Home > मॅक्स ब्लॉग्ज > खेला होबे ; ममता बॅनर्जी – राजू परूळेकर

खेला होबे ; ममता बॅनर्जी – राजू परूळेकर

२०२१ विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींनी मोदी सत्तेला शिंगावर घेत ‘खेला होबे’चा नारा दिला आणि कोणत्याही परिस्थितीत आपण झुकणार नाही, याचं ऐलान केलं होतं. रणात अजून काही वीर झुंजत आहेत, अजून आम्ही माघार घेतलेली नाही, किंबहुना खरा खेळ आता सुरू होत आहे, हे सांगणारा हा नारा म्हणजे ममता बॅनर्जी यांचं समग्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी १९७०मध्ये काँग्रेस पक्षाच्या सदस्य म्हणून राजकीय कामाला सुरुवात केली. १९७५ मध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या मोटारीवर उभं राहून त्यांच्या विरोधात निदर्शने केल्याने त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. १९७६ ते १९८० या काळात त्या राज्याच्या महिला काँग्रेसच्या सचिव होत्या. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव करून त्या लोकसभेतल्या तरुण खासदारांपैकी एक बनल्या. १९९७ मध्ये त्यांनी स्वतःच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. २०११ मध्ये डाव्यांचा पराभव करून त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये सत्तेवर आला. ममता अतिशय तडफेने आपला राजकीय खेळ खेळत आल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

खेला होबे ; ममता बॅनर्जी   –   राजू परूळेकर
X

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर लिहिणं आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आलेख एका लेखात मांडणं केवळ अशक्य आहे; एवढी स्थित्यंतरं, लढाया आणि बंड त्यांच्या आयुष्यात आहेत की ती एका लेखात समाविष्ट होऊच शकत नाहीत. खूप कमी लोकांना त्यांचा संघर्षाचा इतिहास माहीत आहे.

मुळात ममता बॅनर्जी यांना राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. त्याचबरोबर समृद्ध किंवा श्रीमंत अशी बालपणाची किंवा तारुण्याची जोडही त्यांच्या राजकीय संघर्षाला मिळालेली नाही. ममता बॅनर्जी या मध्यमवर्गीय घरात जन्माला आल्या, तरीही त्यांच्या वडिलांच्या लवकर झालेल्या निधनामुळे त्यांना कमी वयात त्यांच्या भावंडांची आणि आईची जबाबदारी उचलावी लागली. ममता दीदी १७ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. ज्यावेळी त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्यातील नेतृत्वगुणांची आणि बंडखोरीची कोणी कल्पनाही केलेली नसेल. त्यांचे वडील वेळीच औषधोपचार न मिळाल्यामुळे निधन पावले. त्यानंतरच्या काळामध्ये ममता बॅनर्जींनी संघर्ष करत शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचवेळी आपल्या राजकीय कारकिर्दीलाही वळण दिलं. बऱ्याच जणांना माहीत नाही, ममता बॅनर्जी यांनी इस्लामिक स्टडीज् (Islamic Studies)मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे तसेच त्या शिक्षणशास्त्राच्या पदवीधर आहेत. याशिवाय वकिलीची पदवीही त्यांच्याकडे आहे. एकेकाळी त्यांनी वकिलीदेखील केलेली आहे. वडील गेल्यानंतर त्यांनी नोकरी करून आपल्या भावंडांच्या पालनपोषणाची आणि कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि आपलं शिक्षण सुरू ठेवलं होतं. आज बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही पण थोड्याशा लाजऱ्या आणि अंतर्मुख असलेल्या ममता दीदी अतिशय साध्या आहेत. त्यांच्या अंगावरची पांढरी साडी आणि त्यांच्या पायातील स्लीपर या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाल्या आहेत.

