Home > मॅक्स ब्लॉग्ज > माझा पत्रकारीतेतील प्रवास, ईटिव्ही आणि रामोजी रावचे सुरक्षा-रक्षक..! #mangalsdiary

माझा पत्रकारीतेतील प्रवास, ईटिव्ही आणि रामोजी रावचे सुरक्षा-रक्षक..! #mangalsdiary

माझा पत्रकारीतेतील प्रवास, ईटिव्ही आणि रामोजी रावचे सुरक्षा-रक्षक..! #mangalsdiary
X

मंगल कारखानीस


पुण्यात एसपी कॅालेजला शिकत असतांनाच लोकसत्तेच्या संपर्क कक्षात काम करण्याची काही काळ संधी मिळाली. इथेच त्यावेळचे रहिवासी संपादक अनिल टाकळकर सर, धनंजय जाधव, आशिष पेंडसे, क्राईम क्राईम बीट बघणारे कडूसकर सर यांना लांबून काम करतांना बघण्याची ही संधी मिळाली. या विभागात असतांना बाबा आढावांना ही भेटतां आलं. या भेटीतील गप्पाटप्पात बाबानीं मला धक्का बसेल अशी माहिती दिली ती म्हणजे “बांधकाम करणारे कामगार यांच आयुष्य इतकं खडतर आहे की,गरीबीला बळी पडून उदरर्निवाह चालवण्यासाठी ते कित्येकदा मुकादमकडे आपल्या बायकांना गहाण ठेवण्यास मजबूर होतात”. हा विषय नाजूकच होता आणि या विषयासाठी मी नवखी पत्रकारच होते पण मी बातमी केली…! जवळपास पंधरा दिवस या बातमीबाबत या कक्षाच्या प्रमुखांनी काहीही केलं नाही, कुठल्या वरिष्ठ पत्रकाराला ही सोपवली नाही. मी रोज विचारत असे पण ते टाळायचे. शेवटी मी कंटाळून थेट रहिवासी संपादक अनिल टाकळकर यांना दाद मागितली. तेव्हा कुठे ही बातमी स्वता संपादकांनी रि-चेकपेक्षा, रि-राईट करून, माझ्या नावाने छापली. पण या घटनेनंतर मला हा कक्ष कायमचा सोडावा लागला. आज महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात-दिल्लीत आणि मुंबईत पत्रकारिता केल्यानंतर वाटतं की ती बातमी त्यावेळच्या कोण्या वरिष्ठ शोध पत्रकाराच्या मदतीने केली असती तर कदाचित सखोल करता आली असती. या कामगार वर्गाकडे ही सर्वांच लक्ष वेधले गेलं असतं. असो या घटनेनंतर त्यावेळचे संपर्क कक्षाचे प्रमुख यांनी मी अद्याप graduate नाही म्हणून या कक्षात काम करण्यास मी योग्य नाही, हा REMARK संपादकांना दिला. मला पुणे लोकसत्तेतील सर्वात लहान, जिथे पत्रकार हा ही उल्लेख नव्हता, ते पद सोडावं लागलं. पण खरं सांगू ही नोकरी सोडावी लागली नसती तर ख-या अर्थाने पत्रकारीतेचा माझा प्रवासच सुरू झाला नसता!

