Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्वातंत्र्य दिवस वगैरे

स्वातंत्र्य दिवस वगैरे

एकीकडे स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही समाजात दिसत असलेली दरी यावर भाष्य केलं आहे लक्ष्मी यादव यांनी....

स्वातंत्र्य दिवस वगैरे
X

तीन पुरुष पुण्यात शिवशाही बसमध्ये चढले. अतिशय मळके कपडे (तिरंग्याच्या रंगाचे अजिबात नव्हते कपडे. आज १५ ऑगस्ट आहे माहिती असावे त्यांना, '' स्वातंत्र्य दिवस" आहे हे कदाचित माहिती नसावे.) सोबतचा भाचा बोलला की यांना तिकीट माहित नसावे. मी म्हणाले माहिती असतं की, तिकीट जास्त आहे, एसी गाडी आहे. देतात लोक. कधीकधी घाईत जायचं असतं. ते तिघेही पुढील सगळे सीट रिकामे असताना मागे येऊन बसले. एका ठिक्यात एक पांघरायची रग दिसत होती वर. एकाने ते ठिकं आपल्या पायात कोंबलं. खरं तर मागे जागा होती ठेवायला. तरी त्यांनी आपल्या पायाखाली ठेऊन अवघडून बसले.

मला आठवले गेल्या प्रवासावेळी असंच एक गरीब कुटुंब होतं, कदाचित पालावर राहणारं. सोबत चार मुलं, तीन चार मोठे; एसटीत पुढे जागा असूनही सगळ्यात शेवटच्या बाकावर बसले. मला वाटले कदाचित सामान ठेवायला जागा हवी म्हणून बसले असावेत.

आज लक्षात आलं हे त्यांनी स्वीकारलेलं social exclusion आहे. स्वतःहुन समाजापासून दूर, सगळ्यात शेवटचं स्थान घेणं. अनाहुत भीती आणि गाठीशी चेंगरलेपणाचे अनुभव. घरकामगार ताई कधीही स्वतःहून खुर्चीवर बसणार नाही. स्वाभिमान परावडायला तरी पाहिजे. त्याची किंमत मोजण्याची ताकद तरी हवी. नुकताच Maammannan नावाचा तमिळ सिनेमा पाहिला. त्यातील खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील वडील आधी राजकीय कार्यकर्ता असतात. मग ते आमदार होतात तरी खुर्चीवर बसत नसतात. उभं राहूनच चहा पितात. त्यातील उच्च जातीय खलनायक त्यांच्या मुलाला म्हणतो, " तुझ्या वडिलांना कुणीही सांगितलं तरी ते बसणार नाहीत." मुलगा विचारतो, "तू कधी त्यांना खुर्चीवर बसायला सांगितलं का?" अशीच परिस्थिती आहे असं वाटलं. यांचे हक्क कधीकधी द्यावेही लागतील.

थोड्या वेळात तिकीट काढण्यासाठी कंडक्टर आले. ते इतरांना तिकिटाचे पैसे सांगत होते. यातील एकजण चुळबुळ करू लागला. त्याने कंडक्टरला तिघांचे पैसे किती विचारले. कंडक्टरने सांगताच यांची बसच्या खाली उतरायची तयारी सुरू झाली. त्यातील एकाने कुणालातरी फोन लावून कंडक्टरकडे दिला. कंडक्टरने त्याला फोन पे गुगल पे घेत नसल्याचे सांगितले. तिकीट झाले होते ४३५ रूपयांचे, त्यांच्याकडे पैसे होते २५० रू. रात्रीची वेळ. मी कंडक्टरला पैसे दिले आणि त्यांना तिकीट द्यायला सांगितले. सुट्टे पाच रू. सापडत नव्हते. कंडक्टर काका "सुट्टे नसतील तर राहू दे" म्हणाले. माणसं विरघळतात. सापडले सुट्टे. कंडक्टर काकांनी त्यांना मला ऑनलाईन पैसे देण्यासाठी फोन करण्यास सांगितले. मी नको म्हणाले. विचार केला गेल्यावर ते पैसे त्यांना मिळतील.

हे सगळे बिगारी कामगार. वाशीमवरून बारामती जवळील गावात निघालेले. शेट सांगेल ते काम करायला.

त्यांच्याकडे पाहून असंही वाटून गेलं की, यांच्यासारखेच असू शकतात शेवटच्या सीटवरसुद्धा पैसे देऊन बसू न शकणारे. जे दंगलीत रस्त्यावर येऊन अस्मितेचा दगड उचलतात आणि जन्मभराचे गुन्हेगार बनतात. मात्र द्वेषपूर्ण मेसेज तयार करणारे आणि फॉरवर्ड करणारे गाडीच्या पुढच्या सीटवर पैसे देऊन बसले आहेत आणि हे अभावाचे जगणे जगत आहेत.

त्यातील एकाने हात जोडून आभार मानले. "तुमच्या मेहेरबानीने चाललो आहे," दुसरा म्हणाला. दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहवत नव्हते. असहायतेतून आलेली कृतज्ञता वेदनादायी असते. "कधीकधी नसतात आपल्याकडे पैसे, "मी. मनातल्या मनात म्हणाले, "पैसे नसण्याच्या अवस्थेतून लवकर बाहेर या आणि पुढच्या वेळी पुढच्या सीटवर बसा."

मी समजू शकत होते त्यांना. पैसे देऊ शकत नाही म्हणून खाली उतरण्याची तयारी करत असताना मनात काय वाटतं अगदी खोलवर समजू शकत होते. मात्र मी आता त्या भावनेच्या काठावर होते आणि ते अनुभवाच्या आत. प्रचंड फरक आहे हाही.

आयुष्यात वंचित असणं अनुभवलं आहे कित्येकदा.

मीही गरजेनुसार आता आता एसी गाडीत बसते.

एशियाडमध्ये बसायला धजायला, परवडायला अनेक वर्षे गेली.

लाल गाडीत सीट मिळणं हा कंफर्ट होता.

ट्रेनमधल्या वरच्या जाळीत जागा मिळणं सुख होतं.

भाच्याला म्हणाले, "अस्सेच काहींचे तिकीट काढू शकशील एवढे तरी पैसे कमवशील आयुष्यात."

आता मी सगळ्या प्रकारच्या गाड्यांमध्ये, विमानात बसू शकते, निदान कधी कधी तरी. मी शिकू शकले, जिद्दीने शिकले. यांच्या आयुष्यात तेही मिळू शकले नाही. कधीकधी नुसती जिद्द असूनही उपयोग नाही, भवतालची व्यवस्था बदलायला हवी.

स्वातंत्र्य दिवस सगळ्यांसाठी सारखा असो!

लेखिका - लक्ष्मी यादव

Updated : 16 Aug 2023 8:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top