधी रिपोर्ट आला आणि अदानींचे शेअर्स कोसळले. दोन दिवसांनी अदानींचे शेअर्स पुन्हा एकदा वाढायला लागले मात्र त्याबद्दल मार्केट मधल्या लोकांना बरीचशी साशंकता आहे. या सगळ्या प्रकारावर अदानींनी ही मोदींचा मार्ग स्वीकारला. हा भारतावरचा हल्ला आहे. भारताची आर्थिक सुबत्ता, समृद्धी ही अनेक देशांना बघवत नाही. काही anti national लोकांनाही बघवत नाही असा प्रतिवाद केला गेला. एकूण आरोपांबाबत अदानी ग्रुप ही शांत राहिला. या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं की, पैसे वळवून आणण्याच्या ज्या रूट बद्दल नेहमीच आक्षेप आणि संशय घेतला जात होता, अनेक व्यापारी आणि एक उद्योगपती यांना नेहमी संशयामधून पाहिलं जायचं तो रूट अदानींच्या निमित्ताने एकदम देशभक्त रूट होऊन गेला. परदेशातील विविध शेल कंपन्यांच्या माध्यमातून अदानींनी आपल्याच शेअर्स मध्ये गुंतवणूक केली आणि शेअर्स चा भाव चढा ठेवला, म्हणजे त्यात छेडछाड केली असा अदानींवर थेट आरोप आहे, विशेष म्हणजे एरव्ही राजकीय विरोधकांवर कारवाई करण्यासाठी पॅराशूट घालून बसलेल्या केंद्रीय एजन्सीज या रिपोर्टनंतर बिळात जाऊन बसल्या. सेबीने जे पत्रक काढलं त्यात अदानी ग्रुप चं नाव ही घेतलं नाही. अशा वेळी विरोधी पक्षांकडे संसदेत आवाज उठवणं आणि संयुक्त संसदीय समितीच्या मार्फत चौकशीची मागणी करणं याव्यतिरिक्त काहीही पर्याय शिल्लक राहिला नाही. मात्र विरोधकांच्या या मागणीकडे मोदींनी अक्षरशः दुर्लक्ष केलं.

ज्यावेळेला अशा पद्धतीचे आर्थिक गुन्हे घडतात. त्यावेळेला एकतर पटापट CBI, ED, income tax या सगळ्या लोकांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे... आणि खासकरून सेबी SEBI ने, कारण हा त्यांचा विषय आहे. तर या सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन चौकशी केली पाहिजे अशी साधारणतः अपेक्षा असते. सामान्य लोकांच्या बाबतीत हे असच घडतं. सामान्य उद्योगपतींच्या बाबतीत हे असं घडतं. काही उद्योगपती असामान्य असतात. त्यांच्या बाबतीत हे थोडं उशिराने घडतं. पण घडतं. पण अदानी सारखे उद्योगपती अतिविशेष असतात.

अदानी आणि नरेंद्र मोदी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. जर अदानींवर आरोप झाला आहे, याचा अर्थ हा थेट मोदींवर हल्ला आहे. त्याचमुळे अदानींच्या चौकशीच्या बाबतीत काहीच घडलं नाही, आणि ते न घडल्यामुळे संसदेमध्ये मागणी होत होती की, joint Parliamentary committee मार्फत या सगळ्या आरोपांची चौकशी व्हायला पाहिजे. हा जो काही route आहे वेगवेगळ्या देशांमधून पुन्हा पैसे इथे आणण्याचा, हा नेमका काय route आहे हा कोणाचा पैसा आहे? हे देशाला समजलं पाहिजे. राहुल गांधींनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला, राहुल गांधी म्हणाले की मोदी कुठल्या देशात अदानींच्या सोबत गेले, कुठल्या देशात आधी मोदी गेले नंतर अदानी गेले, कुठल्या देशांमध्ये मोदी जाऊन आले नंतर अदानी गेले किंवा अदानी जाऊन आलेल्या देशांमध्ये मोदी कधी गेले याच सोबतीने भारतीय जनता पक्षाला electoral bondच्या माध्यमातून किती पैसे दिले याचीही जाहीर चौकशी व्हायला पाहिजे, याचा खुलासा व्हायला पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहेत.

ज्यावेळेला JPC आणि मोदी-अदानींचं नाव घेऊन सभागृहामध्ये घोषणा दिल्या जात होत्या, त्या त्यावेळेला लोकसभेत मोदी दोन-तीन वेळा पाणी प्यायले, राज्यसभेत ते अस्वस्थ दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर सहसा काही भाव उमटत नाहीत, पण अदानी प्रकरणामुळे ते काहीसे त्रासलेले दिसले. आता एवढा मोठा नेता तर अशा छोट्या- मोठ्या या गोष्टी होऊ शकतात. Body language वरनं फार काही मोजणं आणि काही मापं काढणं योग्य नाही. पण साधारणतः मोदी आणि अदानी यांची जवळीक ज्यांना माहितीय त्यांना याचं कारण सहज लक्षाच येऊ शकतं.

