Home > मॅक्स ब्लॉग्ज > पाऊले चालती पंढरीची वाट..

पाऊले चालती पंढरीची वाट..

पाऊले चालती पंढरीची वाट..
X

आजवर जे कधी घडलं नव्हतं, भविष्यात घडणारही नाही, असे असंख्य वैयक्क्तीक आणि सामुहिक अनुभव सध्या आपण सारे अनुभवत आहोत. #लाॅकडाऊन काळात पंढरपूरच्या वाटेवर #वारी आणि #वारकरी दिसत नाहीत... दरवर्षी आकाश कोंदुन टाकणारा टाळ मृदंगाचा नाद, मनात भक्तीभाव गोंदुन जाणारा ग्यानबा-तुकारामांचा गजर कानामनाला जाणवत नाही... पण तरीही हजारो वर्षापासून तनमनात भिनलेले विठ्ठल प्रेम कधी डिजिटल, कधी व्हर्च्युअल तर कधी आत्मिक पातळीवर व्यक्त होत जातं... मग वारी आपल्याला काळवेळाच्या बंधना पल्याड जाते... तर माझ्या सारख्या नवख्या पत्रकारासाठी वारीच्या आठवणींचा ठेवा जीवाला सुखावा देणारा ठरतो... नऊ वर्षापूर्वी सासवडहून सोपानकाकांचा हात धरून केलेल्या पायी पंढरपूर वारीच्या संदर्भात ग्रंथालीच्या रूची मासिकात प्रसिद्ध झालेला लेख आज येथे पुन्हा शेअर करताना आनंद वाटतो... पाऊले चालती पंढरीची वाट...

युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्यदैवत आहे. आषाढी-कार्तिकीची वारी हा मराठीजनांचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि नियंत्रणाशिवाय वारीचा सोहळा साजरा होतो. साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझे जीवीची आवढी। पंढरपूरा नेईन गुढी’ असा निर्धार केला होता. माऊलींनी प्रगट केलेली ती इच्छा आजही चढत्या-वाढत्या उत्साहानं लक्षावधी वारकरी पूर्ण करत असतात. ..‘ज्या देशाचे लोक पंढरपूरच्या वारीला जातात, त्या देशाला महाराष्ट्र म्हणतात’, अशी एक महाराष्ट्राची व्याख्या मानववंशशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांनी केली आहे. त्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या वारीविषयी... लिहिताहेत न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे .

पूर्वी गावात कुठेही सत्यनारायणाची पूजा असो वा कोणताही धार्मिक कार्यक्रम, ‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनिया गाठ’ हे प्रल्हाद शिंदे यांच्या खणखणीत आवाजातील गाणं लाऊडस्पीकरवर लागायचंच. पंढरपूरला आषाढी-कार्तिकीच्या वारीसाठी जाणा-या सर्वसामान्य माणसांची मनोभावना काय असते हे दर्शवणा-या त्या गाण्याचा लहानपणी अर्थ कळत नव्हता; परंतु सरळ साध्या शब्दांची गेयता ओठावर बसली, अगदी कायमची! समज आल्यानंतर त्या गाण्याचा अर्थही समजला. ‘गांजुनिया भारी, दु:ख दारिद्रय़ाने, पडता रिकामे, भाकरीचे ताट.. पाऊले चालती पंढरीची वाट’, गेली अनेक दशकं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणा-या या गीताच्या शेवटच्या कडव्यामध्ये ‘घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट’ ही भाबडी अपेक्षा मनाला चटका लावून जाते..

Max Maharashtra Digital Wari

पंढरीच्या वारीत अशी दु:खं दारिद्रय़ानं गांजलेली, संसारतापानं पोळलेली लक्षावधी जनता, सकाळी तांबडं फुटल्यापासून सूर्य मावळेपर्यंत चालत असते. पण वारीचं वैशिष्ट्य असं की, खेडय़ा-पाडय़ातून केवळ विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारक-यांच्या जगण्यात वेगळंच चैतन्य फुललेलं असतं. एरवी शेती आणि शेतीवर आधारित कामधंद्यात गुंतलेल्या बाया-माणसांना वारीच्या वाटेवर ‘माऊली’चं मानाचं स्थान मिळतं.