ममता दीदींना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती. जोगमाया देवी महाविद्यालयात शिकत असताना वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षीच त्यांनी काँग्रेसच्या छात्रपरिषद या विद्यार्थी संघटनेची स्थापना आपल्या महाविद्यालयात केली. ममतांच्या नेतृत्वाखालील या छात्रपरिषदेने तेव्हाच्या प्रस्थापित डेमोक्रॅटिक छात्र संघाचा पराभव केला होता. विद्यार्थिदशेत काँग्रेस पक्षासोबत त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्याचंच फलित म्हणजे तारुण्यापासून ते प्रौढ राजकारणी होईपर्यंतचा मोठा काळ त्या काँग्रेस पक्षाच्या एक महत्त्वाच्या नेत्या होत्या.

आज मागे वळून बघताना ही गोष्ट आश्चर्यकारक वाटते पण काँग्रेससारख्या त्या काळात बलाढ्य आणि सर्वत्र पसरलेल्या पक्षाला त्यांनी स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. डाव्या विचारांची पश्चिम-बंगालमध्ये प्रचंड लाट असतानासुद्धा ममता बॅनर्जी त्याच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टीच्या समोर उभ्या राहिल्या. काँग्रेसमधील युवा नेतृत्व म्हणून त्यांना नाव, कीर्ती आणि पदंही मिळाली. यामागे त्यांचं आक्रमक राजकारण होतं. त्यांना बालपणीच वडिलांच्या जाण्यामुळे विपरीत परिस्थितीशी संघर्ष करण्याचा अनुभव होता. त्यांना परिस्थितीविरोधात चिवट लढा देण्याची सवय लागली आणि नंतर तो त्यांचा पिंडच बनला. जे त्यांना मिळालं ते सहजासहजी मिळालेलं नाही. काँग्रेसमध्ये सर्वसाधारणपणे मोठी लोकआंदोलनं, रस्त्यावर उतरून काढलेले मोर्चे, विरोधकांना थेट भिडणे या गोष्टी करणाऱ्या लढाऊ नेत्यांची कमतरता असते. पूर्वीही ती तशीच होती. काँग्रेस देशामध्ये प्रबळ असूनही पश्चिम बंगालमध्ये आधी नक्षलवादी चळवळ आणि मग कधीही सत्तेतून पायउतार होणार नाही, असं वाटणारं कम्युनिस्टांचं सरकार होतं. या अशा प्रतिकूल काळामध्ये काँग्रेसमध्ये राहावं आणि रस्त्यावर उतरून आंदोलनं करावी यासाठी नेमकी कोणती प्रेरणा ममता बॅनर्जींना मिळाली असेल, हे एक कोडंच आहे. कदाचित इंदिरा गांधींच्या, एका कणखर स्त्री नेत्याच्या नेतृत्वाचा तो प्रभाव असावा. कारण अगदी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या काळातही त्या काँग्रेस पक्षाच्या बाजूने होत्या, इतकंच नाही तर काँग्रेससाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं करत होत्या. इंदिरा गांधींच्या पराभवानंतर त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहून रस्ता रोको करणं, कम्युनिस्टांविरुद्ध सातत्याने लढत राहणं हे सारं त्यांनी केलं. काँग्रेसच्या राज्यातल्या उच्च नेतृत्वापर्यंत आणि केंद्रातल्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचणं ही सामान्य बाब नव्हती, पण आपल्या लढवय्या बाण्याने ममता बॅनर्जींनी ते करून दाखवलं.

ममता बॅनर्जींची कारकिर्द ही वेगवेगळ्या वळणांनी गेली. काँग्रेसमध्ये असताना निवडणुकांमधील विजयासोबतच केंद्रीय मंत्रीपदंदेखील त्यांना मिळाली. १९९१मध्ये त्या पहिल्यांदा महिला बाल विकास खात्याच्या आणि युवा विभागाच्या केंद्रीय मंत्री झाल्या होत्या.