राहुल गांधींच्या भाषणाचा हा impact मानायला काही हरकत नाही. राहुल गांधींना आणखी एक करता आलं असतं, त्यांना काही पुरावे सभागृहाच्या पटलावर ठेवता आले असते. त्यांचे आरोप हे authenticate होत नाहीयेत असा भारतीय जनता पक्षातर्फे हल्ला केला गेला. राहुल गांधींना तिथे score करता आला असता. असो, आता येऊयात नरेंद्र मोदी यांच्या उत्तराकडे.

नरेंद्र मोदींनी जे उत्तर दिलेलं आहे ते फार काळजीपूर्वक तयार केले गेले होते. त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली त्याचा सगळ्यात भर होता तो महत्वाचा म्हणजे की देशाला स्थिरता आलेली आहे आणि ही स्थिरता काही लोकांना आणि काही लोकं म्हणजे जे कथित anti national आहेत त्यांना खुपते असा हल्ला त्यांनी चढवला. संसदेच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांनी reforms वर भर देत भाषण केलं. DBT हा त्यांचा नेहमीचा मुद्दा आहे, direct benefit transfer मुळे लाभार्थ्यांच्या account मध्ये थेट पैसे जातात. लाभार्थ्यांना थेट मदत देणं हा त्यांचा आपण म्हणूयात की match point आहे. नरेंद्र मोदींचा सगळ्यात जास्त भर हा लाभार्थ्यांशी थेट connect चा आहे. आम्ही दलाल काढून टाकले, आणि म्हणून काही लोकं बेचैन आहेत. असं नेहमीचं समीकरण ते चिटकवून देत असतात.

आपण जर त्यांच्या भाषणाचा flow पाहिला तर याच पद्धतीचा आहे, आणि मग त्यांनी देश कसा जागतिक पातळीवर सक्षम केला, covid लसीकरण, supply chain आणि ह्या सध्या manufacturing hub या दृष्टिकोनातून भारताकडे दृष्टिकोनातून पाहिलं जातंय चा जोरदार प्रचार ही करायला ते विसरत नाहीत. Unicorn आणि start up हा नेहमीचा त्यांचा आवडता मुद्दा आहे. देशात आता साधारणतः एकशे आठ युनिकॉर्न तयार झालेले आहेत आणि तेही खासकरून covid च्या काळामध्ये. energy consumption मध्ये भारताचा क्रमांक वाढतोय. प्रगतीचं मानक म्हणून energy consumption कडे पाहिलं जातंय. देशाची लोकसंख्या वाढते, energy consumption ही वाढतंय इ. इ. इ. एकूणच देश सुरक्षित आहे.२००४ ते २०१४ च्या तुलनेत २०१४ नंतर देशातील हिंसा कमी झालेली आहे. असं मोदींनी ठणकावून सांगितलं. लोकसभेत त्यांनी पंडित नेहरूंचं नाव घेतलं नाही, मात्र राज्यसभेत लोकसभेपेक्षा जास्त आक्रमक विरोध झाल्याने त्यांना बचावासाठी नेहरूंना आणावंच लागलं. नेहरू आडनाव का लावत नाहीत, असा मुर्खासारखा प्रश्न विचारून पंतप्रधानांनी चर्चेचा ट्रॅक घसरवण्याचा प्रयत्न केला

काँग्रेसने २००४ ते २०१४ च्या मध्ये विकासाची सुवर्णसंधी गमावली असा नवीन मुद्दा मोदींच्या भाषणात आला आहे. मात्र या वेळी जेपीसी बाबत बोलायची सुवर्णसंधी त्यांनी मुद्दाम सोडून दिली. आपली इमेज टीव्ही आणि न्यूजपेपर्समुळे झालेली नाही असं मोदींनी सभागृहात सांगितलंय. दररोज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर जाहिराती छापून स्वतःला थँक्यू बोलवून घेणाऱ्या मोदींचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची भावना सभागृहातील त्यांच्या सहयोगी सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. एकूणच मोदींच्या प्रत्यक्ष वर्तणूक आणि विचार यांच्यातील गॅप लक्षात येण्यासारखी आहे

अदानी प्रकरणामुळे स्वतःच्या प्रतिमेवर आघात झाल्यामुळे मोदींनी अख्खा देश आपल्या बचावासाठी उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.

