Home > मॅक्स ब्लॉग्ज > मराठा समाजाने जातीच्या कोषातून बाहेर पडावे

मराठा समाजाने जातीच्या कोषातून बाहेर पडावे

गेल्या 75 वर्षात मराठा या जातीचा केवळ अवास्तव अभिमान बाळगून मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले. एकेकाळी स्वराज्याच्या लढाईत इतर जातींसोबत आघाडीवर असलेला हा जात समूहाने् जातीच्या कोषातून बाहेर पडावे यावर प्रकाश टाकणारा पत्रकार किरण सोनावणे यांचा लेख....

मराठा समाजाने जातीच्या कोषातून बाहेर पडावे
X


गेल्या 75 वर्षात मराठा या जातीचा केवळ अवास्तव अभिमान बाळगून मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले. एकेकाळी स्वराज्याच्या लढाईत इतर जातींसोबत आघाडीवर असलेला हा जात समूह, नंतरच्या काळात साहित्य, चित्रपट यातून माज असलेला, बाहेरख्याली आणि रगेल असा रंगवला गेला. सुरुवातीला बऱ्या पैकी गावगाड्यात जमीन-जुमला बाळगून असलेला हा जात समूह गावागाड्यात अडकून बसला. मात्र, याच गावगाड्यातून ब्राह्मण बाहेर पडला, बौध्द बाहेर पडला आणि त्यांनी त्यांचा पूर्वी पेक्षा चांगला विकास करून घेतला. मात्र, आधुनिक काळाची पावलं मराठा समाजाला उशिरा समजली त्यामुळे गावातच गोतावळा बाळगून आणि शेती व शेती संबंधी उद्योगावर अवलंबून असणाऱ्या मराठा समाजाचे कुटुंब जसे वाढत गेले तशी जमीन घर यात वाटे पडून मोजकी श्रीमंत मराठे घराणी वगळली तर उर्वरित मराठ्यांची स्थिती खालवत गेली.

त्यात मराठा समाजाने सुरुवातीला शिक्षणाकडे लक्ष न दिल्याने ते उच्च वर्गातील जात समूहाशी स्पर्धा करण्यात कमी पडू लागले याचा चाणाक्षपणे फायदा इथे शाळा कॉलेज मध्ये आरएसएस धार्जिने प्राध्यापक आणि शिक्षक यांनी एक नरेशन सेट करण्यास सुरुवात केली. मराठा समाजाला आपल्याशी स्पर्धा करण्यात कमी पडत आहे याची जाणीव करून देण्या ऐवजी किंवा त्यावर उपाय शोधण्या ऐवजी तुमच्या जागा, नोकऱ्या दलितांनी त्यातही प्रामुख्याने नवबौध्द समाजाने हडप केल्या. तुमच्या पेक्षा कमी मार्क असून त्यांना प्रवेश आणि नोकऱ्या मिळत आहेत, असे सांगून त्यांनी महार, मराठा, कुणबी शेकडो वर्ष गावगाड्यात एकत्र राहाणाऱ्या मध्ये द्वेषाची ठिणगी टाकून त्याला सारखे फूक मारून चेतवित राहिले. त्याच वेळी धर्माच्या नावावर आम्ही आता पर्यंत 100% आरक्षण घेत होतो. तुमच्या अज्ञानी पणाचा फायदा घेत होतो. हे मात्र सोयीस्करपणे या उच्च जातीने सफाईदारपणे दडवून दलित सवर्ण वादाची बीजे पेरली. त्यात त्यांना दलित समाजातील नवशिक्षित लोकांचा होणारा विकास डोळ्याने दिसत होता. अनेकांनी बलुतेदारी सोडून स्वतंत्र झाल्याचे गाडी, घर बांधत असल्याचे चित्र या समाजासमोर दिसत होते आणि त्यांचा हा ठाम गैरसमज झाला की केवळ दलित समाजामूळे आपली प्रगती खोळंबली. ज्यांची कुटुंबे आमच्या शेती आणि गोठ्यात काम करत ते आता सरकारी कार्यालयात साहेब बनून दिसू लागले आणि यांना त्यांच्याशी काम पडू लागले, त्यामुळे मराठा आणि दलित आकस वाढला आणि त्यातून अत्याचाराचे प्रमाण वाढू लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा मराठा समाजापर्यंत नीट गेला नाही. हा लढा नेमका काय होता हे सांगण्यासाठी येथील विचारवंत सुरुवातीपासून कमी पडले आणि दलितांचे नेते, दलित उद्धारक अशी प्रतिमा रेखाटली गेली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार पटेल यांची प्रतिमा देशाचे नेते म्हणून रेखाटली गेली. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान, कुटुंब नियोजन, खोती पद्धत बंद केली, कामगार कायदे, हिंदु कोड बिल, ओबीसीच्या राखीव जागा, वीज प्रकल्प, दहा मोठी धरणे, नदी जोड, शेतकऱ्यांसाठी केलेली कामे असे चौफेर योगदान देऊन सुद्धा तत्कालीन इतिहासकारांनी, साहित्यिकानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा संकुचित ठेवली. त्याला आता कुठे छेद दिला जात असून रामचंद्र गुहा यांनी makers of India या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुमारे 700 पानांचे पुस्तक लिहून त्यावर प्रकाश टाकला आहे

