Home > मॅक्स ब्लॉग्ज > थोडीशी लाज बाळगा

थोडीशी लाज बाळगा

वीज महाग झाली म्हणून तुम्ही तिचा वापर सांभाळून करता, पेट्रोल, गॅसबाबतही आपण असंच करतो. टोमॅटोचा दर वाढला म्हणून काही काळ टोमॅटोचा मर्यादित वापर करा किंवा टाळा,असं कोणी म्हटलं तर तुम्हाला मिरची का लागते ? टोमॅटोच्या भाववाढीवर आकांडतांडव करणाऱ्यांना अंतर्मुख करायला लावणारा महारुद्र मंगनाळे यांचा हा लेख नक्की वाचा…

थोडीशी लाज बाळगा
X

खरं तर सोशलमिडियावरचे अर्धवट शहाणे विद्वान बघून शेतीबद्दल इथं लिहायची इच्छा हळूहळू संपुष्टात येतेय. ते चांगलंच आहे.

गेल्या १५दिवसातील टोमॅटोवर चाललेला गदारोळ बघून,आज अगदीच असह्य झालं म्हणून एक पोष्ट टाकली.पोष्ट साधी आहे... टोमॅटो परवडत नसतील तर खाऊ नका,बोंबलता कशाला? अतिशय योग्य मुद्दा आहे हा.गेल्या नऊ वर्षांत किती वस्तुंचे भाव,किती वाढले त्याची यादी करा.पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस ही महत्त्वाची उदाहरणे आहेत.या तिन्ही बाबी जीवनावश्यक आहेत.यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही.या तिन्हींची एवढी मोठी दरवाढ झाली, याविरूध्द तुम्ही किती आरडाओरडा केला.एकदा तरी रस्त्यावर उतरलात का? याचा सरकारला जाब विचारलात का? जीएसटी च्या माध्यमातून केंद्र सरकार प्रचंड पिळवणूक करतेय,त्याविरूध्द कधी आंदोलन केलयं का? कोणत्या टी.व्ही.चॅनलने याविरूध्द मोहीम उघडली? याची उत्तरं नकारार्थी येतील.

पण वर्षभरात कधीतरी एकदा कांद्याचे भाव वाढतात,तेव्हा प्रचंड आरडाओरडा होता.टी.व्ही.वाले घरोघर बायकांच्या मुलाखती घेत फिरतात.कांदा भाववाढ हा राष्ट्रीय प्रश्न बनतो आणि देशभक्त सरकार पाकिस्तान मधून कांदा आयात करून देशातील कांद्याचे भाव पाडते. आठवा हे कितीवेळा झालयं. किती वर्षांपासून होतंय. हाच कांदा कवडीमोल दराने विकला जातो,रस्त्यावर फेकावा लागतो तेव्हा किती ग्राहक असं म्हणतात कि, सरकारने हा कांदा खरेदी केला पाहिजे.

तेलाबाबतही नेहमी असंच होतं. तेलाच्या किमती वाढल्या की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाववाढीची बोंब होते आणि राष्ट्रभक्त सरकार जगभरातून चढ्या किमतीने तेल आयात करते आणि भारतातील तेलबियांचे भाव पाडते.शेतकऱ्यांच्या पदरी पडू पाहणारे चार पैसे या हरामखोर मध्यमवर्ग आणि सरकारमुळे हिरावून घेतले जातात.शहरी विद्वानांनो याचा कधी तरी तुम्ही निषेध केला आहे काय? अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की, केवळ मध्यमवर्गीय मतदारांच्या या आरडाओरडीला घाबरून सरकार शेतकऱ्यांचा बळी देतं...हा विषय फार मोठा आहे. तो लांबवत नाही.मुळ टोमॅटोच्या मुद्यावर येतो.

गेल्या सहा महिन्यांतील टोमॅटोची काय स्थिती होती? आजची ही दरवाढ होण्यापूर्वी टोमॅटो रस्त्यावर फेकले जात होते. ५०पैसे किलोने विकले जात होते,हे तुम्हाला आठवतंय का? तेव्हा सरकारने हे टोमॅटो किफायतशीर भावात विकत घ्यावेत, किमान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असं तुम्हाला वाटलं का? कितीतरी टोमॅटो उत्पादक टोमॅटोच्या या जुगारात बरबाद झालेत, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर कशाला टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने खडे फोडताय?

दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा.बाजारात किरकोळ विक्री मध्ये टोमॅटो ला १५०,१७०रु. किलो भाव मिळत असला तरी, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना किती भाव मिळतोय ? ४०रूपये किलो अपवादात्मक ५०रूपये किलो. हा दर शेतकऱ्यांसाठी वाजवी असाच आहे.बाजार शेतकऱ्यांच्या ताब्यात नाही.बाजारवर शेतकऱ्यांचं कसलंच नियंत्रण नाही. त्यामुळे किरकोळ विक्रीचे दर काय असावेत,हे शेतकरी ठरवू शकत नाही. टोमॅटो तिप्पट दराने विकले जात असले तरी,तो फायदा शेतकऱ्यांकडं येत नाही.

तुम्हाला टोमॅटो कायम स्वस्तात मिळावे वाटत असतील तर,ते कसं शक्य आहे? टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालं.त्यामुळं उत्पादन मर्यादित झालं.मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला म्हणून भाव वाढले.एवढी साधी बाब कशी काय लक्षात येत नाही.

टोमॅटोचे दर परवडत नसतील तर खाऊ नका,असं कोणी म्हणत असेल तर, तुम्हाला का राग येतो.वीजेचे दर वाढले,ती महाग झाली, म्हणून तिचा वापर सांभाळून करता. पेट्रोल,गॅसबाबतही असंच करता.मग काही काळ टोमॅटो चा मर्यादित वापर करा किंवा टाळा,असं म्हटलं तर, तुम्हाला मिरची का लागते ? 'गरीब की जोरू,सबकी भाभी' असंच आहे ना हे !

ज्या सोशल मिडियावर तुमची नसलेली अक्कल पाजाळता,त्या डाटाचे दर बघत बघत किती वाढले.त्याबद्दल कधी तक्रार केलीत? कधी अंबानींच्या नावाने बोटं मोडलीत. तसं नाही करणार तुम्ही.डरपोक आहात तुम्ही.तुमची सरकारच्या एकाधिकारशाही विरूद्ध, हडेलहप्पी धोरणांविरूध्द बोलायची हिंमत नाही... तुम्हाला दिसतो तो फक्त शेतकरी आणि शेतमाल.भाववाढ सगळी चालते फक्त शेतीमालाची नको!

मी तुम्हाला फार चांगलं ओळखून आहे. मला हे माहित आहे, इतक्या सहजासहजी शेतीचं महत्त्व तुम्हा बांडगुळांच्या लक्षात येणार नाही.ज्या दिवशी अन्नधान्यासाठी जगासमोर भीक मागण्याची पाळी सरकारवर येईल,तुम्ही धान्यासाठी रेशनच्या लाईनला उभे राहाल,तेव्हांच तुमचे डोळे उघडतील.तुमचा हलकटपणा आणि नीचपणा ओळखून आहे मी!

मी त्या दिवसाची वाट बघतोय.

Updated : 15 July 2023 5:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top