यानंतर कॅालेज करत असतांनाच माझा नव्याने पत्रकारीतेचा प्रवास पुन्हा तरूण-भारत या आरएसएसच्या वृतपत्रात सुरू झाला. इथे मात्र मला कनिष्ठ पत्रकार यापदावर घेतलं गेलं… खरं तर इथेच आल्यावर समजलं की मला साधी बातमी लिहीण्याचे बारकावे ही माहित नाहित. इथे वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी कित्येक वेळा माझी वसंत व्याख्यानमालेच्या बातमीची कॅापी भिरकावली असेल, कारण त्यात बातमी नसायचीच, कोण काय बोलले ते निबंध स्वरूपात लिहीलेलं असायचे! हे मी आज समजू शकते, त्यावेळी शैल्याचा जाम राग यायचा. पण आज तो मित्र वर्गात आहे. अश्या अनेक पत्रकार साथीदारांनी बातमी कशी लिहावी हे कळत-नकळत, इच्छा असतांना-नसतांना शिकवलं, त्यांचे सर्वांचे धन्यवाद! याच वृतपत्रात असतांना माझ्याकडून राष्ट्रपती पुण्यात येणार नसतांना ते येत आहेत ही एक बातमी दिली गेली. तेव्हा संपादक भगवान दातार यांनी कडक शब्दात दिलेली समज किंवा याच बातमीसाठी आपल्या मोटारसायकलहून त्यावेळचे चीफ रिपोर्टर राकेश टोळ्ये यांनी पुण्यात फिरवून “इथे सुरक्षा व्यवस्था दिसते का” हे विचारून-विचारून दिलेली समज आयुष्यभर लक्षात राहिली. पत्रकाराची एक लहाण चूक दूस-याच्या आयुष्यात परिणाम करू शकते, वृतपत्राला टिकेला सामोरे जावे लागते हे ह्या अश्या अनेक गोष्टींची समज मिळत, मी घडत गेले. या वृतपत्रात अनेक पत्रकारांकडून अजूनही खूप काही शिकतां आलं असतं पण तरूण-भारत फार काळ चालला नाही, पुन्हा बंद पडला…!

आता आपण काय करायचं? हा विचार करत असतांना दरम्यानच्या काळात मी कॅालेजचं शेवटचं वर्ष संपवून SYMBIOSIS COLLEGEमध्ये एलएलबीचे पहिले वर्ष ही उत्तीर्ण केलं होते. वडिलांना आशा होती की लॅा पूर्ण करून वकिलीत रस घेईन. पण destiny तुमच्या सावलीसारखी बरोबरच चालत असते आणि मार्ग सुचवत असते. तेव्हाच त्यावेळी सकाळ वृतपत्रात काम करणारा मित्र अमित गोळवलकर यांनी सुचवलं की “ईटिव्हीने मराठी वृतवाहिनी सुरू केली आहे, तू प्रयत्न करून बघ!” मला वाटत, मी तिस-याच दिवशी थेट हैद्राबाद गाठलं. मित्रमंडळी, यावेळी माझ्याकडे कोणतही APPOINTMENT LETTER नव्हतं. पुण्याहून रेल्वेने हैद्राबाद गाठलं, मी पुणे सोडत असल्याची कल्पना केवळ माझ्या वडिलांना होती, त्यांनी ही जड अंतःकरणाने परवानगी दिली होती. मी सिकंदराबादला उतरले ते थेट न्यूजलाईनच ॲाफिस गाठलं. जरा विचारपूस केली तर येथील जाणकारांनी मला फिल्मसीटीच्या बसमध्ये जाण्याचा सल्ला दिला तो मी स्विकारला कारण ही बस, फुकटात ईटिव्हीच्या कार्यालयापर्यंत घेवून जाते, शिवाय याबसने गेल्यास रामोजी राव फिल्मसीटीच्या दारातून थेट एन्ट्रि मिळते, कोणीही दारात थांबून ठेवत नाही. बस्स, मी चढले, बसले आणि पोहोचले ही! बहुदा तिस-या मजल्यावर त्यावेळचे ईटिव्ही समुहाचे संचालक एस आर रामानुजन सरांच्या कॅबिनच्या बाहेर तीन-चार तास बसले. जोपर्यंत ते भेटत नाहीत, तोपर्यंत बसूनच राहिले! त्यांचे खाजगी सचिव सुबलक्ष्मी आणि किशोर यांनी कित्येकदा “तुमच्याकडे appointment letter नाही “, त्यांची भेट शक्यच नाही”, सांगितल्यानंतरही बसूनच होते. पुण्याहून इथपर्यतचा माझा प्रवास न जेवता चालू होता. “कोण ही मुलगी!” शेवटी रामानुजन सरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं, पाणी प्यायला दिलं आणि विचारल “तुझ्याबरोबर कोण आलं आहे?” मी म्हंटलं “मी एकटीच आले आहे!” तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता. पण “तू का आलीस”, “तुझ्याकडे appointment letter नाही, असं-कसं तुला नोकरी द्यायची?” “हैद्राबदला काम करशील का?” महाराष्ट्राचे राजकारण असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले, माझ्या त्यावेळच्या बुद्धीप्रमाणे उत्तरे दिली. मी म्हणाले “माझ्या घरच्या लोकांच्या विरोधात जावून मी येथे काम मागायला आले आहे, ते कधीच हैद्राबादला काम करायला परवानी देणार नाहित. तुम्ही मला महाराष्ट्रात कुठेही पाठवा.” त्यांनी विचारलं,” मुंबई चालेल.” मी लगेच “हो”म्हटलं. माझ्यासमोरच रामानुजन सरांनी जयश्री लेंडगे यानां (ईटिव्ही मुंबईच्या न्युज कॅार्डिनेटर होत्या) यांना landline ने phone केला, त्याचं speaker on होतं किशोरगारू ही आतच होते आणि सांगितलं की एक मुलगी पत्रकार मुंबईसाठी पाठवत आहे. जयश्री म्हणाल्या,”यहां महिला पत्रकार ज्यादा है!” रामानुजन म्हणाले “ये कोई कमी नहीं होने देगी”. या घटने नंतर मला रितसर मुंबईत रूजू होण्याचं “OFFER LETTER” मिळालं, आनंद गगनात मावत नव्हता. कामात कसूर करायची नाही, या निश्चयाने दोन दिवस आगोदरच मुंबई ईटिव्ही ॲाफिसला ॲाफर लेटर घेवून पोहोचले. दोन दिवस आधी हैद्राबादहून थेट मुंबईला पोहोचले कारण वडिलांनी नोकरी करू नकोस LLB पूर्ण कर हा दबाव आणलाच असता, ही खात्री होती! इथून माझा ईटिव्हीतील प्रवास सुरू झाला. आजपर्यतच्या माझ्या पत्रकारीतेच्या आयुष्यात जयश्री ह्या संपादक श्रेणीतील, बेस्ट न्यूज कॅार्डिनेटर भेटल्या. बातम्या शोधून आणतांना त्यांनी कधीच अडथळे निर्माण केले नाहीत, बातमीत तडजोड करायला ही लावली नाही…! मुंबईत पत्रकारीता सुरू होती, केवळ साडे पाच हजारच्या पगारावर.