वारकरी संप्रदायात चमत्कार, नवससायास याला स्थान नाही; परंतु ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत चालणा-या पाच वर्षाच्या चिमुरड्या मुलीला वा ऐंशीच्या आजोबांना ‘माऊली’ या एकाच नावानं संबोधलं जातं. तसं वागवलं जातं. हा आजही घडणारा, डोळ्यांनी दिसणारा सामान्याला असामान्यत्व देणारा ‘चमत्कार’ फक्त आणि फक्त वारीतच पाहायला मिळतो. अशा या आनंददायी वारीच्या परंपरेनं महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची मुहूर्तमेढ तेराव्या शतकातच रोवली. संन्याशाची पोरं म्हणून बहिष्कृत जीवन अनुभवलेल्या निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताई या चार अलौकिक व्यक्तिमत्त्वांनी सोवळ्याओवळ्यात गुरफटलेल्या मऱ्हाटमोळ्या समाजात जणू ‘आध्यात्मिक लोकशाही’चा पाया घातला! गीतेचा अर्थ मराठीत सांगून ज्ञानेश्वरांनी संस्कृतच्या कचाट्यात सापडलेलं धर्मज्ञान रसाळ आणि सोप्या शब्दांत लोकांपुढे नेलं. एका अर्थानं प्राकृत असलेली म-हाटी मनं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीनं सुसंस्कृत झाली. ज्ञानदेवांनी ज्ञानाची तर नामदेवांनी नामाची साधना अगदी सहजपणे लोकांसमोर ठेवली. त्यात व्रतवैकल्य, कर्मकांड आणि रूढाचाराचं स्तोम नव्हतं. मुख्य म्हणजे भक्तीच्या बळावर चोखा मेळा, सजन कसाई, गोरा कुंभार, नरहरी सोनार, कान्होपात्रा, जनाबाई या तत्कालिन कर्मठ वातावरणात अस्पृश्य आणि हीन समजल्या जाणा-यांनाही संतपद मिळू शकतं, हे वारकरी संप्रदायानं सिद्ध केलं.

अध्यात्म म्हणजे यज्ञ-याग किंवा मोठं तप नाही. नामदेवरायांच्या शब्दांत सांगायचं तर; ‘किर्तन नर्तन वाचे जनार्दन। न पावसी पतन येरझारी’. ज्ञानदेवाच्या मते नामघोषामुळे विश्वाची दु:खं नाहिशी होतात आणि सकळजग ब्रह्मसुखानं दुमदुमून जातं. जनाबाई तर हे सहजसोपं अध्यात्म ‘नाम विठोबाचे घ्यावे। मग पाऊल टाकावे’ इतकं रोजच्या जगण्याशी एकजीव करा, असं सांगतात. एकनाथ महाराजही अधिकारवाणीनं, ‘आवडीने भावे हरिनाम घेसी। तुझी चिंता त्यासी सर्व आहे।’ असं आश्वासन देतात.

दिंडीत चालणार्या वारक-यांच्या जगण्या-वागण्यात जी सहजसुलभता असते, त्यामागे संतांच्या या साऱ्या प्रेरणा अभंगपणे चालत असतात. अगदी पहाटेपासून सुरू होणारी काकड आरतीची आळवणी ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा’ या शब्दांतून गारव्यानं आळसलेल्या आसमंतावर बरसते, तेव्हा दिंडीतील लहान-थोरांची लगबग बघण्यासारखी असते. माऊलींची, तुकोबांची वा सासवडच्या सोपानकाकांची दिंडी रोजच्या मुक्कामावरून मार्गस्थ होण्याचे काही नियम आहेत. त्यात संकेतांना महत्त्व असतं. कुठेही आरडाओरड नाही की धक्काबुक्की नाही. चोपदारांच्या हातातील दंडाच्या इशा-यानुसार लाखो लोकांच्या हालचालींचं नियंत्रण होतं. कुठे विसावा घ्यायचा, कुठे हरिपाठ सुरू करायचा याचे इशारे चोपदार फक्त हातातील दंड उभारून देतात. दिंडीत संतांना मान दिला जातो; पण त्याचा अतिरेक नसतो. ‘वर्ण अभिमान विसरली याती। एकमेकां लोटांगणी जाती’ अशी या चंद्रभागेच्या वाळवंटात खेळ मांडणा-या वैष्णवांची स्थिती असते. तेथे उच्चनीचतेचा भेद नसतो. दंभ-अभिमान नसतो. फक्त एकच ओढ असते, ‘सावळे सुंदर, रुप मनोहर पाहण्याची.’

