Home > मॅक्स ब्लॉग्ज > उद्योगपती महात्मा फुले आणि शेअर मार्केट

उद्योगपती महात्मा फुले आणि शेअर मार्केट

महात्मा जोतीराव फुले हे प्रामुख्याने समाजक्रांतिकारक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही.महात्मा फुले यांच्या उद्योगपती आणि शेअर मार्केट या दुर्लक्षित पैलूंवर प्रकाशझोत टाकणारा संशोधक प्रा. हरी नरके यांचा लेख मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांसाठी पुनःप्रसारित करीत आहोत.

उद्योगपती महात्मा फुले आणि शेअर मार्केट
X

जोतीराव हे स्वत:च्या तेलाने जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य करणारे जोतीराव मुळात एक उद्योगपती होते. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि इतर व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवडय़ाचा (बंडगार्डन) पूल बांधण्याच्या १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळालेले होते. या कामाला खडी, चुना, आणि दगड पुरविण्याचा मुख्य ठेका त्यांच्याकडे होता. १०० वर्षे मुदतीचा हा पूल आज १४१ वर्षांनंतरही मजबूत आहे. त्याचे रहस्य जोतीरावांच्या कंपनीने संचोटीने केलेल्या कामात आहे.

'बिल्डर' हा शब्द आज वेगळ्या अर्थाने प्रचलित झालेला आहे. त्याला 'आदर्श' रूप प्राप्त झाल्याने तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक 'नेशन बिल्डर' होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. सत्यशोधक व्यंकू बाळोजी कालेवार यांनी १८८९ ते १८९३ या काळात मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत बांधली, ते वंजारी समाजाचे होते. ते पुणे जिल्ह्य़ातील (शिरूर) घोडनदीचे होते. याशिवाय मुंबई, पुणे, बडोदे येथे त्यांनी अनेक टोलेजंग आणि देखण्या इमारती बांधल्या.





जोतीरावांचे स्नेही, सत्यशोधक रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा आदींची कामे केली. नरसिंग सायबू वडनाला यांनी भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप बांधले. मुंबईतील अनेक कापडगिरण्यांची बांधकामे त्यानी केली. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे.

जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.





जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतीरावांनी ते 'जातीभेद विवेकसार' प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असे कॉम्बिनेशन फार विरळेच म्हटले पाहिजे.

स्वत:च्या शाळांमध्ये त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून सर्व मुला-मुलींना शेती व उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते.kAn Industrial department should be attached to schools in which children would learn useful trades And crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independentlyl ही त्यांची भूमिका होती. दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.

उद्योगामध्ये सचोटी आणि साधनसुचिता फार महत्त्वाची असते, असा विचार ते आपल्या कवितेतून मांडतात.

'सत्य उद्योगाने रोग लया जाती, प्रकृती होती बळकट!

उल्हसित मन झटे उद्योगास, भोगी संपत्तीस सर्व काळ!

सदाचार सौख्य त्यांची सेवा करी, शांतता ती बरी आवडीने!

नित्य यश देई त्यांच्या उद्योगास, सुख सर्वत्रांस जोती म्हणे!

सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी कित्ता मुलीमुला!

तरूणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणी करी हाय हाय!

उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्याशाप देती जणामाजी!

आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना जोती म्हणे!

आळशांचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडीती सोरटीचे!

नावनिशी नाही पैसा देई त्यांची, आदा आढाव्याची देत नाही!

उचल्याचे परी मूढास नाडीती, तमाशा दावीती उद्योगास!

अशा आळशाची शेवटी फजिती, धूळमाती खाती जोती म्हणे!

कोणत्याही प्रकारची हातचलाखी आणि अनीती ही माणसाला शेवटी धुळीला मिळवत असते. जुगार, मटका, लॉटरी या विनाकष्टांच्या गोष्टींचा ते निषेध करतात. हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत, असे फुले म्हणतात.

शेतकरी सुखी व्हायचा असेल तर त्याची त्रिसूत्री फुले मांडून दाखवतात.

१) उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे.

२) शेती आधुनिक पद्धतीनेच केली पाहिजे. शेतीला नळाद्वारे (ठिबक सिंचनाचे बीजरूप) पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत.

३) शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. 'शेतक ऱ्याचा असूड' या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात.

जोतीरावांनी 'शेअर मार्केट'वर उद्बोधक कविता लिहिलेल्या आहेत.

रोजगारासाठी पैसा नये गाठी ! अज्ञान्यास गाठी नफा हल!

शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!

पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!

उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!

'महापराक्रमी' हर्षद मेहता याने बँकेच्या पावत्यांमध्ये गडबड करून फार मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पावती हीच खरी जडीबुटी म्हणजे जतन करण्याची, लक्ष ठेवण्याची जागा आहे याचा इशारा जोतीरावांनी १२५ वर्षांपूर्वी दिला होता.

शेअर धंदा करताना जोतीराव काही पथ्ये सांगतात :

शेअर्स काढून उद्योग करणे! हिशोब ठेवणे रोजकीर्द!

खतावणी सर्व बिनचूक ठेवी ! नफा तोटा दावी शोधी त्यांस!

जामीन देऊन नितीने वर्तावे ! सर्वा वाचवावे अब्रूमध्ये!

शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा! जगा दाखवावा जोती म्हणे!

लबाडी आणि फसवणूक यांचा निषेध करताना असले उद्योग जळोत असा थेट हल्ला ते करतात.

शेअर्स मार्केटात खप कागदाचा, नफा दलालाचा बूड धन्य!

शेअर्स कागदास पाहून रडती ! शिव्याशाप देती योजी त्यास!

शेअर्स व्यापाराचा जळो तो उद्योग ! होऊन नि:संग मूढा लुटी!

आळशाचा खरा नित्य हाच धंदा! दुरूनच वंदा जोती म्हणे!

लुटीचा कोणताही धंदा जोतीरावांच्या सत्शील वृत्तीला मानवणे शक्यच नव्हते.

त्यांचा भर सातत्याने प्रामाणिकपणे उद्योग, व्यापार आणि शेती करण्यावर असायचा, त्याचेच मोल त्यांनी आपल्या कवितेतून आणि कृतीतून उलगडवून दाखविले.

उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील जोतीरावांची ही लक्षणीय कामगिरी बघितली की त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही अधिक उजळून निघते.

Updated : 28 Nov 2022 2:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top