Home > मॅक्स ब्लॉग्ज > तिचा व्हायरल होणारा फोटो आणि माध्यमं

तिचा व्हायरल होणारा फोटो आणि माध्यमं

मेनस्ट्रीम मीडियाने कौतुक केले म्हणून ती व्यक्ती आपल्या कौतुकासाठी अपात्र ठरावी का? वाचा आर्थिक घडामोडीचे विश्लेषक संजीव चांदोरकर यांचा आत्मभान जागवणारा लेख...

तिचा व्हायरल होणारा फोटो आणि माध्यमं
X

मेनस्ट्रीम मीडियाने कौतुक केले म्हणून ती व्यक्ती आपल्या कौतुकासाठी अपात्र ठरावी की काय? काल लसीकरण करण्याची जबाबदारी पार पाडणारी एक महिला कर्मचारी पाठीला छोट्या मुलाला बांधून नदी पार करणारा लोकसत्तामधील फोटो / बातमीवर बरीच चर्चा झाली चर्चेचे स्वागत; ती चर्चा पुढे घेऊन जाण्यासाठीच म्हटले तर पगारावर / रोजंदारीवर काम करणाऱ्या सर्वच व्यक्ती कामाचा भाग म्हणून अनेक जोखीमीची कामे करत असतात;

पण जोखमीचा वास आल्यावर, आपला जीव धोक्यात येऊ शकतो. हे कळल्यावर देखील काही बाही कारणे देऊन ते त्यापासून दूर जात नाहीत, यासाठी अंतर्यामी बरीच ताकद लागत असते. कोरोनाच्या काळात डॉक्टरी पेशाचे किंवा आरोग्य सेवकांचे / सेविकांचे कर्तव्य निभावताना आपला जीव धोक्यात आहे. हे काय त्यांना कळत नसते; तरी ते दटून उभे आहेत; त्यात म्युन्सिपल सेवा, पोलीस अनेक जण मोडतात; शेकडो व्यक्तींनी प्रत्यक्ष प्राण गमावले आहेत.

या सर्वांच्या मनात डॉक्टरी पेशा / किंवा सेवाक्षेत्र निवडताना आपण चार पैसे कमवू / स्थिर पगाराची नोकरी घेऊ हा विचारच नव्हता; फक्त शुद्ध समाजसेवेचा आणि आत्मबलिदानाची भावना होती? सैनिकांचे घ्या; सैनिक भरतीसाठी रांगा लावणाऱ्या तरुणांची प्राथमिक ढकलशक्ती काय असते? शुद्ध देशाचे संरक्षण करण्यासाठी आहुती देण्याची भावना का कोणतीच नोकरी मिळत नाही तर इथे किमान त्याची शाश्वती तरी मिळेल हा व्यावहारिक विचार? असे काळ्या पांढऱ्यात? हा यादी खूप मोठी करता येईल; विस्तार भयासाठी देत नाहीये.

१००% शुद्ध स्वार्थासाठी किंवा १००% शुद्ध परमार्थासाठी असे काही नसते. महत्वाचा निकष काय? तुम्ही त्या परीक्षेच्या क्षणाला प्रतिसाद देता कि नाही! तुम्ही हाती घेतलेले काम, त्यातील जोखीम, जीवाची जोखीम लक्षात आल्यावर टाकून पळून जाता का? का दटून निभावता हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण दटून उभे राहण्याचा निर्णय जी व्यक्ती वाटतो. तसा फक्त परिस्थितीच्या दबावातून घेत नसते तर तिचा तो सजग / कॉन्शन्स निर्णय असतो, त्यासाठी तिचे आपण कौतुक केले पाहिजे.

त्यांचे व्यक्तिगत धैर्य, त्यांनी मोजलेल्या किंमती यातर आहेतच पण त्याचबरोबर ते काही एका मूल्यांवर आधारित मानवी समाजाच्या कल्पनाचित्रात आपल्यापरीने न पुसले जाणारे रंग भरतात, ते चित्र खोटे नाही हे आपल्या कृतीने इतरांना कळवतात.

त्यातून आताच्या, पुढच्या पिढ्यांसाठी स्टोऱ्या / नॅरेटिव्ह तयार होतात. हे त्यांचे काम खूप मोठे आहे. मेनस्ट्रीम मीडिया, आपल्या राजकीय अजेंड्यासाठी त्या व्यक्तीचे कौतुक करते हे आपले राजकीय विश्लेषण बरोबरच आहे. मुद्दा असा आहे की मेनस्ट्रीम मीडियाने कौतुक केले म्हणून ती व्यक्ती आपल्या कौतुकासाठी अपात्र ठरावी की काय?

संजीव चांदोरकर (२५ जून २०२१)

Updated : 26 Jun 2021 11:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top