पंढरीच्या वारीत गेल्याशिवाय वारकऱ्यांची ही लोकविलक्षण भक्ती आणि शक्ती आपल्याला कळत नाही. पंढरपूरच्या वाटेवर दिंडीत दररोज होणा-या भजनांमध्ये संत तुकारामांच्या अभंगांची संख्या जास्त असते. मला तुकोबांचा खरा परिचय याच वाटेवर झाला. मनाला विचार करण्यास प्रवृत्त करणारे हे अभंग मोठे मार्मिक. एका विसाव्याच्या ठिकाणी नव्याने ओळखीच्या झालेल्या कीर्तनकारांना तुकाराम महाराजांच्या अभंगात संदर्भात विचारलं असता ते म्हणाले, ‘तुकोबा हे तुमच्या-आमच्यासारखे प्रापंचिक होते. लग्न, व्यवसाय, आर्थिक चढ-उतार आणि कौटुंबिक आघात या आपल्या सर्वाना कराव्या लागणा-या गोष्टींचा त्यांनी सामना केला होता. त्यामुळे तुकाराम महाराजांचे शब्द हृदयाला भिडतात. शिवाय ते अत्यंत मोठे संत होते. ‘ज्ञानदेवे रचिला पाया.. तुका झालासे कळस’ असे बहिणाबाईंनी म्हटले आहे, ते उगाचच नव्हे.. तर असे हे तुमच्या-आमच्यातील तुकोबा आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पदावर गेल्यावर जे मार्गदर्शन करतात त्यात आचरण्यास सोपा आणि अंतिमत: हिताचा सल्ला असतो. तुकोबांचे मानवी व्यवहार निरीक्षण अचूक आहे. सुंदर प्रपंच आणि उत्कट परमार्थ या दोन्हींचं एकवट दर्शन घ्या. परमार्थात प्रगती करण्यासाठी कोणत्याही अघोरी मार्गाचा अवलंब करायची गरज नाही. कोंबड्या-बक-याचा बळी मागणा-या ग्रामदैवतांच्या मागे लागण्याची आवश्यकता नाही. ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची.. न लगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण’ असा सहज आणि सोपा मार्ग तुकोबा सांगतात. म्हणूनच असेल कदाचित, वारक-यांच्या नित्यपाठात तुकोबांचे अभंग जास्त प्रमाणात असतील.’’

बंधू भेटीच्या वेळी दिंडीत चालताना एक जपानी वारकरी महिला भेटल्या होत्या. त्यांचं नाव युरिको इकेनोया. वयाच्या साठीतही नवं शिकण्याचा अमाप उत्साह. 30 वर्षांहून अधिक काळ त्या दिंडीत चालतात. आधी उत्सुकता आणि त्यानंतर पांडुरंग भेटीची आतुरता, हेच या दिंडीप्रेमामागील खरं कारण आहे, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना सांगितल्या... आणि माझं मन आकाशीच्या सावळ्या विठ्ठलाची अथांग माया डोळ्यात साठवत चालू लागलो... अचानक आभाळ भरून आलं आणि फेनधवल जलबिंदू आनंदाश्रूंमध्ये न्हाऊन निघाले.

