Home > मॅक्स ब्लॉग्ज > सरकार चालवायला आयडियॉलॉजी लागत नाही - संजय राऊत

सरकार चालवायला आयडियॉलॉजी लागत नाही - संजय राऊत

सरकार चालवायला आयडियॉलॉजी लागत नाही - संजय राऊत
X

मुंबई आयडियॉलॉजी कसली असते? सरकार चालवायला आयडियॉलॉजी लागत नाही, किमान समान कार्यक्रम लागतो. अशी स्पष्ट भूमिका घेताना शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारच; हे सरकार पूर्ण 5 वर्षे चालवतील. त्यांच्यासारखा अनुभवी माणूस सरकार मध्ये असणो ही सरकारची गरज आहे, त्यांनी मधल्या काळात जे काही केले तसा प्रसंग माझ्यावर आला असता तर मी देखील तसेच वागलो असतो असे सांगून त्यांनी अजित पवार यांची भक्कमपणो बाजूही घेतली.

नागपूरात ते दोन दिवसासाठी आले होते. या काळात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली. येत्या 29 डिसेंबर रोजी शरद पवार यांची संजय राऊत पुण्यात प्रकट मुलाखत घेणार आहेत. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून त्या दोघांनी बुधवारी तासभर चर्चा केली. नंतर लोकमतला मुलाखत देताना खा. राऊत म्हणाले, तुम्ही अजित पवार यांच्याविषयी विचारले म्हणून सांगतो, माझा सगळ्यात जास्त विश्वास अजित पवार यांच्यावर आहे आणि अजित पवारच हे सरकार पाच वर्षे व्यवस्थीत चालवतील. त्यांनी चूक केली की काय केले यात मला पडायचे नाही, राजकारणात अशा घटना घडत असतात. आपण विसरुन जायचे असते. राऊत यांच्याशी झालेली बातचित अशी -

प्रश्न : नेहरु सेंटरमध्ये जे काही घडले, शरद पवार यांनी जी नाराजी दाखवली त्यामुळे अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असे वाटत नाही का?

- राजकारणात एखादा प्रसंग असा घडतो की प्रमुख नेता अस्वस्थ होतो व भावनेच्या भरात निर्णय घेऊन टाकतो. अजित पवार यांच्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. जे त्यांना ओळखतात, ज्यांना त्यांचा स्वभाव माहिती आहे त्यांना या गोष्टीचे कधीच आश्चर्य वाटणार नाही. अजित पवार यांच्या जागी जर मी असतो तर कदाचित मीही तसाच वागलो असतो. म्हणून मला वाटते की जे झाले ते विसरुन आम्ही पुढे गेले पाहिजे. अजित पवार यांच्या सारखा अनुभवी माणूस सरकार मध्ये असणो ही सरकारची गरज आहे. त्यांनी देखील त्यांचा पक्ष वाढवण्यात शरद पवार यांच्या सोबत मोलाचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला ही तसे वाटणो स्वाभाविक आहे. अजित पवार हे अत्यंत उत्तम आणि धाडसी नेते आहेत.

प्रश्न : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात आयडियॉलॉजी समान नाही, तेव्हा हे सरकार कसे चालणार?

- आयडियॉलॉजीवर राज्य चालत नाही. त्यासाठी किमान समान कार्यक्रम असावा लागतो. अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक न्याय, महिलांच्या जगण्याचा स्तर उंचावणो हेच महत्वाचे कार्यक्रम असतात. तुम्ही सोमालिया, हैती किंवा रशियात अथवा अमेरिकेत जा. हेच पहायला मिळेल तुम्हाला. याच्या पलिकडे लोकांना काय हवे? आयडियॉलॉजीने पोट भरत नाही, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्यावेळी आयडियॉलॉजी सांगितली पण भाषा मात्र शेवटी त्यांनीही पोटाचीची केली ना.. आमचे मराठी तरुण उपाशी राहू नयेत, त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून त्यांनी त्यावेळी वडापाव विकायला सांगितलाच ना.. आपल्याकडे नोकरी नसेल तर वडापाव विका पण काम करा, हेच बाळासाहेबांनी सांगितले. त्यामुळे आयडियॉलॉजीचा विषय येतच नाही. जीवनावश्यक गोष्टींवरच राज्य चालले पाहिजे, कोणाचेही, कोणत्याही पक्षाचे असले तरी..

प्रश्न : शरद पवार या सगळ्या नाटय़ात शेवटर्पयत सोबत राहतील असे वाटले होते का?