काँग्रेससारख्या पक्षामध्ये यशाचा हा आलेख एखाद्या नेत्यासाठी खरंतर सुखावणारा आणि संतुष्ट करणारा असायला हवा. परंतु ममता बॅनर्जी त्यापैकी नव्हत्या. ममता बॅनर्जींनी काँग्रेसमधील आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना तृणमूल काँग्रेस हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. तपशीलवार पाहता तृणमूल काँग्रेसने पुढे काय केलं हे सगळ्यांना माहितीच आहे. परंतु ममता बॅनर्जींनी आपल्या आयुष्यामध्ये एकहाती तीन बलाढ्य शक्तींशी सामना केलेला आहे. त्यांतली एक काँग्रेस, दुसरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPIM), आणि तिसरी भाजप. तृणमूल काँग्रेस स्थापन केल्यानंतर मधल्या काळामध्ये १९९९ मध्ये त्या अटल बिहारी वाजपेयींच्या एनडीए या आघाडीमध्ये सामील झाल्या आणि वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीही बनल्या. एकेकाळी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील असलेल्या ममता आज मोदी-शहांच्या नेतृत्वाखाली एनडीएला विरोध करत आहेत. किंबहुना त्यांचा मुख्य विरोध भाजपपेक्षाही मोदी-शहांच्या नेतृत्वालाच आहे. केंद्र सरकारसोबत आणि फॅसिझमसोबत कोणतीही तडजोड न करता ममता यांनी पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहांची डाळ अद्याप शिजू दिलेली नाही.

जेव्हा काँग्रेस पक्ष बलाढ्य होता तेव्हा त्यांनी काँग्रेसशी पंगा घेतला, स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि एका अर्थाने त्या त्यात विजयीदेखील झाल्या. कारण आज बंगालमध्ये काँग्रेसचं अस्तित्वच उरलेलं दिसत नाही. जेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सत्ताधारी होता आणि अतिशय बलाढ्य मानला जात होता तेव्हा ममता बॅनर्जींनी कम्युनिस्ट पक्षाशी पंगा घेतला. आणि त्यातही त्या विजयी झाल्या.

या संदर्भात ममता बॅनर्जींच्या लढाऊ बाण्याची एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. प. बंगालमधील सरकारी इमारत जिला ‘रायटर्स बिल्डिंग’ (writers building) असं म्हणतात, जिथून पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राज्याचा कारभार चालवतात, त्या ठिकाणी ममतांनी मुख्यमंत्री ज्योती बसूंच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं. तिथून त्यांना हाताला धरून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी योग्य तो सन्मान प्राप्त झाल्याशिवाय पुन्हा त्या रायटर्स बिल्डिंगमध्ये प्रवेश करणार नाही अशी जाहीर शपथ घेतली होती. त्या घटनेनंतर, बरोबर १८ वर्षांनी पश्चिम बंगालमधून कम्युनिस्ट पक्षाचं समूळ उच्चाटन करून तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री म्हणून त्या रायटर्स बिल्डिंगमध्ये ममता बॅनर्जी यांनी प्रवेश केला. त्या आजतागायत मुख्यमंत्री आहेत. इडी, सीबीआय, आयटी आणि एआयए यांसारख्या संस्थांच्या बळावर अतिबलाढ्य असलेलं भारतीय जनता पक्षाचं मोदी सरकार हे गेल्या ९ वर्षांत दोन वेळा लोकसभा निवडणुकांमध्ये ममता दींदींच्या समोर आलं. दोन्हीही वेळा ममता बॅनर्जींच्या पक्षाने भाजपला पश्चिम बंगालमध्ये धूळ चारली आहे. त्यांनी आपल्या एका आयुष्यात बलाढ्य आणि पाशवी शक्ती असलेल्या तीन पक्षांना नमवलेलं आहे. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती पण काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भाजपा या तिन्ही पक्षांसमोर त्या त्याच हिमतीने उभ्या राहिल्या. त्यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ले झाले पण त्या कधीही डगमगल्या नाहीत.

