Home > मॅक्स ब्लॉग्ज > भास होणं म्हणजे नेमकं काय?

भास होणं म्हणजे नेमकं काय?

आपल्याला हल्ली विचित्र भास होऊ लागलेत का? एलिय़न वगैरे दिसतायत किंवा नसलेल्या व्यक्ती दिसू लागल्या आहेत अथवा ओळखीच्या व्यक्ती अनपेक्षित ठिकाणी दिसतायत. असं जर आपल्यासोबत वारंवार होत असेल तर बॉस जरा गडबड आहे. पण हे असे भास होण्याची कारणं काय आहेत जाणून घ्या डॉ. रूपेश पाटकर यांच्या लेखातून...

भास होणं म्हणजे नेमकं काय?
X

'डॉक्टर, माझे मिस्टर विचित्र वागत आहेत. कळत नाही काय झाले ते? त्यांना वेड तर लागले नाही ना?' माझ्या एका मित्राची बायको रडकुंडीला येऊन मला फोनवर सांगत होती. माझा हा मित्र इंजिनिअर आहे. एका चांगल्या कंपनीत वरीष्ठ पदावर आहे. त्याचे वय पन्नाशीच्या आसपास आहे. मी त्याला गेली सुमारे तीस वर्षे ओळखतो. या तीस वर्षात त्याचे मानसिक आरोग्य कधी बिघडले नाही. त्याचा स्वभाव शांत, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, सर्वांना सांभाळून घेणारा. त्याला कोणतेही व्यसन नाही. असे अचानक काय झाले असेल, मला कळेना.

मी लगेचच त्याला अ‍ॅडमिट केलेल्या हॉस्पिटलमध्ये गेलो. मी पोचलो तेव्हा त्याचे हातपाय कॉटच्या रेलिंगला बांधले होते. त्याला काही वेळापूर्वीच झोपेचे इंजेक्शन दिल्यामुळे तो शांत होता. त्याला ग्लानी आली होती. मी त्याला पाहून त्याच्या बायकोशी बोलायला गेलो. त्याच्या ऑफीसमध्ये अलीकडे टेंशन होती. काहीतरी पैशांचे प्रकरण होते. चौकशी चालू होती. हा मित्र अगदी प्रामाणिक असल्याने त्याला या सगळ्याचा भलताच मनस्ताप होत होता. त्याच्या बायकोचे म्हणणे होते की त्यामुळेच असे घडले असावे.

"काय झाले ते मला तपशीलाने सांगाल का?" मी म्हटले.

"कालपासून यांना बरे वाटत नव्हते. ताप आल्यासारखे वाटतेय म्हणाले. काल कामावरून देखील लवकर आले. मी हात लावून पाहिले तर ताप नव्हता. रात्री भूक नाही म्हणून उपाशीच झोपले. रात्री मला दोनच्या दरम्यान जाग आली तेव्हा हे हुडहुडी भरल्यासारखे कापत होते. मी हात लावला तर अंग तापले होते. घरात क्रोसिन होती, ती दिली आणि डोक्यावर थंड पाण्याची घडी घालत बसले. तासाभराने ताप गेला. त्यांना डोळा लागला. सकाळी पुन्हा ताप आला. तेव्हा ते विचीत्र बोलत होते. आपण ऑफिसमध्येच आहोत असे त्यांना वाटत होते. मी त्यांना सांगितले, त्यांच्या आईने त्यांना सांगितले, पण आपण घरी आहोत हे त्यांना मान्यच होईना. सकाळी आमच्याकडे झाडूपोच्छा करण्यासाठी बाई येतात. त्या गेली दहा वर्षे आमच्याकडे काम करतात, त्यांना यांनी ओळखले नाही. दुपारी उठले आणि म्हणाले तिन्हीसांज झाली. नंतर म्हणायला लागले, 'तो यादव इथे का आलाय?' यादव म्हणून एकजण त्यांच्या ऑफिसात क्लार्क आहे. पण यादव आलाच नव्हता. मी म्हंटले, 'कोणी नाही आलेय.' त्यावर म्हणाले, 'तो मला बघून दारामागे लपलाय.' मी म्हंटले, 'कोणी नाही दारामागे.' पण त्यांना खात्री होईना. मी स्वतः पाहिलाय त्याला. तो आहे त्या दारामागे.' इतके बोलून ते अंथरुणावरून उठले आणि दाराकडे गेले.

