Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्मारक करा, पण शिवाजी पार्कात नको ! - निखिल वागळे

स्मारक करा, पण शिवाजी पार्कात नको ! - निखिल वागळे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे अशी मागणी भाजप आणि काँग्रेसने केली . पण या मागणीला आता विरोध देखील होऊ लागला आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपली भूमिका या मुद्द्यावर परखडपणे मांडली आहे.

स्मारक करा, पण शिवाजी पार्कात नको ! - निखिल वागळे
X

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे अशी मागणी भाजपचे राम कदम आणि काँग्रेसचे नाना पटोले केली आहे. पण या मागणीला आता विरोध देखील होऊ लागला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्कमध्ये स्मारक उभारण्याच्या मागणीला विरोध केला आहे. तसेच याच मुद्द्यावरुन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये निखिल वागळे यांनी काय म्हटले आहे ते पाहूया....

"स्पष्ट भूमिका घेतल्याबद्दल प्रकाश आंबेडकरांचं अभिनंदन. शिवाजी पार्क हे मध्य मुंबईत शिल्लक राहिलेलं एकमेव मोठं मैदान आहे. ती या भागाची फुफुस्सं तर आहेतच, पण अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू या मैदानाने दिले. स्वातंत्र्य आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ, दलित ऐक्य अशा असंख्य ऐतिहासिक घटनांचा हे मैदान साक्षीदार आहे.

लता मंगेशकर यांचं स्मारक मुंबईत झालं पाहिजे, पण शिवाजी पार्क मैदानावर अतिक्रमण करुन नाही. शिवाजी पार्क परिसरात जन्माला आलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना नागरिकांची ही भावना कळेल अशी आशा आहे.

शिवाजी पार्कवर अंत्यविधी करण्याचा प्रघातही पडू नये. ही स्मशानभूमी नाही. १९८६साली स्मिता पाटील यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं पार्थीव अत्यंदर्शनासाठी इथेच ठेवण्यात आलं होतं. पण अंत्यविधी शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत झाला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीनंतर ही प्रथा सुरु झाली. लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीसाठी महापालिकेने पुन्हा खास परवानगी दिली. जनतेच्या आणि सुरक्षेच्या सोयीसाठी हे करण्यात आलं असं सांगण्यात येतं. पण अंत्यदर्शन इथे करुन अंत्यविधी स्मिता पाटील यांच्याप्रमाणे स्मशानात करणं अशक्य होतं का? १९५६ साली बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक अंत्ययात्रेची अखेर याच भागात झाली होती. पण अंत्यविधी चैत्यभूमीवर करण्यात आले होते.

शिवसेनाप्रमुखांचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं अशी मागणी करण्यात आली होती. पण त्यालाही शिवाजी पार्कच्या सुजाण नागरिकांनी विरोध केला होता. शेवटी एका छोट्या जागेवर स्मृतीस्थळ उभारुन तडजोड करण्यात आली आणि महापौर निवासाची जागा त्यांच्या स्मारकाला देण्यात आली.

खरं तर लता मंगेशकर यांची ५ हजाराहून अधिक गाणी हेच त्यांचं खरं स्मारक आहे. पण भव्य पुतळे उभारायची हौस असलेल्या या देशात हे फारशा लोकांना पटणार नाही. तेव्हा लतादिदींचं स्मारक जरुर करा, पण शिवाजी पार्कवर नव्हे."

Updated : 8 Feb 2022 10:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top