Home > मॅक्स ब्लॉग्ज > Max personality: "तेजस्वी": तेजस्वी सातपुते

Max personality: "तेजस्वी": तेजस्वी सातपुते

Max personality: तेजस्वी: तेजस्वी सातपुते
X

कोरोनाच्या कहरामुळे भारतात २४ मार्च २०२० पासून लॉक डाऊन सुरू आहे. अशा अभूतपूर्व परिस्थितीचा अनुभव नागरिकांना तर नव्हताच. त्याशिवाय शासकीय यंत्रणांनासुध्दा असा अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात लॉक डाऊन लागू करण्यात स्वाभाविक अडचणी आल्या. अशातच एका व्हाट्सएप माध्यम समूहावर सातारा जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचं त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांना उद्देशून केलेलं आवाहन मला ऎकायला मिळालं. त्यांची मांडणी अतिशय नेमकेपणाणे केलेली होतीच; पण सगळ्य़ात महत्वाचं म्हणजे त्यात दुहेरी संवेदशीलता जाणवली. समाज आणि आपले सहकारी या दोन्ही घटकांचे हित त्यात ओतप्रोत भरलेलं होतं. या सुस्पष्ट मांडणीमुळे मी सुद्धा प्रभावित झालो.

काही काळ उलटून गेल्यावर लॉकडाऊन नंतरची सातारा जिल्ह्यातील परिस्थिती, पोलिस करत असलेली कार्यवाही, इतकं सूत्रबद्ध, परिणामकारक कार्य करीत असलेल्या तेजस्वी सातपुते मॅडम यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याबद्दल, सध्याच्या कामाबाबत आणि एकुणच प्रवासाबाबत लिहावसं वाटतंय असं सांगितल. त्यावेळी त्या घाईत होत्या.. थोडसं घाईत, पण सध्या कसं अन काय सुरु आहे? हे त्यांनी थोडक्यात सांगितलं. त्या म्हणाल्या

"सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे नागरिकांना वेळोवेळी, जागोजागी आवाहन करण्यात आले. अशी परिस्थिती हाताळण्याचा पोलिसांना पूर्वानुभव नव्हता. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन आवश्यक होतं. संवेदनशीलपणे नागरिकांना समजावून सांगणे,त्यांची समजूत काढणे यावर भर देण्यात यावा, फारच कुणी ऐकत नसेल तर, कायदा हातात न घेता अशा नागरिकांना पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या. याचा सुयोग्य परिणाम झाला. समाज आणि पोलिस यांच्यामध्ये एक आकलन तयार होत गेलं. लोक परिस्थिती समजुन घ्यायला लागले. अन पोलिस देखील लोकांच्या अडचणी समजुन घ्यायला लागले. सगळच नवीन असल्याने थोडासा अवधी गेल्यावर परिस्थिति नियंत्रणात आली. मग त्यानंतर आम्ही गरजा लक्षात घेऊन वेगळ्या योजनांवर काम सुरु केलं.''

[gallery columns="1" size="full" td_select_gallery_slide="slide" ids="85532,85533,85535,85528,85529,85530,85531,85534,85527,85536,85537,85538,85539"]

यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली. येणाऱ्या सर्व प्रवाशांची परिपूर्ण माहिती घेऊन ती पुढील योग्य कार्यवाहीसाठी संबंधित खात्यांना देण्यात आली. परदेशातुन येणार्‍या नागरिकांवर जास्त भर देण्यात आला. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील लाखो नागरिक नोकरी, व्यवसाया निमित्ताने मुंबई - पुणे येथे असतात.

नाकाबंदीमुळे जवळपास ४ लाख नागरिक सातारा जिल्ह्यात परतले आहेत, हे त्यामुळे कळू शकलं. त्यांच्याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली. महसूल आणि आरोग्य यंत्रणेला ही माहिती दिल्यामुळे त्यांना त्यांच्या कामात खूप उपयोग झाला.

पारधी समाजातील मुलांना मदत करताना...

