Home > मॅक्स ब्लॉग्ज > मधूर आवाजाची धार

मधूर आवाजाची धार

एका ट्विटनं भारतातील शेतकरी आंदोलनाला आंतराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या रियानाची जात आणि धर्म कोणता? याबाबत भारतीय लोकं इंटरनेटवर सर्च करत असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी रियानाचा संघर्ष फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडलाय....

मधूर आवाजाची धार
X

रॉबिन रियाना फेन्टो, तथा रियाना, ही वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस शहरात जन्मलेली एका फेरीवाल्याची मुलगी. लहानपणी ती आपल्या वडिलांसोबत रस्त्यावर कपडे विकायची. त्यात वडील मद्यपी. आई सोडून गेलेली. शिवाय रियानाला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होता आणि त्यावर सतत उपचार सुरू होते.

रियानाला आवाजाची निसर्गदत्त देणगी होती. तिच्या शाळेत तिने गायलेलं गाणं एका अमेरिकन म्युझिक कंपनीच्या मालकाने ऐकून तिला तिथे बोलावली. "म्युझिक ऑफ द सन" हा तिचा पहिला अल्बम २००३ साली प्रसिद्ध झाला तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. तो इतका गाजला आणि खपला की तिथून तिने मागे वळूनच पाहिलं नाही. आज वयाच्या ३२ व्या वर्षी ती अब्जोपती आहे. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत.

आपले जुने दिवस मात्र रियाना विसरलेली नाही. गरीब मुलांना शिक्षण, एड्स आणि कर्करोगाचे रुग्ण यासाठी ती खूप दानधर्म करते. एकूणच दुबळ्या घटकांबद्दलची तिची आस्था, पैसा आणि प्रसिद्धीमुळे संपलेली नाही.

दील्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश इथे शेतकरी आंदोलनाला चिरडण्यासाठी इंटरनेट बंद ठेवलं आहे. अमेरिकेच्या सीएनएन वृत्तसंस्थेने यावर एक सविस्तर बातमी दिली. तिचा दाखला देऊन, "आपण यावर का बोलत नाही?", असं ट्वीट तिने काल केलं आणि भारतातील सोशल मीडियावर रान उठवलं. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या आंदोलनात, ज्यात सुमारे ६० शेतकरी अद्यापपर्यंत मरण पावले आहेत, त्यावर भारतातील तमाम सेलिब्रिटी तोंडात मिठाची गुळणी धरून बसले असताना, अमेरिकेतली एक प्रख्यात गायिका आवाज उठवते, हे विलक्षण आहे. नव्हे, कित्येकांच्या तोंडात मारणारं आहे.

भक्तांची तर पार गोची झाली. तिला देशद्रोही म्हणता येत नाही की नक्षलवादी. पाकिस्तानात जा म्हणूनही सांगता येत नाही. "तू आमच्या अंतर्गत बाबीत कशाला ढवळाढवळ करतेस" असा दुबळा प्रतिकार काहींनी केला. त्यावर, "अबकी बार ट्रंम्प सरकार" बोंबलत आपले नेते तिथे कशासाठी गेले होते? ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का? अशा तीव्र प्रतिक्रिया स्वाभाविकपणे आल्या.

हा वैश्विकीकरणाचा जमाना आहे. मानवतेशी निगडीत घटनांचे पडसाद आता त्या देशापुरते मर्यादित रहात नाहीत. ते जगभर उमटतात. जॉर्ज फ्लॉईड या काळ्या माणसाची अमेरिकेत पोलिसाकडून हत्या झाल्यानंतर अख्ख्या जगाने गुडघा टेकवून त्याला श्रद्धांजली वाहिली होती. त्यात जो बायडन होते तसेच मैदानावरचे क्रिकेटपटू सुद्धा होते. या नव्या जगात इंटरनेट बंद ठेवणं हा मुस्कटदाबीचाच एक अवतार आहे. दुर्दैवाने भारत आज यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. (आणि आपण 'डिजिटल इंडिया' करणार म्हणे). तुम्ही ही मुस्कटदाबी केलीत तरी जगात कुठे ना कुठे तरी आवाज उठणार आणि तुमची नाचक्की होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपला आवाज सुमधूर असला तरी त्याला धार सुद्धा आहे, हे रियानाने दाखवून दिलं.

Updated : 4 Feb 2021 6:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top