Home > मॅक्स ब्लॉग्ज > शरद पोंक्षे, तुमची पिल्ल पायलट करा अन आमची तुरूंगात पाठवा..

शरद पोंक्षे, तुमची पिल्ल पायलट करा अन आमची तुरूंगात पाठवा..

नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यापासून शरद पोंक्षे सतत वादग्रस्त राहिलेले आहेत आहेत. ते त्यांच्या भूमिकेचे जाहीर समर्थन करताना दिसतात. अलीकडेच त्यांनी आपली मुलगी पायलट होण्यासाठी रवाना होत असल्याचे फोटोसह एक पोष्ट केली होती. यावर वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी त्यांना सुनावलेले सडेतोड खडे बोल वाचा या लेखात...

शरद पोंक्षे, तुमची पिल्ल पायलट करा अन आमची तुरूंगात पाठवा..
X

गत आठवड्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल माध्यमात एक पोस्ट करत "माझ पिल्लू पायलट व्हायला निघालय !" असे म्हंटले होते. या पोस्टवर सोशल माध्यमात ब-याच उलट-सुलट प्रतिक्रीया आल्या. बहूतेकांनी पोक्षेंना झोडपून काढले. शरद पोक्षेंनी जेव्हा नथूराम गोडसेची भूमिका केली तेव्हापासून ते महाराष्ट्रभर नथूरामच्या हरामखोरीचे उदात्तीकरण करत फिरत आहेत. लोकांच्या डोक्यात नथूरामी विष आणि विकृती पेरण्याचा प्रयत्न करतायत. युवकांना धर्माची अफू पाजत हिंडत आहेत. धर्माची अत्यंत विखारी व कट्टर भाषा ते बोलत आहेत. महात्मा गांधींना खलनायक म्हणून लोकांच्यासमोर पेश करत आहेत. धर्मांध, जातीयवादी असलेल्या विकृत नथूरामी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करताना गांधींच्यावर ते घसरत आहेत. पण याच शरद पोंक्षेंचा दुटप्पीपणा त्याच्या परवाच्या पोस्टमधून समोर आला. शरद पोंक्षे यांची स्वत:ची मुलगी ते पायलट व्हायला पाठवत आहेत. ते त्या मुलीला धर्मासाठी आहूती द्यायला सांगत नाहीत, नथूराम सारखी दुस-या कुणाच्या छातीत गोळी मारायला सांगत नाहीत. धर्म वाचला पाहिजे, धर्म वाढला पाहिजे, धर्माच्या शत्रूंना मारले पाहिजे असे तिला अजिबात सांगत नाहीत. तिने अभ्यास करावा, तिने पायलट व्हावे आणि स्वत:चे जीवन सुखनैव जगावे अशीच त्यांची इच्छा आहे. त्यांची मुलगी पायलट व्हायला निघालीय यांचे त्यांना कौतुक आणि आनंद आहे. नेमकी हिच खरी गोम आहे.

हिंदूत्वाचे नाव घेत ब्राम्हण्यवाद रेटणा-या तमाम लोकांची हिच मानसिकता आहे. त्यांना हिंदूत्वाचे नाव घेत सत्ता, संपत्ती मिळवायची आहे. लोकांना लोकांच्यात झुंजवायचे आहे. त्यांच्यात झुंजी लावून त्यांच्यावर राज्य करायचे आहे. पण हे करत असताना आपली बायका-मुलं, आपलं घर-दार सुरक्षित रहायला हवं. आपली मुलं चांगली शिकली पाहिजेत, चांगल्या हुद्द्यावर पोहोचली पाहिजेत. त्यांच्यावर केस पडायला नकोत, ते तुरूंगात जायला नकोत, त्यांची डोकी फुटायला नकोत, त्यांचे मुडदे पडायला नकोत हाच त्यांचा उद्देश आहे. पण दुस-या बाजूने हिंदूत्वाची ढाल करत बहूजन समाजाला वेडं करायचं, त्याच्या डोक्यात धर्माची आग पेरायची. त्याला मुसलमान तुमचा व या देशाचा शत्रू आहे असे सांगायचे आणि आपल्या पोळ्या भाजायच्या हे कारस्थान जोरदार सुरू आहे. शरद पोंक्षेचाच विचार केला तर आमची पिल्लं पायलट झाली पाहिजेत आणि तुमची तुरूंगात गेली पाहिजेत अशी ही विकृत आणि हिन प्रवृत्ती आहे.


हिदूंत्वाचा पुरस्कार करणारे जेवढे म्हणून नेते आणि चेहरे आहेत त्यांच्या घरातील कुणीही यासाठी तुरूंगात जात नाही. एखादा अपवाद वगळता सगळ्यांची लेकरं अलिशान जीवन जगत आहेत. ते कधीच धर्माच्या व जातीच्या लढाईत, दंगलीत नसतात. स्वत:च्या बायका-मुलांना सुरक्षित ठेवून, त्यांना सुखनैव जीननाचा मार्ग दाखवून समाजात आगी लावायचे उद्योग करतात. लोकांना जाती-धर्माच्या नावाने आप-आपलात झुंजवायचे, त्यांच्यात विष पेरायचे काम करतात. धर्माच्या व जातीच्या नावाने तुम्ही मरा, तुमची घरं जळू द्या, तुमची पोरं तुरूंगात जावू द्या. आम्ही फक्त हाकाट्या पिटू आणि तुमच्यावर राज्य करू असे त्यांचे मनसुबे आहेत. महाराष्ट्रातील व देशातील या लोकांचा विचार केला आणि त्यांची मुले काय करतात ? याचा अभ्यास केला तर या सगळ्याचे उत्तर मिळून जाईल. जे भाजपवाले हिंदूत्वाचा जयघोष करतात त्या भाजप नेत्यांची मुलं असतात का धर्माच्या लढाईत ? धर्माच्या दंगलीत असतात का ? शेंडी वाढवून, दंगली करत फिरतात का ? अमित शहा यांचा मुलगा देशाच्या क्रिकेट बोर्डावर आहे. त्याने कधी हातात बॅट धरली की नाही माहित नाही तरीही तो देशाच्या क्रिकेट बोर्डाचा पदाधिकारी आहे. बुडणारा धर्म वाचवायचे सोडून क्रिकेट खेळणे महत्वाचे आहे काय ? शहा यांचा चिरंजीव क्रिकेटच्या बोर्डाऐवजी धार्मिक संघटणा बांधून रस्त्यावर का उतरत नाही ?


