Home > News Update > आम्ही तिथे पोहोचू तेव्हा...

आम्ही तिथे पोहोचू तेव्हा...

आम्ही तिथे पोहोचू तेव्हा...
X

मानवाचे अंतरिक्षात जाण्याचे स्वप्न सुरू होऊन आता सात दशके उलटली. पृथ्वीच्या सौरकक्षेच्या आतून फेऱी मारणाऱ्या अमेरिकन व्ही २ रॉकेटच्या सोबत आल्बर्ट वन नावाच्या ऱ्हेसस जातीच्या माकडाला सोडण्यात आले तो दिवस होता ११ जून १९४८. यानंतर रशियाचे स्पुटनिक २ हे यान ३ नोव्हेंबर १९५७ रोजी पृथ्वीच्या सौरकक्षेत गेले तेव्हा त्यात लायका नावाची कुत्री सोडण्यात आली होती. १२ एप्रिल १९६१ रोजी रशियाचा युरी गागारिन हा पहिला मानव अंतराळात गेला. त्यानंतर अमेरिकेने चंद्रावर तीन माणसांचे यान पाठवले, त्यातल्या दोघांनी २० जुलै १९६९ या ऐतिहासिक दिनी प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवले.

यानंतर अंतराळ प्रवास सुरूच राहिला. माणसांसकट किंवा माणसांविना अनेक याने अंतराळात गेली. सौर मालेच्या पलिकडे जाणारे वोयाजर -१ आणि वोयाजर-२ ही याने म्हणजे मानवाच्या अंतराळवेधाचा फार महत्त्वाचा टप्पा आहे. आजवर या दोन यानांनी पृथ्वीपासून दूर असलेल्या बहिर्ग्रहांचा वेध घेतला आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांच्यासह एकंदर ४९ उपग्रह किंवा चंद्र, मिटिऑर कडी, चुंबकीय क्षेत्रे यांचा अभ्यास त्यांनी केला आहे. १९७७ मध्ये प्रवास सुरू केलेल्या वोयाजर द्वयापैकी वोयाजर २ने ऑगस्ट २०११मध्ये सर्वाधिक दिवसांचा प्रवास करून पायोनियर ६चा विक्रम तोडला.

या काळात त्यांनी गुरूचे वातावरण, तिथली वादळे, गुरूच्या आयो चंद्रावरील ज्वालामुखी, त्याभोवती निर्माण झालेले प्राणवायू आणि गंधकाचे कडे, गुरूच्याय युरोपा या बर्फाळ चंद्राच्या बर्फाखालील महासागर, शनीची कडी, त्यातच असलेले काही चंद्र आणि त्यात उमटणाऱ्या लहरी, शनीच्या टायटॅन या चंद्रावरील मिथेनयुक्त वातावरण, नेपच्यूनवरील गडद ठिपका म्हणून दिसणारे वादळ आणि नेपच्यूनच्याच ट्रायटन नावाच्या बर्फाळ चंद्राच्या पृष्ठावरून उडून बाहेर येणारे गरम पाण्याचे फवारे अशा अनेक गोष्टींची निरीक्षणे घेतली. आज ही दोन्ही याने सौरमालिकेच्या बाहेर ताऱ्यांमधल्या अवकाशात गेली आहेत. आणि २०२५ पर्यंत किंवा अधिक काळापर्यंत ती माहिती पाठवत रहातील. आणि पृथ्वीवासीय वैज्ञानिक अजूनही वेगवेगळ्या अवकाशमोहिमा काढून, याने पाठवून आपल्या शेजारच्या ग्रहांसंबंधी अधिक माहिती गोळा करीत आहेत.

आता नासाने चंद्रावर आणखी माणसे पाठवण्यासाठी तीन वेगवेगळी डिझाइन्स पसंत केली असल्याचे वृत्त आहे. एलॉन मस्कचे स्पेस एक्स, जेफ बेझॉसचे ब्लू ओरिजिन आणि डायनेटिक्सचे आला अशी ही तीन याने आहेत. नासा ही डिझाइन्स प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निधी देणार आहे... अर्थात आता मात्र जगभर कोरोना विषाणूच्या हैदोसामुळे सारेच अडचणीत आलेले असताना या प्रकल्पावर परिणाम होणार आहे हे निश्चित.

