Home > मॅक्स ब्लॉग्ज > तमाशात कृष्णाची थट्टा करताना भावना दुखावल्या जात नव्हत्या, आताच्या पिढीने कलावंतांवर खटले टाकले असते

तमाशात कृष्णाची थट्टा करताना भावना दुखावल्या जात नव्हत्या, आताच्या पिढीने कलावंतांवर खटले टाकले असते

तमाशात कृष्णाची थट्टा करताना भावना दुखावल्या जात नव्हत्या, आताच्या पिढीने कलावंतांवर खटले टाकले असते
X

श्रीकृष्णाने गवळणींचा रस्ता अडवलेला. त्यातली मावशी म्हणते हो बाजूला कोण हायस तू? आपल्या राजबिंडा अवतारात दोन हात छातीला समांतर ठेवत उजवा हात आत्मविश्वासाने आकाशाच्या दिशेने उंचावता कृष्ण म्हणतो “ या जगाचा करता करविता, घडविता, देवाधी देव श्रीकृष्ण आहे”

आपला हात टाळी देण्यासाठी श्रीकृष्णाकडे सरसावत मावशी म्हणते “ क्या बात करता है”

तमाशाच्या समोर बसलेले सर्व प्रेक्षक या संवादावर खळखळून हसतात. कृष्ण आपला आहे. आपल्यातीलच एक आहे. असे समजून संपूर्ण गवळणीत सोंगाड्या त्याची थट्टा करतो.

मथुरेच्या बाजारात जाणाऱ्या गवळणींना बाजारात विकायला काय आणलंय विचारलं जातं. गवळणी बाजाराला जायला निघतात. मध्येच कृष्ण त्यांची वाट अडवतो. कृष्ण हाका मारतो पण त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही.

चिडून कृष्ण म्हणतो “ अरे इतका वेळ झालं मी बॉंब मारतोय” तर त्याला मध्येच थांबवत मावशी म्हणते “ का शिमग्याला चुकलावतास व्ही?”

कृष्ण मावशीला म्हणतो “म्हातारे हा सगळा मेळा ?” मावशी त्याला मध्येच थांबवत म्हणते “जोगत्याचा”

कृष्ण म्हणतो “तुम्ही आला कुठून आणि निघालात कुठे ?”

मावशी म्हणते “ आलो आमच्या गावातून आणि निघालो लोकाच्या गावाला”

लोकाच्या गावाला? त्या गावाला नाव असेल

हुती नाव हुती पाणी आटल्यावर बंद केली

पाण्यात चाललेली नाव तुला विचारतो का म्हणून कृष्ण मावशीच्या कानाखाली मारतो

मी व्यक्तीच्या नावाबद्धल विचारतोय..

असा सगळा संवाद सुरु असतो.

कृष्ण विचारतो आला कुठून चाललात कुठे

मावशी सांगते आलो गोकुळातून निघालो मथुरेला

कृष्ण म्हणतो हा रस्ता बंद आहे, पुढे जाता येणार नाही.

ती मावशी दुसऱ्या मावशीला सांगते मग ती म्हणते “आगं त्यजच बरोबर हाय”

कृष्ण म्हणतो बघ हिला माहितीय

ती मावशी म्हणते रस्ता बंद हाय तू काय रस्त्याच काम घीतलयस काय ?

पुन्हा कृष्ण चिडून कानाखाली वाजवतो.

तमाशातील गवळण बघणारा प्रत्येकजण खळखळून हसतो. कुणी शिट्ट्या वाजवतो. कुणी फेटे उडवतो. एकामेकाच्या हातावर टाळ्या मारून हसतो. कुणालाही वाईट वाटत नाही. आपल्या देवाची चेष्टा केली म्हणून कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत. संपूर्ण कार्यक्रमात ही थट्टा चालू असते. आताच्या भावना इतक्या संवेदनशील झाल्या आहेत ज्या काळात अशा कलाकारांवर देखील खटले भरले जातील…



Updated : 4 Feb 2024 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top