Home > मॅक्स ब्लॉग्ज > एक मे महाराष्ट्र दिन

एक मे महाराष्ट्र दिन

मध्ययुगीन काळापासून ते आजपर्यंतच्या काळात महाराष्ट्राने साधलेली प्रगती आणि त्यातील चढउतार यांचा लेखक आनंद शितोळे यांनी घेतलेला आढावा...

एक मे महाराष्ट्र दिन
X

मध्ययुगीन काळात जेव्हा दिल्ली दरबारात जाऊन सोयरिकी करून आपले महाल, राजवाडे वाचवण्याची स्पर्धा लागलेली होती तेव्हा दिल्लीचा विजयरथ रोखायला महाराष्ट्र उभा राहिला.आधी शहाजीराजे आणि नंतर शिवाजीराजे यांनी स्वराज्य उभ केल आणि प्रेरणा अशी निर्माण केली कि खुद्द आलमगीर बादशहा महाराष्ट्रात आला आणि इथच मातीला मिळाला.

भागवतधर्म आणि भक्तिमार्गाची सुरुवात वेगवेगळ्या संतानी करून विठ्ठलभक्तीचा जागर इथूनच सुरु केला आणि त्याच नात नामदेवांनी थेट पंजाबशी जोडलं.

नंतरच्या काळात सामाजिक सुधारणाचा प्रयोग बंगाल आणि महाराष्ट्र इथूनच सुरु झाला. ज्योतिबा फुलेंनी मुलींची भारतातली पहिली शाळा महाराष्ट्रात सुरु केली. राजर्षी शाहुनी शंभर वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याचा कायदा केला आणि शिक्षणावर खर्चाची तरतूद एवढी केली जेवढी संपूर्ण मुंबई इलाख्याची सुद्धा नव्हती.

सगळ्यात मोठ काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं, हजारो वर्षे शोषणाचे बळी ठरलेल्या लोकांना आत्मसन्मान नेमका काय असोत हे सांगण्याच, शिक्षण हीच संपत्ती निर्माण करण्याची आधुनिक जगातली किल्ली आहे हे त्यांनी सांगितली. अर्थशास्त्र, सामाजिक सुधारणा, शिक्षण, कायदा अस कुठलही क्षेत्र नाही जिथ बाबासाहेबांनी ठोस काम केलेलं नाही.

कुटुंबनियोजन, विधवाविवाह यासारख्या बाबींमध्ये कर्वे पितापुत्रांनी केलेलं काम देशाला दिशादर्शक ठरणार होत. लोकसहभागातून शिक्षणाची सुरुवात करण्याच वेगळच मॉडेल रयतच्या माध्यमातून भाऊराव पाटलांनी दाखवून दिलेलं. अनेक हुतात्म्यांचे बळी गेल्यावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

यशवंतराव चव्हाणांनी सुरु केलेली शिक्षण शुल्क सवलत योजना देशभरात वेगवेगळ्या राज्यांनी सुरु केली. १९७२ साली वि.स.पागे यांनी सुरु केलेली रोजगार हमी योजना नंतर मनरेगा म्हणून केंद्रीय पातळीवर आली.रोजगार हमी मधून तत्कालीन दुष्काळात अनेक रचनात्मक कामांची उभारणी झाली. प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्याधिकारी असताना हागणदारीमुक्त गावाची संकल्पना मांडून प्रत्यक्षात आणली जी पुढे गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान झाली आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर स्विकारली गेली.

महिलांना ३३ टक्के आरक्षणाची तरतूद करणार पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. सामाजिक, औद्योगिक आघाडीवर कायमच आघाडीवर असलेल राज्य असलेला महाराष्ट्र आज नेमका कुठे आहे ? तुकाराम , ज्योतीराव आणि सावित्रीमाई , प्रबोधनकार , राजर्षी शाहू , गाडगेबाबा , तुकडोजीमहाराज अशी परंपरा असणारा महाराष्ट्र आता कुठ हरवला आहे ? कट्टरता का वाढीला लागलेली आहे ? सलोख्याची परंपरा लुप्त व्हायला लागलेली आहे ? उत्तरेच भाषिक, सांस्कृतिक आक्रमण महाराष्ट्रावर व्हायला लागलेलं आहे ? हिंदी भाषिकांच भाषा, संस्कृती आपल्यावर लादण्याचा प्रयत्न होतोय ? कधीकाळी हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री आता हिमालय सह्याद्रीची कोंडी करू पाहतोय ? हे भाषिक, सांस्कृतिक, राजकीय आक्रमण झुगारून देऊन पुन्हा इतिहासाला आठवून धडा घालून देण्याची आणि धडा देण्याची वेळ आलेली आहे ?

दिल्लीकर बादशहाच्या विरोधात जशी दक्षिणेतल्या सगळ्या राज्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजांनी केला तशीच पुन्हा दक्षिणेकडील राज्यांची मोट बांधून तीच नेतृत्व महाराष्ट्राने करण्याची वेळ आलेली आहे ?

विचार करा आणि व्यक्त व्हा. ठामपणे उभ राहायला.

Updated : 1 May 2022 4:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top