१९७२नंतर एकही मानव चंद्रपृष्ठावर गेलेला नाही. २०२४ पर्यंत एक स्त्री- पहिली स्त्री - आणि एक पुरुष चंद्रावर पाठवायचा असे ठरले होते. आता काय कसे होते ते पाहायचे.

अंतराळ कार्यक्रमावर खर्च करू नये असे म्हणणे हा काहींचा राजकीय विचार आहे. आणि साध्या बेरीज-वजाबाकीचा विचार करायचा तर सध्याच्या आर्थिक संकटाच्या, मानवी दुःखाच्या पार्श्वभूमीवर तो झटकन पटूही शकतो.

हा विषय आज मी लिहिण्याचं आणि मानव अंतराळात पोहोचला आहे याची आठवण देण्याचं कारण एकच आहे. असल्या रोगाच्या शत्रूमुळे मानवी समूह पराभूत होतील, कुटुंबेही पराभूत होतील, नामशेषही होतील कुटुंबेच्या कुटुंबे. पण संपूर्ण मानवजातीच्या समोर काहीतरी आकाशाएवढी उंच आशा आणि स्वप्ने असायलाच हवीत. आपण डायनॉसॉर किंवा मानवाच्या काही पूर्वजांप्रमाणे साफ धुळीला मिळणार नाही, तगून राहू हा विश्वास उराशी असेल तर संकटातही जगणे सोपे होईल.

माया अँजेलौ या महान कवयित्रीची एक कविता आहे... अंतराळाच्या प्रवासातून दूरवर पोहोचणाऱ्या मानवजातीसाठी..... दीर्घ कविता आहे...

एक धैर्यशील आणि अनपेक्षित सत्य- माया अँजेलौ

या छोट्याशा, एकुटवाण्या ग्रहावरचे आम्ही लोक

करतो प्रवास, सहजसंथ अवकाशातून

एकलकोंड्या ताऱ्यांजवळून, अलिप्तशा सूर्यांच्या कक्षांना ओलांडून

निघालो आहोत एका स्थळाकडे, संकेत मिळत आहेत

की अखेर नुसते शक्यच नव्हे, आवश्यक आहे

आम्हाला धैर्यशील आणि अनपेक्षित सत्य कळणे

आणि जेव्हा आम्ही पोहोचू तेथे

शांतीदात्या त्या दिवसाच्या टप्प्यात

सैलावतील आमची बोटे

शत्रुत्वाच्या वळल्या मुठींमधून

आणि तळव्यांना लाभेल सुखद हवेचा गारवा

जेव्हा तेथे पोहोचू आम्ही

तेव्हा द्वेषाच्या दरबारी नाटकावर पडला असेल पडदा

आणि चेहऱ्यावर बसलेले काजळी तुच्छतेचे थर घासून निघतील साफ

रणांगणे आणि आखाडे

आमच्या छकुल्या, जिवलग मुलाबाळांना नाही करणार जखमी

रक्ताळलेल्या गवतांवर नाही लोळवणार

दूर देशच्या जमिनीवर- जरी ती दिसायला इथल्यासारखी असेल.

