Home > Top News > मराठवाडा मुक्ती संग्राम लढा आणि गांधी विचार

मराठवाडा मुक्ती संग्राम लढा आणि गांधी विचार

मराठवाडा मुक्ती संग्राम लढा आणि गांधी विचार
X

मुस्लीम अल्पसंख्य राजा आणि हिंदू बहुसंख्य प्रजा असा सामना असूनही हैद्राबाद मुक्तीसंग्राम आणि संस्थानातलं त्यानंतरचं हिंदू मुस्लीम जीवन हे शांततापूर्ण आणि सौहार्दपुर्ण राहिलं. विशेषतः मराठवाड्यात हिंदू मुस्लीम सख्य राहीलं. याचं एक कारण सहिष्णु संत परंपरा हे असावं. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, जनाबाई, रामदास, एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी, साईबाबा आणि त्यांचे गुरू केशवराज बाबासाहेब अशी मोठी संत परंपरा मराठवाड्यात आहे. तसेच सुफी संत, पीर दर्गेही मराठवाड्यात आहेत. संत परंपरेमुळे बव्हंशी मराठवाडा धार्मिक असण्यापेक्षा अध्यात्मिक जास्त आहे. हिंदू-मुस्लीम सलोखा या शांततेच्या शिकवणुकीमुळे असावा.

हैद्राबादचा मुक्तीसंग्राम आंदोलकांच्या बाजूंनं by and large अहिंसक राहिला. हिंसा झाली पण मर्यादित आणि ती ही अपवादात्मक परिस्थितीत. आंदोलनात हिंसा जास्त झाली असती. तर नंतरच सहजीवन अशक्य झालं असतं. कारण दोन्ही बाजू सुडानं पेटल्या असत्या.

स्वातंत्र्यासाठी काहींच्या खटपटी आधीच सुरू असल्या तरी 1938 साली परतूर येथे गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या हैद्राबाद स्टेट कॉग्रेसच्या पहिल्या अधिवेशनापासून चळवळीला गती आली. हा लढा बहुतेक वेळा अहिंसक राहण्याचं आणखी एक महत्वाचं कारण होतं. या लढ्यावरचा गांधीजींचा प्रभाव. मुळात हा लढा गांधीयुगात सुरू झाला होता आणि त्यामुळे भारतभर दबदबा असलेल्या गांधीजींचा या लढ्यावर प्रभाव असणे स्वाभाविकच होते. गांधी किती मोठे होते? याचं हे एक उदाहरण आहे. ज्या लढ्यात ते एकदाही आले नाहीत. तो लढा त्यांच्याच संपूर्ण प्रभावाखाली होता. इतिहास हेही सांगतो की, लढ्याला यश मिळत नाही. म्हणून हतबल झालेल्या स्वामी रामानंद तीर्थांनी एका क्षणी गांधीजींकडे सशस्त्र क्रांतीची परवानगी मागितली.

त्यावर गांधीजींनी स्वातंत्र्य हे तुमच्या साठी एक मूल्य (value) आहे की, रणनीती (Strategy) ते आधी ठरवा असं सांगितलं. स्वामीजींनी नंतर सशस्त्र लढ्याचा विचारही केला नाही. सशस्त्र क्रांती झाली असती तर कदाचित मराठवाड्याची अवस्था भारताच्या फाळणी झालेल्या प्रदेशांसारखी रक्तरंजीत राहिली असती, सहजीवन उद्ध्वस्त झालं असतं.

गांधीजींचा प्रभाव असण्याचा एक तोटा मात्र जरूर झाला. सत्तेत जायचे नाही हा गांधींचा आदर्श पहिल्या फळीतल्या सगळ्याच महान लोकांनी अंगिकारला. पी व्ही नरसिंहराव, राघवेंद्र दिवाण, दिगंबरराव बिंदू, श्रीरामजी भांगडिया आणि शंकरराव चव्हाणांचा अपवाद वगळता कोणीही कॉग्रेसच्या सक्रीय राजकारणात नंतरच्या काळात उतरले नाहीत. (आणखी कोणी असतील तर कृपया भर घालावी.) स्वामीजी, गोविंदभाई, आ.कृ. वाघमारे, अनंतराव भालेराव, बाबासाहेब परांजपे, भाऊसाहेब वैशंपायन आदि राजकारणात असते तर कदाचित मराठवाडा मागास राहिला नसता. मात्र, सत्ता त्यागाचे आकर्षण हा गांधी राजकारणाचा एक ठळक भाग होता आणि ही मंडळी गांधी अनुयायीच होती.

हैद्राबादच्या लढ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लढणारी सगळीच मंडळी सर्वसामान्य कुटूंबातील होती. आज जसं आपण First Generation Entrepreneur म्हणतो तसं ही मंडळी First Generation Activist होती. कोणालाच फार मोठा राजकीय वारसा नव्हता.

(आजचे नेतृत्व मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्याच्या दृष्टीनं कुचकामी आहे. भरीस भर म्हणून सनातन, बजरंग दल आणि एमआयएम, सीमी सारख्या संस्थाही वेगानं हातपाय पसरत आहेत. जातीय सलोखा धोक्यात येत आहे.)

Updated : 17 Sep 2020 7:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top