दरम्यान 2001ला मुंबईहून मला हैद्राबादच्या मराठी विभागाचे काम करण्यासाठी पाठवण्यात आलं. तुम्हाला केवळ एक महिना काम करायचा आहे ही सांगण्यात आलं पण एकदा कोणी हैद्राबादला गेला तो तेथेच अडकतो हे ऐकून होते. हैद्राबादला काम करत असतांना विश्वास देवकर सरांसारखे पत्रकार भेटले, सागर गोखले, माधुरी गुंटी सारखे सोबती मिळाले. त्यावेळी Rupert Murdochयांचं नाव ऐकलं ही नव्हते पण ईटिव्ही संस्थेत काम करायला सुरूवात करतांना रामोजीराव ही मोट्ठी आसामी आहे हे मात्र कळून चुकलं होतं. गाव-खेड्यातील पत्रकारांना या संस्थेने नावारूपाला आणलं, यात रामोजी रावांचे विचार आणि रामानुजन सरांसारखी त्यांना मिळालेली जोड होती. एक किस्सा आठवतो, मराठी डेक्सवर माझे त्यावेळचे सहकारी रफिक मुल्ला होते. सकाळचं बुलेटिन संपलं की आम्ही ब्रेकफास्टसाठी खाली कॅन्टिनला जायचो पण एकदा रफिक मागून यायला अगदी पाच-सात मिनीटेच उशीर झाला आणि न कळत माझ्याकडून एक कांड घडलं… रामोजी रावांना त्यावेळी ब्लेक कमांडो सिक्योरिटी होती, ते ही सहा. दोन त्यांच्या ॲाफिसमध्ये, दोन बिल्डिंगजवळ गस्त करायचे एक त्यांच्या दालनात प्रवेश करतांना दाराजवळ बसायचा, अजून एक आठवत नाही. माझा बहुदा इनाडू संस्थेतील हा तिसराच दिवस असेल. कुतूहल पत्रकाराला शांत बसू देत नाही, हे खरं आहे. माझ्याबाबतीत हे तंतोतंत खरं आहे. दाराजवळ