सामाजिक बांधिलकीतुन काही उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामध्ये पारधी समाजाची माहिती गोळा करुन त्यांच्यासाठी काही गोष्टी हाती घेतल्या. सातारा जिल्ह्यात अशी ९०० कुटुंबे असल्याचे लक्षात आलं. लॉकडाऊनच्या काळात त्यांची उपासमार होऊ शकते हे देखील त्याच माहितीमुळे लक्षात आलं. या समाजातील बहुतांश लोक मजुरी करत होते. त्यांच्या हातातील काम या परिस्थितीत गेले होते. त्यातच या समाजावर चोर्‍या मार्‍यांचा शिक्का आहे. काही मोजके जण चोर्‍या करण्यात अग्रेसर असतात. त्या मोजक्या जणांच्या टोळक्यात या उर्वरित आणि संख्येने मोठ्या प्रमाणात असलेल्या कष्टकरी पारधी समाजाने उपासमारीच्या कारणाने सहभागी होऊ नये, म्हणून त्यांना जागीच अन्न धान्य पुरविण्याचे काम हाती घेतले”.

पोलिस यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत सतर्क असतेच. पोलिसांना वेगवेगळ्या पार्श्वभुमीवर जिल्हाभर गस्त घालावी लागते. त्यामुळे साहजिकच त्यांना ठिकठिकाणची वस्तुस्थिती समक्ष अवगत होत राहते. अशा गस्त घालणार्‍या पोलिस सहकाऱ्यांकडुन कुठे अन, काय मदतीची गरज आहे, हे समजून घेण्यात आलं. या काळात दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांनी देऊ केलेली मदत एकत्रित करुन गरजू लोकांपर्यत जागेवरच उपलब्ध करून देण्यात आली.

कोरोनाच्या आव्हानामक परिस्थितीत करत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल तेजस्वी सातपुते यांना नुकताच दिल्ली येथील भारत गौरव अवॉर्ड फौंडेशनतर्फे "कोरोना सेनानी सन्मान" जाहीर करण्यात आला.

अशा या कल्पक, कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या वाटचालीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला. त्या स्वाभाविकपणे कामात होत्या. प्रवास सांगायला आता वेळ नाही. पण तुम्ही काही मूलभूत गोष्टी कळण्यासाठी यु ट्युब वर उपलब्ध असलेले माझे व्हिडीओ पाहून समजून घेऊ शकता, ते पाहून झाल्यावर त्या व्यतिरिक्त इतर काही तपशीलवजा माहिती हवी असल्यास परत बोलू, असा दिलासाही त्यांनी दिला. त्यांचे यू ट्युब व्हिडीओ आणि त्यांच्यासमवेत साधलेला संवाद यातून त्यांच्या तेजस्वी नावाप्रमाणेच साजेशी प्रेरक कथा उलगडत गेली. ती आपल्याला निश्चितच आवडेल, असा विश्वास आहे.

max personality sp tejaswi satputeअहमदनगर जिल्ह्यातील औरंगाबादच्या सीमेलगत असलेल्या शेवगाव इथं तेजस्वी यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं. आई कृष्णाबाई प्राथमिक शाळेत शिक्षिका तर वडील बाळासाहेब व्यावसायिक. तेजस्वी यांच्या व्यक्तिमत्वावर आई वडिलांचा मोठा ठसा आहे. वडील अतिशय विचारी गृहस्थ आहेत, असे त्या आवर्जुन सांगतात. त्याचं कारण देखील तसंच आहे. जेव्हा त्यांच्या आई वडिलांचं लग्न झालं तेव्हा दोघेही ११वी शिकलेले होते. वडील ११वीतून शिक्षण थांबवुन घरच्या कामात गुंतवुन घेतलेले सर्व साधारण कष्टकरी होते. त्यावेळी त्यांच्या आईला मात्र शिकण्याची इच्छा होती. अतिशय सर्व साधारण वातावरण असतांनाही त्यांनी त्या हलाखीच्या परिस्थितीतही आईला पुढील शिक्षण घेऊ दिलं. लग्नानंतर वडिलांनी आईला पुढे शिकण्यास जे उत्तेजन दिले ते आमच्या कुटुंबाच्या परिवर्तानाचे केंद्र आहे असेही त्या नोंदवतात.

