Home > मॅक्स ब्लॉग्ज > जेव्हा आपल्याच भोंग्यांची झुंड अंगावर येते...

जेव्हा आपल्याच भोंग्यांची झुंड अंगावर येते...

झुंड ही झुंड असते. ती मेंदूहीन, दिशाहीन असते, याचा प्रत्यय गोदी मीडियाचे पत्रकार असल्याची टीका ज्यांच्यावर केली जाते, अशा एका पत्रकाराने घेतला आहे, भविष्यात येणाऱ्या संकटाचे संकेत देणारे कायद्याने वागा चळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांचे परखड विश्लेषण...

जेव्हा आपल्याच भोंग्यांची झुंड अंगावर येते...
X

Supporters of Hindu Rashtra will have to bear the brunt of the so-called Hindu Rashtra from now Experienced by Saurabh Sharma अशी कोणी कल्पनाही केली नसेल. परंतु न्यूज18 हिंदी चे पत्रकार सौरभ शर्मा यांनी त्याचा भयानक अनुभव घेतला आहे.

एरव्ही, सौरभ शर्मा मोदी-भाजपा समर्थक पत्रकार म्हणून ओळखले जातात. नेटकऱ्यांनी ट्विटरवर त्यांची ज्या पद्धतीने संभावना केली आहे. त्यावरून ते मोदी मीडियाचे पत्रकार असावेत असा अंदाज येतो.

नोएडामधील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या सौरभ शर्मा यांना 'रामनवमीचं जागरण' कार्यक्रमासाठी सुरू असलेल्या लाऊडस्पीकरचा त्रास झाला. रात्री साडेअकरा वाजता लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात जागरणाचा गोंधळ सुरू होता. परीक्षांचा काळ असल्याने सौरभ शर्मा यांनी पोलिसांना ही बाब कळवली आणि हीच नवहिंदुराष्ट्राच्या दृष्टीने शर्मा यांची चूक ठरली.

खरं तर पोलिसांचं हे कर्तव्य होतं की त्यांनी कायद्यानुसार परस्पर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन लाऊडस्पीकर बंद करायला हवा होता. परंतु मोठ्या लबाडीने त्यांनी सौरभ शर्मा यांनाही बोलावून घेतलं. कदाचित आपण 'शर्मा' आहोत आणि मोदी समर्थक आहोत, त्यामुळे सुरक्षित आहोत, असा शर्मा यांचा समज झाला असावा, त्यामुळे तेही पोलिसांसोबत कार्यक्रमस्थळी गेले.

पोलिसांनी आयोजकांना तक्रार असल्याचं सांगितलं. आयोजक सांगू लागले की आमच्याकडे उशिरापर्यंतची परवानगी आहे. त्यावर सौरभ शर्मा यांनी परवानगी दाखवा असं म्हटलं आणि दहानंतर तुम्ही लाऊडस्पीकर वापरू शकत नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून दिली. पण धर्मांधतेपुढे कसलं सर्वोच्च न्यायालय !

आयोजकांनी आणि तिथे उपस्थित झुंडीने शर्मा यांना शिवीगाळ दमदाटी करायला सुरुवात केली. पाकिस्तानी आहेस का? असा एक अतार्किक सवाल शर्मा यांना विचारला गेला. इथेच मारून टाकू, अशी खुली धमकी दिली. धक्काबुक्की केली. मोदीराजवटीत आपण पोलिसांवर विसंबून राहू शकत नाही, हे पहिल्यांदाच अनुभवल्यावर शर्मांनी तिथून पळ काढला तर झुंडींनी बेभान होत त्यांचा पाठलाग केला.

सौरभ शर्मा राहत असलेल्या सोसायटीच्या ठिकाणी येऊन तिथेही झुंडीने शर्मा यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या पत्नीला अंकिता शर्माला, जी स्वतःही पत्रकार आहे, उद्देशून आक्षेपार्ह शेरेबाजी केली. नागडं करून फिरवू असं धमकावण्यात आलं. शर्मा यांचा सहा वर्षांचा लहान मुलगा जवळपास एक तास झुंडीच्या ताब्यात होता. इतकं सगळं प्रकरण वाढूनही पोलिसांपर्यंत जाऊनही पहाटेच्या वेळेलाही कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांनी लाऊडस्पीकरचा आवाज पहिल्यापेक्षा मोठा केला.

झुंड ही झुंड असते. ती मेंदूहीन, दिशाहीन असते. कुठल्याही परिस्थितीत समाजात झुंडींना उत्तेजन मिळणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. झुंडींविरोधात आवाज उठवणं सौरभ शर्माचं पत्रकार म्हणून कर्तव्य होतं. त्याने ते वेळीच केलं नाही. शेवटी व्हायचं ते झालंच...झुंडी त्याच्या दारापर्यंत येऊन पोचल्याच !

Updated : 15 April 2022 4:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top