बसणा-या कमांडोंची आणि आमची नजरानजर व्हायची कारण इथूनच कॅन्टिनला जाण्याचा रस्ता होता. तो, मी कॅन्टिनला जात असतांना तेथे नव्हता. मात्र त्याची स्टेन गन तेथेच टेबलावर ठेवलेली होती. कोणी नाही, हे बघून मी ती हातात घेण्याचा केवळ प्रयत्न केला, पण माहित नाही बाहेर उभे असलेले कमांडो आत धावत आले. मी घाबरले स्टेन गनजवळून हात बाजूला घेतला. मला रामोजी रावांनी आत त्यांच्या ॲाफिसमध्ये बोलावलं विचारलं की “तू गनला हात का लावलास” मी केविलवाणी होवून म्हंटलं की “वजन किती असतं, बघायचं होतं.” त्यांनी विचारलं “का” मी म्हंटलं की “ही मंडळी सतत हातात घेवून असतात म्हणून”, खरं सांगू आता नीट आठवत नाहिए पण मला छाप-छाप छापलं होतं. आमचे मराठी ईटिव्हीचे संपादक विश्वास देवकरांनी ही त्याच्या मृदू शैलीत माझा समाचार घेतला होता. पण या घटनेनंतर कित्येक VVIPच्या संपर्कात अगदी मुंबईपासून दिल्ली पर्यंत आले, मुख्यमंत्री, कॅबिनेट मिनीस्टर पण यांच्या कमांडोच्या गनला हात लावणे तर सोडा साधा स्पर्शही करण्याचं धाडस झालं नाही. कारण “डियुटीवर असतांना संशय आला तर शूट करण्याचे आदेश त्यांना असतात, हे असलं करू नये” हा धडा मला रामोजी रावांच्या सिक्योरिटीकडून मिळाला होता. यानंतर कित्येक दिवस आमना-सामना झाला तर रामोजी राव स्मित हास्य करायचे आणि त्यांचे कमांडोही. आणि मी लाजायचे कारण चूक तर केली होती! ठरल्याप्रमाणे एक-सव्वा महिना काम करून मी पुन्हा मुंबई ईटिव्ही ॲाफिसला रूजू झाले. इथे वातावरण बदललं होतं. जयश्रीच्या जागी आता राजीव खांडेकर आले होते. पण माझ्यासाठी एक वाद वाट पहात होता… पुण्यातून खांडेकरांचे संपर्क,संदर्भ घेवून माझे वडील खांडेकरांना भेटले आणि माझ्या मुलीला नोकरीवरून काढून टाका ही विनंती. हे मला समजलं. मी धावतच ॲाफिसला आले, वडिलांना घेवून दादरला शामा सुळे आत्याच्या घरी आले. दरम्यान खांडेकरांनी वडिलांना समजावलं होतं की “ती जे काही करत आहे ते चांगल आहे, तुम्ही काळजी करू नका”, पण ऐकतील ते कारखानीस कसले? अश्या घरातील गोष्टींना आणि काही आंशी ॲाफिस पॅालिटिक्सला कंटाळून मी दिल्लीत बदली करून मागितली, मेल थेट रामानुजन सर आणि सीसी रामोजी राव यांना…अवघ्या आठवड्यात मला दिल्लीला पाठवण्यात आलं.