त्यांच्या आई डी एड करुन प्राथमिक शिक्षिका झाल्या. नोकरी करत करत तर बीए. अन एम. ए सुध्दा झाल्या. आता तर त्यांची पीएचडी करण्याची आकांक्षा आहे ! आई स्वतः शिक्षिका असल्यामुळे आपल्या मुलांनी खूप शिकावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यासाठी त्या सुरुवातीपासून आग्रही होत्या. आईच्या आग्रहाचं वर्णन करतांना तेजस्वी गंमतीने म्हणतात, माझी शाळा रोज दोन ठिकाणी भरायची. त्यात एक होती वर्गातली जी सर्वांची खरी शाळा असते आणि दुसरी होती घरची शाळा. असं असलं तरी लहानपणी अभ्यास माझ्या आवडीचा नव्हता. जास्त लक्ष खेळण्याकडे असायचं. पण याच बालवयात एक गोष्ट अशी घडली की, एकदम अभ्यास आवडीचा विषय बनला. त्याचं झाल असं, घरी अभ्यासाचा सराव करता यावा यासाठी व्यवसायमाला प्रश्नावली आईने आणल्या होत्या.

त्या व्यवसाय माला त्यांनी आणि त्यांच्या धाकट्या बहिणीने किती तरी महिने न सोडवता तशाच ठेवून दिल्या होत्या. एकदा आठवण आल्यावर आईनं त्याबाबत विचारणा केली. त्यावर त्या प्रश्नावली न सोडवता तशाच ठेवल्याचे कळताच आईला फार वाईट वाटलं. खूप रागही आला. थंडीचे दिवस होते. आई चिडून म्हणाली, तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर,ह्या व्यवसाय माला घरात ठेवून तरी काय उपयोग ? बाहेर शेकोटी पेटलेली आहे,त्यात टाकून देऊ! हे ऐकल्यावर मात्र, दोघी बहिणी खूप खजिल झाल्या. परत असं करणार नाही, असं त्यांनी आईला कबुल केलं. त्यांनी लवकरच त्या सर्व प्रश्नावल्या सोडवल्या.

त्यातून दोघी बहिणींना कायमची अभ्यासाची गोडी लागली. त्याचा थेट अन चांगला परिणाम असा झाला की, तेजस्वी चौथीच्या परिक्षेत केंद्रात पहिल्या आल्या. अभ्यास आवडीचा विषय झाल्यावर त्यांचा पहिला नंबर निश्चितच होऊन गेला. त्यांची गुणवत्ता, त्यांचे अक्षर शाळेत चर्चेचा विषय झाल्यावर त्यांच्याकडून अपेक्षा वाढत गेल्या. त्यांच्या अभ्यासातील सातत्यामुळे त्यांनी दहावीत गुणवत्ता यादीत यावं, अशी अपेक्षा त्यांच्या शिक्षकांनी व्यक्त केली. त्यामुळे आवड जबाबदारीत रुपांतरित झाली. त्यापूर्वी १२ वर्षें त्यांच्या शाळेत कुणी गुणवत्ता यादीत आलं नव्हतं. तेजस्वी यांनी मात्र, शिक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता केली. अभ्यास ही आवड, जबाबदारी या बरोबरच हुन्नर ठेऊन करायची गोष्ट आहे. हे त्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवुन सिद्ध केलं.

max personality sp tejaswi satpute गरजूवंताना स्वत: मदत करताना...

सर्व साधारणपणे गुणवत्ता यादीत आलेल्या मुलामुलींचं प्रमुख ध्येय डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असतं. तेजस्वी यांचं मात्र असं नव्हतं. शाळेत असतांना त्यांना वैमानिक व्हावंसं वाटत होतं. त्याच कारण असं की, त्यांना शहीद वैमानिक निर्मलसिंग यांच्या जीवनावर एक धडा होता. त्या धड्यातुन जे काही वैमानिकाच्या आयुष्याबद्दल उमजलं होत, त्या आधारावर त्यांच हे स्वप्न निश्चित झालं होतं. मात्र, हे स्वप्न त्यांना लवकरच विसरावं लागलं. अर्थात गैरसमजुतीमुळे म्हणा किंवा ग्रामीण भागात त्यावेळी मिळणार्‍या अपुर्‍या माहितीमुळे म्हणा. तर त्याचं असं झालं असं की, अकरावीत तेजस्वी यांना चष्मा लागला. चष्मा असला की, वैमानिक होता येत नाही असे त्यांना कोणीतरी सांगितले. त्यामुळे त्यांचं स्वप्न भंग पावलं.

डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं नाहीं हे तर ठरविलं होतंच. मग दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असला तरी वेगळी वाट त्या शोधत होत्या. नवीन आणि आव्हानात्मक काहीतरी करायचं असं त्यांनी मनाशी ठरवलेलं होतं. शिवाय आई वडील पाठिशी होतेच. वडील तर नेहमी म्हणायचे, तुला आवडेल असं काहीतरी कर,तुझ्या मनाविरुद्ध काहीच करु नकोस.

त्यामुळे १२ ला मिळालेले गुण सहजपणे मेडिकल किंवा इंजिनियरिंगला नंबर लागेल असे असतांना त्यांनी तेव्हा महाराष्ट्रात नवीनच सुरू झालेल्या बीएस्सी (जैवतंत्रज्ञान) या अभ्यास क्रमाला जायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेत प्रवेश घेतला. या पदवीत त्यांना उत्तम गुण मिळाले. याच कोर्स दरम्यान, बंगलोर येथे सी एन आर राव यांनी शास्त्रज्ञ घडविण्यासाठी सुरू केलेल्या जेएनसी एएसआर या ३ वर्षांच्या संशोधनपर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली.

बीएस्सी करत असतानाच दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत हा अभ्यासक्रम त्यांनी पुर्ण केला. त्यासाठी भारतातून फक्त दहा विद्यार्थी निवडले गेले होते. त्यात महाराष्ट्रातून तेजस्वी एकमेव होत्या. खरंतर विद्यार्थांना पदवी नंतर पदव्युत्तर शिक्षण कोठे घ्यायचे असा प्रश्न असतो, यांना पदवीतच पीएचडी पर्यंतचा प्रवेश तो ही भारतातील मान्यवर संस्थेत निश्चित झाला होता. मात्र, तो अभ्यासक्रम दोन वर्षे केल्यानंतर आपल्याला शास्त्रज्ञ होण्यात रुची नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. बीएस्सी झाल्यावर पुढे काय करायचं हा प्रश्नच होता. नियमित एम एस्सी करण्यात तर त्यांना अजिबातच स्वारस्य नव्हतं. max personality sp tejaswi satputeअगदी काही अंशी एमबीए करावेसे वाटत होतं. मात्र, त्यांची अर्ज भरण्याची मुदत संपून गेली होती. आयएलएस लाँ कॉलेजमध्ये प्रवेश चालू असल्याचं समजलं. तिथे अर्ज भरला. तिकडे कला शाखेच्या विद्यार्थांचा जास्त कल असतो. त्यामुळे स्पर्धा मोठी होती. त्यात कला शाखेच्या विद्यार्थ्यांना जास्त गुण असतात. त्या तुलनेत बायोटेक सारख्या नव्या विषयात पदवीत कमी गुण असल्याने पहिल्या दोन याद्यांमध्ये नंबर लागला नाही. तिसऱ्या यादीत मात्र नंबर लागला. तिथं प्रवेश मिळाल्यावर सुरवातीला वर्ष वाचल्याचा आनंद झाला. लॉ करत असतांना त्याची गोडी निर्माण झाली. घरच्यांना त्यांनी मी आता जज होणार असल्याचं स्वप्न दाखवलं. पोरीने डॉक्टर व्हायचे नाकारले तेव्हा आईनं समजुन घेतलं. पुन्हा शास्त्रज्ञ व्हायचं मधुनच सोडलं तेव्हा जज होण्याच्या स्वप्नावर आई समाधानी होती.

मग कायद्याच्या अभ्यासाचं दुसरं वर्ष सुरु झालं. त्यांना स्वतःला देखील त्या अभ्यासात रस निर्माण झाला होता. अशातच वर्गातील काही मुलं तास चालु असतांना शेवटच्या बाकावर बसुन द"हिंदु" हे प्रख्यात वृत्तपत्र वाचत असल्याचं लक्षात आलं. उत्सुकतेपोटी त्यांनी चौकशी केली असता कळले की, युपीएससीच्या परीक्षेसाठी द हिंदु वाचणे आवश्यक आहे. तोवर तेजस्वी यांना ना युपीएससी बद्दल नीट माहित होतं ना द हिंदु त्यांनी कधी वाचलेला होता. मग त्यांनी अधिक माहितीसाठी इंटरनेटवर संशोधन केलं. पुणे येथील विविध स्पर्धा परीक्षेच्या वर्गांना भेटी दिल्या. त्यातून त्यांना यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत स्वारस्य निर्माण झालं.

max personality sp tejaswi satpute२००९ साली त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. आपली आवड ओळखून त्यांनी मराठी आणि इतिहास हे विषय मुख्य परीक्षेसाठी निवडले. पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यश हुकलं. दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्थेत त्यांची निवड झाली.

