Home > मॅक्स ब्लॉग्ज > मीरा के प्रभु गिरधर नागर!

मीरा के प्रभु गिरधर नागर!

संत मीराबाई! भारतीय संत-कवी परंपरेतील एक अद्भूत दुवा. भगवान कृष्णाच्या भक्तीत दंग होऊन ज्यांचे जीवन केवळ कृष्णमय झाले, अशा संत मीराबाई यांची आज पुण्यतिथी निमित्त ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केलेल्या भावना....

मीरा के प्रभु गिरधर नागर!
X

खरे तर संत मीराबाई यांचा जन्म व मृत्यू यांच्या तारखा व वर्ष या दोन्ही बाबतीत अनेक मतप्रवाह व विवाद आहेत. पण 1558मध्ये आजच्या दिवशी संत मीराबाई कृष्णाकडे निघून गेल्या असे त्यांचे भक्त मानतात. म्हणून अधिक विवादात न जाता आपण आजचाच दिवस त्यांचा स्मृतीदिन मानून त्यांच्या अगाध कृष्णभक्तीला वंदन करूया!

राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यात कुरकी नावाच्या गावात मीरेचा जन्म 1504मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रत्नसिंह. लहान वयातच मीरेचा विवाह उदयपूरमधील चित्तोडचे महाराणा संग सिंह यांचा पुत्र कुँवर भोजराज यांच्या समवेत झाला. दुर्दैवाने लवकरच भोजराजचे निधन झाले. पाठोपाठ वडिल, सासरे आदी आप्तेष्टही मरण पावल्याने मीरा दु:खी, कष्टी झाली. त्यातूनच ती कृष्णभक्ती करू लागली.

मीरेचे कृष्णप्रेम इतके लोकविलक्षण की, ती साक्षात कृष्णालाच आपला जीवनसाथी मानून भजने करू लागली व मंदिरात नाचूही लागली.

राजघराण्यातील महिलेने असे सार्वजनिक ठिकाणी गाणे, नाचणे तेव्हाच्या रुढी-रिवाजांना धरून नव्हते. मीरेला रोखण्याचा प्रयत्न तिच्या सासरच्या मंडळींनी केला. ती ऐकेना, तेव्हा तिच्यावर दोन वेळा विषप्रयोगही झाले, असे म्हटले जाते. पण मीराबाईंवर विषप्रयोगाचा परिणाम झाला नाही. साक्षात भगवंतांनीच तिचा विषाचा प्याला प्राशन केला, अशा आख्यायिका आहेत.

ते काहीही असो. मीराबाई बचावल्या, हे मात्र खरे. कृष्णभक्तीची भजने रचणे, गाणे व त्यावर नृत्यही करणे, यामुळे त्यांची कीर्ती दिगंत झाली व राजस्थानबरोबरच शेजारच्या गुजरात, पंजाबमधील कृष्णभक्तही तिचे अनुयायी बनले. आता त्या संत मीराबाई बनल्या.

एका आख्यायिकेनुसार सम्राट अकबराच्या कानावर तिची कीर्ती गेली. त्यांना मीराबाईना भेटायचे होते. पण ते शक्य नव्हते, कारण चित्तोडच्या राजघराण्याशी मोगलांचे वैर होते. म्हणून तानसेनला घेऊन अकबर भिकाऱ्याच्या वेषात मीराबाईना भेटला व त्यांच्या भजनांवर खुष होऊन आपल्या गळ्यातील कंठहार त्यांनी मीराबाईच्या पायावर ठेवला. अर्थात या कथेला ऐतिहासिक आधार नाही.

राजवाड्यात राहणे अशक्य आहे, हे ध्यानात आल्यावर त्या बाहेर पडल्या व हातात तंबोरा घेऊन कृणाच्या लीला गात गात त्या वृंदावनला येऊन पोहोचल्या व तिथे त्यांनी आराधना पुढे चालू केली. काही वर्षांनी त्या चालत चालत द्वारकेला येऊन पोहोचल्या व तिथेच त्यांनी ईहलोकीची यात्रा संपवली.

मीराबाईंच्या जीवनकालाप्रमाणेच त्यांच्या आयुष्याबद्दलही इतिहासापेक्षा आख्यायिकाच अधिक आहेत व त्या परस्पर भिन्नही आहेत. इतके मात्र खरे की, भक्ती सांप्रदायातील त्यांची कामगिरी अद्वितीय आहे.

त्यांच्या रचनांमध्ये राजस्थानीबरोबरच हिंदी, भोजपुरी व गुजराती शब्द आढळतात. पुढील पाच शतके संत मीराबाईंची भजने लोकप्रियच राहिली व त्यांच्या जीवनावर अनेक चित्रपट, नाटके येऊनही त्यांच्या जीवनाबद्दलची उत्सुकताही कायम राहिली, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.

आपल्या रचनांच्या अखेरीस त्या `मीरा के प्रभू गिरिधर नागर' असे म्हणत. त्यांनी कृष्णालाच आपले `प्रभू ' मानले होते व आपले सर्वस्व त्याच्या चरणीच अर्पण केले होते, हेच यातून सिद्ध होत राहते. संत कबीर, तुलसीदास अशा उत्तर हिंदुस्थानी संत-कवी परंपरेत त्यांचे स्थान मानाचे आहे.

त्यांच्या एका लोकप्रिय रचनेत त्यांनी आपल्या जीवनाचे जणु गमकच उलघडले. त्या म्हणतात:

पायो जी म्हे तो

राम रतन धन पायो॥

वस्तु अमोलक दी मेरे

सतगुरु किरपा कर अपनायो॥

जनम जनम की पूंजी पाई

जग में सभी खोवायो॥

खायो न खरच चोर न लेवे

दिन-दिन बढ़त सवायो॥

सत की नाव खेवटिया सतगुरु भवसागर तर आयो॥

मीरा के प्रभु गिरधर नागर

हरस हरस जश गायो॥

- भारतकुमार राऊत

Updated : 2 March 2021 3:47 AM GMT
Tags:    
author-thhumb

भारतकुमार

Print & TV Journalist,Political Analyst and formerMember of Parliament (RS). Worked in India & abroad and in English & Marathi. Opinions are strictly personal.


Next Story
Share it
Top