मोफत राशन घेणारे ऐंशी कोटी लोकं विरोधी पक्षांच्या आरोपांवर विश्वास ठेवणार नाहीत, असं म्हणत त्यांनी ऐंशी कोटी लोकं मोफत राशन घेतात ही माहिती दिली. म्हणजे एका दृष्टिकोनातून मोदींच्या मर्जीवर ते जगतात अशा स्वरूपाचं हे वक्तव्य होतं. आता एकशे चाळीस कोटींचा देश आहे. ऐंशी कोटी लोकं गरीब आणि रेशनवर मोफत राशन घेत आहेत आणि देशाचा पंतप्रधान ते गर्वाने सांगत आहेत... ऐंशी कोटी लोकं तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. अकरा कोटी शेतकऱ्यांना PM किसानच्या अंतर्गत थेट अनुदान मिळतंय, तीन कोटी लोकांना पक्की घरं मिळतायेत, नऊ कोटी लोकांना मोफत gas मिळतोय. ११ कोटी शौचालय, आठ कोटी नल से जल योजना आणि आयुष्यमान भारत मध्ये दोन कोटी लोक- परिवारांना थेट मदत झालेली आहे आणि ह्या सगळ्या परिवारांचा मी घटक आहे, ह्या सगळ्या लाभार्थ्यांना मोदींनी मदत केलेली, आहे ही मोदींची मदत आहे असं म्हणत त्यांनी अदानी प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. खरं तर यात मोदींचं काय कर्तृत्व आहे, ही भारत सरकारची मदत आहे, तुमच्या आमच्या tax च्या पैशातून निर्माण झालेल्या या सुविधा आहेत, मात्र मोदी सातत्याने स्वतःचा डंका वाजवून घेत असतात.

लाभार्थी हीच मोदींची strength आहे असं मोदींचं म्हणणं आहे. खरं तर तुमचं शक्तीस्थळ तुमची कमजोरी सुद्धा असते. कदाचित विरोधी पक्षांना या कमजोरी ओळखता आल्या नाहीत. ज्यावेळेला ऐंशी कोटी लोकं अजूनही मोफत राशनवर जगतायेत, अजूनही भारत आणि India मधील दरी वाढतेय असं चित्र दिसतंय. ज्या India मध्ये अदानी सर्वांत श्रीमंत व्यक्ती होऊ शकते आणि इथेच ऐंशी कोटी लोकांना रेशनसाठी रांगा लावाव्या लागत असतील तर या मुद्द्यांना राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा बनवण्यासाठी विरोधी पक्षांना बरंच काम करावं लागणार आहे. अदानींच्या माध्यमातून देशात मोनोपॉली निर्माण झालीय ही गंभीर बाब आहे. अदानींसारखे काही मूठभर उद्योगपती यांच्या खिशात ही सगळी संपत्ती चालली आहे. ही देशाची संपत्ती आहे. तुमची आमची संपत्ती आहे. आणि तुमची आमची संपत्ती नेमकी कुठे जाते? कशी खर्च होते? आणि ज्यांच्यावरती खर्च होतोय त्यांच्या बाबतीतलं सरकारचं उत्तरदायित्व काय? यापासून सरकारला पळ काढता येणार नाही.

अदानी प्रकरणातील प्रश्नांपासून मोदी पळत असतील तर मोदींनी म्हटलेला शेर कदाचित पुढच्या काळामध्ये त्यांच्यासाठीच लागू होऊ शकतो. मोदीजी, थोडंस लक्ष स्वतःच्या पायांकडेही दिलं पाहिजे. तुमचं संघटन मोठं आहे, विश्वव्यापी आहे तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. तुम्ही म्हटलं की ED ने सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र केलं, तसंच तुमच्या संघटनेच्या बाबतीतही म्हटलं जातं की ED आणि केंद्रीय agency मुळे जे जे कोण पिडीत आहेत ते सगळे भाजपमध्ये येऊन निवडणूका लढतायेत जिंकून येत आहेत. या अशा सगळ्यांचं हे संघटन घेऊन तुम्ही चाललेले आहात, हे संघटन तुम्हाला जड जाणार आहे. बहुमताच्या जोरावर आज तुम्ही सर्व निभावून नेण्याचा प्रयत्न करताय, पण पुढच्या काळामध्ये याचा सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होणार आहे. त्यामुळे देशासाठी तुम्ही काय काय केलं हे सगळं सांगत असताना जी काही टोळी तुमच्या आसपास जमलेली आहे, ती काय करतेय हे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. देश लुटणारी ही टोळी ही देशासाठी घातक आहे आणि काळाला उत्तरं मात्र तुम्हाला द्यावी लागणार आहेत. त्यावेळेला तुम्हाला पळून जाता येणार नाही. संसदेमध्ये तुम्ही गप्प राहू शकता. तुम्ही प्रश्न टाळू शकता. पण सत्य तुमच्या गप्प बसण्यामुळे टळत नाही, तो तुमचा पिच्छा करतच राहिल.

Updated : 11 Feb 2023 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top