Home > मॅक्स ब्लॉग्ज > सन्मानाचा जय भीम

सन्मानाचा जय भीम

सध्या सर्वत्र गाजत असलेल्या जयभीम दाक्षिणात्य चित्रपटाचा बोलबाला असताना रामनाथ पानखडे यांनी या चित्रपटाबाबतच्या भावना त्यांच्याच शब्दात मॅक्स महाराष्ट्रसाठी पाठविल्या आहेत...

सन्मानाचा जय भीम
X

जिच्यासमोर एकवेळच्या जेवणाचा प्रश्नही आ वासून उभा आहे, ती लाखोंची ऑफर धुडकावताना म्हणते, "उद्या माझ्या मुलाने जर विचारलं की हे पैसे कुठून आणले तर मी काय सांगू? भलेही ही लढाई मी जिंकणार नाही, मात्र निदान मी माझ्या मुलांना हे तर सांगू शकते कि मी माझा स्वाभिमान गहाण ठेवला नाही, भलेही हरले मात्र मी लढले. आजही समाजात विविध रुपात सेनगिनी धडपडताना दिसून येते, अन्यायी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवताना दिसून येते.

चित्रपटातील घटना साधारण 20 वर्षांपूर्वीची असली तरी आजही यात फारसा बदल झालेला दिसून येत नाही. इरूला प्रमाणेच आजही इथे रिंगटोन ठेवली म्हणून, गोमांस असल्याच्या निव्वळ संशयावरून, लग्नात घोड्यावर बसला म्हणून काही जाती-धर्म समूहांना झुंडीने मारले जाते. केवळ माझ्या जातीचा आहे म्हणून बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जातात. जात आणि धर्म यांच्या आधारे काही धर्मान्ध टाळकी इथलं वातावरण बिघडवत राहतात आणि लाळघोटा मीडिया याला हवा देत राहतो. हे सर्व होत असताना सामान्य माणूस मात्र महागाई, बेरोजगारी, आरोग्यसुविधा यांसारख्या अनेक प्रश्नांशी एकाकी लढत असतो. त्याच्या सोबतीला मात्र कुणीही चंद्रु येत नाही.

व्यवस्थेसाठी माणसं आहेत की माणसांसाठी व्यवस्था असा प्रश्न इथे निर्माण होतो. इरूला सारख्या तथाकथित खालच्या जातीतील एका सामान्य बाईसाठी व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला कुणीही तयार नसत. अगदी सर्व खोटे पुरावे पेरले जातात, खोटे साक्षीदार रात्रीतून उभे केले जातात, लाखोंची आमिष दिली जातात. मात्र या सर्वांना पुरून उरणारा संघर्ष या चित्रपटात जागोजागी दिसतो. आंबेडकर कुठे प्रत्यक्ष दिसत नसले तरी संपूर्ण चित्रपटभर आंबेडकरी विचार चंद्रुच्या वागण्या बोलण्यातून दिसत राहतो. संविधान जेव्हा एका सामान्य माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे राहते, तेव्हा भ्रष्ट व्यवस्था त्याच्या पायाशी कशी लोळण घेते हा अंगावर काटा आणणारा सेनगिनी आणि तिच्या मुलीला घरी सोडायला येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा प्रसंग खूप काही सांगून जातो.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देणारी चित्रपटाच्या अगदी शेवटची फ्रेम हा या चित्रपटाचा कळस आहे. अगदी चाचपडत पेपर हातात घेऊ पाहणारी ती चिमुरडी जेव्हा चंद्रुच्या इशाऱ्यानंतर अगदी आत्मविश्वासाने खुर्चीवर बसते तेव्हा तिच्या डोळ्यातली चमक ही आपल्या सर्वांसाठी आशादायक आहे.

सामान्य माणसाचे आत्मभान जागृत करणारा, त्याला आत्मसन्मानाची जाणीव करून देणारा जय भीम प्रत्येकाने पाहायला तर हवाच पण जगायलाही हवा.

Updated : 11 Nov 2021 6:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top