तिथे कोणी नव्हतेच. पण त्यांना ते पटेना. ते म्हणाले, 'तो त्या फुलझाडांच्या झाडीमागे लपलाय. त्याच्यासोबत त्याचा मुलगा आहे. ते कुजबुजत आहेत.' मी कोणीही नाही म्हणते म्हणून ते माझ्यावर चिडले. मग कॉलनीतले काहीजण आले आणि त्यांनी मग त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले. इथे आल्यावर पण ते चिडलेलेच होते. डॉक्टरांशी पण ते भांडले. इथून रागारागाने बाहेर जायला लागले म्हणून हॉस्पिटलच्या स्टाफने त्यांना अडवले तर त्यांना मारले त्यांनी. शेवटी त्यांना पाचसहा जणांनी पकडून कॉटवर झोपवले आणि शीरेतून इंजेक्शन दिले तेव्हा कुठे शांत झालेत. डॉक्टरनी त्यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलेय. ते म्हणतात, त्यांच्याकडे कोणी सायकीयॅट्रीस्ट नाही, तेव्हा मेंटल हॉस्पिटलमध्ये न्या, नाहीतर जिथे सायकीयॅट्रीस्ट उपलब्ध असेल अशा हॉस्पिटल मध्ये न्या. म्हणून तुम्हाला बोलावले. काय करायचे डॉक्टर? हे ठीक होतील ना डॉक्टर? त्यांना भास होताहेत. हे असे कायमचे नाही ना राहणार? मला काही सुचतच नाहीये."

पूर्वी कधीही मानसिक आजार नसताना वयाच्या पन्नाशीत अचानक त्याला असा त्रास होणे आणि त्या आधी ताप येणे या गोष्टी माझ्या मित्राच्या वर्तन बदलाचे कारण शारीरिक असल्याची शक्यता सांगत होत्या.

"वहिनी, त्याला काही शारीरिक त्रास होता का? एखादी जखम?"

"नाही."

" ब्लडप्रेशर किंवा डायबेटिस?"

"नाही."

"अलीकडे बेशुद्धी किंवा फिट आली होती का?"

"नाही."

"भडभडून उलटी झाली होती का?"

"नाही."

"एखादे औषध घेतले होते का?"

"नाही."

या माहितीतून मला जी शक्यता वाटत होती, तिला पुष्टी देणारी गोष्ट सापडत नव्हती.

मी त्याला ठेवलेल्या रूममध्ये गेलो. तो ग्लानीत होता. शरीरावर कुठे सूज किंवा गळू आहे का हे शोधू लागलो. पण काही दिसत नव्हते. मागच्या बाजूने पहावे म्हणून वॉर्डबॉयला त्याला कुशीवर सरकवायला सांगितले. त्याच्या माकडहाडाभोवतीचा साधारण तळव्याच्या आकाराचा भाग काळा पडला होता. मी सर्जनचे मत घेण्यास सुचवले. सर्जननी तो भाग पाहिला आणि लगेच ऑपरेशन करून त्यात साचलेले इन्फेक्शन काढून टाकले. आणि त्याला शीरेतून अ‍ॅण्टीबायोटीक्स सुरू केली. दुसर्‍या दिवशी मी जेव्हा त्याला भेटायला गेलो, तेव्हा तो कुशीवर वळून छान गप्पा करत होता. त्याच्याशी बोलताना मला कळले की गेल्या आठ दिवसांपासून त्याचा तो भाग मुंग्या आल्यासारखा वाटे. पण दुखत नसल्याने त्याने दुर्लक्ष केले. शिवाय तो भाग पाठीमागचा असल्यामुळे तिथल्या चामडीचा रंग बदललाय हे ही त्याला कळले नाही.