परत मूळ मुद्द्याकडे येऊ. यासर्व गोष्टींमुळे मराठा समाजा मध्ये दलित समाजा बाबत द्वेष पसरविण्याचा पद्धतशीर प्रयत्न करून येतील सवर्ण वर्ग मात्र स्वतःचे फायदे घेऊन सुरक्षित राहिला. आता देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 55 च्या पेक्षा जास्त मोर्चे निघाले, मोर्चे जरी मराठा समाजाचे असले तरी त्याचे स्टेरिंग मात्र सवर्ण वर्गाच्या हातातील बाहुले असणाऱ्या लोकांच्या हातात होते. एकीकडे दलित किंवा बौध्द समाज छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर अशा सर्वांचा आदर्श घेऊन पुढे जात आहे. मात्र, मराठा मोर्चात भाषण केलेल्या मुलींची भाषणे जर पाहिली तर ती त्यांना कुणी लिहून दिली होती हे सहज समजते, त्याच वेळी मराठा मोर्चाच्या विचारपीठावर शाहू महाराज, म. फुले, अहिल्यादेवी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबीरी नव्हत्या. हा देखील मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा आणि काढण्याचा डाव होता, हे काही मराठा नेत्यांच्या खुप उशिरा लक्षात आले.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 55 मोर्चातून लाखो मराठा समाजाचे तरुण आपली आरक्षणाची मागणी घेऊन रस्त्यावर आले. पण त्यांना आरक्षण मिळाले का ? त्याचे उत्तर नकारार्थी आहे. पण याच काळात मराठा वगळून इतर सवर्ण वर्गासाठी 10% आरक्षणाचा ठराव मंजूर झाला आणि लागू केला गेला. याबद्दल मात्र मराठा समाज चकार शब्द काढायला तयार नाही. बरं अशी मागणी कुणी केली होती का ? यासाठी लाखोंचे मोर्चे निघाले होते का ? यासाठी विधानसभेत कुणी आग्रह धरला होता का ? तर याची उत्तरे आपल्याला नकारार्थी मिळतील. मग ही 10% आरक्षणाची खिरापत का ? याने 50% आरक्षणाच्या कॅप ला धक्का पोहचत नाही का ? एरवी कुठल्याही गोष्टीची दखल घेणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने याची दखल का नाही घेतली ?

त्यामुळे एकूणच देशातील प्रशासन, न्याय व्यवस्था, प्रसार माध्यमे ही ज्या लोकांच्या हातात आहेत. ते या देशाच्या आणि देशातील जात समूहाच्या संदर्भात निर्णय घेत असतात. त्या निर्णयसाठी ते प्रसार माध्यमे आणि न्यायालयाच्या माध्यमातून तसे नरेशन (भूमिका ) ठरवत असतात आणि इतर कठपुतली प्रमाणे त्यावर हुकूम गाजवत असतात. हे नरेशन मग कधी हिंदु मुस्लिम असते त्यासाठी गाय, हिजाब, तीन तलाक, लव्ह जिहाद, लँड जिहाद, मुस्लिम लोकसंख्या वाढते आहे, याचा प्रचार केला जातो. तशी खोटी आकडेवारी केली जाते, त्यांनी उभे केलेले विद्वान त्यासंदर्भात बोलू लागतात. त्यांच्या रिमोट कंट्रोल वर चालणाऱ्या वृत्तवाहिन्या अचानक तो मुद्दा प्राइम टाईम वर आणतात आणि सर्व सामान्य लोकांची माथी भडकवून टाकतात. कारण त्याचा मेंदू यापूर्वी अशाच पद्धतीने घडवलेला असतो.