अशाच एका पहाटे, डोक्यावर बोचकं घेऊन निघालेले वृद्ध आजोबा दिसले. दिंड्यांचा मुक्काम हलण्याआधी म्हातारबोवांनी आपली थकलेली पावलं उचलली होती. हातातील काठीवर भार टाकत, तोंडानं ‘रामकृष्ण हरी’चा जप करत आजोबा एकटेच वाटचाल करत होते. मी सहज त्यांच्या जवळ जाऊन, ‘जय हरी माऊली’चा आवाज दिला. त्यांच्या थकलेल्या शरीरात दडलेल्या प्रचंड उर्जाशक्तीनं ‘जय हरी.. जय हरीचा’ प्रतिसाद दिला. ‘माऊली, दिंडय़ा अजून निघाल्या नाहीत, तुम्ही एकटे कुठे निघाले?’ हातातील काठी उभारून आजोबा थांबले. म्हणाले, ‘काय माऊली, म्हाता-याची गंमत करता काय, मी एकला कुठं हाव? ही पहा माझी ज्ञानेश्वर माऊली काठी बनून मला पंढरपूरला घेऊन निघाली आहे. माऊलीचा हात धरलेला असेल तर दुस-या कोणाची गरज कशाला?’ आजोबांच्या त्या उत्तरानं आम्ही सारेच गप्प झालो. आजोबा बोलू लागले, ‘‘तुम्ही मुंबईहून आलेले दिसता. फार बरे झाले, माऊली, वारी केली पाहिजे. मी पण तुमच्याएवढा होतो, तेव्हापासून दरवर्षी वारीला येतो. रोज सकाळी उठलो की, ‘पंढरीचा वारकरी। वारी चुको न द्यावी हरी’ अशी देवाला विनवणी करतो. माझी विठाई माऊली फार प्रेमळ. बघा ना, माझे वय 80 च्यावर गेले तरी मला ती सोडायला तयार नाही. आता एकच इच्छा उरलीय. त्या पंढरीच्या वाटेवर नाय तर पांडुरंगाच्या दारात मरण यावं, बस एवढंच मागणं आहे, माझ्या विठूरायाकडं.. चला माऊली, तांबडं फुटलंय. आमची पायगाडी जुनी झालीय, तुम्ही लोक जवान आहात. धावत पंढरीला जाऊ शकता, आमची खटारा गाडी हळूहळूच चालणार.. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी.’’

एकेक पाय सावकाश उचलत, सबंध शरीराचा भार काठीवर टाकत ऐंशीच्या घरातील आजोबा चालू लागले.. ओठांवर ‘रामकृष्ण हरी’चा जप आणि डोळ्यांमध्ये पांडुरंगाचे रूप साठवत त्यांचे थकलेले शरीर उत्साहानं पंढरीच्या वाटेनं निघालं होतं...

त्याच दिवशी संध्याकाळी, ‘तुम्ही पंढरपूरला धावत जाऊ शकता’ या आजोबांच्या वाक्याचा प्रत्यय आला. पंढरी टप्प्यात आली असं लक्षात आल्यानंतर देहूकर तुकोबा खांद्यावरील पताका उंचावून पंढरीच्या वाटेनं धावत सुटायचे.. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवर, कर कटावरी ठेवूनिया’ या एकाच ओढीनं त्यांचं देहभान हरपत असे - ‘तुका म्हणे धावा, आता पंढरी विसावा’. त्याची आठवण म्हणून वेळापूरजवळ समस्त वारकरी दिंडीच्या त्या टप्प्यावर एक किलोमीटरची वाट धावून पूर्ण करतात. त्याला ‘धावा’ म्हटलं जातं. ती जागा जवळ येताच पहिल्या दिंडीचे चोपदार हातातील चांदीचा दंड उंच उभारून इशारा देतात आणि लक्षावधी वारक-यांचा जनसागर अचानक भरती आल्यानंतर सागराच्या लाटा जशा किनाऱ्याकडे धावतात, त्या गतीनं पंढरीच्या दिशेनं झेपावू लागतो. हातात वीणा घेतलेले वीणेकरी, डोईवर तुळशीवंृदावन, हंडे, कळशा घेतलेल्या आया-बाया, वजनी मृदंग-पखवाज खांद्यावर असलेले मृदंगमणी, टाळकरी, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले, झेंडेवाले, भिन्न वयोगटातील अबालवृद्ध ‘माऊली, माऊली’ म्हणत पंढरपुरात बसलेल्या विठू माऊलीच्या दिशेनं धावतात. कुणी पायात पाय अडकून पडतात, पुन्हा ‘माऊली’चा जयघोष करत धावू लागतात. दीडेकशे किलोमीटर चालून पाय थकलेले असतात; पण पंढरपूर जवळ आलं, ही बातमी तन-मनात जोष फुलवते. कारण पंढरीच्या ओढीनं प्रत्येक वारक-याच्या डोळ्यासमोर विठाई, कृष्णाई, कान्हाई नाचत असते.