तो म्हणाला, "मला ताप आला त्यापासूनचे सगळेच मला आठवत नाही. मधले मधले आठवतेय. मला यादव दिसला होता ते आठवतेय. तो लपला होता, त्याच्यासोबत त्याचा मुलगा बोलतोय हे मला ऐकू आल्याचे आठवतेय. पण त्यावेळी ते मला खरेच वाटत होते. ही म्हणाली की आमच्याकडे झाडूपोच्छा करायला येणार्‍या बाईना मी ओळखले नाही. पण मला ते अजिबात आठवत नाही. हॉस्पिटलमध्ये मला का आणलेय ते मला कळत नव्हते. मला त्यांच्यात आमच्या ऑफिसमधले लोक दिसत होते. मला त्याक्षणी वाटले की ते सगळे मला वेडा ठरवण्यासाठी प्रयत्न करताहेत."

तुमच्या लक्षात आलेच असेल की माझ्या मित्राला झालेले भास, त्याचे चिडणे, त्याने हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी झटापट करणे याचे कारण त्याच्या पाठीमागच्या भागाला झालेली इजा आणि त्यात झालेला जंतूसंसर्ग हे होते. त्या जंतू संसर्गामुळे त्यांच्या रक्तात विषारी पदार्थ जमा झाले होते, त्याचा परिणाम त्याच्या मेंदूच्या कार्यावर झाला होता. त्यामुळे त्या जखमेवर आणि जंतू संसर्गावर उपचार करताच त्याला होणारे भास नाहीसे झाले. त्याला झालेल्या आजाराला 'डिलीरीयम' म्हणतात. असा डिलीरीयम खूप ताप, जंतूसंसर्ग, मेंदूला झालेला जंतूसंसर्ग, लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्यूअर, अनियंत्रित डायबेटिस वगैरे कारणामुळे होतो.

सतत दीर्घकाळ अतिदारू पिणाऱ्या व्यक्तीने अचानक दारू सोडल्यास देखील अशीच अवस्था होऊ शकते. तिला 'डिलीरीयम ट्रेमेन' म्हणतात. यातले भास अनेकदा त्वचेला होतात. माझा एक पेशन्ट अशा अवस्थेत अ‍ॅडमिट असताना सतत हात आणि पाय झाडत होता. त्याला असा भास होत होता की त्याच्या अंगावर किडे चढत आहेत. हातपाय झाडून त्याला भासणारे किडे तो झाडून टाकण्याचा प्रयत्न करत होता. तीन दिवसानंतर त्याचे हे भास नाहीसे झाले.