अशीच स्थिती बहूतेक नेत्यांच्या मुलांची आहे. ते सगळे उच्चपदस्थ, नेते, अधिकारी, वकील, डॉक्टर किंवा उद्योगपती आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत दरेकर, किरिट सोमय्या यांची मुले काय करतात ? याचा शोध बहूजन समाजातील युवकांनी घ्यावा. फडणवीसांच्या मुलांना धर्माच्या संरक्षणासाठी तयार केले जात नाही. त्यांच्या पत्नीला धर्माच्या प्रसारासाठी दिक्षा दिली जात नाही. या नेत्यांची बायका-मुलं धर्मासाठी मरत असतील, दंगली करत असतील, तुरूंगात जात असतील तर बहूजन समाजातील युवकांनी खुषाल तो उद्योग करावा. या नेत्यांची मुलं हे उद्योग करत नसतील तर बहूजन समाजातील युवकांनीही अभ्यास करावा, उद्योग-धंदे उभे करावेत आणि हा देश सक्षम करावा. अजून किती काळ, किती पिढ्या हा येडेपणा चालणार, किती पिढ्या या लोकांच्या थापांना बळी पडणार ? स्वत:च्या धडावरची डोकी कधी चालवायची की नाहीत ? मेंढरासारखे या धुर्त व बदमाषांच्या मागे किती काळ पळायचे ? हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मात असे बदमाष आहेत. ते दोन्ही बाजूला झुंजी लावतात. लोकांची डोकी भडकावतात. लोकांनी या बदमाषांचा कावा ओळखायला हवा.

शरद पोंक्षे जर पुन्हा लोकांना नथूरामची हरामखोरी सांगायला आले की त्यांची कॉलर पकडून त्यांना जाब विचारायला हवा. बाबा रे, तु तुझी मुलं पायलट व्हायला पाठवतो आणि आमची पोरं तुरूंगात जावीत अशी व्यवस्था का करतो ? तुला जर धर्मावर इतके प्रेम आहे तर तुझ्या पोरीला पायलट करण्यापेक्षा धर्मवीर का करत नाहीस ? तिला धर्मासाठी बलिदान देणारी विरांगणा करून धर्म वाचवण्यासाठी का तयार करत नाहीस ? नथूरामी हरामखोरीचे उदात्तीकरण करतोस तर तुझ्या लेकीच्या हातात पिस्तोल देवून मुस्लिमांच्या छातीत मोकळं करायला का सांगत नाहीस ? परवा राज ठाकरेंनी हनूमान चालिसेचा पुकार केल्यावर त्यांचे जाहिर कौतुक करणारा व गोडवे गाणारा तु तुझ्या स्वत:च्या लेकीला भोंगे वाजवायला का पाठवत नाहीस ? असे पोक्षेंना विचारायला हवे. शरद पोंक्षेंना नथूराम इतका प्रिय आहे तर तोंडाला लाली पावडर लावून नट होण्यापेक्षा धर्माच्या रक्षणासाठी काश्मिरमध्ये जावून अतिरेक्यांशी का लढत नाहीस ? असा सवाल शरद पोंक्षेंना विचारायला हवा.


शरद पोंक्षेसोबत जे जे भामटे धर्माचे राजकारण करतात त्यांना त्यांना हे प्रश्न विचारायला हवेत. धर्म माणसाची गरज आहे. तो त्याच्या आत्मिक प्रवासाचा मार्ग असेल, जगण्याचा आधार असेल इथपर्यंत ठिक आहे पण धर्मच जेव्हा माणसाच्या व मानवतेच्या मुळावर उठू पाहतो तेव्हा तो धर्म नव्हे तर अधर्माचा बाजार आहे हे लक्षात घ्यायला हवे. दोन्ही धर्मातल्या धर्मांधांच्या बखोटीला धरून त्यांचे मुस्काट फोडायला हवे. ही अशी कट्टर आणि आंधळी माणसं धर्माचे नंबर एकचे शत्रू आहेतच पण मानवतेचे शत्रू असतात. तुमची पिल्लं हा देश उभारणीच्या कामाला यावीत की तो बरबाद करण्यासाठी कामाला यावीत ? याचा विचार करा. जर तुमची पिल्ल शरद पोंक्षे सारख्या धुर्त बदमाषांच्या नादी लागत असतील तर ती देश बरबाद करण्याच्या मार्गावर जात आहेत याचे भान ठेवा. हा देश उभा राहिला पाहिजे, सुजलाम, सुफलाम झाला पाहिजे, बलदंड व बलशाली झाला पाहिजे पण त्यासाठी सर्वांनी, सगळ्या जाती धर्मांनी हातात हात घालून काम करायला हवे. देश उभारणीसाठी आपले काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करायला हवे तरच हा देश महासत्ता होवू शकतो.

Updated : 3 Aug 2022 3:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top