तरुणांच्या व्हाट्स अप ग्रुप मध्ये, फेसबुक, इन्स्टाग्राम वर या पोस्ट वायरल करून दोन जात समूहाना अस्मितेच्या नावावर भिडवले जाते. त्यातून कुठे कल्याण मध्ये मोहित सारख्या अल्पवयीन मुलाची धिंड काढली जाते, त्याला जमिनीवर नाक घासायला भाग पाडले जाते.

हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आणि मराठा समाजातील तरुणांना याबाबत जागृत केलं पाहिजे. कारण दलित समाजाच्या विकासात छ. शिवाजी महाराजांपासून ते छ. शाहू महाराज पुढे अर्जुन केळुस्कर गुरुजी, सयाजीराजे गायकवाड, जेधे, जवळकर अशी फार मोठी परंपरा आहे. ती समन्वय, सहकार्य आणि त्याला समजूतदारपणाची किनार होती. याच धर्तीवर त्याकाळी लोकांनी मागासवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण, संरक्षण आणि सन्मान ही त्रिसूत्री आणली होती.

आता मराठा समाजातील दारिद्र्याच्या मुद्दावर येऊ या. मराठा समाज मुख्य प्रवाहातून काठावर येऊन ठेपला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मग या समाजाला इथे थोपवून पुढे जाण्यासाठी काय करता येईल यादृष्टीने विचार झाला पाहिजे. हा शेतकरी, कष्टकरी आणि आता बऱ्या पैकी शिकलेल्या लोकांचा वर्ग आहे. त्यामुळे त्या पद्धतीने काही विचार झाला पाहिजे

आरक्षण हा त्यावर उपाय आहे का ? तर मराठा समाजाला आरक्षणासाठी असलेले निकष लागूच पडत नाहीत, हे यापूर्वी ओबीसी आयोगाने स्पष्टपणे नोंदवले आहे, फक्त भाजप सेना युतीच्या काळात राणे समिती आणि गायकवाड आयोगाने अक्षरशः केवळ येन केन प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनकुल अशी माहिती भरून खेचून कोंबून मराठा समाजाला आरक्षणाच्या चौकटीत बसवले गेले आणि आरक्षण पण जाहीर केले होते, मात्र ते टिकले नाही. कारण ते टिकणे शक्य नव्हते. याचे कारण मराठा समाजाचे मागासलेपण जे आहे ते आर्थिक स्वरूपाचे आहे. ते सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक दृष्ट्या मागासलेले कधीच नव्हते ही वस्तुस्थिती आहे. हे मराठा समाजातील विचारवंत देखील मान्य करतील.

त्यामुळे उद्योग, शेती, शिक्षण आणि नोकरी या क्षेत्रात मराठा समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ठोस आणि थेट मदत कशी देता येईल, यासंदर्भात विचार झाला पाहिजे. समाजातील आर्थिक उत्पनाच्या निकषावर विभागणी करून अल्पभूधारक, कर्जबाजारी, आर्थिक दृष्टया मागास मराठा समाजातील युवकांना प्राधान्याने मदत पोहचविण्यासाठी वर्गवारी केली गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त गरजवंत मराठा कुटुंब आणि तरुणाला मदत कशी मिळेल याचा कृति आराखडा आखला पाहिजे आणि आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हे फार कठीण नाही. ज्या कुटुंबाकडे 10 एकर पेक्षा कमी जमीन आहे, एक राहत्या घराशिवाय इतर शहरात घर नाहीत, ज्या कुटुंबात पदवी पेक्षा कमी शिक्षित तरुण आहेत आणि त्यातही कोरडवाहू, ओलिता खाली असलेली जमीन, बागायती असे भाग पाडून मदत देता येईल. जसे भाषिक, धार्मिक अल्पसंख्यक संस्थेत त्या धर्म आणि भाषेच्या लोकांच्या साठी 50% नोकऱ्या, शेअर राखीव असतात तसे मराठा समाजातील कारखाने, उद्योग, शिक्षण संस्था, बँक अशा अनेक ठिकाणी रोजगार आणि मदत उपलब्ध करून देता येऊ शकते.

मात्र असे सकारात्मक उपाय करण्या ऐवजी मराठा समाजाला बहुजन समाजातून तोडून भरकटवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने समाजात द्वेष, वाद आणि विरोध पसरवला जात आहे हे समाजाने समजणे गरजेचे आहे.

किरण सोनावणे, पत्रकार

Updated : 11 Jun 2023 4:02 AM GMT
Next Story
Share it
Top