मी नुकताच सायकॅट्रीस्ट होऊन नव्यानेच प्रॅक्टिस सुरू केली होती, त्यावेळची गोष्ट. ते एक पॉलीक्लिनिक होते. एक दिवस एका बाईना केस पेपर करणाऱ्याने माझ्याकडे पाठवून दिले. त्या बाईना आठ दिवसांपासून एक त्रास होत होता. त्या बाईना त्रास होत होता हे म्हणणे चुकीचे होईल. त्यांना काहीच त्रास वाटत नव्हता. त्यांच्या सूनबाईना त्यांच्यात फरक झाल्याचे जाणवत होते म्हणून त्या त्यांना घेऊन आल्या होत्या. काय होता त्यांचा त्रास? त्यांना गेल्या आठ दिवसांपासून एक छोटीश्या तबकडीसारखे यान दिसे. त्या यानातून फुटभर उंचीचा, हिरव्या रंगाचा अंतराळवीर बाहेर येई. त्याची वाफ होई आणि ती वाफ त्यांच्या शरीरात विलीन होई. त्यानंतर तो हिरवा माणूस त्यांच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून घेई. आणि पुन्हा ती वाफ बाहेर येई. पुन्हा तिचा फुटभर उंचीचा अंतराळवीर बने आणि त्या तबकडीतून परत जाई. आणि ते यान यायच्या आधी रिक्षाचे हॉर्न वाजत. मी ही सगळी हिस्ट्री ऐकून घेतली. आणि शारीरिक तपासणीकडे वळलो. मला आढळून आले की त्यांचे ब्लडप्रेशर दोनशे बाय एकशेदहा होते. त्यांच्यावर इतर काही उपचार करण्याआधी त्यांचे ब्लडप्रेशर खाली आणणे तातडीचे होते. त्यांना लगेच मी इमर्जन्सी रूमकडे पाठवून दिले. त्यांचे ब्लड प्रेशर नॉर्मल पातळीवर आणण्यासाठी त्यांच्यावर तातडीने उपाचार करण्यात आले. आठवड्याभराने त्या परत आल्या. त्यांना फक्त ब्लड प्रेशर नियमित करणारी गोळी चालू होते. पण तेवढ्यानेच त्यांचे सगळे भास आता नाहीसे झाले होते. त्या मला म्हणाल्या, "डॉक्टर, एक प्रॉब्लेम आहे. ब्लडप्रेशरच्या गोळ्या सुरु केल्यापासून रिक्षाचे हॉर्न वाजले तरी तो हिरवा मित्र येत नाही. तो यायचा तेव्हा मला बरे वाटायचे. थोडा वेळ बरा जायचा." म्हणजे त्यांना त्या भासांचा त्रास नव्हता. त्यांचा तो विरंगुळा होता. पण त्यांच्या भासांचे कारण त्यांचे वाढलेले ब्लड प्रेशर होते. ते तसेच वाढलेले राहिले असते तर कदाचित मेंदूची नस फुटून त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असता. त्यामुळे त्यांचे विरंगुळ्याचे ते नवे साधन दूर केल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता.

आणखी एक गमतीशीर आजार आहे. त्याला ' म्हणतात. या आजाराविषयी सर्वात पहिला अभ्यास अठराव्या शतकातील चार्ल्स बोनेट नावाच्या माणसाने केला. म्हणून या आजाराला चार्ल्सचेच नाव पडले. जर एखादी व्यक्ती आंधळी झाली किंवा तिची दृष्टी खूपच अधू झाली किंवा ती ठार बहिरी झाली तर तिला 'साक्षात्काराचे भास' होतात. तिची दृष्टी गेली असेल तर दिसण्याचे भास होतात आणि बहिरेपण असेल तर ऐकण्याचे भास होतात. ज्याने या विषयी अभ्यास केला त्या चार्ल्सच्या आजोबांना असे भास होत असत. एकदा त्याच्या आजोबांना त्यांच्या दोन नाती भेटायला गेल्या. आजोबा आराम खुर्चीत बसले होते. त्यांच्या उजव्या बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर नाती बसल्या. आजोबा त्यांना उद्देशून म्हणाले की "तुम्ही मला अगोदर सांगितले नाही की तुमच्या सोबत दोन देखणे तरुण देखील येणार आहेत." नाती गोंधळल्या. कारण त्यांच्या सोबत कोणीच आले नव्हते. पण आजोबाना मात्र त्यांच्या डाव्या बाजूला दोन रूबाबदार तरुण दिसत होते. नातींनी त्यांच्या सोबत कोणीही न आल्याचे सांगितल्यानंतर काही वेळाने ते तरुण अदृश्य झाले. चार्ल्स बोनेट प्रकारचे भास जसे अचानक येतात तसे अचानक आपोआप नाहीसे देखील होतात.