ममता बॅनर्जी आता विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ (INDIA) या संयुक्त दलाच्या घटक आहेत. २६ पक्षांनी मिळून बनवलेली ही आघाडी फॅसिझमला, मोदी सरकारला पराभूत करण्याकरता आहे. या आघाडीमध्ये खुद्द काँग्रेस आहे, नितिश कुमारांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) आहे, लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष आणि देशातील इतर अनेक पक्ष आहेत. आणि या सर्वांमध्ये अजेय आणि निर्भीड असा लौकिक असलेल्या ममता बॅनर्जीदेखील आहेत. जर इंडिया आघाडी यशस्वी झाली तर ममता बॅनर्जी या पंतप्रधान पदाच्या प्रबळ दावेदार असू शकतात. कारण ममता बॅनर्जींकडे पश्चिम बंगालमध्ये विक्रमी संख्येने लोकसभेला उमेदवार निवडून आणण्याची क्षमता आहे.

ममता बॅनर्जींच्या कारकिर्दीबाबत वाचायला खूप काही उपलब्ध आहे. शिवाय त्यांची राजकीय कारकिर्द रेकॉर्डवर उपलब्धही आहे. त्यात विजयाचे आणि पराभवाचे अनेक प्रसंग आहेत. परंतु विजय किंवा पराभव यातल्या कशाचाच स्वतःवर प्रभाव होऊ न देता स्थितप्रज्ञपणे आपली लढाई लढत राहणाऱ्या नेत्या ममता बॅनर्जीच आहेत. मोदी-अडाणी प्रकरणामध्ये सार्वजनिक उद्योगांचा आणि लोकांच्या पैशांचा अपहार करण्याच्या विरोधात राहुल गांधींच्या नंतर जर सर्वात जास्त कोणी मुखर असेल, बोलत असेल तर तो ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्षच आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा आणि डेरेक ओ ब्रायन यांच्यामुळे संसदेचा अतीव घसरलेला दर्जा काही प्रमाणात सावरायला मदत झालेली आहे. हेही ममता दीदींचे संसदेवरचे उपकारच म्हणायला हवेत. ममता बॅनर्जी यांनी उमेदवार निवडताना कधीच तडजोड केली नाही. अतिशय योग्य माणसांची निवड करून त्यांना लोकसभेवर नाही तर राज्यसभेवर पाठवण्यात भारतामध्ये तृणमूल काँग्रेस हा पक्षच आघाडीवर आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर, मराठी अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते आणि वेगळ्या वाटांच्या शोधपत्रकारितेचे जनक साकेत गोखले यांना पारखी नजरेनं नेमकं शोधून काढून राज्यसभेत पाठवलं ते ममता दीदींनीच. एकीकडे ममता दीदींचा लाडका काँग्रेस पक्ष आपल्याकडे असलेली विद्वान आणि लढाऊ माणसं गमावत असताना दुसरीकडे ममता दीदी देशभरातील विद्वान आणि लढाऊ माणसांना गोळा करीत निघालेल्या आहेत.

आत्ताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हांना ममता दीदींनीच विरोधी पक्षातर्फे उभं केलं होतं. ज्यावेळी ममता बॅनर्जी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये होत्या तेव्हाही त्यांनी आपल्या म्हणण्याशी किंवा आपल्या राजकीय हक्कांशी कधीही तडजोड केलेली नव्हती. कित्येकदा तर त्यांची समजूत काढण्यासाठी जॉर्ज फर्नांडिसपासून अटलजींपर्यंत सगळेच बंगालच्या त्यांच्या छोट्या घरी जाऊन आलेले आहेत.

