Home > Top News > नामांतर आंदोलनातले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके (भाग २ रा)

नामांतर आंदोलनातले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके (भाग २ रा)

नामांतर आंदोलनातले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके (भाग २ रा)
X

१९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, "येरवडा विद्यापीठातील दिवस", पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.

कुमार सप्तर्षी म्हणतात, " हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. बाळकृष्ण रेणके युक्रांदमधला माझा जुना सहकारी. त्याची पथारी माझ्या दुसर्‍या बाजूला. हरी नरके नंतर रेणक्यांचा जावई झाला. ठाणे तुरूंगामध्ये हरीने सासरा आगाऊ बुक केला. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत..." सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. ते या पुस्तकातून मुळातूनच वाचण्याजोगं आहे.

तुरूंगांत मला ३ आठवड्यात माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं... ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ/जन्माने नाही तर बाय चॉईस बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.

कोणाला हे उद्धटपणाचे वाटले तरी हरकत नाही, पण देशाच्या कानाकोपर्‍यात मी ओबीसी, भटके, विमुक्त, अनु. जाती, जमाती, बहुजनांवर जितकी भाषणं केलीत तितकी करणारा माझ्या पिढीतला दुसरा माणूस मला माहित नाही.

ज्या मूठभरांना माझ्याबद्दल तीव्र नफरत, विरोधीभक्ती आहे, माझा वर्षानुवर्षे द्वेश वाटत आलेला आहे, त्यांनी लाखो सामान्य लोक आणि तळमळीचे कार्यकर्ते माझ्यावर का जिवापाड प्रेम करतात, मला पुन्हापुन्हा भाषणाला का बोलावतात? माझी भाषणं का ऎकतात याचा शोध घ्यावा. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आपोआप मिळून जातील.

ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या होत्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.

तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली, "हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे." हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना/क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.

त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. इतकी वर्षे उलटली तरी आजही त्या भेटी ताज्या टवटवीत आहेत.

मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, " तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे." जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, " व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा." जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. हे भारी आहे ना?

जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मलचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला बावन्नपत्ती म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबा एव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.

दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची.

जेलच्या खूप भन्नाट आठवणी आहेत. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे माझे असे मत बनले आहे की प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. आणि तसाच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे. म्हणून तर कुमार सप्तर्षी त्या दिवसांना "येरवडा विद्यापीठातील दिवस" असे म्हणतात. प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा अनुभव घेणे मस्ट आहे.

१९६३ मध्ये किंवा त्याआधी जन्मलेल्या, ज्यांनी ज्यांनी नामांतर आंदोलनात प्रदीर्घ तुरूंगवास भोगलेला आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये आपण कोणत्या जेलमध्ये होतात, त्याबद्दल लिहावे, म्हणजे त्यातून समविचारी मित्रमैत्रिणींची नवी/जुनी यादी तयार होऊ शकेल.

-हरी नरके

(भाग - २ रा समाप्त. क्रमश:)

नामांतर आंदोलनातले वयाच्या विशीच्या आतले तुरूंगातले दिवस: प्रा. हरी नरके भाग 1

Updated : 17 July 2020 2:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top