Home > मॅक्स ब्लॉग्ज > "महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक उत्सव घटोउत्सव "

"महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक उत्सव घटोउत्सव "

घटस्थापना ही अंधश्रद्धा आहे का? या सणाचे शास्त्रीय कारण काय असते जाणून घेण्यासाठी वाचा संस्कृती अभ्यासक सुधीर नलवडे यांचा हा लेख...

महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक उत्सव घटोउत्सव
X

26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र मोठया उत्साहाने घटस्थापना केली जाणार. निसर्गाच्या नवनिर्मिती प्रकियेत माणसांनी केलेली नवनिर्मिती अशा संयुक्त नव निर्मितीचा उत्सव म्हणजे घट बसवणे ते दसरा साजरा करण्यापर्यंतचा हा सण. शेती जीवनात दरवर्षी येणा-या खरीप हंगामापर्यंत हा सण येतो. पावसाळ्यात सुरवातीपासून निसर्गाशी झटून, दोस्ती करून, कष्ट उपसून सुगी घेतलेली असते. सुगीच्या काळातही धान्य घरात आणण्यासाठी करावे लागणारे सुखद कष्ट झालेले असतात. या सर्वांची उत्सवी प्रतिमा म्हणूनच घटस्थापनेचा सण साजरा होतो. सुगी घरी आणून झाल्यावर किंवा घरी आणता हा सण आनंदाने केला जातो.

पानाच्या साहायाने एखादी खोलगट बुट्टी (किंवा पातेले) तयार करावे. तसा या घटाच्या भांड्याचा भाग पानांनी तयार केला जातो. या पानांच्या भांडयात माती घालून तो ब-याच अंशी भरला जातो. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य 'पेरले' जाते. मातीत मधोमध पाण्याने भरलेले मडके ठेवले जाते. त्यावर दररोज ताज्या पाना- फुलांच्या माळा करून घातल्या जातात. वेगवेगळ्या धान्यापासून केलेला 'कडाकणी' हा पदार्थ माळेत गुंफून इतर माळा बरोबर सोडला जातो. नऊ दिवस घटातले घाडगे पाण्याने भरले जाते. गाडग्यातून पाणी पाझरून पेरलेल्या बियांना पाणी मिळते. सरळ पाणी घातले जात नाही. नवव्या दिवशी घट उठवण्याचा कार्यक्रम होतो. घटात तोपर्यंत धान्य चांगले उगवून आलेले असते. या रोपांचा तुरा टोपीत किंवा फेटयात खोवून मुलं माणसं दस-यांचं 'सोन' लुटायला जातात. एकमेकांच्या 'सोन' (आपटयाच्या झाडांची/ज्वारीचे पान) वाटतात. माणसं एकमेकांच्या प्रेम वाटत उरा-उरी भेटत संपूर्ण गावात फिरतात आणि स्त्रीयांच्या तोडून "इडा-पिडा टळो, बळीच राज्य येवो" अशी इच्छा ओवाळण्याच्या कार्यक्रमात व्यक्त केली जाते. खंडेनवमी दिवशी शेतीत वापरलेल्या जाणा-या सर्व अवजारांची सुद्धा पूजा केली जाते. उरलेला घट त्यातल्या रोपासह शेतात नेऊन पुरण्यात येतो.

घट बसवण्यापासून घट उठवून दसरा साजरा करण्यापर्यंतचा सण हा त्यामुळेच कष्टकरी जनतेच्या नवनिर्मितीच्या आनंदोत्सवाबरोबर या जनतेची शोषणापासून मुक्ती व्हावी अशी इच्छा करणारा सुद्धा हा सण आहे. अशा या सणामध्ये वापरलेल्या प्रतिकांचे आशय समजून घेणे फार महत्वाचे आहे. हीच प्रतीके शेतकरी का वापरतात? त्याचे विश्लेषण खालीलप्रमाणे,

पत्रावळी :

पूर्वीच्या काळी शक्यतो सामुदायीक पद्दीतीनें शेती केली जात असे. शेती कसण्यासाठी अनेक माणसांची गरज भासत. त्या माणसा माणसांमधील ऋणानुबंध म्हणजे 'पत्रावळी' हे त्याचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे पळसाचे एक एक पान घेऊन ते जोडले असता त्याचे एका मोठया पानामध्ये (पत्रावळी) रूपांतर होते. त्याच प्रमाणे शेतात वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट करणा-या माणसांनी एकत्र येऊन, संघटित होऊन शेती करावी म्हणजे चांगले फळ व पीक मिळते याचे हे प्रतीक आहे.

माती (वावरी) :

घटासाठी लागणारी माती (वावरी) शक्यतो शेतकरी आपल्या शेतामधून (वावरातून) आणतो. याचे कारण असे कि घटस्थापनेनंतरचा ऋतू हा हिवाळा येतो. या हिवाळ्या ऋतू मध्ये आपल्या जमिनीचा कस कसा आहे? ओलावा धरून ठेवण्याची क्षमता किती आहे? जमीन कोणत्या पिकांसाठी उत्तम आहे? हया सर्व गोष्टी तपासण्यासाठी आपल्याच शेतातील माती घट स्थापने साठी वापरली जाते.

