Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना आणि फक्त कविता.. कविता.. आणि कविता : अरुण म्हात्रे

कोरोना आणि फक्त कविता.. कविता.. आणि कविता : अरुण म्हात्रे

कोरोना आणि फक्त कविता.. कविता.. आणि कविता : अरुण म्हात्रे
X

जागतिक महामारी कोरोनाने विश्व व्यापले. कवी, गीतकार आणि निवेदक अरुण म्हात्रे यांनाही करण्याची बाधा झाली. कोरोनाच्या संकटातही कवितेवर निस्सीम प्रेम करणारा हा कवी म्हणतो,' कविताई देवी मला नक्की बरी करील खात्री आहे. अनेकदा तीच माझा आधार झालीय'. मग फक्त कविता.. कविता.. आणि कविता...आणि त्यासाठी भटकंती सुरु....

प्रिय अशोक,

शुभ दुपार. तुला हे लिहिण्यासाठी निवांत वेळेची वाट पाहत होतो. तुला हे कळवायला हवे की, चार दिवसापूर्वी घरात काहींना श्वासाचा त्रास सुरु झाल्याने सर्वांची कोव्हिड टेस्ट केली. मला काही symptons लक्षणे नव्हती. तरी टेस्ट करावी लागली. दुर्दैवाने माझी टेस्ट पॉझिटीव्ह आली. मग मी ऍडमिट व्हायचा निर्णय घेतला. तसें घरातच विलगीकरणात राहता आले असते.

डॉक्टर तसें सुचवीतही होते. पण मी ऍडमिट झाली. मुद्दामच. एरवी कोव्हिड पेशंटच्या चाललेल्या हालांचे रसभरीत वर्णन ऐकत असतो. उलटसुलट वृत्तांत असतात. ते नेमके कितपत खरे हे मला स्वतः जाऊन पाहायचे होते. हाही अनुभव घ्यायला हवा. सारे जग कोव्हीडच्या जाश्यामध्यें आले आहे. जगभर अशी कोव्हिड ग्रस्त माणसांसाठी मोठी मोठी सेंटर्स उभारली गेली आहेत. नक्की कसे असते हे कोव्हिड सेंटर स्वतः पाहायला हवे.

काहीशी अभिमानाची गोष्ट आहे की अशी नवी कोव्हिड सेंटर निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य त्यात अग्रेसर आहे. मी जिथे ऍडमिट झालोय ते सेंटर जम्बो सेंटर म्हणून ओळखले जाते. एकाचवेळी 500 +300+100 (icu) इतक्या पेशंटना सामावून घेणारे हे सेंटर आणि त्याचे व्यवस्थापन म्हणजे चमत्कार आहे. दोन वेळचे उत्तम जेवण, दोन वेळा चहा बिस्किटे, दिवसातून दोनदा चेक अप ( ह्यात ब्लड शुगर, इ सी जी, रेटिना टेस्ट, ऑक्सिजन लेव्हल, हृदयाचे फंक्शनिंग, जनरल ब्लड शुगर अशा कैक टेस्ट चालू असतात.

तींन शिफ्ट मध्ये डॉक्टर्स, नर्सेस, सतत वार्डबॉय अशी व्यवस्था आहे. पूर्णपणे ए सी असलेले हे सेंटर बघायला मिळाले, आल्याआल्या काचेच्या केबिन मधून डॉक्टर्स इंटरकॉम वर आपलें बेड कुठे आहेत ते सांगतात आणि हातात 14 दिवसांच्या औषधांच्या गोळ्यांचे पाऊच आपल्या हातात पडते. मी ह्या प्रचंड मोठ्या अद्ययावत तंबूमध्ये शिरलो नि भल्या मोठ्या शुभ्र स्वच्छ लष्करी छावणीत शिरल्यागत वाटले. इतका मोठा तंबू ( त्याला हे हँगर म्हणतात. मी आहे A हँगर मध्ये )मला इथे ऍडमिट होता आले हे मी माझे भाग्यच समजतो..

आपल्याला असे काही झाले आहे हे लपविण्यासारखे नाही असे मला वाटते. कारण साऱ्या जगालाच ह्या रोगाने धरले आहे. कारण हळूहळू कळू लागते की आपल्यातले बरेच जण यातून चालले आहेत. काही जण आधीच बाधित होऊन परत घरी गेले आहेत.