विठ्ठल आणि वारकरी यांच्यातील नातं माय-लेकरासारखं आहे. बाहेरून दुडूदुडू धावत येणा-या बालकांना भेटण्यासाठी, हृदयाशी धरण्यासाठी आई आपले दोन्ही हात उभारून घराच्या उंबऱ्याशी उभी असते. आपल्या लाडक्या लेकराचे गुणदोष किंवा लहान-मोठेपण अशा भेदाच्या गोष्टी तिच्या मनात नसतात. एखादा मंत्री असो वा सामान्य शेतकरी, तिच्या लेखी सारेच समान. त्यामुळे आपली ही लेकरं कधी पंढरपुरात येतात आणि आपण त्यांना कधी उराशी कवटाळतो, असं विठ्ठलाला देखील वाटत असतं.

थोडक्यात काय तर, वारक-यांना जेवढी पांडुरंगाला भेटण्याची आस लागलेली असते, तेवढीच किंवा काकणभर जास्त ओढ विठ्ठलाला भक्तांच्या भेटीची असते, असं संत सांगतात. नामदेव महाराजांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख। पाहताही भूक तहान गेली’. म्हणजे मूर्तीमंत सुखालाही, साकार सुखालाही ज्याच्या श्रीमुखाकडे पाहून सुख वाटेल, असं विठ्ठलाचं सावळं, गोजिरं रूप पाहिल्यावर आपली तहान-भूक हरपणारच! मग अशी विठाई माऊली प्रत्यक्ष भेटल्यावर जिवाला दुसरं समाधान, दुस-या वासना उरणंच शक्य नाही, असं नामदेवराय सांगतात.

ज्ञानोबा तर ‘हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी,’ असा प्रेमळ सल्ला देतात. आणि तुकोबा तर त्याहून पुढे जाऊन म्हणतात, ‘गाऊ नाचू प्रेमे आनंदे कीर्तनी। भुक्ति मुक्ती दोन्ही न मागो तुज’ अशी ही देव आणि भक्तांमधील अनुपमेय, अवर्णनीय आणि निरपेक्ष एकरूपता आपल्याला वारीच्या वाटेवर पदोपदी पाहायला मिळते.

दिंडी ज्या मार्गानं जाणार असते, त्या गावातील सरपंच वा स्थानिक नेते गावाच्या वेशीवर पालखीचं स्वागत करण्यासाठी उभे असतात. दिंडीप्रमुख आणि माऊलींच्या अश्वाचं मोठय़ा कौतुकानं स्वागत होतं. पालखीपुढे लोटांगणं घातली जातात. आणि गावात शिरावं तर सकाळ, दुपार असो वा संध्याकाळ, हातात खाण्याच्या वस्तू घेऊन दुतर्फा लोक उभे.. कुणी चहा, कुणी सरबत पिण्याचा आग्रह करतोय. कुणी हातात बिस्किटचे पुढे घेऊन, ‘माऊली एक तरी पुडा घ्या ना’ असा आग्रह धरत आहे, असं दृश्य बघायला मिळतं. गोपीचंदनाची उटी कपाळावर लावलेले बाळगोपाळ तर लडिवाळपणे त्यांच्याजवळील केळी वा चॉकलेट घेण्याचा हट्टच धरतात. त्यावेळी ज्ञानोबा-तुकोबांनी मऱ्हाटी समाजात रुजवलेली ‘जे जे दिसे भूत। ते ते मानिजे भगवंत’ ही सर्वाच्या ठायी परमेश्वर बघण्याची भावना डोळ्यांसमोर साकार होते.