- शरद पवार विश्वासाने सोबत राहतील का? अशी शंका का यावी. त्यांचा मागचा इतिहास पारदर्शक आहे. त्यांनी धोक्याचे राजकारण केले असे एक तरी उदाहरण दाखवा. त्यांचे राजकारण नेहमी विकासाच्या मुद्यांवरच राहीले आहे. तुम्ही पुलोदच्या काळात वसंतदादांचे सरकार शरद पवार यांनी पाडले असे सतत सांगत असता, पण याआधी आणि नंतर कधी सरकारे पडली नाहीत का? किंबहुना भाजपने महाराष्ट्रात आमच्यासोबत जेवढं विश्वासघाताचे राजकारण केले तेवढे कोणीच केलेले नाही. पुलोदनंतरच्या काळात एकही घटना त्यांनी असे काही केल्याची नाही.

प्रश्न : राहूल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी विधान केले. अशी विधाने पुढे होत राहीली तर त्यातून तुम्हा तीन पक्षात वाद होतील. त्यातून सरकार किती काळ टिकेल?

- हे सरकार पूर्ण पाचवर्षे काम करेल. राहूल गांधी यांचे विधान त्यांच्यापाशी. आम्ही त्यांना योग्य भाषेत समज दिली, तो आमचा अधिकार आहे. आमचे म्हणणो आम्ही मांडले. त्याला आयडियॉलॉजी म्हणतात. ती आयडियॉलॉजी सरकारच्या आड आली नाही. ते बोलले पण आम्ही त्यांचा गैरसमज दूर केला. यापुढे राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांची जबाबदारी आहे की राहूल गांधी यांना भेटून त्यांच्या मनात असे काही विषय असतील तर त्यांचे गैरसमज त्यांनी दूर केले पाहिजेत.

प्रश्न : असेच वाद काँग्रेसकडून होत राहीले तर काँग्रेसचा 30 ते 35 आमदारांचा गट वेगळा होईल आणि तुमच्यासोबत सरकारमध्ये राहील असे सांगितले जाते हे खरे आहे का?

- राज्यातील काँग्रेस तुटणार नाही. सत्तेत सहभागी तीनही पक्ष तुटणार नाहीत. भाजपचे मी सांगू शकत नाही. एक टक्का जरी शक्यता असती तर फडणवीस यांनी सरकार बनवले असते. त्यांनी पक्ष ब्रेक करण्याचे प्रयत्न केले पण ते स्वत:च ब्रेक झाले. त्यांचा ब्रेकफेल झाला. त्यामुळे आमच्यापैकी कोणालाही फोडून भाजप सरकार बनवू शकणार नाही. शिवाय अमर्याद सत्ता असताना आपण राज्यात काहीही करु शकलो नाहीत ही खंत त्यांना आयुष्यभर टोचत राहील. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री यापुढे होणार नाही.

प्रश्न : खाते वाटपात नगरविकास, गृह आणि महसूल ही खाती तीन्ही पक्षात असतील असे ठरले होते पण आज नगरविकास आणि गृह शिवसेनेकडे आहे.

- नागपूर अधिवेशनापुरती ही केलेली व्यवस्था आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर खाते वाटपात पुन्हा काही बदल होतील. त्यावेळी चित्र स्पष्ट होईल. आमच्यात कोणताही वाद नाही, खातेवाटपाबद्दल आमची चर्चा पूर्ण झाली आहे. विस्तार करावा लागेलच.

प्रश्न : उध्दव ठाकरे यांनी मोठे खाते स्वत:कडे ठेवले नाही हे चांगले की त्यांना जबाबदारी घ्यायची नाही?

- काही असले तरी राज्याची जबाबदारी शेवटी मुख्यमंत्र्यांचीच असते. त्यांनी खाते घेतले नाही तरी खात्याची जबाबदारी त्यांचीच असेल. शेवटी सत्तेचे विक्रेंद्रीकरण करावेच लागते. तरच राज्याचा कारभार चांगला चालतो. मी करेन ती पूर्वदिशा असे कधीच होत नसते. मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर अनेक खात्याची ओझी घेऊन फिरु लागले तर ते राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. आमच्याकडे अत्यंत अनुभवी मंत्री आहेत. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भूजबळ, एकनाथ शिंदे असे सगळेच अनुभवी नेते आहेत.

आमचा शोले पूर्ण पाचवर्षे चालेल.! आम्ही तीनही पक्ष एकमेकांशी संवाद साधून होतो. संपर्कात होतो. त्यामुळे मी रोज सकाळी एक भूमिका मांडत होतो. त्यावर सगळे पुढे जात होते. हे ठरवून केले. मी त्या काळात रंगभूमीवरचा एक साधा कलावंत होतो. मला त्या काळात उध्दव ठाकरे यांनी जी भूमिका दिली ती मी नीट वठवण्याचा प्रयत्न केला. त्यातून आमचा शो हाऊसफुल झाला आणि पुढे हा शो पाच वर्षे हाऊसफुल चालेल. ‘शोले’ चा विक्रम देखील आमचा हा शो मोडेल हे मी आत्मविश्वासाने सांगतो.

Updated : 19 Dec 2019 4:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top