हा आजार काही मोठा आजार नाही. खरेतर इतका छोटा की त्यावर उपाय सापडत नाही. वाघ पकडता येतो पण माकड पकडायला कठीण. तसें ह्या रोगाचे आहे. साध्या सर्दीसारखा हा रोग.हजारो वर्षे कोट्यवधी भारतीयांनी तो कित्येक वर्षे अंगावरच काढला. त्यासाठी कोणाला ऍडमिट व्हावे लागले नाही वा प्राण गमवावे लागले नाहीत. आता तीच सर्दी नवा पेहराव करून आलीय. मात्र त्यावरचे जालीम उपाय भारतीयच आहेत. अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट.

मात्र तो व्हायरस सर्दीच्या मार्गाने तुमच्या आत फुफ्फुसांपर्यंत घुसला की सर्व अवयवांना घात करतो. आपल्या साध्या सर्दीत आणि ह्या कोव्हिड व्हायरस मध्ये इतका साधा फरक आहे. तेव्हा काळजी घ्या. सोशल डिस्टंसिन्ग पाळा. मास्क वापरा. गरम पाणी पीत रहा, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. रात्री झोपताना हळदीचे गरम दूध घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा.

मी ज्या सरकारी कोव्हिड सेंटर मध्ये आहे त्याचा मला खर्च किती आहे ठाऊक? फक्त 0. 00. म्हणजे एकही पैसा खर्च न करता ही ट्रीटमेंट चालू आहे. ही नव्या महाराष्ट्र सरकारची किमया. अशा सोयीचा मी विचारच करू शकत नव्हतो. पण हे सत्य आहे.

आणि हे जाहीरपणे सांगण्याचे कोणी तरी करायला हवे.मला अभिमान वाटावा अशी आणखी एक गोष्ट आहे. मी आधी राहत होतो त्या मुलुंड (मुंबई )मधल्या एका साध्या शिवसैनिकाने सर्व कार्यकर्त्यांना आणि डॉक्टरांना हाताशी धरून हे उभं केले आहे. संजय म्हशीलकर असे त्याचे नाव.

त्याचे आणि त्याच्या साथीदारांचे कौतुक करायला माझे शब्द केवळ अपुरे आहेत. शिवाय इथे चोवीस तास राबणारे त्याचे प्रशांत कांबळे सारखे खंदे कार्यकर्ते म्हणजे सलाम. महाराज असते तर गळ्यातला कंठा काढून दिला असता.. राजकीय महत्वाकांक्षा असू दे पण त्यासाठी अशी वृत्ती अंगी असणे ही काय गोष्ट आहे!

संजय म्हशीलकर हा कवितेचा चाहता आहे. मी आणि नायगावकर अनेकदा त्याच्या कार्यक्रमांना गेलोय. त्याने मला आशा कँसर सेंटरशी जोडले. सहा महिन्यापूर्वी वाडा ( जिल्हा ठाणे ) येथील एका शाळेत मेडिकल कॅंप साठी नेले होते. काहीतरी सतत चालू असते त्याचे. कवी म्हणून निवेदक म्हणून त्याला मला हक्काने बोलवावेसे वाटते हा माझा गौरव वाटतो मला. आज त्याच हक्काने मी कोव्हिड पॉझिटिव्ह आहे म्हटल्यावर हक्काने त्याने मला त्याच्या कोव्हिड सेंटर मध्ये ऍडमिट करून घेतले..मी त्याच्या ह्या कोव्हिड सेंटर मध्ये आलो याचा त्याला केवढा अभिमान!

तर जगात अशीही माणसे आहेत. किंबहुना जी कवितेवर प्रेम करतात तीच माणसे असे प्रचंड काम उभं करतात.. असो. "ऑनलाईन कार्यक्रम करा सर "असे तू दोन दिवस मागे लागला होतास म्हणून हे तुला कळवले. ( तसा मी परवा एक गुपचूप छोटासा 15 मिनिटाचा ऑनलाईन कार्यक्रम केला पण दमायला झाले.) तर हे दोन आठवडे मी ह्यासाठीच कार्यक्रम करू शकणार नाही. मात्र 15 डिसेंबर पर्यंत मी ठणठणीत होईन असे वाटते. कविताई देवी तेव्हढे नक्की करील खात्री आहे. अनेकदा तीच माझा आधार झालीय. मग फक्त कविता.. कविता.. आणि कविता...आणि त्यासाठी भटकंती सुरु.

तुझा
अरुण.

Updated : 24 Nov 2020 5:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top