ग्रामीण भागातील लोकांनी या जुन्या परंपरा आणि विचारांची ठेव नव्या पिढीकडे देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याचा प्रत्यय वारीत सातत्यानं येतो. अशाच एका सकाळी ज्या दिवशी सोळा कि.मी.चा टप्पा पार करायचा होता, आम्ही सहा-आठजण आवडवाटेनं चालत दिंडीच्या पुढे निघालो होतो. सकाळीच चहा-पोहय़ाचा दोनदा आग्रह झाल्यानं काही खाण्याची इच्छा नव्हती. ऊन तापण्यापूर्वी किमान अर्धा टप्पा गाठावा, या "शहरी" विचारानं पावलं वेगात पडत होती. एका निर्मनुष्य रस्त्यावर शाळेचा पोषाख घातलेली पाच-सहा वर्षाची चिमुरडी उभी होती. सगळ्यात पुढे असलेल्या जयसिंगबाबू जगतापांना त्या मुलीनं थांबवलं. घरापासून 10-12 दिवस दूर असलेल्या बाबांना आपल्या नातीची आठवण झाली असावी. उत्साही आवाजात ते आम्हाला म्हणाले, ‘अरे ही दीदी बघा काय सांगतेय, घरी जेवायला चला.’

आमच्या गटानं एकमुखाने नकार दिला; पण बाबांना त्या मुलीचा आग्रह मोडवला नाही आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही जाण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही ‘येतो’, म्हणताच ती पोरगी वारा प्यालेल्या वासरागत वस्तीकडे पळाली. ‘आये, माऊल्या आल्या गं’, अशी आसमंत घुमवणारी हाळी तिच्या नाजूक ओठातून निघाली आणि आमची पाऊले शेतातील काळ्याजर्द पाऊलवाटेवरून वस्तीकडे निघाली...

माझ्या, आमच्या सगळ्यांच्या अनवाणी पायांना काळ्या आईनं अबीरबुक्क्यानं रंगवून टाकलं होतं तोवर गाई-गुरांचा प्रशस्त गोठा, मोठी पाण्याची टाकी आणि पुढे-मागे पसरलेलं घर समोर आलं होतं, या चिमण्यापोरीच्या आवाजानं सावध झालं होतं. खिल्लारी जोडी घेऊन निघालेल्या किसनरावांनी हात-पाय धुवायला पाणी दिलं. दुसरा भाऊ मोटारसायकलवर दुधाची भलीमोठी किटली अडकवत होता, तर स्वयंपाकघरात जेवणाची लगबग चालली होती. नुकताच नास्ता झाल्यानं पोट भरलं होतं. त्यामुळे ‘चहा दिला तरी चालेल’, अशी सासवडकर आप्पा बुद्धिवंतांनी सूचना केली. ‘माऊली थोडा दम धरा, दहा मिंटात जेवन करते’, असा आतून आवाज आला. आम्ही सारे गप्प. तेवढ्यात गोकुळासारख्या त्या घरातील 4-5 बालगोपाळ पुढे आले. त्यांच्याशी गप्पा मारतांना 15-20 मिनिटं कशी गेली कळलीच नाही. पुन्हा एक पोक्त आवाज कानी पडला, ‘माऊली, हात धुवून घ्या, जेवण तयार आहे.’ आम्हाला बैठकीच्या खोलीत नेण्यात आलं. आमच्यापाठोपाठ गरमागरम ज्वारीच्या भाकरी, आमटी, ठेचा आणि दह्या-दुधाच्या वाट्या असलेली ताटं आली. त्या सुग्रास जेवणाच्या वासानंच, अर्ध्या तासापूर्वी भूक नाही म्हणणारे आम्ही सारे जण जेवणावर तुटून पडलो. पाचच मिनिटात चुलीवर भाजलेल्या भाकरीची चवड घेऊन आजीबाई आल्या आणि चक्क आमच्या पंगतीमध्ये बसल्या. त्यांच्या डोळ्यांत आम्हा अनोळखी लोकांबद्दल अपार माया दिसत होती. ‘सावकाश खा माऊली’ या आग्रहातून प्रेम निथळत होतं. ‘सकाळधरून वाट बघत होते बघा तुमची, त्या पोरीला कवापास्नं तुमच्या वाटेवर उभी केली होती. म्हनलं एका तरी माऊलीला घरी जेवाया घेऊन ये. मंग शाळंला जा. शाळा काय रोजचीच, माऊली काय वर्षातून एकदा येणार..’ आजीबाई बोलत होत्या.