ममता बॅनर्जी यांनी राजकीय जीवन हे एखाद्या व्रतासारखं स्वीकारलेलं आहे. परंतु त्याच वेळेला त्यांच्यामध्ये एक कलाकार आणि कलाप्रेमीही लपलेला आहे. त्या अतिशय सुंदर चित्र काढतात. किंबहुना कॉलेज काळापासून ते आजपर्यंत त्यांना विंरगुळा म्हणून चित्र काढण्याची सवय आहे. एवढंच नव्हे तर छात्र जीवनामध्ये असताना कित्येकदा त्यांनी पोस्टर्स बनवलेली आहेत. खरं तर ती उपलब्ध असतील तर त्यांचं एक प्रदर्शनच भरवायला हवं इतकी ती देखणी आहेत. या व्यतिरिक्त संगीत हा त्यांच्या आवडीचा विषय. त्या स्वतः पियानो वाजवू शकतात. एवढंच नव्हे तर एकेकाळच्या सत्यजीत रेंपासून आताच्या शाहरुख खानपर्यंत वेगवेगळ्या कलाकारांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. कलेची दृष्टी, संगीताचं भान हे बंगाली माणसाला लाभलेलं वरदानच आहे. आणि त्याचा उत्कृष्ट संगम ममता बॅनर्जींच्या आयुष्यात दिसतो. वरवर पाहणाऱ्या माणसाला ममता या फार रुक्ष, कडक आणि कोरड्या वाटतात. काही प्रमाणात मुत्सद्दी आणि कुशल राजकारणी असल्यामुळे त्या तशा आहेतही. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक मोठा प्रदेश त्यांच्या सौजन्यशील आणि कलासक्त अशा खुबीने व्यापलेला आहे. सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या एका गुणाचा ममता बॅनर्जींना राग येत असेल आणि त्वेषाने विरोध करावासा वाटत असेल तर तो म्हणजे बुद्धिहीन मठ्ठपणा. आज देशभर आरएसएस आणि भाजप परिवार हिंदू-मुस्लीम अशी फूट घालून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असताना, स्वाभाविकपणे देशभरातील मुस्लीम, ख्रिश्चन स्वतःला असुरक्षित मानतात. परंतु पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारची परिस्थिती नाही. मुळातच ममता बॅनर्जी या इस्लामिक स्टडीज् आणि शिक्षण या विषयात स्कॉलर असल्यामुळे त्यांनी या सर्व परिस्थितीचा मुळातून अभ्यास केलेला आहे आणि त्यांना नेमकेपणाने ठाऊक आहे की, भारत हा गंगा-जमनी तेहजीबचा, धार्मिक-पंथीय सर्वसमावेशकता मानणारा देश आहे.

अनेक राजकीय पंडित ममता बॅनर्जी यांच्यावर हा आक्षेप घेतात की, त्यांनी काहीकाळ वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकारसोबत हातमिळवणी केली होती. परंतु त्यांच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली एक म्हणजे तेव्हा एनडीए आघाडीचं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयींसारखे भाजपचे सुसंस्कृत नेते करत होते आणि दुसरं म्हणजे एनडीए आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असतानासुद्धा अनेकदा राजकीय मतभेद झाल्यावर ममता बॅनर्जी यांनी स्वतःची आग्रही मतं सोडली नाहीत, पण वेळोवेळी मंत्रीपद सोडण्याची, पदाचा राजीनामा देण्याची तयारी मात्र दाखवली होती. अनेकदा तत्कालीन सरकारला त्यांच्यासमोर झुकावं लागलेलं आहे. कोणत्याही प्रकारची हुकूमशाही असो, मग ती अति डावी असो किंवा अति उजवी असो, ममता बॅनर्जींनी ती झुगारून देऊन कायमच त्याविरुद्ध बंड पुकारलेलं आहे. त्यांच्या एकूण राजकारणाचं ते वैशिष्ट्य आहे.

आज आयुष्याच्या या टप्प्यावर म्हणजे ६८व्या वर्षी ममता दीदी एक असा लढा देत आहेत, जो संपूर्ण भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय गणतंत्राच्या भविष्याचा फैसला करणारा असेल. भाजपच्या मोदी सरकारने देशावर जाणवेल इतकी अघोषित म्हणावी अशी हुकूमशाही लादलेली आहे. देशातली स्वायत्त विचारांची बैठक असलेल्या स्वयंसेवी संस्था, देशातील माध्यमं ही सर्व आज मोदींच्या तालावर नाचत आहेत. अशावेळी त्यांच्याविरुद्ध सुरुवातीपासून दंड ठोकून उभे राहणारे जे मोजके नेते होते, त्यात ममता दीदी नेहमीच अग्रभागी राहिलेल्या आहेत. अर्थातच देशासोबत त्यासुद्धा इतिहासाच्या एका अनपेक्षित अशा वळणावर उभ्या आहेत.

