Home > मॅक्स ब्लॉग्ज > मधू दंडवते, १२ नोव्हेंबर २००५ आणि शरीरदानाचं विज्ञान !

मधू दंडवते, १२ नोव्हेंबर २००५ आणि शरीरदानाचं विज्ञान !

मुळचे अहमदनगरचे परंतू राजापूर या कोकणातील मतदारसंघात पाचवेळा खासदार झालेले २१ जानेवारी १९२४ रोजी प्रा. मधू दंडवते यांचा जन्म झाला. ‘साधी राहणी, उच्च विचारसणी’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रा. मधू दंडवते. कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न प्रत्यक्षात आणलेला ‘आधुनिक युगातील महात्मा’ अंतिम क्षणी जेजे महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे यांनी अनुभवलेलेले प्रा. दंडवते जयंतीच्या निमित्ताने खास मॅक्स महाराष्ट्रसाठी....

मधू दंडवते, १२ नोव्हेंबर २००५ आणि शरीरदानाचं विज्ञान !
X

मी ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि जेजे हॉस्पिटल,मुंबई मधील माझ्या mbbs च्या पहिल्या वर्ष्याला होतो.दिवाळीच्या सुट्ट्यात सगळे विद्यार्थी घरी घरी असले तरी मी आणि आणखी एक दोन विद्यार्थी एक्सट्रा क्लास साठी थांबलेलो. जेजे हॉस्पिटलच्या आवारात शरीर रचना शास्त्र (अनाटॉमी) विभागाचं भलं मोठं म्युझीअम आहे.रिकाम्या वेळात तिथं रेंगाळत राहणं माझं आवडतं काम. १२ नोव्हेंबरला असचं रेंगाळतांना कळलं की एक बॉडी(!) आली. शरीररचना शास्त्र विभागात प्रथम वर्ष्याच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी डेड बॉडी असते.बॉडी आली हे कळताच मी एमबाल्बिंगची प्रोसेस पहायची म्हणून बाहेर आलो. बाहेर आल्यावर कळलं की बॉडी अजून अँबुलन्स मध्ये आहे. सोबत नातेवाईक असावेत. त्यांनी बॉडला दंडवत केला आणि बॉडी विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. बॉडी घेण्यासाठी खुद्द विभागाचे विभाग प्रमुख आणि ईतर वरिष्ठ डॉक्टर्स आलेले.

त्यामुळे माझ्या मनात कुतूहल की कोण्या VIP ची बॉडी आहे.विचारपूस केल्यावर कळलं की ही माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते यांची बॉडी. बॉडी हँडओव्हरची प्रोसेस सुरू होती. मी जेवायला कॅन्टीनला गेलो.त्यावेळेस माझ्या कडे मोबाईल नव्हता.कॅन्टीन मध्ये जेवता जेवता आवर्जून पेपर चाळला आणि मधू दंडवते यांच्या बद्दल वाचलं. मधू दंडवते हे भारताचे माजी रेल्वे आणि माजी अर्थमंत्री.पण माझ्या साठी विशेष आकर्षणाची बाब म्हणजे ते फिजिक्सचे विद्यार्थी. माझी नुकतीच १२वी झालेली,त्यात माझे वडील फिजिक्सचे प्राध्यापक, आणि ओघानेच फिजिक्स माझा आवडता विषय.


मधू दंडवते हे सिद्धार्थ कॉलेजला फिजिक्सचे विभाग प्रमुख राहिलेले. उगाच एक अक्युट नातं जुळलं त्यांच्या सोबत. त्यांच्या विषयीचे पेपर मधले सर्व लेख वाचून मी अनाटॉमीला वापस आलो. एवढ्या मोठ्या माणसाने कुठलिही पूजापाठ न करता, अंतिमसंस्कार न करता, मोठी अंतयात्रा न काढता शेवटच्या इच्छे प्रमाणे शरीर दान करणे म्हणजे नक्कीच अभिमानास्पद गोष्ट. ए्मबाल्बिंगची प्रक्रिया करण्यासाठी त्यांची बॉडी स्ट्रेचरवर ठेवलेली होती. मी माझा कोणी सख्खा नातेवाईक असावा अश्यारीतीने तिथे थांबलेलो. फिजिक्सशी असलेलं नातं तसं करतं कदाचित.ए्मबाल्बिंगच्या प्रोसेस मध्ये एका मोठ्या आकाराच्या सुईने रक्तवाहिनी मध्ये फॉर्मालिन नावाचा द्रव सोडला जातो, बॉडी प्रिझर्व करण्यासाठी.

मी उगाच त्या 'डेड बॉडीला' कमी त्रास त्रास व्हावा म्हणून सुईटोचणाऱ्या कर्मचाऱ्याला "दादा जरा व्यवस्तीत करा हा" म्हणून सांगत होतो.तिथे उपस्थित कर्मचारी आणि डॉक्टर्सची नजर माझ्या कडे उपहासाने नवखा म्हणून बघणारी होती. तरीही मी ती प्रोसेस बघत थांबलो ते बॉडी व्यवस्थित शिफ्ट करे पर्यंत.फिजीक्स विषयाचा एक माणूस आपल्यातून कमी झाला याचं दुःख माझ्या चेहऱ्यावर दिवसभर होतं आणि त्यांनी शरीर दान केलं याचा अभिमानही.


८१ वर्षाच्या प्रगल्भ आयुष्यात या माणसाने केलेली कामे आपण जर आज विकिपीडियावर वाचली तरी कळेल की विज्ञाननिष्ठ माणसं राजकारणात किती गरजेची आहेत. रेल्वेच्या सेकंडक्लासच्या डब्यातल्या बर्थलाही कम्फर्टेबल कुशन्स असावेत हे भौतिकशास्त्राच्या माणसालाच नेमकं कळू शकतं.कुशन्सची डेंसिटी आणि शरीराला मिळणारा आराम यातला संबंध भौतिकशास्त्र तुम्हाला नक्कीच लक्षात आणून देतं.

बुद्धाचं तत्वज्ञान आपल्याला जन्म ते मृत्यू आणि त्या मधलं आयुष्य यावर लक्ष केंद्रित करायला सांगतं.आधीचा जन्म,मृत्यू नंतरच जग हे थोतांड असून जगत असलेल्या आयुष्याला सुखकर आणि इतरांच्या उपयोगी कसं पाडता येईल हे सांगतं. पण मृत्यू नंतरही काही काळ का होईना आपण अवयवदान किंवा शरीर दान करून इतरांच्या उपयोगात येऊ शकतो, माणसं घडवू शकतो हे फक्त विज्ञानाशी एकनिष्ठ असलेल्या माणसालाच कळतं.

आज मधू दंडवते यांची जयंती. त्यांना आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारांना त्रिवार अभिवादन.

- डॉ.रेवत कानिंदे, मुंबई

Updated : 21 Jan 2021 10:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top