दुसऱ्या प्रयत्नात २०१२ साली देशात १९८ क्रमांक मिळवून त्या आय पी एस झाल्या. युपीएससी परीक्षेत यश संपादन केल्यावर त्यांचं लग्न त्यावेळी दिल्ली स्थित असलेल्या किशोर रक्ताटे यांच्या सोबत झाले. किशोर रक्ताटे त्यावेळी केंद्रीय नियोजन आयोगात नोकरीस होते. निकालानंतर प्रशिक्षणाच्या दरम्यान जो दोन ते तीन महिन्याचा कालावधी होता तेवढा काळ प्रपंच सांभाळला.

ऑगस्ट २०१२ ला त्या मसुरीत प्रशिक्षणासाठी गेल्या. तिथं १०० दिवस त्यांचा फ़ौडेशन कोर्स पुर्ण झाल्यावर हैद्राबाद येथील प्रख्यात वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीत पुढील प्रशिक्षण झालं. हे प्रशिक्षण साधारण डिसेंबर २०१२ ते जानेवारी २०१४ या कालावधीत त्यांनी पुर्ण केलं. या प्रशिक्षणातदेखील त्यांनी मॊठं यश मिळवलं. या प्रशिक्षणात पोलिसांच्या नेतृत्वावर आधारीत होणार्‍या लेखी परीक्षेतील स्पर्धेच्या त्या मानकरी ठरल्या.

अतिशय खडतर प्रशिक्षण आटोपून त्या महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाल्या. फेब्रुवारी २०१४ ते सप्टेंबर २०१४ या काळात परिविक्षाधीन कालावधी त्यांनी जळगाव येथे पूर्ण केला. याच काळात त्यांनी बाळंतपणासाठी सुट्टी घेतल्याने त्यांचा परीविक्षाधिन कालावधी जळगाव अन जालना अशा दोन जिल्ह्यात पुर्ण करावा लागला.

त्यानंतर त्यांची नेमणूक जालना जिल्ह्यातील परतूर येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून झाली. तिथे त्या डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०१६ दरम्यान होत्या. नंतर त्यांची नेमणूक राज्य गुप्तचर विभागात पोलीस अधीक्षक म्हणून झाली. या नेमणुकीच्या काळात त्यांच्याकडे ज्या जबाबदार्‍या होत्या. त्यामध्ये राज्याच्या श्वान पथकाची जबाबदारी होती. यातली गंमत अशी की, लहानपणापासुन त्यांना कुत्र्याची भीती होती. लहानपणापासुन कुत्र्याला प्रचंड घाबरणार्‍या तेजस्वी सातपुते राज्यातील २५० प्रशिक्षित कुत्र्यांच्या पथकाच्या प्रमुख झाल्या !

त्यावेळी त्यांना कुत्र्याच्या जातीपासुन त्यांच्या खाद्यावर अभ्यास करावा लागला. अन त्यांची देखभाल पण करावी लागली. याच कार्यकाळात त्यांच्याकडे आर्थिक स्वरुपाचा एक मोठा गुन्हा तपासाला आला. त्याची पण अशीच गंमत झाली. कारण अर्थशास्त्र हा त्यांचा नावडता विषय होता. या गुन्ह्याच्या निमित्ताने त्यांना सगळं अर्थशास्त्र अभ्यासावं लागलं. पूर्वी ऑप्शनला टाकलेलं अर्थशास्त्र अभ्यासावं लागल्यानं आता त्या आवर्जुन सांगतात की,

आयुष्यात ऑप्नशनला काही टाकू नका !

max personality sp tejaswi satputeगुप्तचर विभागातून त्यांची बदली झाली पुणे ग्रामीणला. पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणुन त्या सव्वा वर्ष कार्यरत होत्या. नंतर पुणे शहर पोलीस दलात त्यांची नेमणूक उपायुक्त ( वाहतूक) या पदावर झाली.

