Max Maharashtra 10-year anniversary : उजेड आहे तो पर्यंत जागे व्हा....
X
"मॅक्स महाराष्ट्र" हे केवळ यू ट्यूब चॅनेल नाही. ती पत्रकारितेतील लोक चळवळ आहे. आज या चळवळीने एक दशक म्हणजे दहा वर्षाचा टप्पा पूर्ण केला. या दहा वर्षाच्या काळात पत्रकारिता म्हणजे एका हातात दिवा आणि दुसऱ्या हातात आरसा दाखवण्याचे काम गेली एक दशक मॅक्स महाराष्ट्र ने केले.
जेव्हा पत्रकारितेने सुख सुविधा आणि फायदा बघत स्वतःला बाजारात उभे केले आहे त्याकाळात मॅक्स महाराष्ट्र ने पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे अदभुत, अलौकिक आणि जोखीम घेऊन जिवंत ठेवण्याचे काम केले. पत्रकार आणि पत्रकारितेवर दबाव, दहशत आणि त्यांचे सोर्स कापण्याचे काम झाले म्हणून पत्रकारिता ही पीआर झाली असे बोलणारे अर्ध सत्य सांगत आहेत कारण जो हाडाचा पत्रकार आहे. जो पत्रकारिता जाणतो तो अशी कारणे देत नाही किंवा अशा दबावांना भीक घालत नाही. वास्तविकता पत्रकारिता ही बाजारात उभी आहे हे २०१४ पूर्वीच तहलका आणि कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनने स्पष्ट केले होते की, मोठी मोठी चॅनेल सहज विकाऊ आहे. पण फक्त मिडियाला जबाबदार धरून काही उपयोग आहे का. आख्खी लोकशाही बाजारात मतदारांच्या रूपाने उभी आहे. केवळ झोपडपट्टीवासी नाही तर, मोठ्या अपार्टमेंट मध्ये टाईट इस्त्री आणि विद्वत्तेचा चष्मा लावलेले मतदार देखील एक तर बाजारात उभे दिसले किंवा मतदानाला दांडी मारून हिल्स स्टेशनवर कुटुंबासोबत दिसले. इतकी हलक्या आपण आपली लोकशाही घेतली आहे. १००० ते ५००० रुपयात आपण मतदान विकत आहोत, हा निर्लज्जपणाचा कळस आहे
त्यामुळे देशाला जशी गरज आहे मॅक्स महाराष्ट्र सारख्या पत्रकारितेची तशीच गरज आहे, लोकशाही मूल्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांची. प्रत्येक क्षेत्रात असे नागरिक उभे होणे ही काळाची गरज आहे, अन्यथा आपली केवळ लोकशाही धोक्यात नाही तर पर्यायाने आपला देश आपले अस्तित्व, आपली संस्कृती सर्वच धोक्यात असून जर आपण यासाठी विद्रोह केला नाही तर मात्र आपण हळू हळू गुलाम होत आहोत, आता ही गुलामी १० ते २०% आसपास आहे. ती कधी पन्नास टक्के होईल हे सांगता येणार नाही.
याची लक्षण तुम्हाला काही घटनांतून जाणवत असतील, तुम्ही तुमच्या मनाने युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर ते रोखणारी अदृश्य ताकत आता आहे. तुमच्या देशाची अर्थव्यवस्था कशी असावी हे तुमच्या ऐवजी अदृश्य ताकत ठरवीत आहे, तुम्ही कुठले उद्योग करावे, कुठे रस्ते करावे, कुठे धरण बांधावे हे आजकाल मोठ्या प्रमाणात अदृश्य अशा जागतिक शक्ती ठरवू लागल्या आहेत . आपण कितीही आत्म निर्भर असल्याची जाहिरात केली तरी आपण एका व्यवस्थेच्या वचकाखाली जात आहोत. यातून आपण मार्ग काढण्यासाठी सर्वात प्रथम आपण आपल्या देशासोबत प्रामाणिक असले पाहिजे.
तुम्ही विचाराल देशासोबत प्रमाणे म्हणजे काय ? मी जे काही काम उपजिविकेसाठी करत असेल त्यात बेइमानी करणार नाही आणि माझ्या सभोवताली जर लोकशाही मूल्याच्या विरोधी कृत्य होत असेल तर त्याला मी स्वतः विरोध करेल आणि इतराना जागृत करेल . बदमाश लोक हे कितीही हुशार, प्रभावशाली असले तरी ते सत्य, न्याय, समता ,मानवता, प्रेम , बंधुत्व मूल्यांच्या कधीच सामना करू शकत नाही, जर लढणारी लोकं प्रामाणिक असतील तर.
अशा लोकांचा आवाज, विचारपीठ मॅक्स महाराष्ट्र आहे. मॅक्स महाराष्ट्र कुठल्याच राजकीय पक्ष, जात, धर्म, भाषा यांच्या विरोधात नाही. मॅक्स महाराष्ट्र देश आणि मानव हिताच्या बाजूचे आहे. तुम्हाला तुमच्या देशा बद्दल प्रेम असेल आणि देश जागतिक गुलामीत जाऊ नये असे वाटत असेल तर "मॅक्स महाराष्ट्र" वाढावे म्हणून त्याच्या सोबत उभे रहा. मॅक्स महाराष्ट्र सारखे इतर वृत्तपत्र, चॅनेल, आंदोलन, संघटना असतील त्यांच्या सोबत देखील उभे रहा. सत्य स्वतः जिंकत नाही, त्याच्या साठी लढणारे लोक लागतात. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्र ही फुटपट्टी आहे समजा. हे आणि असे प्रयोग , आंदोलने बंद पडले म्हणजे आपण लढलो नाही आणि गुलामीला शरण गेलो असेच होईल. मग उगाच वेगवेगळी कारणे शोधून समाधान करण्यात काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्र च्या दशक पूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मी आपणास हे आवाहन करत आहे. अजून पर्याय आहेत, अजून उजेड आहे तो पर्यंत उठा आणि उभे रहा.
किरण सोनावणे
9922666607