पश्चिम बंगालला सुधारणावादाची एक मोठी परंपरा आहे. पण त्याचसोबत बंगाल हे एक आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्रही राहिलेलं आहे. या दोन्हींचा मिलाप ममता बॅनर्जींच्या स्वभावात उठून दिसतो. त्यांनी बंगालमधील सार्वजनिक जीवनात कोणत्याही स्वरूपात धर्मवाद रुजू दिला नाही. व्यक्तिगत वर्तन असो वा राजकीय योजनांची आखणी असो, त्यांनी नेहमीच विज्ञाननिष्ठ भूमिका घेतलेली आहे. याचवेळेला त्या बालपणापासून इतर बंगाली लोकांप्रमाणे कालीमातेच्या भक्त आहेत. इतकंच नव्हे तर पारलौकिक जीवन आणि गूढविद्या यांचा अभ्यास आणि प्रभाव त्यांच्यावर आहे. एक राजकारणी म्हणून ते अतिखाजगी ठेवण्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत हे महत्त्वाचं. कोणत्याही प्रगत बंगाली माणसाप्रमाणे आपल्या व्यक्तिगत, आध्यात्मिक आवडीनिवडी आणि श्रद्धा यांचा त्यांनी सार्वजनिक आणि राजकीय जीवनात बाजार मांडला नाही किंवा त्या जोरावर मतं मागण्याचाही प्रयत्न कधी केला नाही. त्यांचा जन्म ब्राम्हण जातीमध्ये झाला आहे, त्या देवीच्या भक्त आहेत. या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये आपणच हिंदुत्ववादाचे तारक आहोत, अशी प्रतिमा निर्माण करणं त्यांना अवघड नव्हतं पण या सोप्या वाटेने न जाता त्यांनी सर्वधर्मसमभावाचं मूल्य स्वीकारत हिंदू-मुस्लीम एकतेचा भक्कम असा पाया घालत बंगालमध्ये धर्मातीत राजकारण केलं.

ममता दीदींचा विरोधक असलेल्या भाजपला त्यांचा पराभव करणं केवळ अशक्य होतं चाललं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, जे एकमेव धर्माचं शस्त्र भाजप वापरतं ते सर्वार्थाने परिपूर्णपणे ममता दीदींच्या हातात असताना त्यांनी कधीही त्याचा राजकारणासाठी वापर केलेला नाही. एका अर्थाने त्या प्राउड हिंदू आहेत. पण हे त्या कधीही बोलून दाखवत नाहीत. त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांची कालीमातेची पूजा, त्यांचं गूढशास्त्राविषयीचं आकर्षण हे त्यांनी त्यांच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर कधीच येऊ दिलं नाही.

संपूर्ण राजकीय जीवनामध्ये ममता बॅनर्जींचं अजून एक महत्त्वाचं शस्त्र ठरतं ते म्हणजे त्यांचं साधं जीवन. अफाट सत्ता आणि तेवढाच लोकसंग्रह असतानाही त्यांनी स्वतःचा घरसंसार केला नाही. कोणत्याही प्रकारच्या ऐहिक मजेला त्यांनी त्यांच्या जीवनात थारा दिला नाही. जे काही आहे ते पक्षाचं आणि नंतर समाजाचं हे समजून त्यांनी राजकीय नेतृत्व केलं. ज्या काळात मूल्यं आणि माणसं सहज विकत मिळतात, त्या काळात राजकारणात एखादी ममता बॅनर्जी असणं हे खूप दुर्लभ आहे. अनेकांना ते अप्राप्यही वाटतं. आजच्या अय्याशीला सरावलेल्या राजकारण्यांच्या पार्श्वभूमीवर तर ममता बॅनर्जी एखाद्या विजेसारख्या तेजस्वीपणे तळपत राहिलेल्या आहेत.