फ़ेब्रुवारी २०१९ पासून त्या जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंतच्या प्रत्येक नेमणूकीत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. परतूर येथे असताना पारधी आणि शिकलकार समाजासाठी "समाज पोलीस" ही संकल्पना त्यांनी राबविली. पुणे ग्रामीणला असतांना मोठमोठी आंदोलने, दंगली यशस्वीपणे हाताळल्या. याच काळात अनेक आव्हानात्मक केसेसच्या तपासात देखिल त्यांनी त्यांची वेगळी ओळख अधोरेखित केलेली आहे. पुणे शहर वाहतुक पोलिस उपायुक्त असताना हेल्मेटचा वापर, नो हॉर्न डे, वाहतूक नियमांचे पालन केल्यास नागरिकांना होणारे फायदे कळण्यासाठी विविध कार्यक्रम असे अनेक कल्पक उपक्रम त्यांनी हाती घेतले होते.

आजही पुणेकर त्यांची आठवण काढतात. अगदी याच लेखाच्या निमित्ताने तेजस्वी यांचा नंबर मिळवण्यासाठी माझे पुणे स्थित मित्र निवृत्त पोलीस अधिकारी धनंजय धोपावकर यांना फ़ोन केला असता त्यांनी सांगितलं की, ”पुणेकर त्यांची फ़ार आठवण काढतात. अतिशय कमी कालावधीत त्यांनी फ़ार उत्तम काम केलं आहे पुण्यात.”

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमणूक झाल्या पासून त्या सतत लोकाभिमुख उपक्रम राबवित आहेत. सोबतच पोलीस दलातील सहकाऱ्यांच्या कल्याणासाठीही त्या कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील अडचणीत असणाऱ्या जेष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या हितासाठी त्यांचा "भरोसा कक्ष " अतिशय गतिमान काम करत आहे.

भरोसा कक्ष योजना

मुलींनी धीट बनावं,सक्षम व्हावं यासाठी त्यांच्याकडे "निर्भया अभियान" देखील अतिशय नेमकेपंणाने काम करीत आहे. गुन्हेगारीला प्रभावी अटकाव करण्यासाठी बीट मार्शल या जुन्या योजनेत नाविन्यपूर्ण आणि आधुनिक गोष्टी सुरू केल्या. निर्भया अभियान किंवा भरोसा सेल हे तर त्यांच्या खात्याकडून राज्यभर राबवले जाणारे प्रकल्प आहेत... त्या प्रकल्पाना न्याय देत असताना आणखी काही केले पाहिजे. असे त्यांच्या मनात होते. त्यातच प्रत्येक भागाची आपली अशी एक ओळख असते ती लक्षात घेऊन काही गोष्टी करता येतात. त्याच अनुषंगाने त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सुरु केलेली योजना आहे.सिमेवर लढणार्‍या सैनिकांसाठीची.

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात आजी व माजी सैनिकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या सर्व सैनिकांच्या अडी अडचणी समजाव्यात,त्यावर लगेच योग्य ती कार्यवाही व्हावी म्हणुन महिन्याच्या पहिल्या शनिवारी दिवसभर त्यांचा मेळावा भरवण्यास मॅडमनी नोव्हेंबर २०१९ पासून सुरुवात केली. या मेळाव्यांना खूप छान प्रतिसाद मिळत असतो. पाचशे ते सहाशे सैनिक उपस्थित राहतात. या सैनिकांच्या अडचणी, ४०% पोलीस खात्याशी निगडित असतात. तर ५०% इतर खात्यांशी अन १०% कौटुंबिक स्वरूपाच्या समस्या असतात.

सातारा येथे माजी सैनिकांच्या समस्या समजून घेताना...

पोलीस खात्याशी संबंधित अडचणींमध्ये तेजस्वी स्वतः लक्ष घालतात. इतर खात्यांशी संबंधित बाबी त्या त्या खात्याकडे स्वतःच्या विनंतीच्या पत्रासह पाठविण्यात येतात. तर कौटुंबिक बाबीत योग्य ते समुपदेशन करण्यात येतं. या उपक्रमामुळे आजी,माजीं सैनिकांना शासकीय कार्यालयात न जाता, सन्मानाची वागणूक मिळून त्यांचे प्रश्न सुटतात. प्रश्न सुटल्यावर जेव्हा ते पेढे घेऊन भेटायला येतात,तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो,असं तेजस्वी नमूद करतात. याच बरोबर सातारा पोलीस कॅन्टीनचं अतिशय आधुनिक पद्धतीनं नूतनीकरण त्यांनी केलं आहे.

सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वस्तू मिळणारं हे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस कॅन्टीन आहे. नूतनीकरण केल्यामुळे जिथं रोज २० ते ३० हजार रुपयांची विक्री होत असे, तिथे आता रोज २ लाख रुपयांची विक्री होऊ लागली आहे. आणखी एक उपक्रम म्हणजे सातारा जिल्ह्यातील पहिला पोलीस कल्याण पेट्रोल पंप १५ मार्च रोजी सुरू करण्यात आला आहे. या पंपाच्या माध्यमातुन मिळणारा नफ़ा देखील सातारा पोलिस दलासाठी कायमचा इन्कम सोर्स तयार झाला आहे.

तेजस्वी यांना स्वतःला खेळायची खूप आवड आहे. सातारा जिल्हा पोलीस दलात विविध प्रकारच्या खेळातील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांना खेळण्याचा सराव व्हावा आणि मुला मुलींना योग्य प्रशिक्षण मिळावं यासाठीं सातारा येथे पोलीस परेड ग्राऊंडवर विविध खेळांसाठी क्रीडा प्रबोधिनीचा विस्तार त्यांनी हाती घेतला आहे.

या प्रबोधिनीत ५०% मुलं पोलिसांची तर ५०% मुलं सामान्य नागरिकांची असतात. गेल्या सव्वा वर्षात या सर्व मुलांनी विविध स्तरावर जवळपास ५०० ( पाचशे) पदकं मिळवली आहेत.

बऱ्याचदा, असं दिसतं की, हवं ते पद मिळाल्यावर एखादी व्यक्ती क्रियाशील होण्याऐवजी,त्या पदापासून मिळणाऱ्या सोयी सवलती उपभोगण्यातच मश्गुल होते. आपल्या पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याचं भान त्यांना राहत नाही.पण असं भान ठेवून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकं देवा समान मानतात. तेजस्वी त्यापैकीच एक होय.

max personality sp tejaswi satpute

त्यांच्या कार्यात पती किशोर रक्ताटे यांची मनःपूर्वक साथ आहे. ते ही आजच्या पुरुषांसाठी एक आदर्श आहेत. ते लेखक आहेत. हा लेख लिहिण्यासाठी त्यांचं साह्य झालं आहे. त्यांच्यावर स्वतंत्रपणे लिहिलं पाहिजे. कोरोनाच्या काळात तेजस्वी यांनी घरात मदतीला असलेल्या सर्व सहकार्‍यांना इतर ड्युटीवर लावले अन पति किशोर यांनी घरातील सगळ्या कामाची जबाबदारी घेतली. किशोर यांचा स्वयपाक अन इतर काम करतानाचा व्हिडिओ तेजस्वी यांनी स्वतः फ़ेसबुकवर टाकला होता. अन म्हटलं होतं कि, मला अभिमान वाट्तो माझ्या पतीचा ! कधी कधी सुट्टीच्या दिवशी केलेले हट्ट वगळता कन्या इरा त्यांना पूर्ण साथ देत असते.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? असं विचारल्यावर तेजस्वी म्हणाल्या, प्रबळ इच्छा शक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नात सातत्य ही यशाची त्रिसूत्री आहे. स्पर्धा परीक्षेत जागांची संख्या अत्यंत मर्यादित असते. त्यामुळे परीक्षा देणारे सोडाच पण अगदी चांगला अभ्यास असणार्‍यांची देखील निवड नाही होऊ शकत. हे वास्तव लक्षात ठेवून उमेदवारांनी इतर करिअरचे पर्याय तयार ठेवावेत. केवळ संधी उपलब्ध आहेत,म्हणून वर्षानुवर्षे परीक्षा देत न बसता,स्वतःच निश्चित कालमर्यादा घालून घ्यावी. जीवनात वेळेचं महत्व ओळखलंच पाहिजे. सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत वेळेकडे न पाहता दिवसाला १८/१८ तास काम करीत असलेल्या तेजस्वी सातपुते यांना पुढील वाटचालीसाठीं मनःपूर्वक शुभेच्छा.

- देवेंद्र भुजबळ. +91 9869484800.

महाराष्ट्र सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ...

Updated : 17 May 2020 6:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top