Home > मॅक्स ब्लॉग्ज > शिवसेनेत नेमके काय बिघडले आहे?

शिवसेनेत नेमके काय बिघडले आहे?

शिवसेना पक्षात बंडाळी झाली आहे. महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेमके कुठे चुकले? शिवसेनेत काय बिघडले आहे? शिवसेनेचा भुतकाळ वर्तमान आणि भविष्य काळाच्या दृष्टीने विनय काटे यांनी केलेले मार्मिक विश्लेषण...

शिवसेनेत नेमके काय बिघडले आहे?
X

1) अनुपलब्धता -

उद्धव ठाकरे हे लोकप्रिय आणि संयमी नेते असले तरी प्रकृतीकारणास्तव त्यांचे लोकांपासून दूर राहणे हे त्यांच्या राजकारणाचा कमजोर दुवा बनले. अधिकारी किंवा कार्यकर्ते सोडा, अगदी त्यांच्या मंत्रिमंडळात असणारे मंत्रीसुद्धा खासगीत हे सांगतात की मुख्यमंत्री भेटतच नाहीत लवकर. राजकारणात नेत्यांची सर्वांसाठी असणारी उपलब्धता हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जो उद्धव ठाकरेंनी दुर्लक्षित केला.

2) किचन कॅबिनेट -

एकनाथ शिंदे असोत किंवा इतर वरिष्ठ शिवसेना नेते असोत, त्यांना योग्य मान देणे अपेक्षित असते. आदित्य ठाकरे हे एक चांगले उदयोन्मुख नेते आणि मंत्री असले तरी सार्वजनिक कार्यक्रमात फक्त उद्धवजी, त्यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांनीच स्टेजवर बसून बाकी मोठ्या नेत्यांनी खाली बसणे हे पक्षात अस्तित्वात असलेले "किचन कॅबिनेट" दाखवते. शिवसेनेसारख्या चळवळीतून जन्मलेल्या आणि मोकळ्याढाकळ्या पक्षाला हा प्रकार झेपणारा नाहीये.

3) मिलिंद नार्वेकर -

मिलिंद नार्वेकर यांना दिलेले अतिरिक्त महत्त्व शिवसेनेत एक चिंतेची गोष्ट आहे. नार्वेकर हे नक्कीच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत, पण किमान मंत्रीमंडळातील आणि विधीमंडळातील सहकाऱ्यांना प्रत्येक वेळी नार्वेकरांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना संपर्क करायला लागणे हे त्रासदायक आहे. राणेंनी उघडपणे नार्वेकरांचे नाव घेत सेना सोडली होती, त्यातून काही धडा घेणे अपेक्षित होते.

4) संजय राऊत -

खासदार संजय राऊत हे हाडाचे शिवसैनिक आणि चांगले रणनीतीकार असले तरीही त्यांच्या अलीकडच्या काळातील मीडियातील अतीवावराने नवनवीन दुखणी पक्षाने वाढवून ठेवली आहेत. महाविकास आघाडी बनवण्यात संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका पार पाडली हे सत्य असले तरी नंतरच्या काळात त्यांच्या आणि शरद पवारांच्या अतीजवळीकीने सामान्य शिवसैनिकांमध्ये राऊत शिवसेनेला पवारांच्या दावणीला बांधत आहेत असा एक गैरसमज पसरलेला आहे, ज्याला भाजपने भरपूर खतपाणी घालून बंडाळी घडवून आणली.

5) उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्विकारणे -

बाळ ठाकरेंनी कधीही कुठलेही मंत्रिपद किंवा आमदारकी/खासदारकी न घेता सत्तेचा रिमोट कंट्रोल हातात ठेवला. त्यामुळे पक्षीय राजकारणातून कुणी कितीही नुकसान करायचे ठरवले तरी बाळ ठाकरेंना वैयक्तिकरित्या नुकसान करणे किंवा नामोहरम करणे अशक्य होते. उद्धव ठाकरेंनी जिथे मुख्यमंत्रीपद स्विकारले तिथेच त्यांनी रिमोट कंट्रोल सोडला, स्वतःची कवच कुंडले काढून ठेवली आणि ते स्वतः अशा आखाड्यात उतरले जिथे त्यांच्यात आणि त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांमध्ये गुणात्मक फरक राहिला नाही. लोकशाहीत सगळे आमदार एकाच मूल्याचे असतात, म्हणून मग फडणवीस असो की एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे सगळ्यांच्या टप्प्यात आले.

6) हिंदुत्व -

बाबरी पाडली त्या काळाप्रमाणेच सध्याच्या काळातही हिंदुत्व हा भाजपने सर्वाधिकार मिळवलेला राजकीय मुद्दा आहे. शिवसेनेकडे हिंदुत्वाचे छोटे दुकान असेल तर भाजपकडे हिंदुत्वाचा मोठा मॉल आहे. हिंदुत्व हे शिवसेनेचा मूळ मुद्दा नव्हते, ते बाळ ठाकरेंनी 1987-88 च्या आसपास भाजपच्या नादी लागून स्विकारले होते. "आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही" हे सांगून उद्धव ठाकरेंनी विनाकारण स्वतःच्या सैनिकांना भाजपकडे ढकलले आहे. हे होणे स्वाभाविक आहे कारण जर हिंदुत्व हा शिवसेनेचा प्राण असेल तर मग शिवसेना भाजपला विरोध करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हा प्रश्न सामान्य शिवसैनिकास पडणे क्रमप्राप्त आहे.

7) मराठी माणूस -

मराठी माणूस हा शिवसेनेचा सर्वात खंदा समर्थक आहे आणि शिवसेनेच्या स्थापनेचे मूळ कारणसुद्धा आहे. आदित्य ठाकरेंनी "केम छो वरली" चे होर्डिंग्ज लावून शिवसेनेच्या मुळावरच पहिला घाव घातला. मुंबईत गुजराथी किंवा इतर भाषिक मतदार वाढत आहेत हे सत्य असले तरी ते लोक सेनेपेक्षा भाजपला जास्त मतदान करतात हा इतिहास आहे. मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्व धरल्याने शिवसेनेने अप्रत्यक्षपणे भाजपचे वैचारिक मांडलिकत्व पत्करले. युतीत सेना जी आधी मोठा भाऊ होती, ती ह्या एका कारणाने छोटा भाऊ झाली.

शिवसेना हा संघर्षाने बनलेला पक्ष आहे, तेव्हा ED ला घाबरून किंवा सत्तेची गाजरे दाखवून झालेल्या कुठल्याही बंडाळीने सेना अस्तंगत होणार नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अत्यंत सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत आणि ते सेनेला नक्कीच यातून बाहेर काढतील. पण, सेनेने स्वतःच्या पक्षात आणि संघटनेत बिघडत चाललेल्या उपरोक्त गोष्टी सुधारून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. भाजपाई हिंदुत्व विसर्जित करून मराठी माणूस ह्या आपल्या core competency कडे परत जाण्याची ही सेनेला कदाचित शेवटची संधी आहे!

Updated : 23 Jun 2022 2:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top