माझी खरी कसरत दिल्लीत सुरू झाली. मुंबईत अगदी रात्री साडे अकरा-बारा वाजेपर्यत आम्ही, रणधीर कांबळे, सुनिल तांबे, रवी आंबेकर, मनोज भोयर अजूनही खूप जण “कंटू आला” (कंटाळ्याला शोधलेला हा माझा शब्द आहे.) की समुद्रकिनारी जावून बसायचो, ताजी हवा “खायचो” सुनिल तांबेच्या गझली ऐकायचो… कसली-कसली भीती नव्हती! पण दिल्लीत काम आटपून रात्रीचे साडेसात-आठ जरी वाजले तरी बस स्टैण्डवर पुरूषांच्या नजरा आतून काळीज चीरेपर्यत वेदना देणा-या असायच्या. बसमध्ये बसायला जागा नही मिळाली तरीही त्रास-ताप-वेगना होत्याच! कित्येकदा रात्रीचे नऊ वाजत. त्यावेळी मी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल यांच्या सुभांचल या हॅास्टेलला रहात होते. तसं हे हॅास्टेल रात्री नऊला बंद होत असे पण मला साडे नऊपर्यत परवानगी होती. कित्येकदा बस, रात्री अंधारात शुकशुकाट असलेल्या र्निमनुष्य रस्त्यावर उतरवायची, कारण अचानक रूट बदलायची. जसा कामाचा ताण वाढ गेला, तसा उशीर व्हायला लागला मी साडे नऊपर्यतही रूमवर पोहोचत नसे. मी दोन-तीनवेळा रात्र रेल्वेस्टेशनच्या वेटिंग रूसमध्ये काढल्या. त्यावेळचे दिल्लीचे न्यूज कॅार्डिनेटर अभिजीत दास यांना ही कळवलं पण मार्ग निघाला नाही. मी माझ्या महिला पत्रकार यानात्याने अडचणी मांडणारी एक मेल थेट रामानुजन सर सीसी टू रामोजी राव यांना केली. यानंतर दिल्लीत नऊनंतर ॲाफिसमध्ये कामामुळे उशीर होणा-यांना घराच्या दारापर्यत ड्रोप केले जावू लागले, हि गोष्टसुमारे 2001-2002 दरम्यानची आहे. आमच्या कित्येक ईटिव्हीतील साथीदारांना हे माहित आहेच की बाय लाईन(नावाने बातमी येणे) किंवा पीटीसी( कॅमे-यासमोर येवून स्वता पत्रकाराने येवून बातमी देणे) ही प्रथा ईटिव्हीत नव्हती. पण दिल्लीत काम करतांना वर्कलोड जास्त असायचा आणि वेळ कमी ,सकाळी सात नंतर संध्याकाळी सातचे बुलेटिन असायचे, त्यानंतर प्रत्येक तासानंतर पाच मिनीटांच्या थोडक्यात महत्वाच्या बातम्या. आपली बातमी संध्याकाळच्या बातमीपत्रात हेडलाईन बनावी ही इच्छा प्रत्येक जिल्यातील आणि दिल्लीतील माझ्यासारखा पत्रकाराची असायची. बातमीचा फिड पंधरा मिनीटांचा असावा हा नियम होता. दिल्लीत दिवसभर फिरून बातमी करून, लिहून त्यानंतर रिझनल प्रतिनीधींनी स्वता त्या-त्या बातमीचा फीड पाठवावा हा नियम होता. केवळ टिसीआर लिहून टेप पाठवून कोणीही जबाबदारी घेत नसे. यातून वाचण्यासाठी मी मार्ग काढला… चालत चालत नेत्याबरोबर बोलायचा, अधिका-याचा बाईट घ्यायचा. त्यावेळी मी गृहमंत्री शिवराज पाटिल यांच्या सरकारी बंगल्यावर, त्यावेळचे महाराष्ट्र कांग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव आदिक यांचे सुरेश कलमाडी यांच्या सरकारी बंगल्यातील बागेत कित्येकदा चालत चालत INTERVIEWS घेतले असतील, ते हेडलाईन ही बनले. त्यावेळी नेशनल मिडीयातील मोठे पत्रकार नेत्यांच्या अधिकारींच्या घरी जात, दोन खुर्च्या लागत, बरोबरीला किमान तीन कैमेरे लावून interview घेतला जाई, याला UP MARKET REPORTING समजलं जाई. तेव्हा चालत-चालत घेतलेला interview म्हणजे DOWN MARKET पत्रकार असणे होतं, या प्रकारच्या रिपोर्टिंगला आज आपण “वॅाक द टॅाक” या नावाने ओळखतो. 2002चा सुमारास मी मजबूरीत, वेळ वाचावा, आपल्या बातमीला हेडलाईन मिळावी म्हणून चालत चालत interviews सुरू केले होते, म्हणून मी म्हणते, मजबूरी का नाम वॅाक द टॅाक! ईटिव्हीसारखं प्लेटफॅार्म रामोजी रावांनी बनवलं, ते आम्हा नवख्या पत्रकारांना दिलं नसतं तर हे प्रयोग शक्यच झाले नसते. धन्यवाद रामोजी राव आमच्या सारख्या पत्रकाराचा पाया भक्कम करण्यासाठी, कुठेही उडण्यासाठी पत्रकाराचे पंख देण्यासाठी…


#mangalsdiary #ramojirao #etv #journalistdiary #rfc #hydrabad #Eenadu

मंगल कारखानीस (8th June 2024)

Updated : 9 Jun 2024 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top