Home > मॅक्स ब्लॉग्ज > तर छत्रपतींच्या महाराष्ट्राची माती होईल : तुषार गायकवाड

तर छत्रपतींच्या महाराष्ट्राची माती होईल : तुषार गायकवाड

काय झाडी..काय डोंगूर..काय हाटील डायलॉग फेमस झाला असला महाराष्ट्राच्या राजकारणात सगळं काही ओक्के नाही.. त्या उतरत्या राजकारणाचा वेध घेतला आहे लेखक तुषार गायकवाड यांनी..

तर छत्रपतींच्या महाराष्ट्राची माती होईल : तुषार गायकवाड
X

एबीपी माझा टिआरपी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या शहाजी पाटील यांची माझा कट्ट्यावर जाहीर चेष्टा केली गेलीये. सध्याच्या राजकारणात निष्ठा सोडून व्हायरलला महत्त्व आहे. आमदार शहाजी पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या एनएसयुआय पासून झाली. एनएसयुआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास केला आहे. खुमासदार गावरान वक्तृत्वशैली हि त्यांची जमेची बाजू.

सांगोला विधानसभा मतदारसंघ दिवंगत आमदार गणपतराव देशमुख आबा यांच्यामुळे राज्यात सुप्रसिद्ध राहिला. सन १९६२ ते सन १९९५ गणपतराव देशमुख आबा या मतदारसंघातून सलग निवडणूक जिंकले. १९९५ मध्ये गणपतराव आबांचा शहाजी पाटील यांनी केवळ १९२ मतांनी पराभव केला. यावेळेस कोणी मदत केली ते सांगोल्यातील मतदार सांगतील.

१९९९, २००४,२००९ असे तीन पराभव शहाजी पाटील यांनी स्विकारले. काँग्रेस मधून राजकीय सुरुवात केलेल्या शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण तिकीट न मिळाल्यामुळे १९९९ अपक्ष लढले, पराभूत झाले. पुढे परत घरवापसी करत काँग्रेसमध्ये प्रवेश करुन २००४ विधानसभा काँग्रेस मधून लढले आणि आपटले. सन २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि तेव्हाही पराभव झाला. सन २०१९ मध्ये गणपतराव देशमुख यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली आणि नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली.

२०१९ च्या अटीतटीच्या लढतीत केवळ ६७४ मतांनी शहाजी पाटील परत एकदा आमदार झाले. यावेळेसही कोणी मदत केली ते सांगोल्यातील मतदार सांगतील. याचे विश्लेषण लोकसत्ताच्या दृष्टी आणि दृष्टीकोन कार्यक्रमात भाजपा आमदार व संभाव्य प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा. असो, विषय पक्षनिष्ठेचा निघाला म्हणून जुनी आठवण परत एकदा सांगतो. २००२ साली शेकाप आघाडी सरकारमध्ये सामील होता. गणपतराव देशमुख आबा मंत्री होते. रायगड झेडपी निवडणुकीवरुन शेकापचा सत्तेतुन बाहेर पडायचा निर्णय झाला.

आबांना राजीनामा द्यायला एक दिवस उशीर झाला. पक्षात त्यावरुन गोंधळ झाला. मग पक्षाने त्यांना पाचारण केले. डॉ. एन. डी. पाटील चिडले, ते जाहीरपणे म्हणाले 'आमच्या मंत्र्याना राजीनामा द्या, असे बहुतेक पोस्ट कार्ड पाठवून सांगावे लागतेय.' नंतर त्या बैठकीत आबांनी पक्षाच्या नेतृत्वापुढे दिलगिरी व्यक्त केली. गणपतराव देशमुख हे डॉ. एन. डी. पाटील यांच्यापेक्षा वयाने मोठे. पण ते एन. डी. पाटील सरांचा अधिकार मान्य करायचे.

अनेकांनी पाती बदलल्या आणि जातीपण. आबानी दोन्ही सोडल्या नाहीत. वाजपेयींच्या पंढरपुरच्या सभेला ते उपस्थित राहिले, त्याचाही खुलासा त्यांनी व्यवस्थित केला. राज्यात हर एक तालुक्यात सहकार महर्षी आहेत. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी गणपतराव देशमुख यांच्या सुतगिरणीत वर्षभर कारकुन म्हणून काम करावे. मग सहकाराचे नाव घ्यावे. गणपतराव आबा म्हणजे राजकारणातील, समाजकारणातील ना. धों. महानोर यांच्यानंतरचा किंवा बरोबरीचा असा हा मोठा माणूस. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करत विधानसभेत जाणारा आमदार आज हयात नाही.

एकेकाळी आबांच्या पक्षनिष्ठा आणि पक्षसंस्कृतीमुळे, साधी राहणी व उच्च विचारसरणी यामुळे राज्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांत नाव कोरलेला मतदारसंघ आज फुकट ऐशोआराम मिळाला म्हणून हाॅटेलिंग राजकारणात पुरता बदनाम झालाय. मतदाराची चूक नाही राजेहो, तुम्ही पक्षनेतृत्व म्हणून जे काही पेरलंय, ते गेल्या आठ वर्षांत जोमाने उगवलंय. आता पोसवलंय. अजून वेळ गेलेली नाही. लवकर काढणी करा. नाहीतर हे पिकून गळालेले बीज परत रुजले तर छत्रपतींच्या महाराष्ट्राची माती झाल्याशिवाय राहणार नाही.


Updated : 7 July 2022 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top