मी विचारलं, ‘माऊली, तुम्ही वारी केलीय कधी?’ तशा आजी गंभीर झाल्या. ‘‘या सगळ्या परपंचातून कुठं वेळ मिळाला? आता घर-दार सगळं ठीक, तर तब्बेत बिघडते. म्हणून पोरं म्हनतात, म्हातारे एकटी वारीला जाऊ नको. आता आपण त्यांच्या हातात हाओत. मग पोरांचं मन दुखवून कसं चालेल? म्हणून माऊलीला साकडं घातलं, मला सोबत नेत न्याय, तर घरी जेवायला तर ये.. तुम्ही घरी आलात, मला पांडुरंग भेटला.’’ असं बोलून आजीबाई भक्तीभावानं हात जोडती झाली.. आणि संस्कृत गीतेचा अर्थ सोप्या भाषेत उकलून दाखवणारी ज्ञानेश्वरी, जनगंगेच्या ओठांवर तरंगलेली तुकोबांची गाथा आणि देश-धर्म-भाषेच्या भिंती ओलांडून पसरलेली नामदेवांची अभंगवाणी मला त्या भाबडय़ा आजीबाईच्या सश्रद्ध मनात मूर्तीमंत अवतरलेली दिसली...

त्या अलौकिक साक्षात्कारानं गाव-खेडय़ात वसलेल्या माझ्या मऱ्हाटी मुलखाची थोरवी कळली. वारीत असे जगावेगळे अनुभव दररोज येत असतात. लक्षावधी लोकांचा त्यांना हवा तसा प्रतिपाळ करणारा पांडुरंग ‘मागे-पुढे उभा राहे सांभाळीसी। आलिया आघात निवाराया’ असं सांगत सोबत करत असतो. त्यामुळे दिंडीमध्ये आपल्याला ख-या अर्थानं विश्वरूप दर्शन घडतं.

वारीमध्ये सर्व प्रकारचे लोक असतात. जगात जसे सज्जन आणि दुर्जन भरलेले आहेत, तद्वत वारीतही असणारच; पण वारीतील वारकरी त्यांच्याकडेही ‘माऊली’ म्हणूनच पाहातात. एकदा एका शहराच्या वेशीजवळ एक दारू प्यालेला माणूस दिंडीत घुसून ‘ग्यानबा-तुकाराम’च्या ठेक्यावर नाचायला लागला. दारू प्यायल्यामुळे त्याचा तोल जात होता. तेवढय़ात एका वयस्कर गृहस्थानं त्याला हाताला धरून पुढे झेंडेवाल्यांच्या रांगेकडे नेलं आणि मोठय़ा प्रेमानं सांगितलं, ‘माऊली, तुम्ही इथून भजन करा.’ त्या दारूडय़ाच्या कानी ‘माऊली’ शब्द पडताच त्याची चर्या बदलून गेलेली दिसली.

एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आणि सोपानकाकांच्या पालख्यांची भेट होते. त्याला ‘बंधूभेट’ म्हणतात. त्या जागी दोन्ही पालख्या एकत्र येण्यानं प्रचंड गर्दी होते. त्या गर्दीच्या वेळी एक पोलिस इन्स्पेक्टर मोटरसायकलवरून गर्दीचं नियंत्रण करताना दिसला. वारकऱ्यांना उद्धटपणे शिव्या घालणाऱ्या त्या इन्स्पेक्टरनं एका ठिकाणी चक्क आपली मोटरसायकल रांगेत चाललेल्या दिंडीत घुसवली. त्याला दिंडी त्या जागी रोखायची होती. तेवढ्यात एक धिप्पाड तरुण वारकरी तिरासारखा पुढे सरसावला. त्यानं त्या मोटारसायकलचं स्टेअरिंग असं काही वळवलं की काही लक्षात येण्याआधी ती मोटारसायकल दिंडीच्या बाहेर पडली. एव्हाना दोन-चार तरुण वारकरी बाहय़ा सरसावत धावले होते. पहिल्या तरुणानं धाव घेऊन इन्स्पेक्टरचं मनगट पकडले आणि सांगितलं, ‘माऊली, दिंडीत भेटलात म्हणून वाचलात, परत अशी आगळीक करू नका. भारी पडंल.’ नको त्या ठिकाणी पोलिसी खाक्या दाखवायला निघालेल्या इन्स्पेक्टरचा चेहरा पडला. दिंडी आपल्या गतीनं वाट चालत होती..

तेराव्या शतकापासून ज्ञानोबांनी दिंडीचं पुनरुज्जीवन केलं, तेव्हापासून परकीय आक्रमण असो वा नैसर्गिक आपत्ती, वारकऱ्यांच्या दिंडय़ा टाळ-मृदुंगांच्या घोषात आषाढी-कार्तिकीला पंढरीच्या मार्गावर चालू लागतात. एकादशीला भूवैकुंठ पंढरपूर वैष्णवांच्या मेळ्यानं गजबजून जातं. अवघ्या आकाशात भगव्या पताका फडकताना दिसतात आणि आसमंतात घुमत असतो विठोबा-रखुमाईचा जयजयकार..

फक्त महाराष्ट-गोवाच नव्हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. अनेक परदेशी अभ्यासक या भक्तीच्या शक्तीचा अभ्यास करण्यासाठी आलेले असतात. त्यांना पांडुरंग भेटतो. ‘अनंतरूपे, अनंतवेषे देखिले म्या त्यासी, बाप रखमा देवी वरू खूण सांगितली ऐसी’ असा त्यांनाही प्रत्यय येतो. युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला हा विठोबा म्हणजे निर्गुण-निराकारानं घेतलेला साकार भाव. भक्तांच्या भावासाठी, भक्तीसाठी रुक्मिणीला सोडून पंढरपुरात आलेला विठोबा आणि त्याला भेटायला, वारीसाठी ‘सुखी संसाराची सोडुनिया गाठ’ चालत निघालेला खेड्यापाड्यातील, गरीब-श्रीमंत वारकरी हे महाराष्ट्राचं ‘अद्वैत’ आहे.

मराठी मन आणि महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, तर वारीला चला. अर्धशतकापासून वारी करणा-या एका कीर्तनकारांनी मला सांगितलं होतं की, जे लोक वारी करतात, ते वर्षभर आजारी पडत नाहीत. कारण वर्षभर पुरेल एवढा मनाला आणि शरीराला व्यायाम होतो.. सासवडचे अशोकबापू जगताप एका वारीला थेट आयसीयूमधून आलेले मी ‘याचि डोळा’ पाहिलेले आहेत... शरीराला हरवून मनात उत्साह जागवणारा त्यांचा निर्धार मन कधीच विसरू शकणार नाही. कारण वारी म्हणजे जीवन आनंदानं जगण्याचा मोक्षमार्ग, भक्ती चा अखंड उत्सव.. तो उत्सव अजूनही संपूर्ण महाराष्ट्राला कळलेला नाही, कारण ‘ज्ञानबा-तुकाराम’चं कुणी ‘ब्रॅण्डिंग ’ केलेलं नाही. खरं सांगायचं तर तसं करायची गरजही नाही. त्यासाठी पंढरीच्या वारीला चला, चाला आणि ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ म्हणजे काय ते साक्षात अनुभवा...

-महेश म्हात्रे

संपादक, न्यूज 18 लोकमत

Updated : 21 Jun 2020 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top