धान्य :

घटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य टाकले जाते. (उदा. गहू, हरभरा, मका, करडई, शाळू) या पाठीमागे असे कारण आहे कि, आपली जमीन कोणत्या पिकांसाठी योग्य आहे आणि कोणत्या पिकांचे उत्पन्न सर्वात जास्त येईल. जेणेकरून ते उत्पन्न शेतात घेता येईल. याचे प्रात्यक्षिक म्हणून त्यात बियांची पेरणी करतात. यावरून आपल्या कडील बियाणाची प्रतही कळते.

पाण्याने भरलेले मडके :

घटावर पाणी भरून मडके ठेवले जाते. त्यातून हळूहळू पाणी पाझरते व मातीत मिसळते. घटात टाकलेल्या धान्याच्या मुळांना त्यांच्या गरजेनुसार पाणी मिळते व उत्तमरित्या पीक येते. म्हणजेच जर शेतीला पाणी कमी पडू लागले तर पाझरावर जमिनीतील पीक कसे टिकेल व उत्त्पन्न कसे मिळेल याचे परीक्षण या मधून केले जाते.

खाऊंची पाने व नारळ :

पावसाळ्यात विहिरीमध्ये साठलेल्या पाण्याचे सूर्यकिरणामुळे बाष्पीभवन होऊ नये व पाणी पुढच्या पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी व शेतीसाठी शिल्लक रहावे यासाठी शेतकरी विहिरी भोवती नारळाची झाडे लावायची व पानाचा पाचोळा टाकायचे त्यामुळे विहिरींमधील पाण्याचे बाष्पीभवन होऊन विहिरी आटत नसत. त्याचप्रमाणे मडक्यामध्ये ठेवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये. यासाठी खाऊंची पाने व नारळ मडक्यावर ठेवले जाते.

अवजारांचे व शस्त्रांचे पूजन :

खंडेनवमीला अवजारांचे व शस्त्रांचे पूजन केले जाते. पूर्वीच्या काळामध्ये शेती कसण्यासाठी व शेतीतील उत्पादन वाढीसाठी उपयुक्त अशा अवजारांची गरज भासत. तसेच प्राण्यापासून शेतीचे व शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रांचा उपयोग केला जात असे. त्यामुळे शेतीसाठी उपयुक्त अवजारांचे व शेतीतील उत्पादनाच्या संरक्षणासाठी लागणा-या शस्त्रांचे खंडेनवमीला पूजन केले जाते.

आपटयाची/ ज्वारीची पाने :

दस-याच्या दिवशी आपटयाची व ज्वारीची पाने एकमेकांना सोनं म्हणून वाटली जातात. आपटयांच्या पानांचे बारकाईने निरीक्षण केले असता त्या पानाचा आकार आपल्याला माणसांची हृदय एकमेकांना जोडल्या सारखी दिसतात. म्हणजेच आपटयाची व ज्वारीची पाने सोनं म्हणून एकमेकांना देणे म्हणजे आपल्या जवळचे असलेले प्रेम व आपुलकीची भावना एकमेकांना देणे व त्याची जपणूक करणे. आपल्या आई वडिलांचा व वडीलधा-या मंडळींचा आदर ठेवणे तसेच सुख दुःखात सहभागी होणे होय. एकमेकांना जोडण्याचे ते प्रतीक आहे.

परंतु आज काळ खूप बदलेला असताना, शेती क्षेत्रा मध्ये दररोज नवीन चढ उतार येत असताना, जागतिक व देश पातळीवर शेती मध्ये प्रचंड संशोधन केले जात असताना, शेती जीवनात ठिबक सिंचन - टिशू कल्चर - ग्रीन हाऊस, नवीन लागवड पद्दत अशा अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान सार्वत्रिक करणारा हा काळ आहे. अगदी छोटया छोटया खेडयामधून फळे, फुले, पालभाज्या, जागतिक बाजारपेठेत पाठवले जाण्याचा हा काळ हा काळ आहे. कॉम्प्युटरच्या माध्यमातून इंटरनेट वर ज्ञानसंचय आणि विज्ञानसवांद करण्याचा काळ असताना हा नवनिर्मिती करणारा घट उत्सव आणि दसरा अशा पुरातन सांस्कृतिक परंपरेचा काय उपयोग? असा प्रश्न उभा केला जाणे शक्य आहे.

तर अशा या आधुनिक काळात २१ व्या शतकात प्रवेश करीत असताना शहर आणि खेडयापाडयातून घटस्थापना आणि दस-याचे सोने वाटणे या सणांच्या सांस्कृतिक परंपरेचे महत्व कमी होऊ लागले आहे. परंतु मानव निसर्गसंबंधातल्या निरोगीपणाचा, निर्मितीक्षमेतेचा परस्पर अवलंबित्वाला उत्कटेला पुढे आणणारा, निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांशी मैत्री जोपासणारा, निसर्गातल्या काही घटकांविषयी भीतीयुक्त आदर व्यक्त करणारा, तसेच शेतीसंस्कृतीचा मुळ गाभा जपणारा हा घटस्थापना आणि दसरा हा सण असल्याने आपण सर्वांनीच गावाच्या मुख्य ठिकाणी सामुदायिकरित्या घटाची स्थापना करून मोठया उत्साहात साजरा करणे गरजेचे आहे. घटस्थापनेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.

- सुधीर नलवडे

Updated : 27 Sep 2022 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top