प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत भास किवा ज्यांना इंग्रजीत 'हॅल्यूसिनेशन' म्हणतात, त्यांचा गांभीर्याने अभ्यास केला नव्हता. जेव्हा मी पदव्युत्तर शिक्षणासाठी मनोविकारशास्त्र निवडले तेव्हापासून माझा भासांबाबतचा अभ्यास सुरू झाला. आपण डोळ्यांनी पाहतो, त्याचप्रमाणे आपण मेंदूनेदेखील पाहत असतो, म्हणजे जे दृश्य पाहिले त्याचा अर्थ लावत असतो. समोर दृश्य नसताना आपण कल्पनेने मनात चित्र उभे करत असतो. पण ती कल्पना आहे, याची आपल्याला जाणीव असते. पण कधीकधी बाहेर कोणतीही वस्तू, प्राणी, माणूस नसताना, एखाद्याला खऱ्या वस्तूसारखी, किंवा खऱ्या प्राण्यासारखी किंवा खऱ्या माणसासारखे दिसतात. जसे कल्पनाचित्रात व्यक्तीला माहीत असते की हे खरे नाही, ही कल्पना आहे, तसे भासत वाटत नाही. ज्याला भास होतात त्याला ते भास वाटत नाहीत, त्याला ते खरेखुरे वाटतात. त्याही पुढचे म्हणजे जसे कल्पनाचित्र ऐच्छिक असते, आपण ते मनात हवे त्यावेळी रंगवू शकतो आणि हवे त्यावेळी नाहीसे करू शकतो तसे भास नसतात. ते ज्याला होतात त्याच्या इच्छेखाली ते नसतात.

इथे आणखी एक प्रकार विचारात घ्यायला हवा, तो म्हणजे ज्याला इंग्रजीत 'इल्यूजन' म्हणतात. इल्यूजन म्हणजे काय, ते एक उदाहरण घेऊन स्पष्ट करतो. समजा एखाद्या अंधूक प्रकाशात दोरी बघून आपल्याला ती साप कशी वाटते, तेव्हा त्याला इल्यूजन म्हणतात. हे भासापेक्षा वेगळे आहे. भासात बाहेर काहीच नसते. तर इल्यूजनमध्ये सदृश गोष्ट असते.

आणखी एक रोचक निरीक्षण नमूद करण्यासारखे आहे, ते म्हणजे मेंदूच्या ठरावीक भागाला सूक्ष्म विजेने उत्तेजित केले तर त्या मेंदूच्या भागाशी संबंधित भास होऊ शकतात.

प्रत्येक ज्ञानेंद्रियांला भास होऊ शकतात. काही भास तर अशक्य कोटीतले असतात, जसे माझा एक पेशंट सांगे की त्याला पाठीमागचे दिसते. दुसरा एक सांगे की माझ्या क्लिनिकमध्ये तो बसला असताना त्याला त्याच्या गावी त्याचे शेजारी त्याला शिव्या देताहेत ते ऐकू येतेय.

भासांचा अभ्यास केल्यावर माझ्या विचार करण्यात एक महत्त्वाचा बदल झाला. तो म्हणजे सामान्य माणसाला चमत्कारिक वाटणार्‍या गोष्टी चमत्कारिक नसतात हे कळले. दुसरे म्हणजे त्या निव्वळ काल्पनिकही नसतात हे देखील कळले. त्या केवळ मनोविकारांचेच लक्षण असतात असेही नाही. त्या अनेकदा शारीरिक आजारांचे लक्षण असू शकतात. त्याचा संबंध मेंदूच्या कार्य पद्धतीत झालेल्या बदलांशी असतो हे कळले. त्यामुळे कोणतेही लक्षण मानसिक आजाराचे म्हणण्याअगोदर त्याची शारीरिक कारणे शोधण्याची सवय लागली.

.......

डॉ. रुपेश पाटकर.

Updated : 21 Oct 2022 6:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top