जेव्हा चर्चेसवरचे अधाशी लुटारू हल्ले

मंदिरांमधले किंचाळते कोलाहल थांबून जातील

जेव्हा ध्वजा लहरतील आनंदाने

जेव्हा जगातले सारे फलक थरथरतील मस्तीत

स्वच्छ हवेच्या झुळुकीसरसे

जेव्हा आम्ही पोहोचू तेथे

जेव्हा खांद्यावरच्या रायफली गळून पडतील सहज

आणि पोरांच्या बाहुल्यांवर चढतील कपडे तहाच्या झेंड्यांचे

मरणांतक सुरुंग दूर केलेले असतील

वृद्धांना त्यांची शांत संध्याकाळ गाठता येईल

धर्माच्या परंपरांना जडलेला नसेल

गंध जळक्या मांसाचा

बाळपणीची स्वप्ने नाही खाणार लाथ

छळाच्या दुःस्वप्नांकडून

जेव्हा आम्ही पोहोचू तेथे

तेव्हा आम्ही कबूल करू की

रहस्यमय रचनेची दगडी पिरामिड्स

बॅबिलॉनच्या शाश्वत सौंदर्याने

झुलणाऱ्या बागा असल्या जरी आमच्या स्मरणात कोरलेल्या

सूर्यास्ताच्या पश्चिमरंगात

न्हाऊन पेटून उठलेली

ग्रॅन्ड कॅन्यॉनही

युरपमधून आपल्या निळाईचा आत्मा वाहवणारी डान्यूबही

उगवत्या सूर्याकडे झुकलेले

फूजीचे पवित्र पर्वतशिखरही

आपापल्या पोटातली, काठावरची सारी जीवसृष्टी सांभाळणाऱ्या

अमॅझॉनच्या पितृ-नदाची वा मिसिसिपीच्या मातृ-नदीची

कुणाचीच मातब्बरी नाही सांगत आम्ही.

या जगातील आश्चर्ये ही एवढीच नाहीत.

आम्ही पोहोचू तेथे तेव्हा,

आम्ही, या कणसदृश आणि एकल्या ग्रहगोलाचे लोक

जे सतत बॉम्बला, तलवारीला, खंजिराला हात घालायला सज्ज असतो,

आणि तरीही गुपचुप अंधारात बसून शांतीचिन्हांची आस ठेवतो

आम्ही, या भौतिकाच्या तुकड्यावरचे लोक

ज्यांच्या तोंडून निघतात लासट जखमांसारखे

आमचं अस्तित्वच पणाला लावणारे शब्द

आणि तरीही याच तोंडांतून फुटतात गाणी अतीव गोडव्याची

की हृदयांचे ठोके चुकतात

आणि शरीरे आश्चर्यमुग्ध होतात

आम्ही, इथले लोक, या लहानशा, तरंगत्या ग्रहावरचे

आमचे हात निर्ममपणे सपकन् वार करू शकतात

की निमिषार्धात कुणा जीवाचा जीव जाऊ शकतो

आणि तरीही हेच हात कधीकधी स्पर्शून जातात दिलासा देण्यासाठी, किती खोलवर नाजूकपणे

ताठ माना आनंदाने झुकूही शकतात

कणखर कणे आनंदाने वाकूही शकतात

या प्रचंड गोंधळाच्या अंतर्विरोधातून

कळत जातं आम्हाला की आम्ही आहोत ना सैतानी ना दैवी

जेव्हा आम्ही पोहोचू तेथे,

आम्ही, या भटक्या, फिरस्त्या ग्रहावरचे लोक

या पृथ्वीवर जन्मलेले, या पृथ्वीचे लोक

आमच्याकडे आहे, क्षमता या पृथ्वीसाठी निर्मिण्याची

एक वातावरण, जेथे प्रत्येक पुरुषाला आणि स्त्रीला

जगता येईल मुक्तपणे पावित्र्याच्या दिखाऊ धार्मिकतेविना

पांगळेपण लादणाऱ्या भयाविना

आम्ही तेथे पोहोचू तेव्हा

आम्हाला कबूल करावं लागणार आहे की आम्ही आहोत शक्यता

आम्ही आहोत खरी आश्चर्ये, चमत्कार

पण हे तेव्हाच, आणि फक्त तेव्हाच,

जेव्हा आम्ही तेथे पोहोचू.

(मूळ कविता- माया अँजेलौ)

कोरोना असताना आणि नसतानाही... ही स्वप्ने अक्षय राहोत.

Updated : 1 May 2020 3:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top