अर्थातच माणूस हा परिपूर्ण नसतो. त्यानुसार ममता दीदींमध्येही सामुदायिक नेतृत्व करताना त्यात बाधा आणणारे असे काही दोष आहेत. त्या दुराग्रही आहेत, हट्टी आहेत, एकदा दिलेलं आव्हान त्या परत घेत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लवचीकतेची कमी आहे. त्या उत्कृष्ट वक्त्या असल्या तरी लालूजींसारख्या नर्मविनोदी व्यक्तिमत्त्वाच्या नाहीत. यामुळे २६ पक्षांच्या आघाडीमध्ये ममता दीदी किती जमवून घेऊ शकतील याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. परंतु या सर्वांपलीकडे त्यांना या आघाडीत चिकटवून ठेवणाऱ्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे अतितीव्र अशा उजव्या हुकूमशाहीचा विरोध आणि दुसरी म्हणजे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी. आयुष्यातील सर्वात महत्वाची वर्षे ममता बॅनर्जींनी काँग्रेसला दिलेली आहेत. किंबहुना सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होण्याअगोदरच सोनियांनी काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं असं सुचवणाऱ्या ममता दीदीच होत्या. अर्थात, सोनिया गांधी तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष न होता नरसिंह राव अध्यक्ष झाले होते. त्यांच्या मंत्रीमंडळात ममता दीदी मंत्री होत्या. पण नंतर विरोधी पक्षात असतानाही काँग्रेसने जेव्हा प्रणव मुखर्जींना आपले नेते म्हणून राष्ट्रपती पदासाठी उभं केलं तेव्हा ममता बॅनर्जींनी आपल्या मतभेदांसहित पूर्वीच्या ज्येष्ठ नेत्याला मनमोकळेपणाने पाठिंबा दिला. त्यामुळे ममता बॅनर्जी हे एक परस्परविरोधी गुणांचं शक्तिकेंद्र आहे. असं आंतरविरोधी चुंबकीय शक्तिकेंद्र बाकी कोणत्याही स्थानिक राजकीय पक्षांमध्ये नाही.

यापुढे जाऊन त्यांच्या स्वभावाला साजेसाच स्वभाव असणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी त्यांच्या तारा कशा जुळतात यावर भावी भारताचं भविष्य अवलंबून आहे. कधी कधी एकारलेली माणसं हीच इतिहास घडवतात. कारण त्यांच्यासमोर एकमेव, एकारलेलं असं उद्दिष्ट (singleness of purpose) असतं. ममता बॅनर्जी या बहुअंगी प्रतिभेच्या धनी असल्या तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कठोरपणे बाणवलेला ‘सिंगलनेस ऑफ परपज’ म्हणजेच एकारलेपणा आहे. हा एकारलेपणाच आजवरच्या त्यांच्या बंडखोरीला, क्रांतिकारकत्वाला आणि त्यांच्या उद्दिष्टांना बळ देणारा ठरलेला आहे. त्यांचा लढाऊपणा आणि आयुष्यामध्ये मिळवलेलं यश यामध्ये या एकारलेपणाचा खूप मोठा वाटा आहे.

पण भारत देश हा इतिहासाच्या एका अशा वळणावर उभा आहे, ज्या वळणावर ममता बॅनर्जी पराभूत होऊन चालणारच नाही. या नेमक्या वळणावर त्या याच पद्धतीने पुढे जातात की, स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून त्यांनी इथवर आणलेली क्रांती पुढे जाऊ देतात, हे आपल्याला २०२४ मध्ये पाहायचं आहे.


साभार - "वसा" दिवाळी अंक

Updated : 29 Dec 2023 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top